काही महिन्यांपूर्वी नागपूरला ज्येष्ठ नागरिकांचा लिव्ह इन रिलेशनशिप ह्या विषयावर एक कार्यक्रम झाला. नागपूरच्या मानाने हा विषय तसा स्फोटकच होता. तरुणांची लिव्ह इन रिलेशनशिपदेखील ह्या शहराने अजून मान्य केलेली नाही, तर मग ज्येष्ठ नागरिकांची कथा ती काय? ताळतंत्र सोडून वागण्याचे स्वातंत्र्य एकवेळ तरुणांना असते असे मानता येईल, पण ज्येष्ठ नागरिक? तेच जर असे काही वागू लागले तर तरुणांना कोण अडवणार? सगळ्यांनाच जर ह्याची मुभा मिळाली तर विवाहसंस्थेची प्रस्तुतताच राहणार नाही. समाज स्वास्थ्य धोक्यात येईल. एकूण काय, तर हा सारा अमेरिकेच्या अंधानुकरणाचा भाग आहे. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर त्या विषयावर तटस्थपणे आणि खोलवर विचार केल्यानंतर माझ्या मनात काही वेगळे विचार आले, ते येथे मांडत आहे.
प्रथा व परंपरा – आपण सारे मानव आहोत. तेव्हा मानवता हा आपला धर्म असला पाहिजे. मानवताधर्म सर्वांवर प्रेम करायला सांगतो. आपण जे काही करू, ते मानवता टिकविण्यासाठी असले पाहिजे. आपल्या वागण्याचा, धोरणांचा निकष तो असला पाहिजे. मानवधर्म आचरून, सर्वांवर प्रेम करून जगातील दुःख कमी करणे हे मूळ नीतिमूल्य आहे वा असावे. प्रेम करणे म्हणजे दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्याचे दुःख दूर करणे, त्यासाठी झीज सोसणे.
प्रेम करणे म्हणजे दुःख दूर करणे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा हे दुःख कोणत्या प्रकारचे असू शकते, त्याचाही विचार केला पाहिजे. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही. एकटेपण, एकाकीपण वा समाजापासून दूर केले जाणे (वाळीत टाकणे) ही आपल्याकडे फार भयानक शिक्षा मानली जाते. गुन्हेगारालाही कठोर शिक्षा म्हणून एकान्तवासाची शिक्षा देतात. चौदा वर्षांच्या एकान्तवासाला तर आपल्याकडे जन्मठेप हीच संज्ञा आहे.
प्रत्येक माणसाचे इतर अनेकांशी अनेक प्रकारचे संबंध असतात. मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. रक्ताचे संबंध-ज्यांना नाती असे संबोधले जाते-ते तर जन्मभर टिकावेत/टिकवावेत अशी अपेक्षा असते. शिवाय ज्याच्या त्याच्या वैचारिक, भावनिक ऐपतीप्रमाणे मित्रपरिवारही असतो. अशा रीतीने, कधी समाजरूढींनी नियमित केलेल्या तर कधी स्वेच्छेने कवटाळलेल्या विविध प्रकारच्या संबंधांचे साखरेचे पोते–आपले भावविश्व सोबत घेऊनच प्रत्येक माणूस जगत असतो. अशा एकमेकांशी संबंध असलेल्या माणसांचा मिळून एक समाज बनतो.
स्त्री-पुरुष जोडीदारांना एकत्र आणणारा विवाह, हा ह्या समाजातील एक महत्त्वाचा संबंध आहे. आपल्यासारखे दुसरे जीव निर्माण करून आपला वंश चालू ठेवणे ही सर्व जीवांची आदिम प्रेरणा आहे. मग मानव तरी त्याला अपवाद कसा असेल? फरक एवढाच आहे की, मनुष्यमात्रांत वंशाबरोबर वारसा नावाचीही एक गोष्ट असते. हा वारसा मिळवण्यासाठी वंशजांच्या वैधतेचा मुद्दा येतो. वैध रीतीने वंशसातत्य टिकून राहावे म्हणून मानवाने विवाहसंस्था निर्माण केली. ह्या वैधतेचे निकष व नियम सनातन नाहीत. ते मानवनिर्मित व परिस्थितिसापेक्ष आहेत. ते पुरुषांनी तयार केलेले असल्यामुळे त्यामध्ये स्त्रियांच्या बाजूने विचार केलेला नाही.
वंशसातत्य हा विवाहाचा मूळ उद्देश असला, तरी साथ, सोबत, मदत, आधार हे त्यातून मिळणारे अन्य लाभ आहेत. प्रत्येक व्यक्तीला-मग ती स्त्री असो वा पुरुष ह्या सर्व गोष्टींची गरज असते. दोघेही वैवाहिक जोडीदार एकमेकांना ते देतात. पुरुष स्त्रीला आधार देतो असे म्हणण्याची जरी चाल असली, तरी स्त्रीच्या आधाराशिवाय समाधानाने एकाकी राहणारे वा राहू शकणारे पुरुष ह्या जगात कमीच आहेत. परिणामी, एकाकीपणा दूर करणे हा विवाहाचा तेवढाच महत्त्वाचा उद्देश बनला आहे. वंशसातत्य टिकविण्याचे कार्य विशिष्ट वयातच होत असले, तरी सोबतीची, शक्यतो आपल्या बरोबरीच्या व्यक्तीच्या सोबतीची गरज सर्व वयाच्या माणसांना भासते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैचारिक अशा विविध प्रकारच्या सोबतींची ही भूक असू शकते. त्या सर्वांसाठी, जेवढ्या प्रकारे ते एकमेकांच्या बरोबरीचे असतील, समान क्षमतेचे व वैचारिकदृष्ट्या एकाच पातळीवरचे असतील, तेवढे त्यांचे सहजीवन सुखद, समृद्ध व दीर्घकालिक होते.
शारीरिक भूक व लैंगिक भूक ह्या दोन्ही खऱ्या व जन्मजात आहेत. मूलप्रेरणा (instinct) आहेत. त्यांची गरज व्यक्तिपरत्वे भिन्न असली तरी प्रत्येकाला ती असते आणि ती जेथे पूर्ण होत नाही, तेथे दुःख निर्माण होते. ते दूर करण्याच्या पद्धती निरनिराळ्या असतात. परिस्थिती बदलल्यानंतर त्या बदलाव्या लागतात. ज्या गरजांसाठी त्या निर्माण झाल्या, त्या गरजा सातत्याने पूर्ण होत राहाव्यात ह्यासाठी त्या बदलाव्या लागतात. ह्या पार्श्वभूमीवर आजची विवाहसंस्था कोणत्या स्थितीत आहे? ती ह्या सर्व गरजा पूर्ण करीत आहे का?
नाही. अनेकजणींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन ही विवाहवेदी धगधगती ठेवली आहे. ह्याशिवाय आपल्या स्वत्वाची, स्वाभिमानाची आहुती कितिकींनी दिली, ह्याची तर गणतीच नाही. निराधार स्त्रियांच्या आश्रमात जाऊन पाहिले, तर विवाहात होरपळलेल्या स्त्रियांच्या करुण, दारुण कहाण्या कळतील, निराधार स्त्रिया कशाला, कामकरी महिलांच्या वसतिगृहातही हे साहित्य काही कमी नसणार. ह्या दोन संस्थांचा उल्लेख ह्यासाठी केला, की तेथील स्त्रिया तोंड उघडून बोलू तरी शकतात. घरात, कुटुंबात राहणाऱ्या बायकांचे काय? त्यांच्याही घरात मातीच्याच चुली आहेत. आपल्या समाजात घरोघरी, विवाहाच्या माध्यमातून क्रौर्याची परिसीमा गाठली जात आहे. विवाहातून मिळणारी सोबत व तिचा आनंद ह्या गोष्टींचा लवलेशही तिथे नाही. हे प्रमाण अविश्वसनीयरीत्या मोठे आहे.
विवाहसंस्कार हा पावित्र्याची झूल पांघरलेला, भारतीय जनमानसात खूप, खूप खोलवर रुतून बसलेला एक संस्कार आहे. हे पावित्र्य विवाहविधीमधून उद्भूत होते असा समज करून दिला जातो, परंतु विवाहविधी हे केवळ एक कर्मकांड आहे. प्रत्यक्षात स्त्रीपुरुष-नात्याचे पावित्र्य हे परस्परसामंजस्य आणि विश्वास ह्याच दोन गुणांच्या आधाराने वसत असते. दुसरे असे की विवाहबंधन हे अतूट, जन्मोजन्मीचे नाते मानले गेले आहे. ह्या अतूटपणामध्येच त्याचे पावित्र्य सामावले गेलेले आहे, असाही एक वेडगळ समज प्रचलित आहे. प्रत्यक्षात ह्या अतूटपणामुळेच ते छळाचे साधन बनू शकले आहे (मला सोडून कुठे जाशील?). त्यामुळे विवाहसंस्थेचा दगडी चेहरा हटवून त्यात आणखी लवचीकपणा आणणे आणि वरील दोन गुणांची प्रतिष्ठापना करणे हाचं आता परिस्थित्यनुरूप केलेला बदल होईल.
आणखी एका मुद्द्याचा विचार येथेच करणे प्रस्तुत ठरेल. विवाहसंस्था अस्तित्वात आली त्या काळात माणसांचे आयुर्मान फार कमी होते. युद्ध, दुष्काळ, महापूर यांसारख्या अनेक अस्मानी व सुलतानी संकटांपुढे माणूस टिकाव धरू शकत नसे. आरोग्य संपादन करून वा कृत्रिम उपायांनी आयुष्य वाढवायचे मार्ग तेव्हा ठाऊक नव्हते. पुनर्जन्मादि अलौकिक कल्पनांचा पगडाही जनमानसावर होताच. त्या काळात एका आयुष्यात एकच लग्न करण्याचा नियम बनणे स्वाभाविक होते. परंतु आज आयुर्मर्यादा वाढली असून जीवनातील संघर्ष कमी झाला आहे. त्यामुळे एक जोडीदार गेल्यावरही दुसऱ्याच्या आयुष्यात जगण्यासारखे बरेच काही राहून गेलेले असू शकते. जोडी जमविण्याचा अधिक लवचीक पर्याय त्यांना हवासा वाटू शकतो.
असे बदल आजतागायत वेळोवेळी होतच आलेले आहेत. या कामी न्यायव्यवस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे. विवाहविच्छेद अर्थात घटस्फोट कायदेशीर होणे आणि नंतर तो घटस्फोट एकमेकांवर चिखलफेक न करता परस्परसंमतीने घेता येणे हे दोन त्यामधील महत्त्वाचे टप्पे आहेत. कुटुंब न्यायालयात विसंवादी जोडप्यांच्या समुपदेशनाची सोय करून आणखी एक पाऊल उचलले आहे. आता तर घटस्फोटानंतरही त्या दोघांच्या पृथक संपत्तीवर दोघांचा संयुक्त हक्क राहील अशी तरतूद येऊ घातली आहे. काचणारे विवाहबंधन सैल करण्याचेच हे सर्व प्रयत्न आहेत. ते स्तुत्य आहेतच, पण त्यांनी विवाहसंस्थेला शह मात्र दिलेला नाही.
लिव-इन-रिलेशनशिप हा असा बदल घडवून आणण्याचा एक चांगला मार्ग आहे असे मला वाटते. अधिक व्यापक परिप्रेक्ष्यात बोलायचे झाले तर, ज्याच्या त्याच्या गरजेनुसार आपली सोबतीची भूक परस्परसंमतीने भागविण्याची सोय आणि त्यासाठी अनेक मार्ग समाजामध्ये उपलब्ध असावेत असे मला वाटते. ते स्वैराचार व बलात्कार ह्या दोन्ही टोकांच्या मधले असावेत आणि मुख्यतः समाजाने ते मान्य करावेत. हे मार्ग सर्वपक्षी (दोन जोडीदार आणि तिसरा समाज) जर मान्य झाले, तर त्या नात्यांना खरा अर्थ प्राप्त होईल आणि त्यांतून माणुसकीचा अंकुर फुटेल. कृत्रिम बंधनात अडकवून बहुधा स्त्रियांची व क्वचित पुरुषांची मुस्कटदाबी करण्याचे साधन नष्ट होईल. एकटेपणाचे दुःख कमी होऊन त्यांना आपली शक्ती विधायक कामांमध्ये लावता येईल.
ह्यामध्ये कोणते धोके आहेत त्याचाही विचार या ठिकाणी करावा लागेल. कोणताही प्रवाह आला, की आम्ही नवीन विचारांचे आहोत असे दाखविण्याची काहींना हौस असते. अशा काही कृतक-पुरोगामी लोकांकडून, सहजीवनाचा हा प्रकार त्यामागील विचार समजून न घेताच अंमलात आणला जाईल व त्यातून पुन्हा दुःखच निर्माण होईल अशी शक्यता आहेच. मर्कटाप्रमाणे असे हेतुशून्य अनुकरण करणारे लोक सर्वत्र असतातच. परंतु असे काही आढळल्यास समाजाने त्याकडे साफ दुर्लक्ष करावे. त्याचा जाहीर गवगवा करू नये. कारण त्याने खिजविण्यासाठी ते मुद्दाम करून दाखवण्याची इच्छा होते. अशा लोकांचा उद्देश सुखी सहजीवन साध्य करणे हा नसतोच मुळी. तो फक्त असतो आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा. मग त्यांना आपण का महत्त्व द्यावे?
सहजीवन ही समंजस, प्रौढ व्यक्तींनी उभयपक्षी संमतीने स्वीकारावयाची गोष्ट आहे हे आपण सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे. त्यामुळे जे करतील ते निभावतील हेच सूत्र त्याबाबतीत योग्य आहे. वृद्धांच्या अशा सहजीवनाचा तरुणांवर विपरीत परिणाम होईल असेही मानायचे कारण नाही. आजची तरुण पिढी सजग आहे. योग्य निर्णय घेत घेत जटिल परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. त्यांना आज सहजीवन/विवाह/एकटेपणा ह्यांतून निवड करावी लागणार आहे. त्यांनी विचारपूर्वक सहजीवनाचा निर्णय घेतला, तर आपल्याला त्यांच्या पाठीशी उभे रहायचे आहे, कारण त्यात काहीही गैर नाही.
दुसरे असे की कोणत्याही प्रकारचे सहजीवन हे काही नुसते एका पोकळीत स्थापित करता येणार नाही. अमलात आणताना तेही कुठल्या ना कुठल्या चौकटीत बसवावे लागेलच. कारण दोन जीव एकत्र येऊन राहणे ही काही तशी साधीसुधी बाब नव्हे. त्यात कुणा एकाचे शोषण होण्याची शक्यता बरीच आहे. विशेषतः बायकांचेच. कारण त्यांना पटकन शरणागती पत्करण्याची सवय (प्रशिक्षण?) असते आणि विवाहामध्ये कायद्याने दिलेले अधिकार आता त्यांच्याकडे नसतील.
म्हणून असा नातेसंबंध प्रस्थापित करताना दोघांमध्ये एक करार करावा. त्यामध्ये दोहोंची संपत्ती, आरोग्य, कामाचरण, नातेवाईक व त्यांच्याप्रति असलेल्या जबाबदाऱ्या ह्या बाबतींतील परस्परांच्या अपेक्षा आणि आश्वासने ह्यांचा समावेश असेल. अशा रीतीने करार करून घेतल्यास, भारतीय करार अधिनियमांतर्गत त्यांचा व्यवहार न्यायालयाच्या कक्षेअंतर्गत येईल. कराराची पूर्ती न झाल्यास त्यासाठी दाद मागता येईल. कराराचा आराखडा जितका सुघटित आणि समावेशक असेल, तेवढी ह्या नात्यामधून शोषण होण्याची शक्यता कमी होईल. नागपूरचे लिव-इन-रिलेशनशिप मंडळ त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे असे कळते.
वर उल्लेखिलेले दोन धोके टाळले, तर अविवाहित सहजीवनामुळे नातेसंबंधाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येईल…..मात्र एका मूलभूत मुद्द्याला मी ह्या लेखात स्पर्शच केला नाही. हे सहजीवन एकट्या (वैवाहिक जोडीदार नसलेल्या) व्यक्तीसाठीच आहे असे मी ह्या लेखात गृहीत धरले आहे. पण अशा मार्गाने विचार करता करता शेवटास येताना आणखी एक गोष्ट सुचली. ती अशी, की वैवाहिक आयुष्यातील क्रौर्याबद्दल आपण बोललो, पण सरसकटपणे, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विवाहांतर्गत लैंगिक कुपोषणाचे काय? त्याने आपले समाजस्वास्थ्य किती बिघडले/बिघडत असेल….वेश्याव्यवसाय व त्यामध्ये जबरदस्तीने होणारा मानवी अपव्यापार कमी करायचा असेल, तर आपल्या योनिशुचितेच्या कल्पना सैल कराव्या लागतील असे एक विदारक सत्य मला जाणवत आहे…आम्ही गरती स्त्रिया स्वतःचे पावित्र्य राखण्यासाठी कोणाचा बळी देतो? त्या आमच्या मुली नव्हत का? असो. ह्या विषयावर पुन्हा कधीतरी.
303, स्टाफ क्वार्टर्स, NMIMS-SPTM, मुंबई-आग्रा महामार्ग,
तापी काठ, बाबुळदे, ता.शिरपूर, जि.धुळे 425405.