डॉक्टर चिंतामणी मोरेश्वर पंडित किंवा सी.एम. पंडित यांच्याशी झालेली माझी पहिली ओळख लोकविज्ञान संघटनेच्या माध्यमातून, लोकविज्ञानच्या सुरुवातीच्या काळात सर्व बैठका श्री.म.ना.गोगटे यांच्या ‘ताडदेव एअर-कंडीशन्ड मार्केट’मधील कार्यालयात व्हायच्या. मी अधून मधून त्यात सहभागी व्हायचो. पंडितांचे कार्यालयही तिथेच होते. गोगटे आणि पंडित दोघेही स्थापत्यतज्ज्ञ आणि दोघेही मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक सदस्य त्यामुळे लोकविज्ञानच्या काही बैठकांत दोघांचाही सहभाग असायचा. मला वाटते 1976-77 चा सुमार होता तो. मी वास्तुरचनेचा व्यवसाय नुकताच सुरू केला होता. त्यामुळे या दोघांच्याही कार्यालयात थोडाफार वेळ घालवायला मला आवडायचे. पंडितांच्या कार्यालयाबाहेरील ‘डॉ.सी.एम.पंडित, स्ट्रक्चरल इंजिनीअर’ ही पाटी परत परत वाचत मी भारावून, काहीसा दबून या ‘डॉक्टर असलेल्या इंजिनीअर’च्या भेटीला आत शिरायचो आणि या अगदी साध्या-सरळ व्यक्तिमत्त्वाला भेटून आदराने विनम्र होऊन बाहेर पडायचो! पंडितांशी झालेली तोंडओळख ही अशी.
1980 साली आम्ही ‘जागतिक वन्यजीवन निधी’च्या मार्फत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला सादर केलेला निसर्ग उद्यानाचा प्रल्प स्वीकारला गेला. धारावीला मिठी नदीच्या किनाऱ्यावरील कचऱ्याच्या प्रचंड ढीगावर हा आव्हानात्मक प्रकल्प उभा राहणार होता. परिसर विज्ञान, जीवशृंखला आणि निसर्गशिक्षण या विचा धारेवर आणि पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पातील प्रमुख इमारती होत्या — निसर्ग शिक्षण केंद्र आणि प्रयोगशाळा. एका नावीन्यपूर्ण पद्धतीने आम्ही त्यांची संकल्पना केली होती आणि त्यानुसार आराखडे बनवले होते. खाडीच्या किनाऱ्यावर आणि तेसुद्धा कचऱ्याच्या ढिगावर या इमारती उभ्या करणे हे अफाट आव्हान आमच्यासमोर उभे होते. आणि आम्हा तरुण वास्तुरचनाकारांना गरज होती ही स्वप्नपूर्ती करू शकेल अशा अनुभवी आणि नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असलेल्या स्थापत्यतज्ज्ञाची. बराच विचार केल्यावर पंडितांचे नाव माझ्या डोळ्यासमोर आले. पंडितांचे प्रावीण्य होते विविध पुलांच्या संकल्पनांचे आणि त्यांच्या रचनांचे. अनेक मोठमोठे प्रकल्प ते हाताळत असत. हे तसे छोटे काम ते स्वीकारतील का ही मनाः। येणारी शंका बाजूला ठेवून मी त्यांना भेटायचे ठरवले. मधल्या कालावधित पंडितांनी आपले कार्यालय विलेपार्ले येथे त्यांच्या घराजवळच हलवले होते. दूरध्वनीवर संपर्क साधून मी त्यांच्याशी भेटीची वेळ ठरवली आणि त्यानुसार त्यांच्या विलेपार्ले कार्यालयात शिरलो. पंडितांनी संपूर्ण ‘निसर्ग उद्यान’ प्रकल्पाची संकल्पना माझ्याकडून समजावून घेतली. त्यातील इमारतींचे आराखडे
पाहिले. मोजकेच प्रश्न विचारले. बहधा मी योग्य उत्तरे दिली असावीत कारण लगेचच ते म्हणाले, “मला या प्रकल्पावर काम करायला आणि त्यात सहभागी व्हायला आवडेल”. पंडितांच्या टेबलाचाच एक भाग होती पाटी आणि पंडित खडू-पेन्सीलच्या साहाय्याने त्या पाटीवरील रेखाटनातून त्यांच्या कल्पना समजावून द्यायचे. या प्रकल्पावरील बऱ्याच चर्चेनंतर पंडित म्हणाले, “उल्हास, अगदी मोकळेपणाने वास्तु-कलाकारासारख्या संकल्पना मांड, त्या प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी माझी”. माझ्या गेल्या चाळीसहून अधिक वर्षांच्या व्यावसायिक अनुभवात वास्तुरचनाकाराला एवढे स्वातंत्र्य देणारा आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने स्वीकारणारा हा एकुलता एक स्थापत्यतज्ज्ञ! प्रकल्पाच्या चर्चेतून पुढे संवाद वळला – माझे छंद, निसर्गप्रेम, गिर्यारोहण, भटकंती इत्यादी विविध विषयांकडे. या भेटीतच आमचे स्वर जुळले, मला एक आदरणीय सुहृद मिळाला.
‘महाराष्ट्र निसर्ग उद्याना’चे काम वेगाने मार्गी लागले. निसर्गशिक्षणकेंद्राच्या इमारतीच्या उभारणीसोबतच वन-उद्यान रचनेचीही कामे सुरू झाली. विविध प्रकारच्या वनस्पतींनी या वन-उद्यानाला आकार यायला लागला. पंडितांनाही निसर्गाची खूप आवड होती. इमारतीच्या कामाच्या देखरेखीसाठी जेव्हा जेव्हा ते भेट द्यायचे त्या त्या वेळी सर्वसाधारणपणे ते आपला 20% वेळ बांधकाम विभागात तर 80 वेळ वन-उद्यान विभागात घालवायचे! महाराष्ट्रनिसर्गउद्यानाने आज मिठी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वेगळीच हिरवाई निर्माण केली आहे, तिथले निसर्ग शिक्षण केंद्र अविरत कार्यरत आहे. या प्रकल्पाची गणना एक उल्लेखनीय पर्यावरणीय प्रकल्प म्हणून जगभर होत आहे. या प्रकल्पाच्या सहप्रवासात पंडितांकडून आम्ही कुठच्याही आव्हानांचा स्वीकार करायला आणि संरचना-प्रक्रियेच्या पुढे जाऊन प्रकल्पाचा सर्वांगीण विचार करायला शिकलो. या प्रकल्पाच्या कामानिमित्ताने पंडित अनेकदा आमच्या फोर्टच्या कार्यालयात यायला लागले, आमच्या कार्यालयात तरुण वास्तुरचनाकारांना मार्गदर्शन करायला लागले आणि बघता बघता आमच्या कार्यालयातील सर्वांसाठी ते ‘मणीकाका’ झाले!
ज्या काळात तंत्रज्ञानक्षेत्रात पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या व्यक्तीही तुरळक होत्या त्या काळात मणीकाकांनी पश्चिम जर्मनीतील स्टुटगार्ड येथून स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी.तर मिळवली पण त्यापुढेही भारतात परत येऊन येऊन देशाच्या विकासाला हातभार लावण्याचे व्रत घेऊन या क्षेत्रात प्रामाणिक योगदान केले. नागपूरच्या नंदा खरे या प्रख्यात सुविधा-विकासकाबरोबर त्यांनी विदर्भात अनेक अवघड प्रकल्प राबवले, विशेषतः नद्यांवरील पुलांचे. त्यांच्या या क्षेत्रातील अत्युच्च प्रावीण्यामुळे आणि प्रामाणिक वृत्तीमुळे सरकारतर्फे विविध समित्यांवर आणि आयोगांवर त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या परखड परीक्षणाबरोबरच्या व्यावहारिक मार्गदर्शनाचे कौतुकही झाले. विकासाच्या कामात असे योगदान करत असतानाच बेकायदेशीर कामे करणाऱ्या विकासकांना धडा शिकवण्यालाही त्यांचा हातभार लागला. नकारात्मक काराने गाजलेल्या ‘प्रतिभा’ या उत्तुंग इमारतीचे वरचे सहा कायदेशीर मजले पाडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे कठीण काम होते. पण मणीकाकच्या योग्य तांत्रिक मार्गदर्शनाखाली घाणेकर कंपनीने हे आव्हानात्मक काम मूळ इमारतीला कोणताही धोका न येऊ देता पूर्ण केले.
1987-88 च्या सुमारास सुरत महानगरपालिकेने त्यांच्या नवीन प्राणिसंग्रहालयाच्या प्रकल्पाचे संकल्पन आणि संरचनेसाठी आमची नेमणूक केली. सुरतच्या दक्षिण सीमेलगत, तापी नदीच्या किनाऱ्यावरील एका मोठ्याशा परिसरात हा प्रकल्प उभा करायचा होता. हे आह्वान आम्ही स्वीकारले आणि प्राणिसंग्रहालयाऐवजी ‘वन्यप्राणि उद्यान’ अशी संकल्पना मांडली. प्राण्यांना मोकळ्या वातावरणात, त्यांच्या मूळ परिसरसदृश विभागात ठेवायचे. सहसा इतर प्राणिसंग्रहालयात नसणारे, पण वैशिष्ट्यपूर्ण अशा प्राणिगटांसाठी खास विभाग करायचे. सरपटणारे प्रणी, निशाचर पक्षी-प्राणी, कीटक, मासे यांच्यासाठी खास प्राणिगृहे आणि या उद्यानाचा प्रमुख हेतू ‘करमणुकीतून निसर्गशिक्षण’ असा ठेवायचा. अशी आम्ही मांडलेली संकल्पना सर्वांना भावली आणि संरचनेचे काम सुरू झाले, तिथल्या मोजक्याच इमारतींची रचना गुजरातच्या वास्तुशैलीवर आधारित केली. अशा निसर्गप्रेमी प्रकल्पाचे स्थापत्यसल्लागार निसर्गप्रेमी मणीकाकाच असणार हे गृहीतच होते. मी सर्व कच्चे आराखडे घेऊन मणीकाकांना भेटायला पुन्हा एकदा त्यांच्या विलेपार्ले कार्यालयात गेलो. मोठ्या उत्साहाने त्यांच्यासमोर प्रकल्प.की संकल्पना मांडली आणि त्या इमारतींच्या स्थापत्यरचनेसंबंधी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मणीकाकांनी मला थांबवले, “उल्हास, प्रकल्प सुंदर आहे, तुझी संकल्पनाही उत्तम आहे. पण मी तुला मदत करू शकणार नाही. मी व्यवसायातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आता फक्त हातात असलेली कामे संपवतो आहे. नवीन कामे नाहो, कितीही चांगली असली तरी!” त्यावेळी मला बसलेला तो धक्का पुढे अनेक वर्षे जाणवत राहिला. मी पुष्कळ विनवणी केली, वादविवाद करण्याचा प्रयत्न केला, पण मणीकाका आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी मी त्यांना निर्वाणीने म्हटले, “तुमच्यासारखा आव्हाने घेणारा आणि संवेदनाशील स्थापत्य-सल्लागार जोडीला नसेल तर मला नाही वाटत मी या प्रकल्पाला न्याय देऊ शकेन. तेव्हा मलाही गत्यंतर नाही प्रकल्प सोडून देण्याशिवाय!” मणीकाका हळुवार हसले, “उल्हास, मी तुझ्या भावना आणि माझ्यावरचे प्रेम, विश्वास समजून आहे. मी तुला एका तरुण, उत्साही, अभ्यासू, संवेदनाशील स्थापत्य-रचनाकाराची ओळख करून देतो. तो माझ्याबरोबर काही वर्षे काम करतो आहे, होतकरू आहे. तुझ्या कामांना न्याय देईल अशी मला खात्री आहे. शिवाय त्याला काही मदत लागली तर मी आहेच! त्याचे नाव आहे अरुण सामंत.” अरुणला मी गिर्यारोहक म्हणून काहीसे ओळखत होतो. पण तो अशा आह्वानात्मक स्थापत्यरचना करू शकेल का हे माहीत नव्हते. मणीकाकांच्या भरवशावर मी हो म्हटले आणि पुढच्याच आठवड्यात अरुणसह एकत्रित बैठक मणीकाकांच्याच कार्यालयात झाली. प्रकल्पावर चर्चा आणि मग अवांतर विषयांवर भरपूर गप्पा झाल्या. पहिल्या बैठकीतच आम्हा तिघांचे ‘सूर’ जुळले. सुरतचे वन्यप्राणि उद्यान, फिल्म्स डिव्हिजनच्या ‘गुलशन महाल’ इमारतीचा एका वेगळ्या प्रकार, जीर्णोद्धार ही काम एकत्र करत करत आम्ही आसाममधील ‘फुलपाखरू उद्यान’ या आहानात्मक आणि नावीन्यपूर्ण प्रकल्पाला सुरुवात केली. अरुणने या कामाला अक्षरश: वाहून घेतले होते. आणि या आसामच्या भूकंपग्रस्त भागातील वैशिष्ट्यपूर्ण संरचनांसाठीच्या त्याच्या स्थापत्य-रचना खास मणीकाकांना दाखवून पुढे नेत होता. त्यातल्या सुरवंटाच्या आकाराच्या फुलपाखरू-गृहाचे काहीसे गुंतागुंतीचे काम अर्ध्यावर असतानाच अचानक बातमी आली की अरुणचे हिमालयातील गिर्यारोहण मोहिमेत अपघाती निधन झाले. मणीकाकांनीच मला दूरध्वनीवर ही बातमी अक्षरशः ओक्साबोक्शी रडत दिली. अरुण मणीकाकांचा लाडका होता आणि आम्हा दोघांचाही प्रिय मित्र होता. फार मोठा आघात होता. त्यातून कसेबसे सावरत असताना एके दिवशी मणीकाका अचानक आमच्या कार्यालयात आले, “उल्हास, आपल्याला फुलपाखरू उद्यानाचे काम पुरे करायचे आहे. चला कामाला लागू या.” व्यवसायनिवृत्तीनंतरही अरुणवरील आणि माझ्यावरील प्रेमाखातर आणि व्यावसायिक जबाबदारीच्या जाणिवेने मणीकाकांनी दिलेल्या आधारातून या प्रकल्पाची यशस्वी पूर्तता झाली.
तसे म्हटले तर आम्ही एकत्र केलेला फक्त एकच प्रकल्प, महाराष्ट्र निसर्ग उद्यान! पण आमच्या अनेक कामांना मणीकाकांचे अप्रत्यक्ष साहाय्य झालेले आहे. पण ह्या व्यावसायिक वाटचालीच्या पलीकडे अनेक विषयांवर आमचे एकत्र संवाद, वादविवाद व्हायचे – निसर्ग-अभ्यास, पर्यावरण, शेती, पाणी, जमीन, समाजसेवा, संगीत, चित्रकला, पुस्तके — असे कितीतरी! त्यांचा अनेक स्वयंसेवी संस्थांशी जवळून संबंध होता. आनंदवन आणि बाबा आमटे कुटुंबीयांशी तर त्यांचे अगदी जवळचे नाते होते. तरीही मला नेहमी जाणवत राहायचे की मणीकाकांनी आपले स्थापत्यशास्त्रातले ज्ञान आणि अनुभव हे तरुणांपर्यंत पोचवायला हवे होते.
30 सप्टेंबर 1993 ची सकाळ, भयानक भूकंपाने लातूर परिसर उद्ध्वस्त झाल्याच्या बातम्या यायला लागल्या आणि माझे मन सुत्र होऊन गेले! खरे म्हणजे त्या दिवशी माझा वाढदिवस होता! आपण काही तरी करायला पाहिजे हे मनात येत होतेच. उद्ध्वस्त गावांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी योजना आखावी असे मनात आले – वास्तुतज्ज्ञ आणि स्थापत्यतज्ज्ञांना एकत्र घेऊन. या क्षेत्रातल्या माझ्या काही मित्रांशी संपर्क साधला – मणीकाकांशीही! आणि सर्वप्रथम त्यांच्याकडूनच प्रतिसाद आला, “नक्कीच काहीतरी करूया, मीही इतरांशी, विशेषतः मराठी विज्ञान परिषदेशी संपर्क साधून त्यांचे विचार घेत आहे.’ पुढील घटना वेगाने घडल्या. मराठी विज्ञान परिषद आणि दैनिक महानगर यांच्या सौजन्याने लातूर परिसरातील एका गावाचे सर्वांगीण पुनर्वसन करण्याचे ठरले. मराठी विज्ञान परिषदेतर्फे मणीकाका, निळू दामले आणि मी यांची तांत्रिक समिती तयार झाली. मी प्रकल्पाचा संकल्प-आराखडा बनवला, मणीकाकांनी तांत्रिक भर टाकली, निळूने लातूरमधील त्याच्या परिचयाच्या आणि या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधला – यथायोग्य गाव निवडण्यासाठी. मग आमच्या लातूरला भेटी व्हायला लागल्या, सर्वानुमते पारधेवाडी या छोट्या गावाची निवड केली. स्थानिक समिती आणि ग्रामसमिती नेमून कामाला सुरुवात झाली. लोकशिक्षण, परिसर सर्वेक्षण, नवीन ग्रामरचना, घरांचे आराखडे, बांधकामाचे तंत्र, देखभालीचे शिक्षण, महिलांचा सहभाग, सह-मालकी इत्यादी अनेक अंगांनी काम हळूहळू पुढे सरकत होते. आर्थिक विवंचनाही होतीच, कारण या गावाला सरकारी मदत नव्हती – या गावातील घरे पडली होती, पण मनुष्यहानी नव्हती! आम्हा सर्वांचेही एक प्रकारचे अनुभव-शिक्षण होत होते. दोन तीन वर्षांतील लातूरच्या या अनेक फेऱ्यांमध्ये मणीकाका, निळू आणि मी चांगलेच मित्र झालो. चर्चा, वादविवाद, प्रसंगी भांडणे या सर्वांतून अधिक जवळीक झाली, एकमेकांचे विविध पैलू समजायला लागले. लातूरनंतरच्या जीवनात या सर्वांचा खूप उपयोग झाला. एक आठवण आम्ही तिघेही जागवायचो – सोलापूर-मुंबई प्रवासात सर्व वादविवाद, भांडणे कुडूवाडी-दौंड स्थानकांदरम्यान संपायची-थंडगार श्रीखंडाचा
आस्वाद घेत! आम्ही तिघेही अस्सल खवय्ये असल्यामुळे!
निवृत्तीनंतर मणीकाकांनी स्वतःला शेती, माती आणि पाणी या क्षेत्रांत तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या मूल्यमापनात वाहून घेतले. या विषयांवरचे त्यांचे वाचन अमाप आणि अनुभव विपुल होता. त्यांच्याशी गप्पा म्हणजे ज्ञानाचा खजिना उलगडणे असायचे. मला त्यांच्याशी स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या अनुभवांबद्दल ऐकायला खूप आवडायचे, त्यांना माझ्याशी निसर्गाबद्दत बोलायला आवडायचे. मणीकाकांनी विविध विषयांवर अनेक लेख लिहिले, पण त्यांनी स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या अनुभवाचे लिखाण करायला हवे होते. मी अनेकदा त्यांना हे सुचवायचो, मी लेखनिक होतो असेही सांगायचो, पण त्यांनी निवृत्तीनंतर जणू काही स्थापत्यशास्त्राशी फारकतच घेतली. समाज एका उत्कृष्ट स्थापत्य-अनुभव-ग्रंथाला मुकला हेच खरे! त्यांनी अधून मधून स्थापत्य/वास्तु महाविद्यालयांतून तरुणांना मार्गदर्शन करावे, त्यांच्याशी या विषयांवर गप्पा माराव्या असेही मी सुचवून पाहिले, पण त्यांनी दाद दिली नाही. बेंगळूरला माझ्याकडे ते बऱ्याच वेळा येत. अशाच भेटीत एकदा/दोनदा मी त्यांना आमच्या वास्तुमहाविद्यालयात नेले आणि माझ्या विद्यार्थ्यांशी बोलायला लावले. तिथे मात्र ते रंगले, मुलेही रंगली. माझ्या एका विद्यार्थिनीने त्यांना एका प्रश्नात निरुत्तर केले, “सर, तुम्ही स्थापत्यशास्त्र शिकला, तेच अनुभवले, तोच व्यवसाय इतकी वर्षे केला आणि आता ‘मी स्थापत्यशास्त्र सोडले’ असे कसे म्हणू शकता? हे अशक्य आहे?” मणीकाका त्यावेळी काही काळ सुन्न झाले होते! ही आठवण त्यांच्या मनात अनेक वर्षे होती. त्यांना ते विद्यार्थ्यांबरोबरचे हितगूज आवडले होते!
मणीकाकांनी बदलापूरला शेती/बागायतीसाठी सहकारी तत्त्वावर जागा घेतली होती, पण तो प्रयोग फसला! सहकाऱ्यांच्या असहकारामुळे! मणीकाका खूप नाउम झाले होते. पण मग त्यांनी तळेगावला घरासाठी आणि शेतीसाठीही जागा घेतली, उत्साहने घर बांधले आणि मुक्काम तिथे हलविला, त्यांच्या आवडत्या पुस्तकांसह, मणीकाका आणि त्यांची पत्नी/सहचरी वर्षा, दोघेही इथल्या सहनिवासात अनेक स्वप्ने पाहात होते. मी दोन-तीनदा त्यांना तिथे धावती भेट दिली होती आणि एकदा मी आणि माझी पत्नी रेल्वेने भीमाशंकरहन परताना त्यांच्याकडे दोन दिवस राहिलो, दोघांचा आतिथ्यशील पाहुणचार उपभोगला, पुष्कळ गप्पा मारल्या, आम्हीही त्या दोघांच्या स्वप्नविश्वात विहरून आलो! पण अचानक वर्षाकाकींना कर्करोग झाल्याचे निदान झाले, उपचार सुरू झाले. त्या काळातील मणीकाकांची मानसिक ससेहोलपट मी अगदी जवळून पाहिली. मीह जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न केला, पण वर्षाकाकी लगेचच सर्वांना सोडून गेल्या. स्वाती, अक्षय ही मुले आणि इतर कुटुंबीय यांच्या मदतीने मणीकाका या दुःखातून विरहातून कसेबसे सावरले, पण शेवटपर्यंत बाहेर नाही पडले! हा विरह त्यांच्या बोलण्यातून सतत अप्रत्यक्षरीत्या व्यक्त व्हायचा! त्यांची संगीताची आवड मला माहीत होती. मी अनेकदा त्यांना मैफिलींना बोलवायचो, पण ते काही ना काही कारण देऊन नाकारायचे एकदा ते बेंगळूरला माझ्याकडे राहायला आले असताना मी त्यांना अगदी आग्रहाने काहीशा जबरदस्तीनेच अश्विनी भिडे यांच्या सकाळच्या मैफिलीला घेऊन गेलो. परतताना मला म्हणाले, “वर्षा गेल्यानंतर पहिल्यांदाच संगीत मैफल अनुभवली, पण ते संगीत ऐकताना सतत वर्षाची अनुपस्थिती अस्वस्थ करत होती! वर्षाही छान गायची, तिचे सूर सतत सभोवती गुंजत असतात!” त्यांचे मन मग तळेगावलाही रमेना आणि ते खि मनाने मुंबईत – विलेपार्ल्याच्या जुन्या घरी परतले!
मणीकाकांच्या निसर्गाच्या आवडीमुळे मी सांगताच ते मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे आजीव सभासद झाले, अधूनमधून कार्यक्रमातही भाग घेतला. आमच्या कर्नाळ्याजवळील शेतावर ते दोन-तीनदा राहून गेले. त्यांना आमच्या तिथल्या नैसर्गिक शेती/वनीकरण इत्यादी प्रयोगांत खूप स्वारस्य होते. रेनेचे भीमाशंकर येथील शेकरूने संशोधन आणि आमचे तिथल्या गावांमधील सर्वांगीण विकास-परिसर-विकासाचे प्रयत्न याबद्दलही सतत आम्हाला सूचना करत, वेगवेगळ्या परीने मदत करत. आमचे एका भीमाशंकरला जाणे मात्र झाले नाही. मणीकाकांना निसर्गपरिसरात भटकायचीही आवड होती. वर्षांसह त्यांनी केलेल्या भ्रमंत्यांची वर्णने ते मला खुलवून सांगत. आमच्या भटकंत्यांबद्दलही आवर्जून विचारत. मी आणि रेने अॅमेझॉनच्या जंगलात जाणार होतो तेव्हा त्यांनी मला तीमधून एखादा दगड घेऊन यायला सांगितले! असे अनेक भूस्तरीय नमुने मी त्यांना माझ्या प्रत्येक भटकंतीअंती द्यायचो आणि त्यांच्या निरागस आनंदात सहभागी व्हायचो! निसर्गावरील त्यांचे वाचनही अफाट होते. सात-आठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध वन्यप्राणी संशोधक जेन गुडाल यांचे ‘माय लाइफ विथ चिंपांझीज’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले, त्यांना ते खूप भावले आणि त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी जेन गुडाल यांना पत्र लिहून आपला अभिप्राय कळवला. त्यातूनच जेन गुडाल आणि मणीकाकांची पत्रमैत्री सुरू झाली. जेनने त्यांना ह्या पुस्तकाचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर व्हावे असे सुचवले. मणीकाकांनी ते मनावर घेतले, त्यावर त्यांचे मित्र आणि प्रख्यात लेखक विजय तेंडुलकर यांच्याशी चर्चा केली आणि ह्या पुतकाच्या मराठी रूपांतराचे काम त्यांनी माझ्यावर आणि रेनेवर सोपवले. मलाही ते आह्वानात्मक काम आवडले आणि थोड्याशाच कालावधीत मी ते पुरेही केले. माझे रूपांतर मणीकाकांना आणि तेंडुलकरांनाही आवडले. मध्यंतरीच्या जेन गुडाल यांच्या दोन भारत बेटीत बेंगळुरू इथे आमच्या या पुस्तकाच्या विषयावर आणि निसर्ग-संवर्धनाच्या विषयांवर चर्चाही झाल्या. जेनना मणीकाकांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप उत्सुकता होती, तसा योगही आम्ही मुंबईत जुळवून आणला होता. मणीकाकाही या भेटीसाठी उत्सुक होते. पण विमानांच्या गोंधळात जेनना मुंबईद्वारे न जाता दिल्लीहून थेट लंडनला जावे लागले. ती भेट तशीच राहिली आणि ते दोघे कायम पत्रमित्रच राहिले! आमचे पुस्तकही अप्रकाशित राहिले, जेनच्या मूळ प्रकाशकाने परवानगीसाठी लावलेल्या विलंबामुळे!
29 सप्टेंबर 2008 ला आमच्या कार्यालयातर्फे आम्ही एक ‘कृतज्ञता संमेलन’ आयोजित केले – मी आणि सुबोध, दोघा भागीदार-मित्रांच्या ज्येष्ठत्वाच्या तसेच आमच्या व्यवसायाच्या प्रौढत्वाच्या निमित्ताने. सुमारे चाळीस वर्षांच्या आमच्या व्यावसायिक वाटचाली.ल्या अनेक सहप्रवाशांना आम्ही एकत्र केले आणि आम्हा दोघांना विशेष स्फूर्तिदायक, मार्गदर्शक असलेल्या काही बुजुर्गांचा आम्ही तिथे सत्कार केला. मणीकाका यातील एक सत्कारमूर्ती होते. समारंभानंतर रात्री उशीरा दूरध्वनीवरून मला मणीकाकांचा भारावलेल्या आवाजात छोटासाच संदेश मिळाला, “उल्हास, समारंभ फार हृद्य झाला, अभिनंदन आणि शुभेच्छा!”
गेल्या एप्रिलमध्ये केव्हातरी माझ्या बहिणीला-प्रेरणाला मणीकाका दादरला सुनीता कर्णिक यांच्या डोळ्यांच्या दवाखान्यात भेटले. स्वातीही सोबत होती त्याच्या. डोळ्यातला मोतीबिंदू तपासायला आले होते ते. प्रेरणाच्या चौकशीवर ते हसत हसत म्हणाले, नेत्रतज्ज्ञांच्या मते हा अगदी सावकाश वाढणारा मोतीबिंदू आहे. बघू या आता कोण कोणाला हरवते ते! Whether it outlives me or I outlive him!”
मणीकाकांनी मोतीबिंदूला हरवले!
मणीकाकांचे शेवटचे दोन महिने अचानक उद्भवलेल्या आजारात गेले. त्यातही मी त्यांना त्यांच्या भावाकडे-आनंदकडे, नंतर स्वातीकडे भेटलो. या आजाराने मणीकाका एकदम खचल्यासारखे वाटले. मला आणि रेनेला सतत वाटत होते की ही आजारातून आलेली निराशा आहे, ते यातून सावरायला हवेत. मी त्यांना आमच्याकडे बेंगळुरूला बण्यासाठीही सुचवत होतो. पण त्यांच्या आवाजातच निराशा जाणवत होती. त्यांना अक्षयकडे चेन्नईला हलवले हे कळताच मी चेन्नईला भेटायला जायचे ठरवत होतो आणि तेवढ्यात त्या 10 ऑगस्टच्या रात्री निळचा निरोप आला, “उल्हास, पंडित गेले आताच. आपले भेटायला जायचे राहूनच गेले!”
आमच्या कार्यालयातील सर्वांनाच मणीकाकांच्या जाण्याची खूप हळहळ लागून राहिली. मणीकाकांनी अनेक तरुण वास्तु/स्थापत्यतज्ज्ञांना मायेची ऊब दिली. आमचा तर सुमारे तीस वर्षांचा, दोन्ही कुटुंबीयांसह दृढ स्नेह! अशा या अभ्यासू वृत्तीच्या, सुसंस्कृत, ऋषितुल्य स्थापत्यविशारद मित्राची कमतरता तर भासत राहणारच, वाईटही वाटणारच. पण मणीकाकांचा स्पर्श झालेल्या प्रत्येक प्रकल्पातून आम्ही आयुष्यभर
आनंदोत्सव करत राहू!
नुकत्याच कर्नाळ्याजवळच्या माझ्या निसर्गधामाच्या भेटीत एका मोहाच्या वृक्षाखाली रुजणाऱ्या बिया दिसल्या. हे मणीकाकांचे आवडते झाड! मी आता आमच्या या निसर्गधामात मणीकाकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मोहवन’ उभारायला घेतले आहे. त्यातून ही स्मृती सदैव सुगंधित राहील!
‘वृंदावन’, 227, राजमहाल विलास एक्स्टेशन-2,
एच.आय. जी. कॉलनी, फर्स्ट मेने रोड, बेंगळुरू-560 094, भ्रमणध्वनी : +919448 149236.