कोलंबसाने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर युरोपमधून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन तेथे स्थलांतरित झाल्या. त्यांनी तेथील आदिवासी रक्तवर्णीय लोकांकडून जमीन घेतली व आपल्या वसाहती उभारल्या. अशा रीतीने संयुक्त संस्थानांची स्थापना झाली. संपूर्ण भूप्रदेशाचा कायापालट झाला. आधुनिक युगातील अतिविकसित भांडवलवादी साम्राज्य आज तेथे उभे आहे. ह्या सगळ्या स्थित्यंतरामधून जाताना तिथल्या मूळच्या जमीन, हवा पाण्याला काय वाटले असेल? तिथल्या किडामुंग्यांना, पशुपक्ष्यांना आणि माणसांना काय क्लेश झाले असतील? या कामात
ह्या संबंधात वाचनात आलेल्या एका इंग्रजी स्फुटलेखाचा अनुवाद करून पुढे देत आहोत. लेखकाचे नाव मिळाले नाही, पण त्याने काही फरक पडू नये. त्यातील भावना महत्त्वाची आहे. नाहीतरी ज्याचे नाव आज आपल्याला माहीत आहे असा कोणी प्रसिद्ध पुरुष तो नसेलच.
सिऍटल येथील रेड इंडियनांच्या प्रमुखाने संयुक्त राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष फ्रैंकलीन पीअर्स ह्यांना सन — मध्ये लिहिलेल्या ह्या पत्रामधून कोणत्याही भूमीवरील आदिवासींची वैश्विक व्यथाच व्यक्त झाली आहे…
….आकाश आणि जमिनीची ऊब कशी विकता येणार? आम्हाला तर ही कल्पनाच फार विचित्र वाटते. हवेचा ताजेपणा, पाण्याचे तुषार हे जर आमच्याच मालकीचे नाहीत, तर तुम्ही ते आमच्याकडून कसे विकत घेणार? ही इंच-इंच भूमी आम्हा लोकांसाठी पवित्र आहे. पाईन वृक्षाचा प्रत्येक सूचिपर्ण, वाळूचा प्रत्येक किनारा, घनदाट जंगलातील धुक्याचा प्रत्येक कण, त्या वनात घोंघावणारा प्रत्येक कीटक म्हणजे आम्हा लोकांच्या महन्मंगल भावविश्वाचाच एक भाग आहे. तेथील झाडांमधून वाहणारा रस हा प्रत्येक रेड माणसाची स्मृती वाहन नेणारा रस आहे. गोरा माणूस मृत्यूनंतर स्वर्गलोकात फिरायला लागला म्हणजे त्याला त्याच्या जन्मभूमीचा विसर पडतो. आम्हाला मात्र तो कधीच – मृत्यूनंतरही पडत नाही, कारण ही रूपसंपन्न निस्तुला पृथ्वी म्हणजे आमची माताच आहे. त्यामुळे आमच्यात तिचा अंश आहे आणि तिच्यात आमचा. येथील सुगंधी पुष्पे व ती धारण करणाऱ्या लतिका म्हणजे आमच्या भगिनी आहेत. येथील गोंडस हरिण, चपळ घोडा आणि भव्य गरुड हे आमचे बंधू आहेत. ह्या भूमीची ही दगडी शिरोभूषणे, तिच्या उद्यानांमधील विविध स्वादांचे हे रस आणि त्यामधून घावणाऱ्या कुत्र्याच्या पिलाच्या अंगाची ऊब हे सारे एकच आहे. एका विश्वव्यापी कुटुंबाचाच ते भाग आहे.
आता वॉशिंग्टनमध्ये बसलेले राष्ट्राध्यक्ष आमची भूमी त्यांना खरेदी करायची आहे म्हणून संदेश पाठवतात, तेव्हा तो ह्या कुटुंबातील सर्वांसाठी असतो. ते थोर राष्ट्रप्रमुख असा निरोप पाठवतात की ते आमच्यासाठी काही जागा राखून ठेवणार आहेत, जेथे आम्ही आमच्यापुरते सुखसमाधानात राहू शकू. ते आमचे पिता असतील, आणि आम्ही त्यांची बाळे. ह्या प्रस्तावाचा आम्ही निश्चितच विचार करू, पण एवढे मात्र सांगतो, की हे आमच्यासाठी सोपे नाही. कारण ही समग्र भूमीच आमची आई आहे. इथल्या नद्यांत आणि झऱ्यांतून जे वाहतंय ते पाणी नसून आमच्या पूर्वजांचे रक्त आहे. आम्ही जरी हे तुम्हाला विकले, तरी त्याचे पावित्र्य तुम्हाला कायम ध्यानात ठेवावे लागेल आणि आपल्या मुलांच्याही ध्यानात ते आणून द्यावे लागेल. ह्या स्फटिकजळात पडलेले कोणतेही भयानक प्रतिबिंब माझ्या आप्तस्वकीयांच्या आयुष्यातील प्रसंगांची मला आठवण करून देते. त्या पाण्याची झुळझुळ म्हणजे माझ्या वाडवडिलांचा आवाज आहे. ह्या तहान शमविणाऱ्या नद्या म्हणजे माझ्या बहिणी आहेत. त्या आमचे पड़ाव वाहून नेतात आणि आमच्या मुलांच्या मुखात पाणी घालतात. आमची जमीन तुम्ही खरेदी केली, तर तुम्ही तुमच्या मुलांनाही हे शिकवले पाहिजे की त्या आमच्याप्रमाणेच तुमच्याही बहिणी आहेत. तुम्ही त्यांच्यावर तुमच्या बहिणींप्रमाणे माया केली पाहिजे. गोऱ्या माणसांना आमच्या जगण्याच्या रीतीभाती, तौरतरीके कळत नाहीत हे आम्हाला ठाऊक आहे. ह्या विराट भूमीवरील कोणताही भूप्रदेश त्यांच्यासाठी सारखाच आहे. आमच्या दृष्टीने मात्र, रात्रीच्या वेळी चाल करून येणारा आणि ह्या जमिनीवरून आपल्याला जे काही हवे असेल ते ओरबाडून घेणारा प्रत्येक माणूस हा येथे उपरा आहे. तो ह्या जमिनीचा शत्रू आहे. कोणतीही जमीन एकदा पादाक्रांत केली, की तो आपली पाळेमुळे विसरून एखाद्या जेत्याप्रमाणे त्यावर हिंडूफिरू लागतो. आपल्या पूर्वजांनी चिरनिद्रा कोठे घेतली आहे, आपल्या मुलांचा जन्म कुठे झाला होता, हेदेखील त्याला आठवत नाही. आपली मातृभूमी आणि पित्याप्रमाणे छत्र धरणारे आकाश ह्यांना तो शेळ्यामेंढ्या किंवा रत्नमोती ह्यांप्रमाणे खरेदी, विक्री, लूटमार करण्याच्या वस्तू मानतो. त्याच्या आधाशीपणामुळे ह्या सुजला सुफला पृथ्वीचे एक दिवस वाळवंट बनून जाईल. मला काही कळत नाही. तुमच्या जगण्याच्या पद्धतीच आमच्यापेक्षा वेगळ्या आहेत बहुतेक. तुमच्या शहरांकडे नुसती नजर टाकली, तर आम्हा लोकांच्या नजरेला क्लेश होतात. तेथे एकही शांत जागा नसते. वसंतातली कोवळी पालवी उमलण्याची चाहूल तेथे घेता येत नाही, की कोण्या कीटकाच्या पंखांची उघडझाप अनुभवता येत नाही. मग काय ठेवलेय तुमच्या त्या शहरांमध्ये? असो. मी पडलो रानटी माणूस, म्हणून कदाचित मला कळत नसेल. तिथला गोंगाट तर मला माणसाची अप्रतिष्ठा करणारा वाटतो. तेथे राहण्यासारखे आहेच काय माणसाला, मधमाश्यांचा गणगणाट किंवा एखाद्या डबक्यामध्ये बेडकांचे सामहिक पठण जर ऐकायला मिळत नसेल तर? असो. मी पडलो रानटी माणूस, म्हणून कदाचित मला कळत नसेल. आम्हा रानटी माणसांना तळ्यातील पाण्यावरून अलगदपणे येणाऱ्या हवेचा स्पर्श किंवा रानवाऱ्याचा गंध हेच अधिक मोहवितात. हवा आमच्यासाठी लाखमोलाची आहे कारण सगळ्यांचे निःश्वास तीत सामावलेले असतात- पशू, पक्षी, कीटक, झाडे, पाने सगळ्यांचेच…गोऱ्या लोकांची हवा ही मात्र फक्त त्यांचीच असते. त्यातू- ही, गोरा माणूस, श्वासाने जी आपल्या आत भरून घेतो, त्या हवेची कधी दखल घेत असेल असे वाटत नाही. अनेक दिवसांपासून मृत्युशय्येवर असलेल्या माणसाप्रमाणे, त्याला दुर्गंधीही जाणवत नाही. पण आमची जमीन खरेदी केली मात्र ही हवा अनमोल आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल. ही तीच हवा आहे जीतून आमच्या पणजोबांनी पहिला श्वास घेतला आणि जिने त्यांचा शेवटचा उसासा सामावून घेतला. आम्ही जर आमची जमीन तुम्हाला विकली, तर तुम्ही ती पवित्र भूमी वेगळी काढून ठेवली पाहीजे, जेथे उद्यानातील पुष्पांनी सुगंधित आणि पाण्याच्या तुषारांनी ताजीतवानी झालेली हवा खायला गोरे लोक देखील जाऊ शकतील.
…तर आम्ही, आमची जमीन खरेदी करण्याच्या तुमच्या प्रस्तावाचा जरूर विचार करू. मात्र आमचा होकार असल्यास तो सशर्त असेल. गोऱ्या लोकांनी येथील पशूना बंधूप्रमाणे वागविले पाहिजे. होय. मी रानटी आहे. होय. मला जगण्याची दुसरी कोणतीही रीत ठाऊक नाही. एका गोऱ्या माणसाने आगगाडीतून जाताना बंदुकीने उडविलेले हजारो रानरेडे गवताळ प्रदेशावर सडत पडलेले मी पाहिले आहेत. मी पडलो रानटी माणूस. त्यामुळे तो धूर ओकणारा पोलादी घोडा हाडामांसाच्या रानरेड्यांपेक्षा महत्त्वाचा कसा असू शकतो, हेच मला समजत नाही. पशूशिवाय माणसाच्या जगण्याला अर्थ काय? सगळे पशुपक्षी नामशेष झाले तर माणूस एकाकी पडलेल्या आत्म्याच्या दुःखानेच मरून जाईल. कारण जे काही पशुंना होते, तेच नंतर मनुष्यप्राण्यालाही होते. चराचर सृष्टीतील सर्व गोष्टी एकमेकींशी जोडलेल्या आहेत. आपण जीवर आज उभे आहोत, ती आपल्या पायाखालची जमीन म्हणजे आपल्या पूर्वजांची राख आहे हे तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकविले पाहिजे. म्हणजे ते तिची कदर करतील, आपल्या गणगोतामुळे ही पृथ्वी संपन्न झाली आहे हे तुम्ही आपल्या मुलांना शिकविले पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना जे शिकवले, की ही पृथ्वी म्हणजे आपली माता आहे, ते तुम्ही तुमच्या मुलांनाही शिकवा. तिचे संकट म्हणजे तिच्या अपत्यांचे संकट.
आयुष्याचे वस्त्र माणसाने विणलेले नाही. तो फक्त त्यात गोवला गेला आहे. त्यामुळे त्या जाळ्याला तो जे काही करील, तेच शेवटी त्यालाही होईल हे उघड आहे. हे संपूर्ण मनुष्यजातीलाच होणार आहे. गोरा माणूस ज्याचा परमेश्वरही त्यांच्यासोबत मित्राप्रमाणे चालतो-बोलतो तोही ह्या सामायिक दुर्गतीतून सुटू शकणार नाही. जगाच्या अंतकाळी आपल्या सर्वांची एकच गती होणार आहे. बघू काय होते तर. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. तुमच्या आता लक्षात आले नसले तरी हे खरे, की तुमचा आणि आमचा परमेश्वर एकच आहे. आता जरी तुम्हाला वाटत असले, की त्याच्यावर तुमचा मालकी हक्क आहे – जसा आमच्या जमिनीवर तुम्हाला प्रस्थापित करायचा आहे – तरी तुम्हाला तसा करता येणार नाही. सर्व मानवजातीचा परमेश्वर एकच आहे आणि सर्वांवर त्याची सारखीच अनुकंपा आहे, मग तो गोरा असो की रक्तवर्णीय. पृथ्वी त्याच्यासाठी अनमोल आहे आणि तिची दुर्दशा करणे म्हणजे त्या परमेश्वराची अवहेलना करणे होय. तुम्ही गोरे लोकही कधीतरी येथून नष्ट व्हाल. कदाचित इतर जनजातींच्या अगोदरच व्हाल. आपली स्वतःचीच शय्या तुम्ही दूषित करीत आहात. एखाद्या रात्री त्यातच घुसमटून तुम्ही मराल. जाताजाताही त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या असीम तेजाने उजळून निघाल. त्याने काही विशिष्ट कारणासाठी तुम्हाला रक्तवर्णीय लोक आणि त्यांची भूमी ह्यांच्यावर वर्चस्व बहाल केले आहे. पण हे काही कायमचे नाही. भविष्यकाळ अज्ञात आहे. नशीबात काय लिहिले आहे, हे आम्हा अडाण्यांना काय करणार? आम्हाला तर रानरेड्यांना केव्हा मारले, जंगली घोड्यांना कसे माणसाळविले, जंगलातील गुप्त जागांमध्ये माणसांची एवढी गर्दी अचानक कशी जमली आणि चालत्या बोलत्या तारांनी टेकड्यांची शिखरे कशी सजविली गेली हे काही म्हणता काहीच कळले नाही. गरुड कुठे आहे, गेला. नाकतोडा कुठे आहे, गेला..आम्ही हतबल होऊन हे पाहातच राहिलो आहोत. पण जे झाले ते योग्य नाही एवढे मात्र आम्हाला कळते. ही सृष्टी केवळ तुम्हाआम्हा आज हयात असलेल्यांचीच नाही, तर अखिल मानवजातीची माता आहे. आपल्या आधी ती होती. तिच्यामुळे आपण आहोत. उद्या आपल्या पश्चातही ती असावी लागणार आहे. त्यासाठी तिची व्यवस्थित काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या हयातीत तरी आपलीच नाही का?
303, स्टाफ क्वार्टर्स, NMIMS-SPTM, मुंबई-आग्रा महामार्ग,
तापीकाठ, बाबुळदे, ता.शिरपूर, जि.धुळे 425405.