स्त्रियांना शिक्षणाचा शताकनुशतके नाकारला गेलेला जन्मसिद्ध हक्क त्यांना नुकताच प्राप्त होऊ लागला आहे. स्त्रीशिक्षण हा शब्द आणि संकल्पना एकोणिसाव्या शतकारंभी औपचारिकदृष्ट्या रूढ झाली. पाश्चात्त्य वाङ्मय आणि संस्कृतीच्या परिशीलनाने एकोणिसाव्या शतकातील विचारवंतांनी स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांना सुरुवात केली. स्त्रीशिक्षणाच्या अभावातच स्त्रीजीवनातील गुलामगिरीची बीजे रुजली असल्याची जाणीव या विचारवंतांत हळूहळू दृढ होत गेली. भंग्याची मुलगी राष्ट्राध्यक्ष व्हावी असे महात्मा गांधींनी त्यामुळेच म्हटले होते. एका स्त्रीच्या शिकण्याने सारे कुटुंब सुशिक्षित बनते; आणि कुटुंब हा समाजजीवनाचा पाया स्त्रीशिक्षणाच्या अभावी रोवला जाणार नाही अशा विचारांची खूणगाठ तत्कालीन विचारवंतांनी निश्चित केली.
भारतीय इतिहासात मध्ययुगापर्यंत अनौपचारिक अशा स्त्रीशिक्षणाची परंपरा होती. पूढे कालौघात ती लुप्त झाली आणि स्त्री अबला, दासी, भोगवस्तू, गृहिणी या भूमिकांतच मान्यता पावली. सर्वस्वी अन्याय्य आणि परावलंबी जिणे तच्यावर लादले गेले. हळूहळू बालविवाह रूढ होऊन वैवाहिक जीवन हीच तिची इतिकर्तव्यता बनली. घराबाहेरील तिचे जीवन असुरक्षित बनले.
स्त्रिया शिकल्या तर त्या विधवा होतात, अनीतिमान बनतात, शिक्षणाला लागणारी पात्रता व बुद्धी त्यांच्यात नाही, स्त्रीशिक्षणाला शास्त्राधार नाही, स्त्रीशिक्षणाच्या प्रेरणा पाश्चात्त्य आहेत अशा कित्येक निराधार समजुतींपायी एकोणिसाव्या शतकापर्यंत औपचारिक स्त्रीशिक्षण सुरू होऊ शकले नव्हते. मात्र; शिक्षण हे स्त्रीला विवेकी, परिपक्व, प्रगल्भ आणि चिकित्सक बनवणारे तसेच तिला व्यक्तित्व जाणिवांचे भान देणारे असल्याचे तत्कालीन सुधारकांच्या लक्षात आल्याने एकोणिसाव्या शतकारंभी स्त्रीशिक्षणाचे औपचारिक प्रयत्न भारतात खऱ्या अर्थाने सुरू झाले.
भारतात व्यापारासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या मिशनऱ्यांनी धर्मप्रसाराच्या उद्देशाने स्त्रीशिक्षणाच्या शाळा प्रथम बंगालमध्ये काढल्या. डेव्हिड कॉरी या मिशनऱ्याने कोलकता फीमेल ज्युव्हेनाईल सोसायटीतर्फे कोलकात्याला 1819 साली बंगाली; पर्यायाने भारतीय मुलींची पहिली शाळा सुरू केली. 1820 साली कोलकात्यालाच स्त्रियांचे स्वतंत्र कॉलेजही होते. याच काळात मिशनऱ्यांनी अलाहाबाद, बनारस, ढाका, चेन्नई आणि उत्तर भारतात मुलींच्या शाळा काढल्या. पुढे राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा दक्षिणारंजन मुखर्जी, देवेंद्रनाथ ठाकूर, केशवचंद्र सेन इत्यादी ब्राह्मो सुधारकांनी बंगाल प्रांतात स्त्रीशिक्षणाच्या प्रसारार्थ प्रयोग केले.
महाराष्ट्रातही स्त्रीशिक्षणाला चालना आणि प्रोत्साहन प्रथम शासकीय पातळीवरच मिळाले. अमेरिकन मिशनरी सोसायटीच्या संस्थेत काम करणाऱ्या विल्सन पतिपत्नींचा शैक्षणिक मिशनरी चळवळीत, विशेषतः स्कॉटिश मिशनरी सोसायटीच्या कार्यात सिंहाचा वाटा होता. मिसेस विल्सन यांनी 1824 साली मुंबई इलाख्यात हिंदू मुलींसाठी पहिली शाळा अमेरिकन मराठी मिशनच्या वतीने काढली. तिने मुंबईत अशा 6 शाळा काढल्या. तिच्या पश्चात मिस्टर विल्सन यांनी तिचे कार्य नेटाने पुढे नेले. पुणे शहरात मिशनऱ्यांनी 1840 पर्यंत पाच शाळा काढल्या. पुढे अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांत तसेच कोकण आणि गोवा येथेही त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या बऱ्याच शाळा आणि वसतिगृहे काढली. भारतात 1830 च्या सुमारास मुलींच्या तीस शाळा होत्या. त्यांत 500 तरी मुली होत्या.
मुंबईचा गव्हर्नर जनरल असलेल्या लॉर्ड डलहौसी याने 1848 ते 1856 या काळात बंगालच्या शिक्षण मंडळास स्त्रीशिक्षणाची जबाबदारी उचलायची विनंती केली. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलचे कायदेपंडित आणि शिक्षण मंडलाचे अध्यक्ष असलेल्या बेथ्यून यांनी हिंदू मुलींसाठी निधर्मी तत्त्वावरील शाळा स्वखर्चाने काढून त्यांना महाविद्यालयीन वर्गही जोडले. त्यांच्या सांगण्यावरून कंपनीचा संचालक असलेल्या डलहौसीच्या 854 सालच्या; सुप्रसिद्ध सर चार्ल्स वूड याच्या शैक्षणिक खलित्याने स्त्रीशिक्षणाचे कलम आपल्या शैक्षणिक धोरणात जाहीररीत्या घातले. त्यात म्हटले होते. स्त्रीशिक्षणामुळे समाजसुधारणांत पुरुषशिक्षणापेक्षा अधिक भर पडेल.
भारतातील ब्रिटिश सत्तेने 1857 नंतर पाठपुरावा केलेल्या अनेक शैक्षणिक ठरावांपैकी एक ठराव स्त्रीशिक्षणविषयक होता. तोवर मुली खासगी शाळांत शिकत होत्या. या काळात मेरी कापेंटर (1807-1877) या इंग्लंडमधील विदुषी आणि समाजकार्यकर्तीच्या नेतृत्वाखाली सरकारी प्रयत्नांनी मुंबई, पुणे, अहमदाबाद इत्यादी ठिकाणी Training Colleges of Women’s ची स्थापना झाली.
मात्र 1857 चे बंड आणि राणीच्या जाहीरनाम्याचा भारतीय समाजसुधारणेच्या चळवळीला अडथळा निर्माण झाल्याने स्त्रीशिक्षणाबाबतचे सरकारी पाठिंब्याचे धोरण शिथिल झाले. त्याकाळी स्त्रीशिक्षण लोकांच्या कडव्या धार्मिक आणि मानसिक समजुतींशी निगडित असल्याने लोकक्षोभाच्या धास्तीपायी त्यात फारसे लक्ष न देणे सरकारने हितकारक मानले. हळूहळू, मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसारार्थ स्त्रियांच्या शाळांतूनही धर्मांतराचा मार्ग अवलंबल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलींना शाळांतून काढून टाकले. त्यामुळेच सरकारने सामान्यतः मिशनरी शाळांनाही मदत केली नव्हती.
महाराष्ट्रातील स्त्रियांचा सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने अनेक कृतिशील व्यक्तींचे, चळवळींचे आणि संस्थाचे जाणीवपूर्वक योगदान महाराष्ट्राला लाभले.
हंटर कमिशन
सर्वांगीण स्त्रीशिक्षणाच्या विचारार्थ 1882 मध्ये चेन्नईच्या ड्रॉईंग स्कूलचे अधीक्षक सर डॉ. विल्यम हंटर यांचे शिक्षम आयोग (Education Commission) पुणे येथे आले होते. संबंधित प्रमुख स्थानिक व्यक्तींचे शैक्षणिक विचार ऐकण्यासाठी आयोगामार्फत पुण्याच्या हिराबागेत नागरिकांची मोठी सभा भरवली गेली. तेव्हा स्त्रियाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कमिशनपुढे पुण्याहून आठ निवेदने सादर झाली. पंडिता रमाबाईंना तेव्हा विशेष आमंत्रण होते. आयोगामार्फत त्यांची परिणामकारक साक्ष झाली. सर्वस्पर्शी स्त्रीशिक्षणांतर्गत वैद्यकीय स्त्रीशिक्षणाचीही जोरदार तरफदारी करून तशी सरकारी योजना कार्यान्वित होण्याची मागणी त्यांनी केली. मुलींच्या शाळा तपासनीस स्त्रीअधिकारीच असण्याचीही मागणी त्यांनी केली. हंटर यांनी रमाबाईंच्या साक्षीचे कौतक आपल्या भाषणात केले होते. ही साक्ष परदेशातही गाजली होती. रमाबाईंच्या साक्षीमुळेच व्हिक्टोरिया राणीचे लक्ष भारतीय स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसमस्यांकडे वळले होते.
स्त्रियांच्या वैद्यकीय शिक्षमासाठी आर्य महिला समाज सर्वतोपरी मदत द्यायला तयार असल्याची ग्वाही न्या. रानडे यांनी आयोगासमोर दिली होती. बहुजन समाजासाठी निदान बारा वर्षांपर्यंत सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची जोरदार तरफदारी यावेळी महात्मा फुले यांनी केली होती. तसेच प्रशिक्षित शिक्षकांची वेतनवाढ, कनिष्ठ वर्गीय खेडूत मुलींना शेतकी व तांत्रिक शिक्षण मिळावे अशाही मौलिक सूचना त्यांनी आपल्या निवेदनात केल्या.
पंजाबमध्ये दयानंद सरस्वती व त्यांच्या आर्यसमाजी अनुयायांनी वेदकाळ आदर्श मानून पुनरुज्जीवनवादी स्त्रीशिक्षणाचा गौरव केला. गुजरातमध्ये दलपतराव, लक्ष्मीशंकर उमियाशंकर, महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्त्रीशिक्षणाला चालना दिली. सयाजीरावांनी 1892 साली; जोतिबा फुले यांचे निधन झाल्यावर सावित्रीबाई फुलेंसाठी हयातभर तीन महिन्यांनी पन्नास रुपये देण्याची तरतूद केली, तसेच रखमाबाई इंग्लंडहून परतल्यावर त्यांना काम देऊ केले होते.
कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रीशिक्षणाच्या मोफत शाळा चालवल्या. अमेरिकेहून परतल्यावर आनंदीबाई जोशी यांना पुण्या-मुंबईत काम करायची संधी मिळाली नव्हती. मात्र, महाराजांनी आपल्या दवाखान्यात काम करण्यासाठी त्यांना सन्मानाने बोलावले. सयाजीरावांनीही त्यांना बोलावले होते. महर्षी शिंदे व त्यांची बहीण जनाक्का यांनी पदरमोड करून बहुजनसमाजातल्या स्त्रियांच्या शैक्षणिक प्रबोधनावर लक्ष केंद्रित केले होते.
महात्मा फुले (1827-1890) यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेले कार्य
मिसेस फारार या शिक्षिकेपासून प्रेरणा घेऊन जोतिबा फुले यांनी एकविसाव्या वर्षी 9 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात स्थानिक मुलींसाठी पहिली शाळा काढली. याच सुमारास अमेरिकेत स्त्रीहक्कांची चळवळ चालू होती.
फक्त मुलींच्या, सहशिक्षणाच्या, संमिश्र ज्ञातीतील मुलामुलींच्या, स्पृश्य ज्ञातीतील मुलींच्या, प्रौढशिक्षणाच्या अशा विविध दृष्टिकोणातून फुलेंनी पुण्यात सात आणि पुण्याबाहेर हडपसर, सासवड, ओतूर येथे चार वर्षांत अकरा मराठी शाळा चालवल्या. मुलींनी शाळेत येण्यासाठी फुलेंनी मुलींना शिष्यवृत्ती वा मासिक विद्यावेतन देण्याचा तसेच खाऊ वाटण्याचा उपाय योजला होता. या शाळांतील मुलींची पटसंख्या सरकारी शाळांच्या दसपट होती. फुलेंच्या स्त्रीशिक्षणाच्या कार्यात तत्कालीन अनेक उच्चवर्णीय दिग्गजांचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सक्रिय सहकार्य लाभले होते. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे तत्कालीन अध्यक्ष सर अर्किन पेरी यांनी फुलेंच्या शाळांना आर्थिक मदत केलीच, पण त्यांचा सत्कार करण्याची शिफारसही सरकारला केली. त्यानुसार 16 नोव्हेंबर 1852 रोजी पूना कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमस कॅण्डी यांच्या हस्ते मुंबई सरकारच्या शिक्षण खात्यातर्फे 200 रुपयांची शाल (महावस्त्र) अर्पण करून फुलेंचा जाहीर सत्कार झाला. 3000 मान्यवर व मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. यावेळी मुक्ता या मुलीने ‘मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध’ हा निबंध वाचून दाखवला होता.
स्त्रीशिक्षणाचे ऐतिहासिक कार्य करताना; लोकांच्या दबावापायी फुलेंना त्यांच्या वडिलांनी घराबाहेर काढल्याने त्यांनी सपत्निक गृहत्याग केला होता. मेव्हण्यानेही त्यांना छळले होते. स्वकीयांचा आणि परकीयांचा विरोध, आर्थिक ओढाताण अशा कारणांमुळे फुलेंच्या शाळा अपेक्षित जोमाने टिकल्या नाहीत, त्यांचे सरकारीकरण झाले.
सावित्रीबाई फुले (1831-1897) यांनी केलेले स्त्रीशिक्षणविषयक कार्य
सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या सार्वनिक जीवनातील पहिली कार्यकर्ती, भारतातील पहिली प्रशिक्षित शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. तेरा वर्षीय फुलेंशी नवव्या वर्षी लग्न होईपर्यंत त्या निरक्षर होत्या. फुलेंनी त्यांना औपचारिक शिक्षण घरीच दिले. घरोघरी जाऊन फुलेंच्या शाळांसाठी त्या मुली जमवत. या शाळांत 200 हूनही अधिक विद्यार्थिनी होत्या. या सर्व शाळा टिकवण्या-वाढवण्याचे अवघड कार्य बाईंनी त्यागबुद्धीने, सेवाभावाने व विनावेतन पेलले. तत्कालीन शासकीय अहवालात त्यांच्या कार्याची स्वतंत्र नोंद आहे. शिक्षणखात्याचे तत्कालीन अध्यक्ष जॉन वॉर्डन यांनी सावित्रीबाईंच्या अध्यापक महाविद्यालयाला भेट देऊन 1851 साली त्यांचा गौरव केला होता. सनातनी पुरोहितांनी मात्र ‘धर्मबुडवी सटवी’ असे संबोधून त्यांची यथेच्छ निंदानालस्ती केली. शेण, चिखल, दगड यांचा मारा करत त्यांचा अनन्वित छळ केला. त्यामुळे शाळेत जाता-येताना बाईंना शाळेचा शिपाई बरोबर घ्यावा लागे. मात्र कर्मठ लोकांना प्रत्युत्तर देताना क्षमाशील होऊन त्या म्हणत, ‘मला उत्तेजन देण्यासाठी खरेतर तुम्ही माझ्यावर फुले उधळीत आहात. तुमचे कृत्य मला असे शिकवते, की माझ्या भगिनींची मी नेहमी अशीच सेवा करीत राहावे.’ असे असले तरी, त्यांचे कार्य बंद करण्यासाठी धमक्या देणाऱ्या गुंडाला भर रस्त्यात चपराक मारायला बाईंनी कमी केले नव्हते. अखेर, त्यांच्या रक्षणार्थ पट्टेवाला आणि पुणे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बा.स.कोल्हे यांची जोतिबांनी नेमणूक केली होती.
आगरकर, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे यांच्यापैकी कोणाचाही या काळापर्यंत जन्म झाला नव्हता.
स्टुडण्ट्स लिटररी अॅण्ड सायन्टिफिक सोसायटी.
मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील शिक्षक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांत सामाजिक प्रश्नांबाबत विशेष आस्था होती. ती जोपासण्यासाठी आणि त्या अनुषंगाने चर्चासत्रांद्वारे समाजजागृतीसाठी डॉ. भाऊ दाजी, डॉ. दादाभाई नवरोजी, जगन्नाथ शंकरशेठ, दादोबा पांडुरंग, विश्वनाथ नारायण मंडलिक इत्यादी आंग्लशिक्षितांच्या प्रेरणेने 13 जून 1848 रोजी ‘स्टुडण्ट्स लिटररी अॅण्ड सायन्टिफिक सोसायटी’ ही संस्था मुंबईत स्थापन झाली. संस्थेत मान्यवरांकडून स्त्रीशिक्षणविषक अनेक व्याख्याने होत आणि निबंधवाचन होई. चर्चासत्रे होत. संस्थेने काही शालेय पुस्तकांची निर्मितीही केली. संस्थेने पारशी आणि मराठी मुलींसाठी एकूण सात शाळा काढल्या. सोसायटीचे शिक्षक आणि विद्यार्थी शाळांत विनावेतन शिकवत, घरोघर जाऊन आपल्या उद्देशांचा प्रचार करत. मिशनऱ्यांचे अंतस्थ हेतही पालकांच्या नजेरला आणत.
सोसायटीच्या मराठी आणि गुजराती शाखा असलेल्या ‘उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा’, ‘बुद्धिवर्धक हिंदु सभा’ आणि ‘गुजराती ज्ञानप्रसारक मंडळी’ या संस्थांनीही स्त्रीशिक्षणाचे कार्य पुढे चालवले. सोसायटीतर्फे चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या शाळांसाठी ‘ज्ञानबोधक’ नावाची मराठी पुस्तकेही सोसायटीने तयार केली.
शारदा-सदन
पंडिता रमाबाई यांनी महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था काढून स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि स्त्री-पुरुष समानता या मुद्द्यांचे आग्रही प्रतिपादन केले होते. समाजातील पीडित विधवांना जीवदान देण्याच्या हेतूने त्यांनी मुंबईत शारदा सदन ही संस्था 11 मार्च 1889 रोजी स्थापन केली संस्थेचे वसतिगृहही होते. संस्थेच्या नियामकमंडळात भांडारकर, तेलंग, नूलकर, आत्माराम पांडुरंग, लोकहितवादी इत्यादी नामवंतांचा समावेश होता. मुंबईनंतर संस्था पुणे आणि नंतर केडगाव येथे हलली. दुष्काळग्रस्त अनेक अनाथ मुलांनी तिथे आश्रय घेतला होता. मोठ्या घरंदाज मुलींनीही प्रवेश नोंदवला होता. रीती, नीती, गृहव्यवस्थादींचे उत्तम शिक्षण मिळून मुलींच्या मद्यनिषेधक, पारोपकारिक वगैरे लहानसहान संस्था स्थापन झाल्या. अभ्यासापलीकडील वेळात दुर्बल घटकांच्या साह्यार्थ श्रम करून मुली पैसे गोळा करत, सभा करून यथासक्ती वर्गणीही जमवत. बाया ऊर्फ आनंदीबाई कर्वे या शारदा सदनाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत.
पंडिता रमाबाईंनी आणि त्यांच्या अनेक विद्यार्थिनींनीही ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने अनेक पालकांनी आपापल्या मुलींची नावे संस्थेतून काढून टाकली. अर्थात, त्यामुळे संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली.
फीमेल हायस्कूल
न्या. रानडे, वामन आबाजी मोडक, डॉ. भांडारकर इत्यादी प्रतिष्ठित पुणेकरांच्या सहकार्याने 29 सप्टेंबर 1884 रोजी पुणे येथे सर वेडरबर्न यांनी ‘हायस्कूल फॉर नेटिव्ह गर्ल्स’ या स्वतंत्र माध्यमिक शाळेची स्थापना केली. आज ही संस्था ‘हुजूरपागा’ या नावाने ओळखली जाते. फीमेल हायस्कूल, फीमेल ट्रेनिंग कॉलेज व प्राथमिक शाळा याही सोसायटीच्या संस्था होत्या. स्त्रियांच्या वैद्यकीय शिक्षणासहित उच्च शिक्षण, धंदेशिक्षण आणि सहशिक्षण इंग्रजी माध्यमातूनही शाळेत दिले जाई. मात्र शाळेचे हे वैशिष्ट्यच शळेवर टीकेचा भडीमार व्हायला कारणीभूत ठरले. ‘पुरुष बिघडले आहेतच, धर्म काय तो बायकांतच शिल्लक होता. तोही आता नाहीसा होणार’, अशा स्वरूपाच्या टीका तत्कालीन नियतकालिकांत येत. ‘धारवाडवृत्त’ या पत्रात तर म्हटले होते, ‘यंदाच्या मंगळागौरी आता बहुतेक शेवटच्या होतील.’ या निमित्ताने आगरकरांनी ‘केसरी’त सात्त्विक संतापापोटी काही खरमरीत अग्रलेख लिहिले होते. एका अग्रलेखात ते म्हणतात, ‘स्त्री सुशिक्षित होण्याने व्यक्तिमात्राला हा कष्टमय संसार खूप आनंददायी होणार आहे किंवा बऱ्याच स्त्रियांना थोडेसे सुशिक्षण मिळाल्यास प्रत्येक राष्ट्राच्या, किंबहुना साऱ्या जगाच्या सुखात खूप भर पडणार आहे.’
फीमेल हायस्कूलनंतर मुंबईत चंदारामजी हायस्कूल फॉर गर्ल्स आणि आर्यन गर्ल्स हायस्कूल स्थापन झाल्या.
अनाथ बालिका
महर्षी कर्वे यांनी 14 जून 1896 रोजी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही विधवांना शिक्षण देणारी संस्था पुणे येथे काढली. कर्वे हे संस्थेचे चिटणीस होते. विधवांमध्ये आत्मविश्वास जागृत होऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या कार्याला अण्णासाहेबांनी वाहून घेतले होते. आश्रमात सुरुवातीला एक विद्यार्थिनी होती, तर संस्थेच्या खर्चाने सात-आठजणी फीमेल हायस्कूलच्या वसतिगृहात राहून शिकत. शिकतानाच काहींचे संस्थेच्या पाठिंब्याने पुनर्विवाह पार पडले. उरलेल्या स्त्रियांनी स्वावलंबनाचा मार्ग पत्करला. विधवांच्या हातचे पोळपाट लाटणे त्यामुळे सुटले. कर्वेच्या पत्नी बायाबाई, बायाबाईंच्या भगिनी पार्वतीबाई आठवले, सीताबाई अण्णिगिरी अशा विद्यार्थिनींनी अत्यंत मानहानी सोसून आश्रमाच्या विकासाला मोलाचा हातभार लावला.
स्त्री विचारवती सभा
न्या. रानडे, सदाशिवराव गोवंडे आणि गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्याला 1870 साली स्थापन केलेली ‘सार्वजनिक सभा’ नावारूपाला आल्यानंतर सौ. गोवंडे व सौ. जोशी यांनी गावातील महिलांत शैक्षणिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘स्त्रीविचारवती सभा’ ही संस्था काढली. केरो लक्ष्मण छत्रे हे निवृत्तीनंतर स्त्रीशिक्षणाचे कार्य तिथे हौसेने करत. स्त्रीसुधारणांना अनुकूल अलेल्या साप्ताहिकाने उपरोधिक टिपणी करताना एका ठिकाणी म्हटले होते, ‘आज अशी सभा भरवणे म्हणजे रांगता न येणाऱ्यास पळायला लावण्याचा प्रयत्न करायला लावण्यासारखे आहे असे अनेकांचे मत आहे.’
आर्य महिला समाज
आत्माराम पांडुरंग, भास्करराव भागवत इत्यादी प्रार्थना समाजीय पुढाऱ्याच्या पाठिंब्याने 1 मे 1881 रोजी पंडिता रमाबाई यांनी ‘आर्य महिला समाज’ ही स्त्रीशिक्षणसंस्था पुण्यात स्थापन केली. मुंबई, सोलापूर, पंढरपूर येथे संस्थेच्या शाखा होत्या. वैधव्य नशिबी आलेल्या रमाबाई त्यावेळी अवघ्या चोवीस वर्षांच्या होत्या. पंडिता रमाबाई, काशिबाई कानिटकर, रमाबाई रानडे इत्यादी महिलांची सभेत नियमितपणे प्रबोधनपर व्याख्याने, निबंधवाचन, चर्चा होत. विशेषतः पंडिताबाईंची व्याख्याने अधिक गर्दी खेचत. पुरुष श्रोत्यांनी कुटुंबातील एकातरी महिलेला सोबत घेऊन येण्याचा अभिनव दंडक बाईंनी निरपवाद घातला होता. या नियमाबाबत अज्ञानी असलेल्या केरुनाना छत्रेसारख्या सुधारकाबाबतही बाईंनी अट शिथिल केली नाही. बाईंच्या व्याख्यानांत शास्त्रे, पुराणे, महाकाव्ये यांचे आधुनिक दृष्टीने विवेचन येई. लोकहितवादी, रानडे, काशिनाथ बाळकृष्ण मराठे यांच्याही घरी बाई पुराण सांगत.
नॉर्मल स्कूल
स्टुडण्ट्स लिटरकरी अॅण्ड सायन्टिफिक सोसायटीच्या मुलींच्या शाळा भरभराटीला आल्यावर प्रशिक्षित शिक्षिकांची उणीव भासू लागली. कारण वयात आलेल्या मुलींबाबत पालकांना पुरुषशिक्षकांची अडचण वाटू लागली. म्हणून रावसाहेब मंडलिक यांनी शिक्षिका तयार करणारे नॉर्मल स्कूल मुंबई आणि अहमदाबाद येथे काढण्याबाबत काही पुढाऱ्यांच्या सह्यांनिशी सरकारकडे अर्ज केला. दुसरीकडे, दादाभाई नौरोजी यांनी मुंबईकर पारशी आणि हिंदू अशा तीस विचारवंतांच्या सह्यांनिशी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया यांना इंग्लंडमध्ये अर्ज पाठवला. त्यानुसार पाच वर्षांपर्यंत नॉर्मल स्कूल काढण्याची सरकारी योजना होती, मात्र त्यासाठी लोकाश्रयाची अट घातली गेली.
वूडचा 1854 सालचा फतवा निघून स्थानिकांच्या शिक्षणासाठी काही लाख रुपये खर्च करण्याचे सरकारने मंजूर करूनही एकाही प्राथमिक शाळेत तोवर प्रशिक्षित शिक्षिका उपलब्ध नव्हती. कार्पेटर बाईंनी मुंबई सरकारच्या ठरावानुसार पुणे, मुंबई, नागपूर, अहमदाबाद इत्यादी ठिकाणी स्त्रीशिक्षणाची नॉर्मल स्कुले स्थापन केली. पुण्यात सर्वप्रथम प्रवेश मिळवलेल्या आठपैकी काही भगिनींना धुळाक्षरेही माहीत नव्हती. कार्पेटर बाईंपूर्वी दादाभाईंनी बंगालमध्ये फीमेल ट्रेनिंग कॉलेजे काढली होती.
‘दि सन्डे रिव्ह्यू’ या पत्राने, आपल्या तरुण मुलींना या शाळेत पाठवण्याइतपत पुणेकर आधुनिक नसल्याचे कारण एका अंकात पुढे केले होते.
एकोणिसाव्या शतकात वैचारिक वाङ्मयांतर्गत स्त्रीशिक्षणविषयक झालेले प्रयत्नही उल्लेखनीय होते. असा पहिला प्रयत्न ‘दर्पण’ या बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेल्या पहिल्याच नियकालिकात पाहायला मिळतो. ‘माता’ नावाच्या पत्रकर्तीने; देशात स्त्रीशिक्षणाची एकही शाळा नसताना सातारच्या राजाने मुलीला शिकविल्याबद्दल संतोष व्यक्त करून 8 जून 1832 च्या अंकात या आदर्शाचे अनुकरण करण्याचे आवाहन लोकांना केले आहे. पुरुषांच्या सुखदुःखांची वाटेकरीण असलेल्या स्त्रीची दशा दासीसमान वा पुरुषाच्या पाळीव जनावरासमान असल्याचे तिने निदर्शनाला आणले आहे.
बाबा पदमनजी यांनी 1852 साली ‘स्त्रीविद्याभ्यासनिबंध’ हे स्त्रीशिक्षणविषयक पहिले पुस्तक लिहून स्त्रीशिक्षणाचा प्रसार केला. गोविंद नारायण माडगांवकर यांनी त्यांच्या काही पुस्तकांतून स्त्रीशिक्षणाचे महत्त्व वर्णिले आहे.
स्त्रीशिक्षणाचा जोरदार प्रसार करणाऱ्या नियकालिकांत त्या काळी ज्ञानदीप, केसरी (आगरकरांचा), सुधारक, व-हाड समाचार ही नियकालिके अग्रेसर होती. तर लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर असे मोजकेच विचारवंत या विचारांचे नेतृत्व करत होते.
उच्चविद्याविभूषित व प्रगल्भ अशा स्त्रीजीवनाचे आगरकरांचे सुरुवातीपासूनच हळवे, पण भाबडे नसलेले स्वप्न होते. त्यांची ही आस युगान्तरीची असल्याबाबतचे वास्तव भान त्यांना होते. उच्चशिक्षण, धंदेशिक्षण, सहशिक्षण आणि इंग्रजी शिक्षण ही त्यांची स्त्रीशिक्षणाबाबतची चतःसत्री होती.
स्त्रीशिक्षणाबाबत विरोधकांचे नेतृत्व टिळकांनी केले. फीमेल हायस्कूल निघाल्यावर स्त्रीशिक्षणाला विरोध करणारे पाच अग्रलेख त्यांनी ‘केसरी’त लिहिले. त्यांच्या मते तत्कालीन शिक्षण पुरुषंचाही मेंदू कोरडा ठेवणारे, त्यांना दुर्वर्तनाला नकळत प्रोत्साहन देणारे होते. टिळकांच्या मते, स्त्रियांवर आणि देशावरही स्त्रीशिक्षणाचा दुप्पट अनिष्ट परिणाम होईल. स्त्रीशिक्षणाबाबत टिळकांच्या अपेक्षा माफक होत्या. स्त्रीशिक्षण देशकालानुरूप, आर्यसंस्कृतीवर आधारित; बहमताला पेलणारे, चुचकारणारे व रुचणारे असण्याबाबत टिळकांचा विलक्षण अट्टाहास होता. त्यामुळे त्यांच्या मते विवाहितावस्था आणि गृहकृत्यदक्षता हीच स्त्रीजीवनाची इतिकर्तव्यता होती. त्यामुळे तशा प्रकारचाच पायाभूत असलेला ‘ध्येयाधिष्ठित’ शिक्षणक्रम आखणे त्यांच्या दृष्टीने उचित आणि न्याय्य होते..
‘अभिनवविद्यातरुणी प्रहसन’ आणि ‘तरुणी शिक्षण नाटिका’ ही पेशाने वकील असलेल्या नारायण बापूजी कानिटकर यांची स्त्रीशिक्षणाचा विरोधी प्रचार करणारी 1886 साली आलेली नाटके जनसामान्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. ‘तरुणी शिक्षण नाटिका’ ‘केसरी’त पूर्वप्रसिद्ध झाले होते.
त्या काळच्या वैचारिक वाङ्मयात स्त्रीशिक्षणाबाबत माफकच अपेक्षा आढळतात. व्यवहारशिक्षण, पाककला, शिवणकाम, बालसंगोपन, कशिदा, नैतिक पातिव्रत्यदर्शक ऐतिहासिक आणि पौराणिक कथांचे आदर्श ठेवण्याचे तसेच स्त्रीने सद्गुणंची पुतळी व्हवे; अशा पारंपरिक स्त्रीशिक्षणाची तरफदारी करणारी स्त्रीविषयक मासिके आणि संख्येने मोजक्याच असलेल्या स्त्रीनिबंधकार या भूमिकेबाबत आघाडीवर होत्या. सुमित्र, साध्वी, आर्यभगिनी, अबलामित्र, गृहिणी, स्त्रीशिक्षणचद्रिका, स्त्रीसद्बोधचिंतामणी, स्त्रीभूषण, स्त्रीज्ञानप्रदीप अशा स्त्रीजीवनाला वाहिलेल्या मासिकांचीही संपादकीय धोरणे निश्चित नव्हती. स्त्रीशिक्षणाची – तरफदारी करणाऱ्या मासिकांत एखाद्या लेखाच्या आगेमागे स्त्रीशिक्षण घातक असल्याचे सांगणारा किंवा गृहिणीपणाचा महिमा गाणारा लेख आढळतो. त्या काळच्या नियतकालिकांत बऱ्याचदा सुधारकांची यथेच्छ टवाळी करून त्यांचे खच्चीकरण केलेले आढळते.
रवींद्रनाथ टागोर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘स्त्रियांनी कान्ट आणि हेगेलचा अभ्यास केला तरी मुलांवर त्या पूर्ववत प्रेम करतीलच, पण नवऱ्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत. आपले जीवन सुसंपन्न करण्यासाठी स्त्रीने ज्ञान मिळवावेच. टागोरांचे हे मत आजच्या काळाने यथार्थच ठरवले आहे. शिक्षणाने सुसंस्कृत, सालंकृत झालेली आजची भारतीय स्त्री – कन्या, माता, पत्नी, कार्यालयीन सहकारी अशा अनेक नात्यांनी अधिकाधिक कर्तव्यदक्ष, जबाबदार बनत आहे हे आपण पाहतच आहोत, आजच्या स्त्रीची सामाजिक उपयोगिता आणि प्रतिष्ठा शिक्षणामुळेच निःसंशय वाढीला लागली आहे! स्त्रीशिक्षणाच्या प्रगतीच्या टप्प्यावर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आज, एकोणिसाव्या शतकातील विचारवंतांच्या प्रयत्नांमुळेच अग्रेसर आहे.
(पूर्वप्रसिद्धी : परिवर्तनाचा वाटसरू – दिवाळी 2012)
ठाणे, (ई-मेल : ramaniusha@gmail.com)