अमेरिकेतील निधर्मी, मानवतावादी तत्त्वचिंतक पॉल कुर्झ ह्यांचे नुकतेच निधन झाले. विविध प्रकारच्या विज्ञानातील निराधार अपसमज, गूढवाद, बुवाबाजी, प्रसारमाध्यमांतील भोंदूगिरी आणि सर्व रूपांतल्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा ह्यांचा बीमोड करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. परमेश्वराच्या संकल्पनेशिवाय निकोप सामाजिक व नैतिक आयुष्य जगण्यासाठी युप्रैक्सोफी नामक विज्ञानाधिष्ठित पर्याय त्यांनी लोकांसमोर ठेवला.
पॉल कुर्झ हे नामांकित लेखकदेखील होते. त्यांनी 1973 साली मानवाधिकारांचा जाहीरनामा तयार केला. हा जाहीरनामा म्हणजे 1933 साली तयार करण्यात आलेल्या धर्मविषयक जाहीरनाम्याची नवी आवृत्ती होती, परंतु त्यामध्ये आण्विक शस्त्रास्त्रे, लोकसंख्या : नियंत्रण, वंशवाद आणि लैंगिकता यांसारख्या नव्या युगातील मुद्दयांची भर घालण्यात आली होती. ह्या जाहीरनाम्यावर आंद्रेइ साखारोव्ह, फ्रान्सिस क्रिक, कादंबरीकार इसाक असिमाव इत्यादी 120 विचारवंतांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ‘आपल्याला कोणतीच देवता वाचवू शकणार नाही. आपणच स्वतःला वाचवावे लागेल.’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.
कट्टर धर्मवेड्या लोकांच्या आक्रमणाच्या विरोधात 1980 साली कुर्झ ह्यांनी एन्क्वायरी नावाचे नियतकालिक काढले. त्याच्या पहिल्याच अंकामधून त्यांनी कट्टर धार्मिक पुनरुज्जीवनवादाचा उदय हा विचारस्वातंत्र्य, मानवाधिकार आणि वैज्ञानिक प्रगती ह्या सर्वांना हानिकारक व धोकादायक ठरू शकेल असा खणखणीत इशारा दिला होता. त्यांच्या मते आजचे बहुतांश धर्म हे मानवाच्या भटक्या, रानटी अवस्थेत तयार झाले असल्यामुळे आजच्या युगासाठी, प्रगत, नागर मानवाच्या गरजांच्या पूर्तीसाठी योग्य व पर्याप्त नव्हते.
‘धर्मविहीनतेचे जिणे’ ह्या शीर्षकाखाली 1989 साली त्यांनी केलेल्या लेखनात त्यांनी एका धर्मनिरपेक्ष परंतु नैतिक अशा जीवनपद्धतीचा पर्याय समोर मांडला होता. त्यांच्या मते, धर्मातील पारलौकिकता आणि अधिकारशाहीपासून मुक्त आणि सामाजिक गरजा योग्य रीतीने पूर्ण करणारी अशी ही जीवनपद्धती होती. धर्माशिवाय आयुष्य हे केवळ शक्य कोटीतलेच नव्हे तर अधिक सुकर आहे असे ते मानीत. दोन हजार साली काढलेल्या मानवतावादाच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी मानवमात्रांसाठी एकच सरकार असावे, त्यांची जागतिक संसद असावी आणि त्यातील प्रतिनिधी लोकसंख्येच्या बळावर निवडून दिले जावेत, असे प्रतिपादन केले होते. पर्यावरण-आणि कराधान ह्यांचीही आंतरराष्ट्रीय व्यवस्था असावी असे त्यांनी त्यामध्ये सुचविले होते. व्हाय आय स्केप्टिक हादेखील त्यांचा नावाजलेला लेख होता.
कुझ हे अमेरिकन ह्युमॅनिस्ट जर्नलचे संपादक होते. परंतु सन 1978 मध्ये काही संघर्ष झाल्यामुळे त्यांना ते पद सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या अनेक संस्था वा संघटना काढल्या. कमिटी फॉर द इनवेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ द पॅरानॉर्मल हिचेच नाव नंतर फॉर स्केप्टिकल एनक्वायरी असे झाले. उफॉर सेक्युलर ह्युमॅनिजम व सेंटर फॉर एनक्वायरी ह्या त्या संस्था होत. मात्र 2010 मध्ये बराच वाद व मतभेद होऊन शेवटी त्यांना स्वतःच स्थापन केलेल्या संस्थांमधून बाहेर पडावे लागले, तेव्हा आक्रमक आस्तिकवादाशी आपण सहमत नसल्याचे त्यांनी नमूद केले होते.
पॉल विंटर कु_ ह्यांचा जन्म दि. 25 डिसेंबर 1925 रोजी न्यू जर्सीतील नेवार्क मधील स्वतंत्र विचारवंतांच्या एका घरात झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी अमेरिकन सैन्यात भरती होण्यासाठी उच्च शिक्षण सोडले होते. त्यामुळे त्यांना काही काळ छळछावणीतही राहावे लागले होते. युद्धानंतर ते न्यूयॉर्क विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाले, कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञानात पीएच.डी. मिळवली. तो विषय त्यांनी अनेक ठिकाणी शिकवला. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनच ते निवृत्त झाले.
सन 1969 मध्ये त्यांनी प्रोमेथिअस बुक्स नावाची प्रकाशन संस्था काढली. इतर प्रकाशक चुकूनही ज्यांच्या वाटेला जाणार नाहीत अशी धर्मशास्त्रावर परखड टीका करणारी पुस्तके ते काढत असत. स्केप्टिकल एनक्वायरर (प्रश्नकर्ता) ह्या आपल्या नियत कालिकामधून अनेक वैज्ञानिक अंधश्रद्धांवर त्यांनी हल्ला चढवला होता. त्यांनी स्थापन केलेल्या नवीन पंथाला नव-असे नाव दिले होते. त्यांनी त्याची भूमिका पुढील शब्दांत मांडली होती. आधुनिक युगामध्ये बदल घडवून आणीत आहे. त्यातही, दैनंदिन प्रश्नांचे विशेष धाडसाने उत्तर शोधणाऱ्या आमच्या पंथासाठी नव-असा शब्द घडवला आहे. नव कल्पना व मूल्ये, आपल्या समस्या सोडविण्यातील आणि मानवी जीवनाच्या अस्पृष्ट सीमा ओलांडण्यातील विशेष आत्मविश्वास व्यक्त करतात. आमचा हा वैश्विक समुदाय आपल्यातील मतभेद मिटविण्याचा शांतपणे व परस्पर सहकार्याने प्रयत्न करणार आहे.
मनुष्यमात्रांवर परिणाम करणारे बहुतेक निर्णय जरी स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर घेतले जात असले तरी काही मद्दे मात्र त्याच्या पलीकडे झेपावणारे आहेत. उदा.प्रादेशिक युद्धे, मानवाधिकारांचे जबर उल्लंघन, विज्ञान, नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान यांमधील नवीन संकल्पना व त्यातून साध्य होणारा विकास. सध्या आपण एका सामायिक अशा वैश्विक पर्यावरणात वास्तव्य करतो. त्यामुळे पृथ्वीची तपमानवाढ, जलमार्ग, प्रदूषण यांसारखे मुद्देही सर्वांवर परिणाम करणारे असू शकतात.त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. काही सामायिक धोरणे आखावी लागतील. त्यासाठी हा वैश्विक समुदाय कार्यरत असेल. त्याचप्रमाणे ह्या पृथ्वीवरील अनन्य अशा प्रजातींचे जतन करणे, समुद्रातील अती मासेमारीला आळा घालणे, आर्थिक मंदींचे नियोजन करणे, भूक व दारिद्र्यावर नियंत्रण ठेवणे, संपदेतील विलक्षण तफावत कमी करणे, ग्रामीण भागांत तसेच झोपडपट्ट्यांत सार्वजनिक स्वच्छता यंत्रणा आणि ताजे पाणी पुरविणे, विशेष महत्त्वाचे म्हणजे पारंपरिक दमनकारी व्यवस्थांमधून स्त्रियांचे उत्थान करणे, अन्यायपीडित अल्पसंख्यांकांची त्या चक्रातून मुक्तता करणे – जसे की भारतातील अस्पृश्य समाज.. पीडितांची यादी न संपणारी असून त्यांचे शिक्षण व सुधार ह्यांच्यासाठी संतत-आंदोलन करावे लागेल. व तंत्रज्ञान ह्यांचा वापर मानवतेच्या सेवेसाठी झाला पाहिजे असे आमचे ठाम मत आहे. मानवी मूल्यांची पुनर्रचना करून त्यानुसार आपल्या वर्तनात सुधारणा करण्यास आपण तयार असले पाहिजे.त्यानेच चांगले आयुष्य जगण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पदरात आनंद आणि कल्याण ह्यांचे माप टाकता येईल.
असे संतत-आंदोलन चार दशके अव्याहतपणे चालविणाऱ्या पॉल कुर्झ ह्यांचे स्थान वैचारिक उत्क्रांतीच्या इतिहासात अव्वल असेच राहील.