श्री बाळ ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मुंबईत पाळल्या गेलेल्या बंदमुळे वैतागलेल्या एका तरुणीने त्याबद्दलची नाराजी फेसबुकवर लिहिली आणि त्या माध्यमाच्या पद्धतीने तिच्या एका मैत्रिणीने ‘मला पटतं’ म्हटले. या साध्याश्या, खरे म्हणजे अगदी निरुपद्रवी कृतीची फार मोठी किंमत या मुलींना आणि अनेकांना भरावी लागली आहे. या दोन मुलींना अटक करून अर्ध्या रात्रीपर्यंत पोलीसचौकीत डांबण्यात आले. एकीच्या नातेवाईकांच्या इस्पितळाचे सुमारे पंचवीस लाखांचे आणि दुरुस्त करून घेण्यासाठी लागणाऱ्या अनंत तासांचे नुकसान झाले. त्यावेळी इस्पितळात असलेल्या रुग्णांचे काय झाले; त्यांना मार बसला असेल, लावलेले सलाईन उघडले असेल. सगळ्यांत म्हणजे मरणाची भीती वाटली असेल. इस्पितळातल्या नर्स, डॉक्टर आणि इतर साहाय्यकांना ‘आपण वैद्यकव्यवसायात आलो’ हीच आपली फार मोठी चूक असे वाटले असेल.
बिचाऱ्या मुली. त्यांनी तर जन्माचा धडा घेतला. ‘माझं यात काही चुकलेलं नाही’ असं मनापासून म्हणणारी ती पोर शेवटी ‘दया करा’ सुरात क्षमा मागायला लागली. तिच्या नातेवाईक सर्वांनी ‘बघ. तुझ्यामुळे हे काय काय घडलं’ असे म्हणून तिला बोलूनबोलून तिला जीव नकोसा केलेला असणार. त्या दोघी मैत्रिणी पोलीसचौकीत एकमेकींशी बोलतही नव्हत्या. या मुलींनी बंडखोरी करण्याची हिम्मत जर या प्रकारात गमावली तर ते मात्र फार भयंकर नुकसान असेल. अर्थात याशिवायही काही बऱ्या गोष्टी यातून घडल्या. मुलींची चूक नसल्याचे, पोलिसांनीच आततायीपणे वागल्याचे सर्वांच्या निदर्शनाला आले. त्यातून पोलिसांची एकंदर कायदा कनवटीला असल्यासारखी गुर्मी थोडी कमी होईल की काय अशी शंका निर्माण झाली. पण कायदा, सुव्यवस्था आणि त्याची हमी देणारे सरकार यांच्यात घडणारे बदल ह्या वाळूवरच्या रेषा असतात, कधीही पुसल्या जातात, असा आपला आजवरचा अनुभव आहे.
पण मुलींसाठी मात्र परिस्थिती वेगळी आहे. काय चूक, काय बरोबर हे आता आता कुठे उमजू लागलेल्या या नवतरुणींनी खरोखर एकादी चूक केली असती तरी समाजाने त्यांना सावरून घ्यायला संधी द्यायला हवी होती. त्याउलट नसलेल्या चुकीसाठी जन्माची अद्दल घडणे हेच त्यांच्या वाट्याला आले हे त्यांचे आणि दुर्दैव की आणखी काही?
– कार्यकारी संपादक