विज्ञान, तंत्रज्ञान व गांधीजी

“यंत्रसामुग्री हे आधुनिक समाजाचे मुख्य प्रतीक आहे. ते खूप मोठे पाप आहे.”
“नई तालीम ह्या माझ्या योजनेमध्ये अधिक चांगली ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था असतील. रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि इतर तज्ज्ञ ह्यांची फौज असेल. हे लोक राष्ट्राचे खरे सेवक असतील आणि आपले हक्क व गरजा ह्यांच्याबाबत सजग झालेल्या जनतेच्या विविध आणि वाढत्या गरजांना ते पुरे पडतील. हे तज्ज्ञ जेव्हा परकीय भाषा न बोलता लोकांची भाषा बोलतील, त्यांनी संपादन केलेले ज्ञान ही जनतेची सामाईक मालमत्ता मानली जाईल, तेव्हाच निव्वळ नक्कल न होता खरे मूलभूत स्वरूपाचे काम होईल आणि त्याचे मूल्य समान व न्यायी पद्धतीने सर्वांमध्ये विभागले जाईल.”
गांधीजींनी उच्चारलेल्या वा लिहिलेल्या शब्दांवरून त्यांना समजून घेणे हे हत्ती व सात आंधळ्यांच्या कथेप्रमाणे आहे. म्हणूनच, भांडवलवादाच्या बेलगाम पुरस्कर्त्यांपासून तर अहिंसक संघर्षासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या शांतिदूतापर्यंत सर्वांना आपल्याला हवा तो गांधी बरोब्बर शोधून काढता येतो. ह्याचा दोष शोध घ्यायच्या वस्तुपेक्षा शोधणाऱ्यांच्या दृष्टीतच अधिक आहे. सत्याचा संततशोध हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय
असल्यामुळे गांधीजी सतत उमलत होते. त्यामुळे, एकाच विषयावरची त्यांची मतेही कधीकधी परस्परविरोधी वाटतात व असतातही, ह्यात काहीच आश्चर्य नाही. दुसरे असे की माझे जीवन हाच माझा संदेश असे म्हणणाऱ्या माणसाला समजून घेण्यासाठी एखाद्या विशिष्ट प्रसंगात त्याने उच्चारलेल्या शब्दांऐवजी त्याचे आयुष्य, काम, व एकंदर तत्त्वज्ञानच जाणून घेणे आवश्यक नाही का? समग्रतेच्या ह्या उपासकाला समजून घेण्यासाठी विभाजक, विश्लेषक साधने किती उपयोगी पडणार?
विज्ञान, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास हे गांधींच्या आयुष्यातील सगळ्यांत कमी चर्चिले गेलेले विषय आहेत. ह्या विषयाची, त्यांच्या अस्पृश्यता, सभ्यता, सत्य आणि अहिंसा ह्या विषयांशी आणि त्यावर झालेल्या चर्चेशी तुलना करून पाहा म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. प्रस्तुत लेखात त्याचा समग्र नाही, तर धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
गांधीजी हे तंत्रज्ञानाच्या विरोधात होते किंवा निदान जगाला पुढे नेण्याऐवजी मागे ढकलत ढकलत यंत्र-पूर्व आदिम अवस्थेला नेऊन ठेवणारे स्वप्नाळू पुरुष होते असे अनेक आधुनिकतावादी, मार्क्सवादी, समाजवादी आणि खुल्या बाजारपेठेचे सर्व प्रकारचे समर्थक ह्या लोकांचे मत आहे. त्यांच्या गांधींवरील टीकेचा सारांश पुढील शब्दांत सांगता येईल –
• गांधीवाद म्हणजे साध्या शेतकरी जीवनाचे उदात्तीकरण आहे. तो गरिबीला महत्त्व देतो. हे मूळ मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे.
• आपली इच्छा असली तरी आपण त्या आदिम युगाकडे परत जाऊ शकत नाही. तंत्रज्ञानाच्या प्रवाहात एकदा पडल्यावर आता आपल्याला मागे फिरता येणार नाही. तसेच ह्यामधून बाहेरही पडता येणार नाही.
• तंत्रज्ञानाची प्रचंड काम करण्याची, समृद्धी निर्माण करून त्याद्वारे गरिबी दूर करण्याची आणि त्यातून लाखोंच्या राहणीमानात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ह्या सकारात्मक पैलूकडे गांधींनी पूर्णपणे कानाडोळा केला.
तंत्रज्ञानाच्या मुळाशी असलेली, आपल्या स्वाभाविक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची इच्छाच माणसाची सर्वात मोठी शक्ती आहे, ह्याचा त्यांना विसर पडला.
तंत्रज्ञानावरील गांधींची मते समजून घ्यायची असतील तर, ती विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील तंत्रज्ञानाबद्दल आहेत हे सर्वप्रथम लक्षात घ्यावयास हवे. तेव्हाचे औद्योगिकीकरणाचे प्रतिमान हे कष्टकरी वर्गाच्या शोषणावर आधारलेले होते. पुढे तेच वसाहतवादाचे वाहक बनले. त्या काळात भांडवलाचे व उत्पादनपद्धतींचे केंद्रीकरण करणे हाच त्याचा अर्थ होता. आजचे औद्योगिकोत्तर प्रतिमान हेही कामगारांच्या आणि नैसर्गिक संसाधनांच्या शोषणावरच आधारलेले असले, तरी आताचे विकेंद्रित प्रतिमान आणि वैश्विक भांडवलाची जटिलता व गतिमानता हे शंभर वर्षांपूर्वी कोणाच्या कल्पनेतही नव्हते. तसेच गांधी म्हणजे आधुनिक युगापासून तुटलेली कोणी अत्यंत सोवळी व्यक्ती होती, असेही आपण मानता कामा नये. इंग्रजी शिक्षण घेतलेले ते पहिल्या पिढीतील भारतीय होते आणि धर्मशास्त्राला विरोध करून, वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी सागर ओलांडून दक्षिण अफ्रिकेत जाण्याची हिम्मत त्यांनी दाखवली. 1885 पासून तर 1931 पर्यंत त्यांनी पंधरा वेळा अफ्रिकेचा व युरोपचा प्रवास केला. पाश्चात्त्य संस्कृती व आधुनिकता ह्यांना असलेला त्यांचा विरोध हा अपरिचयातून नव्हे तर अतिपरिचयातून ओढवला होता. स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी व तत्पूर्वी त्यांनी रेल्वेने भरपूर प्रवास केला. प्रसार माध्यमांच्या (टेलिग्राफच्या तंत्रज्ञानासहित) ताकदीची त्यांना जाणीव होती. आपले संदेश देण्यासाठी त्यांनी त्याचा कौशल्याने उपयोग केला. (उदा.-दांडीयात्रेच्या वेळी)
“तुम्ही सर्व प्रकारच्या यंत्रसामुग्रीच्या विरोधात आहात काय?” असे विचारल्यावर ते म्हणाले होते, “हे शरीरही एक प्रकारचे नाजूक यंत्रच आहे हे कळल्यावर मी कसा काय बुवा त्याचा विरोध करू शकतो? तो चरखा हे एक यंत्र आहे. दात कोरण्याची काडी हेदेखील यंत्रच आहे. माझा विरोध यंत्राला नाही, तर यंत्राच्या मागे धावण्याला आहे…’सगळ्यांत महत्त्वाचा आहे माणूस. मला काही यंत्रे मान्य आहेत. उदा-सिंगरचे शिलाई मशीन हा एक उपयुक्त शोध आहे….” “पण..” प्रश्नकर्ता म्हणाला, “तुमचा चरखा आणि सिंगर सिलाई मशीनचा जर तुम्ही अपवाद करीत असला, तर ह्या अपवादाचा अंत कुठे होईल?”
“ते यंत्र व्यक्तीला मदत न करता तिच्यावर अतिक्रमण करेल, तिथे. यंत्राने माणसाला कधीच अपंगत्व आणता कामा नये.”
गरिबांच्या उद्धाराची क्षमता असलेली यंत्रसामुग्री नाकारण्याबद्दल रवीन्द्रनाथांनी त्यांच्यावर टीका केली तेव्हा ते म्हणाले,
“मला विकास, स्वातंत्र्य, आत्मभान हे सर्व हवे असले, तरी मला ते हवे आहे फक्त आत्म्यासाठी. त्या दृष्टीने विचार करता, पोलाद-युग हे गारगोटी-युगाच्या पुढचे होते की नाही, याबद्दलही मला शंका वाटते. यंत्रविकासाबाबत मला काही म्हणायचे नाही. मानवी बुद्धिमत्ता आणि इतर सर्व शक्ती आत्म्याच्या आणि आत्म्याच्याच उन्नयनासाठी उपयोगात आणल्या गेल्या पाहिजेत, एवढाच माझा आग्रह आहे.”
आणखी एका प्रसंगात त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की –
“आर्थिक प्रगती ही खऱ्या प्रगतीच्या आड येते का? आर्थिक प्रगतीचा अर्थ अनिबंध सांपत्तिक प्रगती असा मी घेतो. नैतिक प्रगतीचा अर्थ मात्र आपल्यामध्ये कायम स्वरूपी दडून बसलेल्या घटकांची प्रगती असा होतो.’ ह्या दोन प्रकारच्या प्रगतींमधील फरक दाखवीत असताना ते म्हणतात, “आर्थिक प्रगतीची मी जी काही व्याख्या केली आहे, तीवरून ती खऱ्या प्रगतीच्या आड येते असेच म्हणावे लागेल. म्हणून समृद्धी मिळवून देणाऱ्या उपक्रमांना आळा घालणे हा आपण पूर्वापार ठेवलेला आदर्श होता. अर्थात ह्यामुळे समृद्धीच्या महत्त्वाकांक्षेस आळा बसत नाही.”
प्रकृती आणि तंत्रज्ञान ह्यांच्या समुचित भूमिकेविषयी गांधींचे मत.
गांधी सर्व प्रकारच्या यंत्रसामुग्रीच्या विरोधात नव्हते. तंत्रज्ञान हा मानवजातीचा सेवक असावा, मालक नव्हे असे त्यांना वाटत असे. वर म्हटल्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीला वा तिच्या व्यक्तित्वाला ते तंत्रज्ञान सहाय्य करते की त्याच्यावर अधिकार गाजवते, हाच ते स्वीकारण्याचा वा अव्हेरण्याचा त्यांचा निकष होता. आचार्य दादा धर्माधिकारी ह्यांच्या शब्दांत उपकरण म्हणजे हाताचा विस्तार. म्हणून, हाताची ताकद वाढविणे हेच त्याचे काम असले पाहिजे. न की तो उखडून टाकणे. यंत्राच्या वापरात तारतम्य ठेवणे हाच त्यांचा मूलमंत्र होता. त्यातही साध्या-सोप्या, लहान प्रमाणावर वापरावयाच्या यंत्राला ते प्राधान्य देत असत.
सिबले ह्यांच्या मते गांधींच्या दृष्टकोनाचा मूलमंत्र म्हणजे दोन गोष्टींमधला फरक स्पष्ट करणे आणि त्यातील जे अधिक साधे-सोपे आणि लहान प्रमाणावर वापरण्यासारखे असेल त्याला मान्यता देणे. इथेदेखील, काही केंद्रीकृत व्यवसायांना मान्यता दिली जाईल, पण ते अपवाद असतील, नियम नव्हे.
खरे तर, भारतातील गरिबी आणि त्यातून उद्भवणारी निष्क्रियता ह्यांना त्यामुळे आळा बसत असेल तर मी अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रसामुग्रीच्याही बाजूने उभा राहीन, अशी खुद्द गांधीजींनी घोषणा केली होती. तथापि, प्रत्येक घरात लहान उद्योग सुरू करणे हा भारतात आर्थिक स्वातंत्र्य आणून तेथील गरिबीचा भयावह प्रश्न दूर करण्याचा एकमेव मार्ग असून कापडाच्या गिरण्या ते करण्यास असमर्थ ठरल्या आहेत असा त्यांचा दावा होता. त्याचप्रमाणे, खेडी स्वयंसिद्ध असेतोपर्यंत आधुनिक यंत्रे व उपकरणेही तेथे न्यायला त्यांची हरकत नव्हती. फक्त ती शोषणाची हत्यारे बनू नयेत एवढेच.
खादीला जर गिरणीच्या कापडाशी स्पर्धा करायची असेल, तर चरखा अधिक कार्यक्षम बनवणे भाग आहे ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. ह्यासाठी त्यांनी 24 जुलै 1929 ला अखिल भारतीय चरखा संघाच्या कर्मचारी समितीच्या वतीने चरख्याच्या सर्वोत्तम डिझाइनसाठी एक लाख (आजचे वीस कोटी) रुपयांचे बक्षीस ठेवले होते. ह्या स्पर्धेच्या जाहिरातीत असे म्हटले होते.
संपूर्ण जगभरातील नवशोधक आणि अभियंते ह्यांना चरखा किंवा संयुक्त यंत्र तयार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुढील निकष पूर्ण करणाऱ्या चरख्याला रुपये एक लाख इतके रोख बक्षीस देण्यात येईल
1. चरखा वजनाने हलका, उचलून ने-आण करण्यास सोपा आणि हाताने वा पायाने, ग्रामीण भारतात ज्या प्रकारे चालविला जातो त्या प्रकारे चालणारा असावा.
2. सर्वसाधारण (भारतीय) स्त्रीस, तिची फार दमछाक न होता दिवसाकाठी आठ तास चरख्यावर बसता येईल अशी त्याची रचना असावी.
3. चरख्यामध्ये पुनी ठेवण्याची सोय असावी.
4. चरख्यावर आठ ते दहा तास बसल्याने 16,000 फूट सुताचे 12 ते 20 पेळू कातून व्हायला पाहिजेत.
5. चरख्याची किंमत 150 रुपयांपेक्षा अधिक होता कामा नये आणि चरखा फक्त भारतातच तयार झाला पाहिजे.
6. चरखा 20 वर्षांचा सतत वापर सहन करण्याइतका दणकट असला पाहिजे. त्याच्या दुरुस्तीला व तेलपाण्याला त्याच्या किंमतीच्या 5 टक्क्यांपेक्षा अधिक खर्च लागता कामा नये.
7. ह्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व लोकांनी त्यांची स्वतःच्या खर्चाने बनविलेली यंत्रे दि. 30 ऑक्टोबर 1930 रोजी किंवा तत्पूर्वी साबरमती आश्रमात पाठवावी: वरील निकषांची पूर्ती करणाऱ्या यंत्रकर्त्यांना त्या-त्या यंत्राचे पेटंट दिले जाईल. तथापि त्यांना जर बक्षिसाची रक्कम हवी असेल, तर त्यांना पेटंटचे सर्व हक्क भारतीय चरखा संघ परिषदेच्या स्वाधीन करावे लागतील.
8. खादी प्रतिष्ठानचे सतीशचंद्र दासगुप्ता, बारडोली स्वराज्य आश्रमाचे तंत्र निदेशक श्री. लक्ष्मीदास पुरुषोत्तम आणि तिरुचेंगोंडू गांधी आश्रमाचे संचालक श्री. चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्पर्धेचे परीक्षक असतील. त्यांच्यामध्ये एकमत न झाल्यास, गांधीजींचा निर्णय अंतिम राहील.
हा स्पर्धेमध्ये एकही यंत्र गांधीजींच्या अपेक्षेप्रमाणे उगले नसले, तरी तीबद्दलची घोषणा आणि एकूणच त्या प्रकरणावरून त्यांच्या विचारप्रक्रियेवरं झगझगीत प्रकाशझोत पडत नाही काय? गांधीजींच्या ह्या उपक्रमावर कापडगिरणी गटाने काळाच्या एक शतक मागे असल्याची टीका केली. असे एक यंत्र अमेरिकेत तयार असल्याचीही त्यांनी वल्गना केली. गांधीजींनी त्यावर उत्तर देताना असे म्हटले की भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाच्या प्रगतीची एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. तीमध्ये प्रथम आली टकळी. नंतर तिची जागा चरख्याने घेतली. त्यामध्येही यथावकाश अनेक बदल झाले. मात्र ईस्ट इंडिया कंपनीने कापडगिरण्यांच्या मार्फत इथे जे यांत्रिकीकरण घडवून आणले, त्यामुळे ही स्वाभाविक प्रक्रिया खंडित झाली. ते स्वतः किंवा अखिल भारतीय चरखा संघ ह्यांचा प्रयत्न हा तुटलेला धागा जोडून घेण्यासाठीच तर चालला होता. यंत्रांना त्यांचा विरोध नाही असेही पुढे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. मात्र उद्योगांच्या यांत्रिकीकरणाची प्रक्रिया कुटिरोद्योगांना मारक ठरून संकुचित शहरी क्षेत्रांत त्यांचे केंद्रीकरण व्हायला नको, ह्याचा ते आग्रह धरतात. अमेरिकेत असा काही शोध लागला असल्यास, अशा त्या सर्व निकष पूर्ण करणाऱ्या संशोधकास आपण आनंदाने बक्षीस देऊ असे जाहीर करून, आपण नवीन चरखा तयार करू शकलो नाही, तरी त्या दिशेने प्रयत्न करताना आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे..
वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की गांधीजींचा भर फक्त कार्यक्षमता वाढविण्यावर नव्हता. कापडगिरण्यांमधील प्रचलित यंत्रे ह्या कसोटीला उतरू शकली नाहीत, कारण ती केंद्रीभूत उत्पादनासाठी तयार करण्यात आली होती. महिला कामगारांची परवड त्यांन ठाऊक होती हे आणखी एक कारण. म्हणूनच त्यांनी निकषांमध्ये ‘भारतीय स्त्रियांना झेपेल असेचा मुद्दाम उल्लेख केला आहे. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाची कळ ही ते वापरणाऱ्याच्या हातात असली पाहिजे हेच त्यांना म्हणायचे आहे. अंतिम उत्पादनापेक्षा त्याच्या प्रक्रियेवर आणि नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील अनेक बाबींवर त्यांनी दिलेला भर लक्षणीय नव्हे काय?
अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाची संरचना
काँग्रेसने एक ठराव संमत करून, ग्रामजनांची उन्नती व कल्याण करण्यासाठी एक स्वयंसिद्ध, स्वतंत्र आणि अ-राजकीय संघटना स्थापन करण्याचे ठरविले. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली पहिले संचालक मंडळ श्री. श्रीकृष्णदास जाजू अध्यक्ष व कोषाध्यक्ष आणि श्री. जे. सी. कुमारप्पा आयोजक व सचिव असे ठरविण्यात आले. ह्या संघटनेचे मुख्य काम होते ग्रामीण पुनर्रचनेच्या कामाची वेळोवेळी व्याख्या करणे. ह्याशिवाय, तज्ज्ञांच्या मदतीने संशोधनाचे कार्य करणे आणि ग्रामोद्योगातन येणाऱ्या जादा उत्पादनांसाठी बाजार निर्माण करणे हीदेखील त्यांची अन्य कर्तव्ये होती. तज्ज्ञांच्या मदतीशिवाय मंडळ ग्रामीण पुनरुत्थानाचे काम करू शकणार नाही हे त्यांना पक्के माहीत होते. ह्या मंडळावर येण्यास सम्मती देणाऱ्यांपैकी जगदीशचंद्र बोस, चंद्रशेखर व्यंकटरमण, सर प्रफुल्लचंद्र राय ह्यांच्याशिवाय रवीन्द्रनाथ टागोर आणि घनश्यामदास बिरला असे लोक होते. संघाचे उद्दिष्ट ग्रामीण पुनर्रचना आणि सुसूत्रीकरण करण्याचे होते. अर्थात त्यामध्ये ग्रामोद्योगाचे पुनरुज्जीवन, प्रसार व सुधारणा, ग्रामीण भारताची भौतिक व आध्यात्मिक उन्नती आणि ग्रामीण उपकरणे विकासित करण्यासाठीची उपाययोजना ह्यांचाही समावेश होता. कुमारप्पांचे उत्तुंग काम आणि शाश्वत अर्थव्यवस्थेची संकल्पना हे ह्यातूनच उद्भवले आहे.
विज्ञानाबद्दल
मानवतेवीण विज्ञान हे गांधींनी जगाच्या सात पापांपैकी एक मानले होते. त्यांनी विवेकवादाचा त्याग केला नाही, फक्त विवेकवादास सर्वोच्च मूल्य मानायचे त्यांनी नाकारले. कारण ते सत्याचे शोधक होते आणि सत्य हे विज्ञानाच्या किंवा तर्काच्या चिमटीत सापडण्यासारखे नाही, त्याहूनही सूक्ष्म आहे, असा त्यांचा विश्वास होता. एक सनातनी हिन्दू ह्या नात्याने, ज्ञानेंद्रियांना प्रतीत होणाऱ्या वास्तवापलीकडे एक व्यापक सत्य आहे, असे ते मानीत. ह्या सर्वव्यापी सत्यामुळेच आयुष्याला अर्थ व मूल्य प्राप्त होते अशी त्यांची श्रद्धा होती. परंतु एक सनातनी हिन्दू ह्या नात्याने, त्यांनी आयुष्यात कधीही मानवताविरोधी परंपरांचे व रूढींचे समर्थन केले नाही. ज्या व्यक्तीने आपल्या आत्मचरित्राचे नाव सत्याचे प्रयोग असे ठेवले, सामाजिक परिवर्तन व जाणीव जागृतीच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण अवजारांचा शोध लावला, त्या व्यक्तीसाठी विज्ञान ह्या संज्ञेचा अर्थ अधिक व्यापक व खोल होता, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. गांधींनी निसर्गोपचाराच्या क्षेत्रात केलेल्या प्रयोगातून त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता व प्रयोगातून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची हातोटी दृग्गोचर होतात. एके काळी त्यांनी पुरस्कारिलेल्या हातसडीचा तांदूळ, साखरेऐवजी मध वा गुळाचा वापर, ह्या गोष्टींची थट्टा होत असे. त्यांचे ते आग्रह विज्ञानाधिष्ठित असल्याचे आज सिद्ध झाले आहे. महत्त्वाची बाब ही की गांधी स्वतःला संत किंवा महान राजकीय नेता न मानता एक शास्त्रज्ञ मानत असत. त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर
संत हा शब्द पावित्र्यसूचक असल्यामुळे कोणालाही सहजपणे लावण्यासारखा नाही. विशेषतः माझ्यासारखा माणूस जो स्वतःला सत्याचा स्वतःला विनम्र पाईक मानतो, ज्याला स्वतःच्या मर्यादा माहीत आहेत, जो सातत्याने चुका करतो आणि त्या स्वीकारण्यास मागेपुढे पाहात नाही आणि जो एखाद्या शास्त्रज्ञाच्या प्रांजळपणे आयुष्यातील शाश्वत बाबींवर प्रयोग करीत असतो (अशा व्यक्तीला संतापेक्षा शास्त्रज्ञ म्हणवून घेणेच अधिक आवडणार नाही का?)
303, स्टाफ क्वार्टर्स, NMIMS-SPTM,
मुंबई-आग्रा महामार्ग, तापी काठ, बाबुळदे, ता.शिरपूर, जि.धुळे 425405.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.