सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे
आधुनिक भांडवलशाहीचा जन्म झाला आणि आधुनिक औद्योगिकीकरण उदयास आले, त्यावेळी, ज्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणता येईल, असे काही विचारवंत निर्माण झाले. त्यांनी व्यक्तीच्या पराक्रमावर सरकारचे कसलेही बंधन असू नये, असे प्रतिपादन करण्यास सुरुवात केली. ‘प्रायव्हेट एन्टरप्राईजेस’ (खासगी उद्योगा)मुळे सर्वांनाच संधी मिळते. प्रत्येकाने आपापले हित पाहावे, म्हणजे सर्वांचेच हित साधेल, व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहील, ‘ग्रेटेस्ट गुड ऑफ दि ग्रेटेस्ट नंबर’ (जास्तीत जास्त लोकांचे हित) याच मार्गाने साधू शकेल, अशा प्रकारचे त्यांचे तत्त्वज्ञान होते.
सरंजामशाहीच्या जमान्यात सर्वसामान्य व्यक्तीला फारच थोडे स्वातंत्र्य असे. राजे-सरदार हेच सदैव वर असत. अशा प्रकारच्या बंधनांनी जखडलेला तो समाज होता. त्यांची बंधने तोडणे, हे क्रांतिकार्यच होते. फ्रान्समध्ये व युरोपातील इतर काही देशांत ही क्रांती झाली. व्यक्तीला स्वातंत्र्य असावे; पूर्ण स्वातंत्र्य असावे, कोणतेही बंधन नसावे, असा विचार प्रसृत होणे त्या काळात स्वाभाविक होते. ‘जगू द्या, करू द्या.’ हा विचार निर्माण झाला आणि त्याच दृष्टीने सरकारकडून कार्य झाले; परंतु त्याचा परिणाम मात्र उलटा झाला. आपापले हित साधण्याचे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिल्याने जास्तीत जास्त लोकांचे हित होईल, ही आशा विफल ठरली.
हा उलटा परिणाम का झाला? कारण जीवनाच्या संग्रामात भाग घेणारी प्रत्येक व्यक्ती योग्य स्थानावर उभी नव्हती . सर्वांकडील योग्यता, संधी, साधने ह्या गोष्टी समान नव्हत्या. ज्यांच्याजवळ त्या अधिक होत्या, ते पुढे गेले. ज्यांना त्या मिळाल्या नाहीत, ते बिचारे मागेच राहिले… कराराचे स्वातंत्र्य आले, तरी करार करणारे उभयपक्ष समबल असायला पाहिजेत ना. ते नसल्यामुळे सरंजामशाहीच्या काळात होती त्यापेक्षाही अधिक वाईट स्थिती ह्या काळात जगाची झाली. – जयप्रकाश नारायण
(आर्थिक लोकशाहीचा आधार – विश्वस्तवृत्ती ह्या भाषणामधून)