भारतातील अनेक जनसंघटना, त्या जनसंघटनांतील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, विचारवंत आणि विश्लेषक दत्ता सावळे यांचे गुरुवार दि.१३ डिसेंबर रोजी त्यांच्या गावी, पंढरपुरी, वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. गेली ३-४ वर्षे त्यांना पार्किन्सनच्या आजाराने ग्रासले होते. शारीरिक हालचाली मंदावणे, विस्मरण, परावलंबित्व अशांळे त्यांचा शेवटचा काळ काहीसा त्रासदायक झाला होता. मात्र अशा अवस्थेतही भोवतालच्या सामाजिक-राजकीय घडामोडींविषयी ते कमालीचे सजग होते. अलिकडल्या काळातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानिमित्त काहीशी उभारी मिळालेल्या जनमानसाला, १९७० च्या दशकात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून उभारी मिळालेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनासारखे टोक कसे आणता येईल याविषयीचे मत भेटावयास येणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर ते आग्रहाने मांडत होते. यानिमित्ताने जनमानसाला मिळालेली उभारी विझू नये असे त्यांना मनापासून वाटत होते. या स्थितीत जाणतेपणाने वाटचाल करा असे ते कार्यकर्त्यांना सुचवीत होते. “कितीही अंदाधुंदीची आणि प्रतिकूल परिस्थिती असली तरी ती बदलण्याचे सामर्थ्य लोकांध्ये असते’ हा लोकसामर्थ्यावरचा दृढ विशास हे दत्ता सावळे ह्यांचे वैशिष्ट्य होते. दत्ता सावळे हे कमालीचे प्रसिद्धि-परायख होते. त्यांनी कधीही स्वतःला तज्ज्ञ वा विचारवंत मानले नाही. स्वतःचे कौतुक स्वतः करणे सोडाच पण इतरांनीही केले तरी त्यांना खपत नव्हते. तरीही विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात देशभरातील कानाकोपऱ्यात ‘कार्यरत’ असणाऱ्या कार्यकर्त्यांत दत्ता सावळे माहीत नाहीत असा कार्यकर्ता मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे. व्यापार-उदीम करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात ते जन्मले. मात्र या पारंपारिक व्यवसायात ते फारसे रमले नाहीत. मोठ्या जिद्दीने शिकत शिकत पुढे ते शिक्षक मुख्याध्यापक झाले. मात्र अशा पठडीबद्ध, औपचारिक शिक्षणातही त्यांना फारसे स्वारस्य वाटले नाही. मध्यमवयातच सहचारिणी निवर्तल्यानंतर आयुष्याच्या एका वळणावर व्यापक समाजातच आपला शिक्षकी पेशा बजावण्याचे मनोन ठरवून त्यांनी पंढरपूर सोडले. हा निर्णय घेताना, कुटुंबातील व्यावहारिक जबाबदाऱ्यांपासून अलिप्त होताना, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती या नात्याने असणारे भावनिक संबंध मात्र त्यांनी कसोशीने जपले. मूळची जिज्ञासू, अभ्यासूवृत्ती, तरुणपणी आलेला पुरोगामी, समाजवादी चळवळींशी संबंध यामुळे त्यांच्या शिक्षकी वृत्तीला कार्यकर्तेपणाची जोड मिळाली.
सन १९७८ च्या सुारास त्यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या शिक्षणाचे काम सुरू केले. मात्र पुढे एका जागी पाय रोवून काम करण्यापेक्षा विविवध ठिकाणचे अनुभव घेणे आणि त्या अनुभवांना एकत्र झारखंड, बिहार, प.बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल इ. विविध राज्यांत विस्तारत गेला. नुकतीच झारखंड मधील ‘जुड़ाव’ संघटनेने त्यांच्यावर ‘दत्ता सावळे : यायावर सहयात्री’ या शीर्षकाची एक फिल्म तयार केली. जनसामान्यांतील सामर्थ्यांचा वेध घेत फिरणारा घुक्कड सहयात्री असे हे त्यांचे वर्णन आहे. त्यांचे हे फिरणे अगदी अर्थपूर्ण होते. माणसांना समजून घेणे, समजावणे, त्यातून काही तथ्ये शोधणे आणि ती तथ्ये पुन्हा समाजासमोर मांडणे असा हा अनोखा प्रवास होता.
कमजोर, दुबळा मानला जाणारा समाज जर एकवटला तर त्या एकत्र येण्यातून एक अजब त-हेची ऊर्जा तयार होते. या अशा ऊर्जेतच समाजामध्ये वर्षानुवर्षे भिनलेली कमजोरी दूर करण्याचे सामर्थ्य असते. मनुष्याने आपली कमजोरी कशात आहे हे नीटपणाने समजून घेतले तर त्या जाणिवेतच कमजोरीवर मात करण्याची ऊर्जा चेतविण्याचे सामर्थ्य असते.’ हे तथ्य दत्ता सावळे यांनी सतत मांडले, पडताळून पाहिले. या अशा लोकसामर्थ्याचा प्रयय अनेकदा आलेला आहे. यातून पुढे येणारे सूत्र समान असले तरी त्याच्या हाताळणीच्या पद्धती भिन्न भिन्न असतात. चंपारण्याच्या लढ्यात म. गांधी यांनी याच सूत्राची हाताळणी आपल्या स्वतःच्या पद्धतीने केली होती. गावागावांतील निळीच्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या कहाण्या ऐकल्या. लोकांना बोलायला लावले. आपली दुःखे शेतकरी, मजूर गांधीजींसमोर मांडत.
आपली दुःखे मांडता मांडता लोक संघटित होत गेले. आणि जली इंग्रजी सत्तेविरुद्धचा मोठा सत्याग्रह उभा राहिला. तोही अहिंसेच्या मार्गाने. राजस्थानमधील ‘साथिन’ची चळवळ प्रसिद्ध आहे. त्या चळवळीत दत्ता सावळे ह्यांचे योगदान मोलाचे होते. वर्षानुवर्षे चार भिंतींच्या आड, घंघटामध्ये बावरलेल्या चेहऱ्याने दुःख लपविणाऱ्या स्त्रिया आपले मौन सोडून बोलू लागल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अन्याय सहन करणाऱ्या अशा आपण एकेकट्या नाही, अनेक जणी आहोत. या जाणिवेतूनच त्यांना भयमुक्त होण्याची वाट सापडली. दत्ता सावळेनी उत्तरप्रदेशातील बावरिया जमातीसोबत असाच संवाद साधला. या संवादातूनच छोट्या मोठ्या चोऱ्या करणाऱ्या बावरियांच्या लक्षात आले की, ‘अश्या चोऱ्यांतून आपले फारसे काही भले होत नाही. उलट चोऱ्या करण्यासाठी भाग पाडणाऱ्या दलालांचेच अधिक भले होते.’ असे भान येण्यातून बावरिया मंडळी चोरीच्या व्यवसायातून बाहेर पडू लागली.
दत्ता सावळे अशा लोकसामर्थ्याचे दूत बनले होते. देशभरात जेथे जेथे सामर्थ्यनिर्मिती, शोषणमुक्तीचे प्रयास दिसले तेथे तेथे ते जात राहिले. त्यांना बोलावणे येत गेले. अशा जाणत्या जनसंघटना, त्यात पुढाकार घेणारे कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते, लोकांधले जाणते नेतृत्व, दुःखाने पिचलेली माणसे या साऱ्यांबरोबर त्यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवांची देवाण-घेवाण केली. अशा शिक्षणप्रशिक्षणात ते कधीही टिपिकल प्रशिक्षक म्हणून वावरले नाहीत. तर अशा ऊर्जास्थळांना आपल्यातील ऊर्जेची जाणीव करून देता देता त्यांचे त्यांचे अनुभव एकमेकांना साहाय्यभूत आणि दिशादर्शक कसे ठरतील असा प्रयत्न ते जाणीवपूर्वक करीत असत. पुन्हा आपापल्या युगप्रश्नांशी जोडता जोडता व्यापक परिवर्तनाकडे कसे जाता येईल याचे भान या सर्वांध्ये राहावे असा त्यांचा आग्रह असे. जनसंघटनांनी आणि त्यांचेशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्याविषयी आणि भूमिकेबाबत गंभीर असावे असे त्यांना वाटत असे. प्रत्येकाकडे विचार करण्याचे सामर्थ्य असते हे सामर्थ्य जर नीटपणाने वापरले तर आपली कृतीही अर्थपूर्ण होते यावर त्यांचा पक्का विशास होता. आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक व्यक्ती विचार करायला कशी शिकेल यावर ते भर देत. खऱ्या अर्थाने ते लोकचळवळींचे शिक्षक होते.
दत्ता सावळे हे चतुरस्र आणि गाढे अभ्यासक होते. वाचणे लिहिणे आणि बोलणे यावर त्यांचा सततच भर असायचा. हे सारे करताना ते सतत चिंतनात मग्न असायचे. तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, कला, साहित्य, संगीत या सर्व विषयांत त्यांना रस असायचा. तुकाराम, कबीर, गांधी, फुले, लोहिया, आंबेडकर, मार्क्स, रॉय, विनोबा, पावलो फ्रेअरी यांच्या मांडणीविषयी त्यांना विशेष ममत्व होते. गांधी आणि फुले ह्यांच्या मांडणीवर अनेक अभ्यासवर्ग त्यांनी घेतले. या सर्व महान व्यक्तींच्या मांडणीचा अभ्यास आणि आदर करताना त्यातील विचारांची तर्कशुद्ध पद्धतीने चिकित्सा करण्यात
आणि त्या विचारांची कालातीतता तपासण्यांतही त्यांना रस होता. त्यामुळे त्यांनी स्वतःला मार्क्सवादी, गांधीवादी, समाजवादी अश्या चौकटीत बंदिस्त केले नाही. विचार केवळ विचारवंतच करतात किंवा मांडतात यावरही त्यांचा अजिबात विश्वास नव्हता.याच भावनेतून गोटुलसारख्या आदिवासींच्या पारंपारिक शिक्षणपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. हा अभ्यास सामूहिकरित्या व्हावा यासाठी ‘गोटुल’ अभ्यास गटाच्या बांधणीत त्यांनी पुढाकार घेतला. आधुनिक सभ्यतेच्या चौकटीत न सामावणारे आणि म्हणून मागासले समजले जाणारे आदिवासी, गावसमाज सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहेत असा त्यांचा दावा होता. ही भूमिका त्यांनी भारतातील विविध ठिकाणचे आदिवासी, गावसमूह यांचेसोबतच्या वावरण्यांतून, निरीक्षणातून विकसित केली होती. शिक्षणाबाबत दत्ता सावळे यांचा दृष्टिकोन अतिशय व्यापक होता. आपल्यादेशाने आजवर अंगीकारलेली शिक्षणपद्धती अत्यंत चाकोरीबद्ध आहे असे त्यांचे म्हणणे होते. शिक्षण ही काही कुणीतरी देण्याची आणि कुणीतरी घेण्याची वस्तू नाही, ती एक नवनिर्मितीची प्रक्रिया आहे. म्हणूनच मूल ही काही कोरी पाटी किंवा मातीचा गोळा नसतो तर ते जिज्ञासेचे, आणि नवनिर्मितीचे भांडार असते. म्हणूनच शिक्षक हा सहाध्यायी असावा लागतो’ असे ते म्हणायचे. प्रारंभी स्वतः शिक्षक — मुख्याध्यापक असताना आणि पढे ठाणे जिल्ह्यात तसेच इतर अनेक गटांसमवेत त्यांनी या भूमिकेतून काम केले. चिपळूणमधील ‘श्रमिक सहयोग’ या गटाने वंचित समाजाच्या शिक्षणपद्धतीविषयक मांडणीचे काम त्यांच्या मार्गदर्शनातून हाती घेतले. ही प्रक्रिया या गटाने गेली २० वर्षे नेटाने चालविली आहे. ‘वंचितांचे शिक्षण त्यांच्यातील सामर्थ्याच्या सहाय्याने अधिक मजबूतपणे घडते’ हे तथ्य या गटाने समोर ठेवले, तपासले आणि मांडले आहे.
कोणताही समाज हा सामाजिक-आर्थिक आणि राजकीय या तीन स्तरांवर समृद्ध झाला तर अधिक मजबूत होतो. मात्र ही समृद्धी चिरकाल टिकावयाची तर त्याचा सांस्कृतिक पायादेखील अधिक मजबूत असावा लागतो हे सूत्र त्यांच्या मांडणीत सातत्याने पुढे येत असे. म्हणून विकास हा केवळ आर्थिक किंवा भौतिक अंगाने मोजता येत नाही. अशातून चंगळवाद जन्माला येतो. आर्थिक-भौतिक विकास समतोलाने घडण्यासाठी त्याला सांस्कृतिक विवेकाची गरज असते. कुठे जायचे याचे नियोजन करताना कसे जायचे हे समाजाने ठरवायला हवे. हे मांडताना ते मार्क्स आणि गांधीना एकत्र जोडत असत. याच पद्धतीने त्यांनी आपला स्त्री-विषयक दृष्टिकोन विकसित केला होता. ‘स्त्री-वाद म्हणजे सत्ताविहीन जीवन-प्रणाली स्वीकारण्याचा विचार आहे’ हे त्यांनी आपल्या मांडणीतून पटवून दिले. स्त्रियांधील या आंतरिक ऊर्जेकडे त्यांनी अत्यंत आदराने पाहिले. अलिकडे एकदा त्यांच्या समवेत अजमेरमध्ये साथिन गटासोबत, चर्चेचा योग आला. साथिन चळवळीतील जन्या कार्यकर्त्या त्यांना प्रेपूर्वक भेटल्या. बोलता बोलता त्यातील एकजण म्हणाली की, “यह तो हमारी दत्ताबहन हैं.” विविध ठिकाणच्या स्त्री-कार्यकर्त्यांच्या मनांत त्यांच्या विषयी असाच विश्वास आणि आपुलकी होती. स्त्रिया, कष्टकरी, आदिवासी,दलित, भटके समाज आणि विशेषतः सर्व सामान्य माणसे या सर्वांविषयी त्यांच्या मनांत विशेष ममत्व होते.
दत्ता सावळे यांच्या व्यक्तिमत्त्वात विचार, कृती आणि भावना ह्यांचा अजब संगम होता. याची प्रचिती झारखंड मधील आदिवासी कार्यकर्ते घनश्याम यांनी त्यांच्याविषयी काढलेल्या उद्गारातून सहज येते. घनश्याम म्हणाले की, ‘मैं तो जयप्रकाश नारायणजी के संपूर्ण क्रांति आंदोलन से प्रेरणा लेकर काम करने लगा. पहले डॉ. लोहिया थे जिन्होंने हमें विचार करना सिखाया था. डॉ. लोहिया और जे.पी. के जाने के बाद हम निराश हो गये. लेकिन जब हमें दत्ताजी मिले तो ऐसा लगा कि, डॉ.लोहिया का विचार और जयप्रकाशजी की भावना हमें एकसाथ मिली. और हम फिर काम करने लगे.” डॉ. लोहिया आणि जे.पी. यांना ज्यांच्यात एकत्र पाहावे असे हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. दत्ताजींनी कार्यकर्त्यांना घडवले. जनआंदोलनांना दिशा दिली. खंत याची वाटते की, त्यांची मांडणी, त्यांचे कार्य आजवर अप्रकाशित राहिले. साधना प्रकाशनाच्या जाणिवेने आम्हां ऐसे चेतविले या पुस्तकात त्यांनी आपल्या दमखिंडीतील प्रयोगाविषयी तपशिलाने लिहिले. त्याखेरीज त्यांची मांडणी फारशी संकलित झालेली नाही. हे काम आता कार्यकर्त्यांना करावे लागेल. त्याचे विचार त्यांच्या प्रेरणा त्यांच्या जाण्याने संपणार नाहीत हे ही तितकेच खरे. देशभरात ठिकठिकाणी त्यांची प्रेरणा घेऊन चाललेले कार्य जितक्या जोाने पुढे गेले तरच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली व्यक्त होईल. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सद्गोपाल यांनी त्यांच्याविषयी बोलताना म्हटलेहोते की, “दत्ताजी तो हमारी पाठशाला हैं” ही पाठशाला सदैव कार्यकर्त्यांना आणि लोकचळवळीना प्रेरणा देत राहील यात शंकाच नाही.
झिम्मड, सती-चिंचघरी, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी-४१५६०५
दूरभाष : ०२३५५-२५६००४, भ्र. ९४२३०४७६२० इ-मेल : indulkarrajan@gmail.com