एक पत्रकार म्हणून मध्यवर्ती कारागृहात जाण्याची वेळ माझ्यावर अनेकदा आली आहे. तुरुंगाभोवतीच्या अजस्र भिंती, लोखंडी दरवाजा, भोवतालची बाग, तिथे वावरणारे जुने कैदी, पोट सुटलेले पोलिस, आतबाहेर करणाऱ्या, लाँड्रीच्या किंवा भाजीपाल्याच्या गाड्या, दर तासाला होणारा घड्याळाचा टोल वगैरे वातावरण माझ्या परिचयाचे आहे. बाहेरच्या जगासाठी गूढ असलेल्या आतल्या जगाबद्दलची उत्सुकताही मी पाहिली व अनुभवली आहे. मात्र मला विशेष कुतूहल आहे, ते तेथे भेटायला येणाऱ्या कैद्यांच्या कुटुंबीयांविषयी. त्यांच्यामध्ये बहुतांश बायकाच असतात. बायको, बहीण, आई वगैरे. आपल्या माणसाला फक्त वीस मिनिटे भेटण्यासाठी कुठून कुठून दूरवरच्या खेड्यापाड्यांतून आलेले ते लोक. त्यांचे रापलेले चेहरे. व्याकुळ डोळे, त्याच्या शिक्षेचे उर्वरित दिवस मोजत मोजत संसाराचा गाडा हाकताना होणारी त्यांची कसरत. त्याच्यासाठी पॅरोल किंवा मेडिकल लीव मिळवण्यासाठी चाललेला आटापिटा. दारावरच्या जमादाराशी कधी हुज्जत घालत, कधी आर्जव करत सोबत आणलेली एखादी पिशवी आत पाठवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड…
कोर्टात आरोपी आणले जातात तेव्हाही त्या गाडीभोवती पहिला गराडा पडतो तो आपल्या लहानग्यांना कडेवर घेऊन आलेल्या त्यांच्या घरातल्या बायकांचा. त्याही परिस्थितीत पुरुष माणसे गाडीच्या जाळीतून जामिनासाठीचे सल्ले देताना आणि स्त्रिया आपण केलेले प्रयत्न सांगताना, पोरांना बापाला भेटवताना दिसतात.
ही दोन्ही दृश्ये डोळ्यांपुढे येण्याचे कारण म्हणजे अलिकडे वाचनात आलेले. नंदिनी ओझा यांचे व्हिदर जस्टिस हे पुस्तक आणि त्यातील कैदी स्त्रियांच्या कथा. ह्या स्त्रियांचे अनुभव मात्र वर सांगितल्याच्या नेमके उलट आहेत. तब्बल तीन-तीन वर्ष त्यांना घरचे कुणी भेटायला येत नाही, जामीनासाठी प्रयत्न करीत नाही, की पत्रही पाठवीत नाही. त्यांच्या वाट्याला कैद्यांच्या कायदेशीर सुविधा तर येत नाहीतच, पण जे काही भोग येतात त्यांवर हे पुस्तक जळजळीत प्रकाश टाकते.
फक्त एवढेच नाही. पुस्तकाची झेप आणखी मोठी आहे. एखाद्या गुन्ह्याचा तपास करणारी पोलिस यंत्रणा, त्यासाठी शिक्षा ठोठावणारे न्यायालय, अंमलबजावणी करणारे कारागृह आणि तेथे शिक्षा भोगणाऱ्या स्त्री कैदी. ह्या दृष्टीने विचार करता, समाजातील एका जगव्याळ व्यवस्थेचा अक्राळविक्राळ चेहरा ते आपल्यासमोर आणते. तिचे नाव जरी न्यायव्यवस्था असले, तरी ती पदोपदी अन्यायालाच जन्म देते.
ह्या पुस्तकाचे नेपथ्य म्हणजे कारागृह, त्याच्या नायिका म्हणजे ह्या स्त्री-कैदी आणि त्याचे कथानक म्हणजे अत्याचार, क्लेश आणि पीडा ह्यांनी बरबटलेल्या त्यांच्या जीवनकथा. परंतु हे पुस्तक केवळ त्याच्यावर न थांबता त्या कथांचा अन्वयार्थ लावण्यास व न्यायाची पुन्हा व्याख्या करण्यास भाग पाडते. ह्यातील प्रत्येक कथेची नायिका असलेली स्त्री ह्या विराट अन्यायमूलक व्यवस्थेपुढे अगतिक झालेली दिसते. भीषण परिस्थितीतून मार्ग काढण्याचा तिचा प्रयत्न म्हणजेच लौकिक अर्थाने तिच्या हातून झालेला गुन्हा. त्याच्या पाठोपाठ तिच्या आयुष्यात क्रमाने येणारे पोलिस, न्यायालय आणि कारागृह. म्हणजे जगण्याच्या परीक्षेत ती सपशेल नापास. सभ्य, पापभीरु समाजाचे दरवाजे तिला बंद. गुन्हा कशाला म्हणावे, शिक्षा कशाची आणि ती कोणी द्यावी, ती भोगताना काय आणि भोगल्यानंतर काय….सारेच प्रश्नच प्रश्न…
पुस्तकाचा जन्मच लेखिकेने घेतलेल्या एका जळजळीत अनुभवातून झाला आहे न्याय-अन्यायाच्या व्याख्या धुडकावून लावणारा तो प्रसंग लेखिकेच्या आयुष्यात महाविद्यालयीन शिक्षण घेताना आला. परीक्षेसाठी जात असताना एसटी स्टँडवर लेखिकेचे पाकीट चोरीस गेले होते. तेव्हा सर्वांना प्रथम संशय आला तो गाडीतल्या एका कळकट महिलेचा. पाकिटातून हॉलतिकीट चोरीला गेल्यामुळे आगतिक झालेली विद्यार्थी दशेतील लेखिका, त्या कळकट बाईला साणकन कानाखाली मारणारा पोलिस हवालदार, पुढे तिला झालेली शिक्षा आणि शेवटी मुद्देमालातून ते पाकीटच गायब करणारा पोलिस अधिकारी. सारेच उद्विग्न करणारे. पुढे समाजकार्य अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मध्यवर्ती कारागृहात गेल्यावर तिच्याशी लेखिकेची पुन्हा गाठ पडली. पाकीटमारी आणि तशाच स्वरूपाच्या किरकोळ गुन्ह्यांसाठी तिला तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. त्यामुळे मोठ्या मुलापासून तिची ताटातूट झाली आणि धाकट्याचा तर मृत्यूच ओढवला. तेव्हा तिच्या नजरेला नजर देता आली नसली, तरी इथल्या शोषणाची कल्पना आणि त्याविरोधात लढा देण्याचे बळ त्याच डोळ्यांनी आपल्याला दिल्याचे, लेखिका नमूद करते.
पुढे नर्मदा बचाव आंदोलनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष कारावास भोगण्याची वेळ आल्यावर स्त्री-कैद्यांसोबत राहाण्याची जी संधी लेखिकेला मिळाली, त्यातून कळलेल्या ह्या कथा. अशा एकूण दहा कथा यात आहेत. ह्या कथा वर म्हटल्याप्रमाणे केवळ महिलाकैद्यांच्या जीवनातील घटिते किंवा त्यांचा संघर्ष ह्याचे वर्णन करून न थांबता त्यामागच्या अन्यायी व्यवस्थेचा वेध घेतात. पुस्तकातल्या एकेक कथेची नायिका एक स्वतंत्र चेहरा घेऊन येते. कुणी उदास, कुणी हताश, कुणी धीरगंभीर तर कुणी स्थितप्रज्ञ. मग तो चेहरा फक्त तिचा राहात नाही. तथाकथित गुन्हे केलेल्या, करू इच्छिणाऱ्या किंवा कराव्या लागलेल्या तमाम बायकांचा प्रातिनिधिक चेहरा बनतो तो. त्यांचा कारागृहातील वावर, वर्तणूक, परस्परसंबंध हे सारे काही त्याची प्रतिक्रिया म्हणून आपल्यासमोर येते. ही प्रतिक्रिया कधी त्या अन्यायाला सर्व ताकदीनिशी केलेला विरोध म्हणून, तर कधी त्याही परिस्थितीतून स्त्रीत्वाला साजेसा विधायक मार्ग काढण्याच्या प्रयत्नातून येते.
“पुस्तकातील पहिली कथा आहे ती रेवलीची. सुशिक्षितपणामुळे लेखिकेकडे एक काम अनाहूतपणे चालून येते, ते स्त्री-कैद्यांसाठी पत्रे लिहून देण्याचे. रेवलीही तिच्याकडे यासाठीच येते. कैदेत पडल्यापासून तब्बल चार वर्षांनी ती हे पत्र आपल्या नवऱ्यातला लिहिणार असते. तेही तुरुंगात जन्माला आलेला त्यांचा मुलगा तीन वर्षांचा झाला आहे. आता त्याला रिमांड होममध्ये हलवण्यात येणार आहे. त्यापूर्वी नवऱ्याने येऊन त्याला घेऊन जावे हे सांगण्यासाठी. काळजाला चीर पाडणारा हा प्रसंग. यातही हद्द म्हणजे पत्र लिहून झाल्यावर नवऱ्याचा पत्ता काय, तर प्लॅटफॉर्म नंबर अमुकतमुक, धर्मापुरी रेल्वे स्टेशन. एवढी अनिश्चित, अस्थिर आयुष्ये असंख्य लोक जगत असताना, आपण कोणत्या स्थैर्याच्या गप्पा करतो?
एका शांत गावातल्या सुखी कुटुंबातली रेवली. एक दिवस नदीला आलेला पूर सारे काही बदलून टाकतो. पुरामुळे विस्थापित झालेले रेवलीचे कुटुंब शहरातल्या एका झोपडपट्टीत कोंबले जाते. तिथेही जगण्यात पराभूत झाल्यावर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर येते. मरणोन्मुख मुलाच्या उपचारासाठी चरस पोहोचवण्याची जोखीम पत्करणारी रेवली प्लॅटफॉर्मवरच्या उघड्या विश्वातून थेट तुरुंगातल्या बंदिस्त विश्वात पोहोचते. तुरुंगात जन्मलेल्या मुलाची खबर बापाला नाही की चार वर्षांपासून शिक्षा भोगणाऱ्या रेवलीला नवऱ्याचा पत्ता माहीत नाही.
दायलीची ओळख करून देताना लेखिका म्हणते, दायलीचे जीवन तर इतके क्षुल्लक की ती तुरुंगात असो वा तुरुंगाबाहेर – कुणाला काहीच फरक पडत नाही. दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या दायलीलाही आजवर ना कोणी भेटायला आलेले, ना कुणाचे पत्र आले. ना कुणी तिच्या सुटकेसाठी प्रयत्न केला, ना जामीनासाठी. एकलकोंड्या स्वभावामुळे सगळ्यांनी वेडी ठरवलेली दायली तुरुंगातल्या मुलांमध्ये मात्र खुलायची. चिंध्या जमवून त्यातून मुलांसाठी बाहुल्या बनवायची. दायलीचा कथित गुन्हा काय तर तिने चारशे रुपयांची साडी चोरली होती. घटनेनंतर दोन वर्षांनी तिचा खटला न्यायालयात उभा राहिल्याची अनपेक्षित बातमी मिळते आणि नंतर त्यासाठी दोन वर्षांची शिक्षा. सगळेजण तिला शहाणपणाचा सल्ला देतात. शिक्षा कबूल कर, पटकन सुटका होईल. सगळ्यांचा हा सल्ला शांतपणे एकून घेणारी दायली प्रत्यक्ष त्यादिवशी तुरुंगात परतते. सगळ्यांना आश्चर्य. पण दायली शांत आणि ठाम, मी साडी चोरली नाही, मी खोटं बोलणार नाही. कोण शहाणे आणि कोण वेडे? सारेच अनाकलनीय…..
बेजबाबदार नवऱ्याला सांभाळताना सासूशी अलवार नाते जपणारी रेहाना. नवऱ्यांच्या पश्चात् मुलाला वाढवणाऱ्याने सासूबद्दल अभिमान बाळगणारी. दारुड्या नवऱ्याला सुधारण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या या सासूसुना. मात्र शेवटी नवऱ्यानं आपल्या आईला मारले याचा बदला घेण्यासाठी रेहानाने थेट सासूचाच खून केला. या प्रसंगाने हादरून गेल्यानंतर ‘सुधारलेला’ नवरा बाहेरच्या जगात आणि रेहाना तुरुंगात. चौदा वर्षांची शिक्षा संपल्यावर आपण 34 वर्षांच्या असू, तेव्हा पुन्हा नवऱ्यासोबत नव्याने संसार करू या स्वप्नात ती अजूनही हरवत असे.
नवऱ्याचा कारखाना अचानक बंद झाल्याने दारोदार पावडर विकून संसार सावरण्याचा प्रयत्न करणारी शकुंतला. नवऱ्याच्या वागण्याने उद्विग्न होऊन शेवटी घराजवळच्या तलावात मुलांसह उडी घेते. मुले मरतात आणि शकुंतला मात्र वाचते. मुलांच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी तिला गजांआड व्हावे लागते. नऊ वर्षांपासून तुरुंगात असलेली शकुंतलाही सुटकेची वाट पाहातेय. पण त्यानंतर तिची वाट वेगळी असणार आहे. ती त्याच तलावाकडे जाणार आहे. अनेक वर्षांपासूनची तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी….
साथीदाराच्या फसवणुकीतून जन्माला आलेले मूल वाऱ्यावर सोडणारी बुध्वा तुरुंगात खुश आहे. ती म्हणते, मी बाहेर पडले तर लोक मला दगडाने ठेचून मारतील. नर्मदा घाटीतील विस्थापनाच्या विरोधात लढा देणारी रेवा. शहरात शिक्षणासाठी येऊन वेश्याव्यवसायात अडकलेली मुक्ता. तिथून मुक्त होण्याऐवजी तुरुंगाच्या बराकीतही अस्पृश्य ठरवली गेलेली. लग्न टिकवण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी सीमेपलीकडून सोने आणण्याचा धंदा स्वीकारणारी शबनम. अटकेच्या वेळी सोन्याची बिस्कीटे जप्त करणाऱ्यात पोलिसांनी प्रत्यक्ष मुद्देमालात फक्त काही बिस्कीटे दाखवल्यावर भर कोर्टात खवळून उठणारी. तीस बिस्कीटे हडप करणाऱ्या पोलिसांचा गुन्हा मोठा, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करणारी. परिणामी तिच्या वाट्याला तुरुंगाधिकाऱ्याचा जास्तीचा जाच आला. रंगू आणि कम्मू. दोघींचाही गुन्हा सारखाच. आपल्या मुलांच्या भल्यासाठी केलेला नवऱ्याचा खून. फरक इतकाच की एकीला पश्चात्ताप होतोय, दुसरीला नाही. पण त्यात त्या अडकून राहिल्या नाहीत. दोघींची शिक्षा एकाच सुमारास संपणार आहे. त्यानंतर एकत्र राहन मुलांना चांगले वाढवायचे असे दोघींनी ठरवन टाकले आहे..
आपल्या मनात पटकन येते, की हे फक्त बायकाच करू शकतात. लेखिकाही हेच म्हणते, पण वेगळ्या संदर्भात. स्त्रियांनी केलेले गन्हे हे हिंसकपणातन, सडातन किंवा कुणाचे वाईट करण्याच्या उद्देशाने झालेले नाहीत. त्यांच्या मनात गुन्हेगारी वृत्ती नाही. कायद्याच्या परिभाषेत जरी तो गुन्हा असला, त्यासाठी त्यांना शिक्षा झाली असली, ती भोगल्यावर त्या आयुष्यातून उठल्या असल्या, तरीदेखील खऱ्या अर्थाने त्या गुन्हेगार नाहीत. आपले कुटुंब सावरण्यासाठी, मुलाबाळांना आजारातून बरे करण्यासाठी, तर कधी त्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना तसे काही करणे भाग पडते. त्या परिस्थितीत तिच्या हातून तो गुन्हा घडणे अपरिहार्य होते. बऱ्याच प्रकरणांत इतरांनी केलेल्या गुन्ह्यांची किंमत स्त्रियांना मोजावी लागली. दोन्हीचे कारण एकच. ती स्त्री होती म्हणुनी…
ह्याचे परिमार्जन कसे होणार? त्यांना न्याय कसा मिळणार? आणि न्यायव्यवस्थेची रचना तर सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी झाली आहे म्हणतात… देशातील स्त्रीवादी चळवळ, मानवाधिकार चळवळ आणि कायदेविषयक जाणीव जागृती चळवळ ह्यांना थोडा काही हातभार लागला तर आपल्या लेखनाचे सार्थक होईल अशी आशा लेखिका पुस्तकात व्यन करते. आपणही ती करूया का?
(व्हिदर जस्टिस, मूळ लेखिका नंदिनी ओझा, अनुवाद प्रियंका कुलकर्णी, मेहता पब्लिशिंग हाऊस, किंमत 110 रुपये)
बी-16, श्रीजी अनेक्स, पाथर्डी फाटा, मुंबई रोड, नाशिक 422010 भ्रमणध्वनी – 9764443998
सारा इतिहास पाहता, विज्ञान हे मूल्यहीन असते, ते केवळ सत्याचा पाठपुरावा करते हे खरे नाही असे दिसते. समाजातील विशिष्ट हितसंबंध, सत्ताधारी आपल्या सोयीसाठी विज्ञान वापरू शकतात आणि तसे करतात. अर्थात हा विज्ञानाचा दोष नाही, हेही तितकेच खरे आहे. परंतु केवळ तंत्रज्ञानाचाच दुरुपयोग होतो असे नाही, तर विज्ञानाचाही होऊ शकतो. तेव्हा, ह्या दोन्ही प्रकारच्या दुरुपयोगांविरुद्ध आपण काळजी घेतली पाहिजे, आवाज उठवला पाहिजे हे उघड आहे.
-माधव गाडगीळ