विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
राजा, खरेतर नियमाप्रमाणे मला तुला गोष्ट सांगणे आणि त्यानंतर प्रश्न विचारणे भाग आहे, पण खरे सांगू? आज कोणतीही नवीन गोष्ट तुला सांगण्याची अजिबात इच्छा नाही बघ. त्यापेक्षा असे करू या का? आपला जो हा उद्योग कित्येक वर्षांपासून, नव्हे शतकांपासून चालू आहे, तू, म्हणजे राजा विक्रमादित्याने, प्रेत उचलून खांद्यावर टाकायचे आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागायचे, मग मी जागे होऊन तुला एक गोष्ट सांगायची आणि त्या आधारावर प्रश्न विचारावयाचे, त्यावर तुला उत्तर द्यावयास बाध्य करून तुझ्या मौनव्रताचा भंग करावयाचा आणि मी लगेच झाडावर जाऊन लोंबकळावयास लागावयाचे. हीदेखील एक कथाच होऊ शकते, नाही काय? तेव्हा असे कर, आज आपल्या ह्या अजरामर उद्योगाबद्दल किंवा कथेबद्दल म्हण हवे तर, मलाच पडत असलेल्या प्रश्नांची तू उत्तरे दे बघू. आपण हा जो उद्योग शतकानुशतके चालवला आहे. ह्याचे प्रयोजन काय? कधी सुरू केला आपण हा उद्योग आणि संपणार तरी कधी? काय आहे त्यामागचे गूढ कारण ? मीसुद्धा पार विसरलोय बघ सगळे.
आणि हो, तू माझ्या ह्या सगळ्या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे देऊ शकला नाहीस तर परिणाम तुला ठाऊकच आहे. तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील.
वेताळाचा आजचा गुगली बघून राजा विक्रमादित्य क्षणभर गोंधळला. शताकानुशतके झालेल्या ह्या सवयीवरच वेताळ प्रश्न उपस्थित करेल ह्याचे त्याला पूर्वानुमान करता आले नव्हते आणि खरे सांगायचे तर वेताळाप्रमाणेच त्यालाही ह्या सगळ्या गोष्टींचा आता विसरच पडला होता. पण क्षणभरातच तो सावरला आणि जरा विचार करून बोलू लागला.
आपला हा उद्योग अगदी बाबा आदमपासून सुरू आहे बघ. उत्क्रान्त होत माकड मानवप्राण्यात रूपांतरित झाले तेव्हापासूनचा, मानव विचार करू लागला तेव्हापासूनचा. आपण दोघेच त्याच्या विचारक्षमतेचे साक्षीदार नव्हे पाईक आहोत, आपल्याशिवाय विचार करणेच त्याला अशक्य. प्रत्येक मानवाच्या विचारप्रक्रियेचे आपण दोन हिस्से, एकाने दुसऱ्याला डिवचावयाचे, दुसऱ्याने पहिल्याला प्रश्न विचारावयाचे, पहिल्याने मग त्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घ्यायचा आणि उत्तर द्यावयाचे. उत्तरे जर तर्कसंगत बरोबर वाटली आणि त्यांनी दुसऱ्याचे जर समाधान झाले तर थोडा वेळ शांतता मग परत खेळ सुरू. एकाने जर मौन व्रत स्वीकारले तर खेळ कसा रंगणार? त्यामुळे त्याचे मौन व्रत तोडायलाच हवे. आणि त्याने दिलेली उत्तरे जर तर्कसंगत आणि समाधानकारक नसली किंवा सापडलीच नाहीत तर मग प्रचंड अस्वस्थता इतकी की जणू आपल्या डोक्याची शंभर शकले होऊन आपल्याच पायावर लोळताहेत. कोणताही विचार करावयाचा झाल्यास तो आपल्या ह्या द्वंद्वामुळेच किंवा संवादामुळेच साध्य होणार. संवाद सुरू असेपर्यंत विचारमंथन आणि जर संवाद थांबला तर स्मशानशांतता. त्यामुळे आपली ही कथा मानजातीच्या उदयापासून अस्तापर्यंत आणि प्रत्येक मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अशीच चालत राहणार.
आता तू न विचारलेल्याही एका प्रश्नाचे उत्तर देऊन टाकतो. ह्या कथेत माझे नाव विक्रमादित्य आणि तुझे वेताळ का बरे? कारण माझ्या नावातला ‘वि’ तुझ्या नावातला ‘वे’ आणि ह्या कथेचा ‘क’ मिळूनच मानवाच्या डोक्यात ‘विवेका’ची निर्मिती होते नाही का?
विक्रमादित्याचे हे उत्तर ऐकून वेताळाचे पूर्ण समाधान झाले आणि अश्या तऱ्हेने विक्रमादित्याच्या मौनव्रताचा भंग होताच वेताळ आनंदाने परत झाडावर जाऊन लोंबकळू लागला.
गौरीवंदन, 123, शिवाजीनगर, नागपूर 440010.
भ्र.ध्व.: 9822736808, इ-मेल: bharat_i@yahoo.com