भारतामध्ये आणि त्यांत प्रामुख्याने हिंदूंमध्ये आत्मा, पुनर्जन्म या गोष्टी अगदी रोमारोमांत भिनल्या आहेत. श्रीमद्भगवद्गीतेतील ‘वसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा’ ‘मारोत देहास परी मरेना’ आणि त्याचबरोबर
‘सांडुनिया जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन।
तशींचि टाकूनि जुनी शरीरें आत्माहि घेतो दुसरी निराळीं।
आणि म्हणूनच ‘जन्मतां निश्चयें मृत्यु मरतां जन्म निश्चयें।
असे भगवंतांनी आणि हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या थोर ऋषिमुनींनी सांगून ठेवले असल्यामुळे अनादि काळापासून हे तत्त्वज्ञान खरेच असले पाहिजे अशी जनसामान्यांचीच नाही तर अगदी उच्चशिक्षित डॉक्टर्स, इंजीनिअर्स, व शास्त्रज्ञांचीही खात्री आहे. माझ्यासारख्या सर्जनचाही चार वर्षांपूर्वी यावर दृढ विश्वास होता. या गोड (गैर)समजाला रोज अधिक अधिकच खतपाणी घातले जात आहे. त्यांतही दृक्श्राव्य माध्यमे आणि वर्तमानपत्रे आत्म्यावर आणि त्यावर आधारित पुनर्जन्मासारख्या गोष्टींवर अनेक चित्रपट आणि मालिका काढीत असतात. ‘लोकमत’सारख्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानांवर (7 जून 2009) महान संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचा ‘पुनर्जन्मावर माझा विश्वास’ अशी ठळक बातमी देऊन अशा विधानांना प्रसिद्धी देण्यात येते आणि लोकसत्तेच्या रविवारच्या अंकात (22 फेब्रुवारी 2009) ‘पुनर्जन्म एक कल्पनातीत वास्तव’ असा डॉ. विद्याधर ओकांचा पानभर लेख छापला जातो. दूरचित्रवाणीच्या एका राष्ट्रीय चॅनलवर पुनर्जन्माची एक घटना परत परत दाखविली जाते, मग ती खरी असो की खोटी!
एवढेच काय डॉ. विजय भटकर असेही विधान करतात की, “पुनर्जन्मावर विश्वास नसणाऱ्यांनी विज्ञानाचा अभ्यासच केला नाही.” आता प्रश्न असा आहे की 4-5 हजार वर्षांपूर्वी केलेल्या आत्म्याच्या विधानावर विश्वास ठेवणारे डॉ. विजय भटकर खरे की अत्याधुनिक विज्ञानाच्या निकषावर आत्मा, पुनर्जन्म या गोष्टींचा अभ्यास करून त्या नाकारणारे वैज्ञानिक खरे?
पर्यावरणतज्ज्ञ श्री. गाडगीळ म्हणतात (लोकमत 07-08-2009) त्याप्रमाणे, “(खरे) विज्ञान हा शंकेखोरपणाचा एकत्रित प्रयत्न आहे. विज्ञान कोणाची अधिकारवाणी मानत नाही. (आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल भगवान श्रीकृष्णाचीही नाही) विज्ञान प्रत्येक गोष्ट निकषांवर तपासून पाहते. एकच टोकाचा सिद्धान्त (उदा. आत्मा आहे) निश्चितपणे टिकून राहत नाही. स्थळ, काळ, स्थितीप्रमाणे त्यात बदल होतो.” (कंसातील शब्द माझे). आता
अशा ‘प्रचलित’ विज्ञानाच्या आधारावर आत्मा खरेच अस्तित्वात आहे काय?
आत्मा हा ऊर्जारूपी आहे आणि ऊर्जा अविनाशी असते या शास्त्रीय तत्त्वाप्रमाणे माझा स्वतःचा भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानावर पूर्ण विश्वास होता. त्याचप्रमाणे माझ्या जीवनावर भगवद्गीतेतील शिकवणुकीचा खूप परिणाम झाला आहे. तरी पण विज्ञानाचा खरा विद्यार्थी असल्यामुळे जेव्हा मी आत्मा आणि पुनर्जन्म ह्यांबद्दल खऱ्या विज्ञानाच्या कसोटीवर अभ्यास करू लागलो, तेव्हा मला पटू लागले की त्या भ्रामक कविकल्पना आहेत. माझ्या अल्पबुद्धीला जे पटले, ते आपणासारख्या सुज्ञ वाचकांनाही सांगावे या हेतूने हा लेखप्रपंच!
ह्या विषयावर चर्चा करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांतील फरक. या दोघांची सुरुवात ही एखाद्या कल्पनेतूनच होते. उदा. राईट बंधूंच्या डोक्यात विमानाची कल्पना प्रथम आली. त्या कल्पनेवर विचार करत करत, विज्ञानाचा आधार घेत, प्रयोग करीत करीत शेवटी त्यांनी पहिले विमान तयार केले आणि आज विमान एक नित्याची बाब झाली आहे. आणि जगातील कोणीही व्यक्ती ते पाहू ‘ शकते आणि इच्छा असल्यास प्रवास करू शकते. परंतु तत्त्वज्ञानाबद्दल तसे कधीही म्हणता येणार नाही. कारण शेवटपर्यंत त्यातील ज्ञान हे तार्किक व काल्पनिकच राहते. आणि कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती प्रत्यक्ष त्या गोष्टींचा उदा. देव, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, ब्रह्म यांचा कधीच प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकत नाही. कामाला
या पार्श्वभूमीवर आत्मा व पुनर्जन्म यांच्या अस्तित्वाचा अभ्यास करावा लागेल. पुनर्जन्म मान्य न करणे याचाच अर्थ आत्मा नाकारणे हा होय. कारण आत्म्याच्या अस्तित्वाशिवाय पुनर्जन्म शक्य नाही. आत्मा किंवा पुनर्जन्म आहे किंवा नाही याची चर्चा करण्याकरिता एक छोटा लेख पुरणार नाही. त्याकरिता पीएच.डी. चा मोठा प्रबंधच लागेल. पण या लेखात थोडक्यात त्याचा ऊहापोह करू या.
खरे तर आत्मा किंवा पुनर्जन्म या गोष्टींवर विश्वास ठेवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि इतरांना त्यांचे काही घेणे देणे नसावे. मग या विषयावर चर्चा तरी कशाकरता करायची? या चर्चेचा सर्वसामान्यांना काही उपयोग आहे काय? की ही नुसती वांझोटी चर्चा आहे? नाही. ही चर्चा वांझोटी नाही. आत्म्याचे आणि पुनर्जन्माचे अस्तित्व नाकारल्यास खालील अनेक फायदे होणार आहेत.
1) भूत, प्रेत, पिशाच्च, भानामती, चेटूक, चेटकीण, झपाटलेले घर या गोष्टी आपोआप नष्ट पावतील आणि त्यांचे निराकरण करण्याकरिता भगत, बुवा, बाबा यांच्यासारख्यांच्या नादी लागून भूत, भानामती काढण्याच्या नावाखाली लागणारा वेळ, पैसा आणि स्वतः किंवा इतरांना होणारा त्रास, क्वचित एखाद्याचा बळी. ह्यांची जरूरी पडणार नाही.
2) एखादा सामान्य जादूगार आपल्या हातचलाखीने ज्या साध्यासाध्या गोष्टी करू शकतो त्याच दाखवून, “या माझ्या अंगी असलेल्या दैवी शक्तीमुळे आहेत’ असे भासवून कोट्यवधींची माया जोडणारा कोणताही स्वयंघोषित स्वामी, महाराज, बापू, माँ, “आपण ईश्वराचे किंवा कोणत्यातरी देवतेचे अवतार आहोत’ असे सांगून लाखोंच्या भोळसट जनतेला फसवू शकणार नाही.
3) माणूस मेल्यानंतर करण्यात येणारी कर्मकांडे, पिंडदान, पिंडाला कावळा शिवणे, दहावे, बारावे अस्थिविसर्जन आणि त्यानंतर दरवर्षी मेलेल्या पितरांना खाद्य देण्याकरिता केलेली श्राद्धे या कशाचीही जरूरी पडणार नाही. त्यासाठी भरपूर वेळ आणि प्रसंगी कर्जाने घेतलेला पैसा वाया जाणार नाही.
4) कर्मसिद्धान्तावर विश्वास ठेवून आपल्या प्राप्त आयुष्याच्या बऱ्यावाईट गोष्टींस आपणच जबाबदार असताना त्यांत स्वकर्तृत्वाने बदल घडविण्याऐवजी ‘माझे नशीब’, पूर्वजन्मीचे फळ’ त्याला माझा इलाज नाही कारण “दैवजात दुःखें भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा” असे म्हणत रडत न बसता आपली प्रगती करता येईल.
5) याचबरोबर पुढचा जन्म चांगला मिळावा, मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून या जन्मीची सर्व सुखे सोडून भौतिक सुखांचा आनंद घेण्याकरिता धडपड करण्याऐवजी सोडोनि कामना सर्व’ सर्वसंगपरित्याग करून खडतर जिणे जगण्याची जरुरी पडणार नाही कारण पुढचा जन्मच असणार नाही.
6) आत्मा आणि पुनर्जन्म नाकारण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आज जगात कोफावणारा आतंकवाद नष्ट होईल, कारण ‘धर्मयुद्धात मरण पावल्यास तुला स्वर्गप्राप्ती होईल.’ “कयामतच्या दिवशी ईश्वर निवाडा करताना तुला जन्नतमध्ये पाठवेल’ असे कोणीही, कसाब’सारख्या स्वतःला अल्पवयीन समजणाऱ्या आतंकवाद्याला पटवून देऊ शकणार नाही! आणि कोणीही ‘आत्मघातकी हल्ले करण्यास तयार होणार नाही.
एवढे सर्व फायदे जनसामान्यांना मिळवून देण्याकरिता आजच्या प्रगत विज्ञानाची मदत घेऊन सर्वसामान्य माणसांनासुद्धा ‘आत्मा व पुनर्जन्म नाही’ हे सत्य पटवून देणे हे सर्व सुबुद्ध व्यक्तींचे कर्तव्य आणि या लेखाचे प्रयोजन आहे.
आत्मा नाही हे सिद्ध करण्याआधी, आत्मा या कल्पनेचा जन्म, त्याच्या जन्माचा इतिहास, खरेच ती कल्पना भगवान श्रीकृष्णानेच सर्वांत प्रथम स्वतः सांगितली की ती त्याने ‘अवतार’ घेण्यापूर्वीपासून होती हे बघणे आवश्यक आहे. कारण आत्म्याच्या जन्मापासूनच ती एक कपोलकल्पित कविकल्पना असून कोणाही ‘एका भगवंताने’ ती सांगितलेली नाही हे जर पटले व शास्त्रीय निकषावरही ती खोटी ठरवता आली तर सत्य पचविणे सोपे जाईल.
ही कहाणी सांगण्याअगोदर एक अभिमानाची गोष्ट सांगावी लागेल, ती अशी की, जगातील इतर प्रमुख धर्माच्या तत्वज्ञानापेक्षा आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात याबद्दल अधिक सखोल आणि शास्त्राच्या जवळ जाणारा अभ्यास झाला आहे. जगातील तीन प्रमुख धर्म ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम ह्यांचा उगम अब्राहम ह्याच्यापासून झाला आहे. तीन्ही धर्मांच्या पुस्तकांची – प्रामुख्याने बायबल, आणि कुराण यांची सुरुवात एकच आहे आणि ते तीन्ही धर्म असे मानतात की ईश्वराने 10,000 वर्षांपूर्वी फक्त सहा दिवसांत सर्व जीवसृष्टी निर्माण करून सातव्या दिवशी विश्रांती घेतली. या पार्श्वभूमीवर आपल्या दशावताराकडे पाहिल्यास आपण डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या अधिक जवळ जातो असे म्हणावे लागेल. कसे ते पाहू या : साधारण 1300 कोटी वर्षांपूर्वी एक प्रचंड महास्फोट झाला (Big Bang) आणि हे विश्व तयार झाले.
460 कोटी वर्षांपूर्वी आपल्या सूर्याचा आणि पृथ्वीचा जन्म झाला. हळूहळू पृथ्वीचे तापमान कमी होऊन पृथ्वीवर पाणी तयार झाले. केव्हातरी एखादा धूमकेतू पृथ्वीवर येऊन धडकला किंवा प्रचंड मोठा विजेचा लोळ पृथ्वीवर पडला आणि पृथ्वीवर असलेल्या रासायनिक पदार्थापासून पहिल्या ‘जीवाची’ पाण्यात सुरुवात झाली. (एकपेशीय पाण्यातील जीव) त्यानंतर या पेशींचे समूह तयार होऊन प्रथम वनस्पतींचा जन्म झाला. व त्यानंतर जलचर सृष्टीचा जन्म झाला (मत्स्यावतार). नंतर क्रमाक्रमाने उत्क्रांती होत पाण्यात आणि जमिनीवर वावरणारे परंतु अंडी देणारे कासवासारखे प्राणी (कूर्मावतार), मग सस्तन प्राणी (वराह-अवतार), त्यानंतर अर्धवट प्राणी आणि अर्धवट मानव ‘एप’सारखी माकडे (नृसिंह अवतार), असे करत करत पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आल्यापासून कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर साधारण 3 लाख वर्षांपूर्वी मेंदूची अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेल्या बुटक्या मनुष्यप्राण्याचा आफ्रिका खंडात जन्म झाला (वामन-अवतार). सकृद्दर्शनी इतर प्राण्यांत आणि माणसांत दोन बाह्य फरक आहेत आणि ते म्हणजे मनुष्यप्राणी दोन पायांवर चालतो आणि त्यांच्या अंगावर केस नसतात. पण हे फरक अगदी क्षुल्लक आहेत. इतर जीवांत आणि मनुष्यांत सर्वांत मोठा फरक आहे तो म्हणजे मनुष्यप्राण्याचा खूप मोठा मेंदू. साधारण 50 कोटी वर्षांपूर्वी सरपटणाऱ्या जीवातील अगदी प्राथमिक स्वरूपातील छोट्या मेंदूचा उदय झाला (Brainstem). तेव्हापासून माणसाच्या डोक्यांतील अतिप्रगत आणि प्रचंड आकाराच्या व वजनाच्या मेंदूचा विकास होण्याकरिता उत्क्रांतीच्या कडीत कोट्यवधी वर्षांचा कालावधी जावा लागला.
डार्विनच्या सिद्धान्ताप्रमाणे माकडापासून माणूस उत्क्रांत झाला. या कडीत माणसाच्या नजीकचा पूर्वज होमोहॅबीलीस (जो दोन पायांवर चालत होता) जो साधारण 15 ते 25 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आला, त्याचा मेंदू सर्वसामान्यपणे 630 cm’ एवढा होता. आजहि ‘एप’ या आपल्या पूर्वज माकडांचा तो 600 cm’ आहे. त्यानंतर विकसित झाला Homo Erectus (होमो इरेक्टस). ज्याला ‘आदिमानव’ म्हणता येईल. (10 ते 15 लाख वर्षांपूर्वी) त्याचा मेंदू 1250 (ते) 1300 cm’ झाला. या मोठ्या मेंदूमुळे त्याने अग्नीचा वापर सुरू केला आणि हातोडी आणि कु-हाडीसारखी हत्यारे तो तयार करू लागला. याचा अर्थ तो ‘विचार’ करू लागला. कल्पनाविलास करू लागला आणि मनांतील कल्पना वापरून प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या आणि डोळ्याला न दिसणाऱ्या नवीन वस्तू तयार करून त्या वापरू लागला. उदा. कु-हाडी, चाक, तेव्हाच चाकाचा शोध लागला.
आजच्या माणसाचा मेंदू साधारण 1450 ते 1500 cm’ एवढ्या आकाराचा आहे. या आजच्या मोठ्या मेंदूमुळे मानवप्राणी अधिकच विचार, कल्पना करू लागला. निरनिराळे शोध लावू लागला, भाषा बोलू लागला, पुस्तके लिहू लागला. गेल्या 300-400 वर्षांत तर त्याची फारच झपाट्याने प्रगती झाली आहे. आज टी.व्ही., कॉम्प्युटर, अंतराळ प्रवास, जेनेटिक्स् या सर्वांचा रोजच्या जीवनात सहज वापर होत आहे.
अगदी मुंग्यांपासून डॉल्फिन सारखे मासे, इतर सर्व प्राणी विचार करू शकतात. वारुळे, घरटी बांधू शकतात. आपल्या अपत्यांची काळजी घेऊ शकतात. परंतु माणूस सोडून कोणत्याही प्राणिमात्राच्या डोक्यात ‘काळ’, ‘वेळ’ या कल्पना येत नाहीत आणि कोणताही प्राणी आपला एक दिवस मृत्यू होणार आहे याची तसेच सौंदर्याची कल्पना करू शकत नाही. त्याचप्रमाणे कोणताही प्राणी एखाद्या कलेचा अगर शास्त्राचा तात्त्विक विचार (Theory) मांडून आपल्या वंशजांकरिता, भावी पिढ्यांकरिता लिहून वा कोरून वा नोंदी करून ठेवू शकत नाहीत.
इतर प्राण्यांपेक्षा आपला मेंदू मोठा आहे आणि तो अजूनही वाढतोच आहे म्हणजे नक्की काय होते आहे? म्हणजे मेंदूतील पेशी आणि मज्जातंतूचे जाळे (Brain Cells & neurons) हे वाढत आहे. (मानवाच्या मेंदूत 2 अब्ज मेंदूच्या पेशी असतात.) त्याबरोबरच मेंदूच्या कामाला लागणारी रसायने वाढत आहेत. आज असे सिद्ध झाले आहे की मन, विचार, कल्पना, प्रेम, बुद्धी या सर्व गोष्टींना मेंदूतील असंख्य पेशी आणि त्यांची जोडणी, आणि तेथे तयार होणारी रसायने कारणीभूत आहेत. कोणतीही संवेदना मेंदूत पोहोचली की तेथे सिरोटोनीन किंवा नॉरअॅड्रीनॅलीन संप्रेरके स्रवतात. डोपामीन नावाच्या रसायनामुळे उत्तेजन मिळते मग ते एखाद्या कामात असो, शर्यतीत असो, नर-मादीच्या समागमात असो किंवा भक्तांची ब्रह्मानंदी टाळी लागणे असो. अशा गोष्टीत यश मिळाल्यानंतर मिळणारे सुखद अनुभव, बरे वाटणे हे एन्डॉर्फिन (अफूसारख्या) रसायनामुळे मिळतात. प्रेम – मग ते नर-मादीचे असो की अपत्यप्रेम असो, मादीमध्ये ऑक्सिटोसिन नावाच्या द्रव्यामुळे तर नरामध्ये वाझोप्रेसिन या द्रव्यामुळे होते. स्मरणशक्तीमध्ये कॉर्टिसोल या संप्रेरकाचा सहभाग असतो. सिरोटोनीन, नॉरॲड्रीनलीन, डोपामीन, एन्डॉर्फिन, ऑक्सिटोसिन, वाझोप्रेसिन आणि कॉर्टिसोल या सर्व द्रव्यांची इंजेक्शन्स आज उपलब्ध आहेत आणि रोजच्या वापरात आहेत. आपला विचार हा मेंदूतील जैवरासायनिक अंतस्रावाला किंवा कोणत्याही एखाद्या बाह्य संवेदनेला मेंदूच्या पेशींनी दिलेला प्रतिसाद असतो.
आपण बोलतो म्हणजे काय होते? : प्रथम आपल्या मेंदूत एखादा विचार येतो. तो अक्षरे आणि शब्दप्रतीकांच्या रूपात तयार होतो. त्यांची एक साखळी बनते आणि मेंदू याचे रूपांतर विजेच्या प्रवाहात करून तो प्रवाह आपल्या जिभेच्या, ओठांच्या आणि स्वरयंत्राच्या स्नायूंकडे पाठवितो. मग आपल्या मुखांतून आपल्या डोक्यांतील विचार शब्दांवाटे बाहेर पडतो.
तीच गोष्ट, आपण एखादा विचार लिहितो तेव्हाही होते. आपला मेंदू आपल्या प्रतीकात्मक शब्दांचे रूपांतर आपल्या हाताच्या आणि बोटांच्या हालचालीत करतो आणि ते शब्द कागदावर उमटतात. याचा थोडक्यात अर्थ म्हणजे विचार करणे, कल्पनाविलास करणे, प्रेम करणे, बोलणे, लिहिणे, मन, बुद्धी इत्यादी सर्व गोष्टी आत्म्यासारख्या कोणत्याही बाह्य शक्तींमुळे किंवा ‘देवाच्या कृपेने होत नसून, जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा परिपाक म्हणून तयार झालेल्या मानवाच्या मेंदूत होणाऱ्या जैवरासायनिक क्रियांमुळे होतात. हे आता अनेक प्रयोगांनी, त्यांतही नवीन शोधलेल्या पेटस्कॅन (Petscan) आणि फंक्शनल मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग (EM.R.I. – Functional Magnetic Resonance Imaging) सारख्या नवतंत्रज्ञानाने सिद्ध करता येते.
अशा प्रकारे विचार करता करता साधारण 5000 वर्षांपूर्वी, म्हणजे ख्रिस्तपूर्व 3000 वर्षांपूर्वी मानवी मेंदू अधिक निसर्गात व आपल्या शरीरात होणाऱ्या सर्व क्रियांचे विवेचन करू लागला. त्यामागील कार्यकारणभाव समजावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. हाच तो भारतीय तत्त्वज्ञानातील वेदकाळ, परशुरामाचा आणि त्यानंतर श्रीरामाच्या अवतारांचा काळ, आणि अब्राहमचा काळ. हाच इराण, युरोपातील, ग्रीक संस्कृतीचा उदयाचाही काळ.
ज्या आर्यांनी, त्यांच्यातील काही कविमनाच्या ऋषि-मुनींनी वेद, उपनिषदे आणि रामायण, महाभारत ही महाकाव्ये लिहिली ते आर्य बाहेरून भारतात आले. आर्य हे मूळचे भारतीय नाहीत. त्यांच्या उगमाबद्दलही वाद आहेत. वामन अवतारातील बुटका आफ्रिकन माणूस उत्तरेकडे सरकत तेथून जगात सगळीकडे गेला. त्यानंतर आर्यांसारख्या उंच गोऱ्या रंगाचा मानव निर्माण झाला. आर्य प्रथम साधारण 5000 वर्षांपूर्वी युरोप-इराण येथील भूमध्य समुद्राच्या प्रदेशाजवळ राहत असत असे म्हटले जाते आणि तेथील संस्कृतीला इंडो-युरोपियन आणि इंडो-इराणीयन संस्कृती समजले जाते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या मते आर्य हे उत्तर ध्रुवाकडून आले (The Arctic Hoine of the Vedas – B.G. Tilak 1903. page No.41-42). कारण ऋग्वेदांत दिल्याप्रमाणे इंद्रदेवाचे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस ही परिस्थिती फक्त उत्तर-दक्षिण ध्रुवांवरच असते.
हे आर्य नंतर भारतात आले आणि त्यांचा भारतातील द्रविड संस्कृतीशी मिलाफ झाला. अशा या आर्यापैकी ऋग्वेदकाळातील काही बुद्धिवंतांच्या डोक्यात असे विचार आले की प्रत्येक हालचालीमागे कोणीतरी ‘कर्ता’ असलाच पाहिजे. बाहेरून ढकलल्याशिवाय कोणतीच निर्जीव वस्तू जागेवरून हलू शकणार नाही. कोणत्या तरी दैवी शक्तीने ढकलल्याशिवाय नदीतील पाणी वाहणार नाही किंवा वरुणदेवाने कुंकर मारल्याशिवाय वारा वाहणार नाही. तीच गोष्ट चंद्र, सूर्य आणि विश्वातील सर्व ताऱ्यांची. तद्वतच मनुष्यप्राण्यांच्या सर्व हालचाली या कोणत्यातरी ‘शक्ती’ शिवाय होऊच शकत नाहीत. ही शक्ती म्हणजेच ‘आत्मा’. ही ‘शक्ती’, हा आत्मा शरीराला सोडून गेला तर शरीर ‘अचेतन’ होते. त्याच्या चलनवलनादि सर्व क्रिया थंडावतात. म्हणजेच ती व्यक्ती ‘मृत’ होते. ‘केनोपनिषदाची’ सुरुवातच मुळी या प्रश्नाने होते.
केनोशितम् पतति प्रेषितम् मनः केन प्राणः प्रथमः प्रैती युक्तः।
केनोशीतम वाचम इमामं वदन्ति चक्षःश्रोतम क उ देवो यनाक्ति। केन उप.7)
कोणाच्या आज्ञेने मन उजळते? कोणाच्या आज्ञेने जीव चालतात? कोणाच्या आज्ञेने माणसे बोलतात? ‘कोणाच्या आज्ञेने डोळे पाहतात, कान ऐकतात आणि शरीरांतील इतर अवयव आपापली कामे करतात? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच, ‘आत्म्याच्या आज्ञेमुळे’.
आत्म्याच्या उगमाची दुसरी शक्यता अशी, की ‘प्रत्येकाच्या जीवनात ‘अटळ’, ‘अमर’ असलेल्या मृत्यूवर मात करून शरीर मृत झाल्यावरही आपले अस्तित्व टिकवावयाचे असेल तर एखाद्या अशा ‘अमर’ ‘वस्तूची’ कल्पना करणे भाग होते.
खरे तर आत्मा आणि पुनर्जन्म ही कल्पना साधारण 2000 वर्षांपूर्वी (येशू ख्रिस्ताच्या काळात) लिहिल्या गेलेल्या भगवद्गीतेपेक्षा कितीतरी अगोदर म्हणजे ऋग्वेदाच्या काळातच (5000 वर्षांपूर्वी) जन्माला आली. एक कवी एकदा एका मृत व्यक्तीच्या अग्निसंस्काराच्या वेळी हजर होता. त्यावेळी त्याला काव्य स्फुरले आणि तो म्हणू लागला, (“जिवंतपणी सूर्यासारखे तेजस्वी असलेले) याचे डोळे आता सूर्याकडे परत जावोत.” याचा श्वास (प्राण)वायूकडे आणि आत्मा त्याच्या धर्मानुसार (कर्मानुसार) एक तर स्वर्गाकडे किंवा पृथ्वीकडे जावो; किंवा पाण्यात वा वनस्पतीत जावो (ऋग्वेद 10 व्या मंडळातील 16 व्या अध्यायातील 3 रा श्लोक)
“सूर्य चक्षुर्गच्छतु वातमात्मा द्यां च गच्छ पृथिवीं च धर्मणा।
अपो वा गच्च यदि तत्र ते हितं ओषुधी प्रतिष्ठा शरीरैः।।
आणि पुढे त्या कवीने वल्गना केली की माझा काव्याच्या शक्तीने मृत्यूच्या जगात गेलेल्या त्या आत्म्याला मी परत बोलावून जगण्याची संधी देईन. पुढे कवी असेही म्हणतो की, हा आत्मा कोठेही गेलेला असेल, स्वर्गात, पृथ्वीवर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पाण्यात, प्रकाशात, वनस्पतीत किंवा कोठूनही त्याला परत आणून नवीन शरीरात वास करण्यास लावेन, (ऋग्वेद 58,1-12)
आपल्या तत्त्वज्ञानातील आत्मा आणि पुनर्जन्म या कल्पनेचा हा खरा उगम. येथे लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की ही एका कवीची कल्पना आहे, ते वास्तव नाही. पूढे उपनिषदांच्या काळात या कल्पनेचा फार मोठ्या प्रमाणात विलास केला गेला.
बृहदारण्यक उपनिषदातील चौथ्या भागातील चौथ्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकात कवी अशी कल्पना करतो की, एखाद्या गवताच्या पानाच्या वरच्या टोकावर आलेला नाकतोडा जसा दुसऱ्या पानावर उडी मारतो तसेच आपला आत्मा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात उडी मारतो. कठ उपनिषदांत तर नचिकेत यमाकडून तिसरा वर मागताना, मृत्यूनंतर काय होते याचेच ज्ञान देण्याचा हट्ट करतो आणि मृत्यूची देवता यम त्याला आत्म्याचे आणि ब्रह्माचे सर्व ज्ञान देते.
याच कठोपनिषदांतील पहिल्या भागातील दुसऱ्या अध्यायातील 18 ते 20 ह्या श्लोकांत भगवद्गीतेत दिलेली आत्म्याबद्दलची सर्व माहिती जशीच्या तशी दिलेली आहे.
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पराणो न हन्यते हन्यमाने शरीरे।।
हा जसाच्या तसा गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील विसावा श्लोक आहे. अगदी कानामात्रेचाही फरक नाही. त्याचप्रमाणे कठ उपनिषदांतील पहिल्या भागातील दुसऱ्या अध्यायातील 19 व्या श्लोकाची खालची ओळ आणि गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 19 व्या श्लोकाची खालची ओळही जशीच्या तशी आहे. याचा अर्थ व्यासमुनींनी भगवद्गीता लिहिताना गीतेच्या 500-600 वर्षे अगोदर लिहिल्या गेलेल्या उपनिषदांचा आधार घेतला. यावरून श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला रणांगणावर गीता सांगितली हे तरी किती खरे आहे असा प्रश्न पडतो. कारण महाभारतातील कौरव-पांडवांमधील युद्ध हे साधारण ख्रिस्तपूर्व 1400 वर्षे ते 1000 वर्षांपूर्वी झाले होते. (The Vedic Age – Bhartiya Vidya Bhavan 1966 – p.273) त्याचा अर्थ आजची गीता त्या युद्धाच्या 1000 ते 1500 वर्षानंतर लिहिली गेली. उपनिषदे आणि भगवद्गीता कोण्या एका कवीने लिहिली नसून ती
अनेक ऋषीमुनींनी लिहिली आहेत.
भगवंतांनी गीता सांगितली म्हणजे ती खरीच असली पाहिजे, हे म्हणणे तरी किती सयुक्तिक आहे? कारण गीतेचे तत्त्वज्ञान सांगणारे दोन कृष्ण आहेत. छांदोग्य उपनिषदात ‘घोरा अंगिरसाचा शिष्य – देवकीचा पुत्र कृष्ण’ याचा उल्लेख आहे. (छांदोग्य उप. 1181) (The Principal Upnisadas – S. Radhakrishnan 397) परंतु ‘महाभारत’ या महाकाव्यातील कृष्णाबद्दलच्या तपशिलामध्ये कोठेही त्याच्या या गुरूचा – ‘घोरा अंगिरसाचा उल्लेख नाही, उलट महाभारतातील कृष्ण-सुदामाच्या आख्यायिकेनुसार हा ‘वासुदेव’ कृष्ण सांदीपनीच्या आश्रमात सुदाम्याबरोबर अभ्यास करीत होता. त्यामुळे हे दोन कृष्ण एकच असण्याची शक्यता फारच कमी आहे. (A Constructive Survey of Upanishadic Philosophy – R.D.Ranade, Bharatiya Vidyabhavan 1986 page 143-144) ह्या सर्व विवरणावरून, श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या तोंडी घातलेले आत्मा पुनर्जन्माबाबतचे तत्त्वज्ञान, हे ‘भगवंतांनी’ पांगितल्यामुळे त्याविरुद्ध कोणी बोलू नये, ह्या . उद्देशाने लिहिले आहे असे दिसते.
हे तत्त्वज्ञान जे मुळात फक्त कपोलकल्पित आहे, ते एवढे फोफावलेही नसते, परंतु गेली 2000 वर्षे त्याला वारंवार खतपाणी घालून ते भारतीयांच्या मनांत अगदी पक्के ठसविण्याचे काम प्रारंभी श्रीमद् आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांनी प्रारंभी केले. मध्ययुगात संतांनी आणि प्रामुख्याने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून, ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचविले. अगदी अलिकडच्या काळांत स्वामी विवेकानंद, स्वामी अरविंद ह्यांनी त्याला आधुनिक शास्त्राचा मुलामा दिला. यामुळे माझ्यासारखे शल्यचिकित्सक आणि श्री विजय भटकरांसारखे शास्त्रज्ञही या भूलथापांना बळी पडले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत हिटलरचा प्रचारप्रमुख पॉल जोसेफ गोबेल्स याने अवलंबिलेल्या नीतीसारखी नीती, आत्मा पुनर्जन्माबाबत वापरली गेली आहे. “एखादी असत्य गोष्ट अगदी ठासन आणि परत परत खूप वेळेस लोकांच्या माथी मारली तर त्यांना ती खरीच वाटते.
आत्मा आणि पुनर्जन्म आणि एकंदरीतच देव, ब्रह्म, चैतन्य हे भारतीयांच्या मनात इतके ठाम बसले आहेत की या विरुद्ध बोलण्यामुळे माझ्या घरातील लोकच नाही, तर थेट उधमपूर, डेहराडूनपासून दक्षिणेकडील शिवकाशीपर्यंतचे माझे सर्व सर्जन मित्र मला मूर्खात काढील आहेत. पण सत्य कितीही झाकले तरी कधीना कधी ते बाहेर येणारच म्हणून हा छोटासा प्रयत्न.
(क्रमशः उर्वरित भाग पुढे)
डॉ. टोणगांवकर हॉस्पिटल, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि.धुळे – 425408 फोन : (02566)244042, 244742,
E-mail : rrtongaonkar@gmail.com
(साभार अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रावरून)