[जनजीवन आणि संस्कृती हे आ.सु. चे जिव्हाळ्याचे विषय आहेत. आपल्या अनेक समस्या आणि त्यांची उकल ह्यांची पाळेमुळे त्यातच रुजलेली असतात. आज जगभरातल्या विविध भौगोलिक प्रदेशांतल्या संस्कृतीचे झपाट्याने एकजिनसीकरण व सपाटीकरण होत आहे. निसर्गापासून दूर दूर जाणे हेही त्याचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. त्यामधून आणखी वेगळ्या समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत बिगर-शहरी संस्कृतीची वाटचाल कशी चालली आहे हे पाहणे उद्बोधक ठरेल. ह्याच उद्देशाने अनिल पाटील सुर्डीकर ह्यांची ग्रामीण जीवनावरची लेखमाला आ.सु. ने दिली होती. आदिवासींच्या जीवनावरील सुनंदा पाटील ह्यांचा हा लेखही असाच. सुनंदा पाटील ह्यांनी खानदेशातील भिल्ल व पावरा जमातींविषयी लिहिले आहे. लेख वाचून, हे आदिवासी कशाच्या बळावर जगतात, त्यांच्या आयुष्यातील प्रश्नांना ते कसे भिडतात, त्यांचे हे जिणे समाधानाचे असते का, स्वतःला मुख्य प्रवाहातील मानणाऱ्या आपल्यासारख्या लोकांचा त्यांच्याकडे पाहणअयाचा दृष्टिकोण कसा असावा. ह्या मुद्द्यांचा खोलवर विचार करावा. आ.सु. च्या सजग वाचकांकडून ही अपेक्षा आहे. – कार्यकारी संपादक]
आदिवासी संस्कृतीबद्दलचे कुतूहल आजही कमी झालेले नाही. अनेकांना त्यांच्या पेहरावाचे, दागिन्यांचे, केशरचनेचे, खाद्यसंस्कृतीचे, सणवार-रीतिरिवाजांचे तर काहींना त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचे, त्यांना अवगत असलेल्या कलाकुसरीचे आकर्षण वाटते. आकर्षणातून अभ्यास व अभ्यासातून संशोधन असा प्रवास करणारेही अनेक आहेत. त्यामुळे आदिवासींचा बराचसा जीवनपट अशा अभ्यासातून प्रकाशात आला आहे. काही आदिवासी बंधुभगिनी शिकून सुशिक्षित झाले. त्यांनी स्वतःच्या जीवनाचा -संस्कृतीचा भाग आपल्या लिखाणातून प्रसिद्ध केला. असे असले तरी निव्वळ भाषा अवगत नसल्यामुळे बिगर आदिवासींना त्यांच्या हृदयापर्यंत पोहचता आले नाही. अतिशय दुर्गम भागात हे लोक राहत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना समजून-उमजून लिहिणे फारच अवघड आहे. कारण शहरीकरण जसे गावापर्यंत पोहचले तसे तांड्या-पाड्यापर्यंतही पोहचले आहे. त्यामुळे आदिवासींनी आपले वास्तव्य अतिदुर्गम भागात स्थापित केले आहे. आजही आदिवासी बांधव शहरी/नागरी समाजापासून अलिप्त राहणे पसंत करतो. त्यामुळे आदिवासींमध्येच आता दोन. प्रकार दिसू लागले आहेत. जे शिकले, शिकून सुशिक्षित झाले पण आजही जे पाड्यांत राहतात त्यांना शहराची, शहराच्या चमक-धमक जीवनाची ओढ आहे. पण जो दुसरा वर्ग जो आजही शिक्षणापासून, नागरी जीवनापासून कोसो मैल दूर आहे, त्याची जीवनपद्धती पहिल्या प्रकारच्या आदिवासींपेक्षा भिन्न आहे. हे सारे सांगण्यापाठीमागचा उद्देश एकच. ‘जो शिकला तो ब्राह्मण झाला’ ह्या म्हणीप्रमाणे शिकलेले आदिवासी हे नागरी पारंपरिक असे संमिश्र जीवन जगत आहेत. त्यांना आपली भाषा बोलायला, आपल्या अशिक्षित पालकांना परिचित करताना संकोच वाटतो. ते धड शहरी नाहीत न धड शुद्ध आदिवासी. यांचा फार मोठा वर्ग तयार झाला आहे. (त्यांना जशी आपल्या पालकांची लाज वाटते. तशीच आपल्या रूढी परंपरांचीही लाज वाटते. त्यामुळे आजचा खरा अभ्यासाचा विषय आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी हा नसून सुशिक्षित आदिवासी विरुद्ध पारंपरिक आदिवासी हा आहे.) असो. महाराष्ट्रातील आदिवासींचा अभ्यास करताना तीन विभाग चटकन डोळ्यांपुढे उभे राहतात,
1. सह्याद्रीच्या कुशीतील आदिवासी
2. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी
3. गोंडवनातील आदिवासी
अर्थात येथे मी जो विचार मांडणार आहे तो सातपुड्याच्या कुशीतील भिल्ल, पावरा, जमातींविषयी – ज्या धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. त्यातल्या त्यात नंदुरबार जिल्ह्यात या जमातीच्या आदिवासींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच नंदुरबार आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून त्यात भिल्ल, पावरा, कोकणी, मावची हे आदिवासी जास्त प्रमाणात आहेत. त्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे : निसर्गाच्या कुशीत वसतिस्थान
आजही यांना निसर्गसांनिध्य प्रिय आहे. निसर्ग हाच त्याचा माय-बाप, देवता असतो. निसर्गातील विघातक तसेच विध्वंसक घटनांबद्दल त्यांच्या मनात कुतूहल, भीती, प्रेम, आदर दिसतो. म्हणूनच ते कधी निसर्ग देवतेला आळवताना दिसतात, तर कधी पूजताना! त्यांचे सण-उत्सव हे देखील निसर्गातील ऋतुचक्राशी संलग्न असतात. जसे सूर्य, चंद्र, वारा, अग्नी, डोंगर, नदी, पशू, पक्षी हे त्यांचे देव आहेत. ‘ओला पूजनला’ म्हणजे शेती अवजारांची पूजा. पावसाळा सुरू झाल्यावर हा सण साजरा करतात, ‘नवाई या सणाला वेळ, तारीख, वार यांचे बंधन नसते. पिके परिपक्व झाली की पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही पूजा केली जाते.
गोव्हन पूजा – पावसाळा संपल्यावर साजरा करायचा सण. गोव्हन म्हणजे गाई -गुरे बांधण्याची जागा (गोठा). यासाठीही दिवस – वार महत्त्वाचा नसून सर्वांच्या सोयीने, जवळ पैसा येईल तेव्हा पावसाळा संपल्यावर हा सण साजरा करतात.
निई चारी – पावसाळ्यात साजरा होणारा सण. निई म्हणजे हिरवी. जिकडे-तिकडे हिरवळ असते. वेली, भाज्या, धान्य, अंबाडी, फांग, शिरी, राजगीरा, कटोली, कुबस, तांदळे किती तरी आवडत्या भाज्या ह्यादरम्यान खायला मिळतात. म्हणून त्यांची पूजा करायची. या शिवाय
पालुडयो देव – जेव्हा वसंत ऋतूत झाडांना नवीन पालवी फुटते व कंदही फुटतात तेव्हा नव्या-कोवळ्या पालवीची पूजा म्हणजे पालुडयोदेवपूजा होय. त्याच दरम्यान
नंदुरी देव – मान्सूनच्या पहिल्या पावसाने भिजलेले रानमाळ हिरवेगार होते. विविध झाडाझुडुपांबरोबर शेतमळा फुलून येतो. त्या निसर्गाला धान्य देण्यासाठी ही पूजा करतात.
कणसरी – सुगीच्या हंगामात पूजली जाणारी अन्नधान्याची देवता, खळ्याची पूजा (खोवो) यासारख्या अनेक देवता आहेत. ज्या निसर्गातील ऋतुचक्राशी संबंधित आहेत.
यावरून एकच ध्यानी येते. आदिवासींचीही कृषिप्रधान संस्कृती’ आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका त्यांनाही सोसावा लागतो. पण वेगळेपण येथे हे दिसते की, त्यांनी शेती दैववादाशी जोडल्याने; कमालीची समाधानी वृत्ती असल्याने; असंग्रही प्रवृत्ती असल्याने; जेवढी गरज तेवढेच पिकवायची वृत्ती म्हणा किंवा श्रद्धा म्हणा असल्याने; गरिबी, भूकबळीला सामोरे जावे लागते. पारंपरिक विचारांना चिकटून राहिलेले भोळे भाळे आदिवासी आधुनिकतेचा स्वीकार केला तर.. देव कोपेल या भीतीने, अंधश्रद्धेने पीडित आहेत. शिकला-सुसंस्कृत झालेला आदिवासी नागरी संस्कृतीत मिसळला तो सुटला. पण जे आजही निरक्षरतेच्या अजगर मिठीत अडकले ते मात्र अज्ञान – अंधश्रद्धेच्या जबड्यात अडकले. ते जेवढे परमेश्वराला मानतात तेवढेच आत्मा-परमात्म्याला, भूत प्रेत, डाकीण, चुडेलला मानतात. असे आदिवासी नागरी संस्कृतीपेक्षा कोसोमैल दूर आहेत. आपले जगणे नशिबाच्या हवाली सोडून मस्त राहतात. निसर्गाशी नाते जोडलेल्या आदिवासींनी कोणतीच सुविधा सहज प्राप्त होत नाही, पावलो-पावली असुरक्षितता, कमालीची अंधश्रद्धा असे असते तरी एक निरागस प्रामाणिकपणा त्यांच्यात आजही टिकून आहे.
सामुदायिक
कोणतीही गोष्ट एकट्याने/एकट्या कुटुंबाने न करता सर्वांनी मिळून करायची ही भावना आदिवासी संस्कृतीचा विशेष आहे. समुदायानेच शिकार करायची आणि मग वाटून खायची. सामूहिक शेती, सामुदायिक सण-उत्सव, मनोरंजन, सारेच सामुदायिक. यामागचा हेतू हाच दिसतो की, गाव शहरापेक्षा तांडे/पाडे आकाराने लहान असतात. त्यामुळे तांड्या-पाड्याचे संरक्षण करण्यासाठी एकी असणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी वेगळी नियमावली केली जाते. त्यांची पंचायत असते. यांच्यात वाद नसतात का? असतात ना! पण नागरी/शहरीपेक्षा एक संघाची भावना जास्त प्रमाणात असते. आपण सगळे एक आहोत ही वृत्ती त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणारी आहे. म्हणूनच त्यांचा मुख्य सण होळी, पोळा, दिवाळी ही गावदिवाळी, गाव्होळी असते. त्यांचा संबंध तारीख – वार तिथी, मुहूर्त यांच्याशी नसतो. गावातून प्रत्येकाची पैशांची सोय झाली. सवड मिळाली
की, सर्वांच्या सोयीने, आनंदाने व एकोप्याने सण-उत्सव-मनोरंजन साजरे होतात.
एवढेच नव्हे हे लोक आरतीही सामुदायिक करतात. आरती कुणाची? तर आपल्याच माणसांची. म्हणून त्या मंडळाचे नावही ‘आप मंडळ’ असे आहे यात नवरा बायको यांनी एकमेकांचा सन्मान करायचा. पूजा करायची, त्यामुळे असे म्हणावे लागते की या सामुदायिकत्वात नवनैतिक मूल्य प्रस्थापित करून आदिवासींनी शिक्षितांनाच समानतेचा, एकीचा धडा दिलेला दिसतो.
मौखिक भाषा :
आदिवासी समाजाचा इतिहास, त्यांचे भारतातील वास्तव्य, भूप्रदेश इ.चा अभ्यास केल्यावर आढळते ही जमात कितीही प्राचीन असली तरी, त्यांची भाषा लिपिविरहित आहे. ह्या बोलीभाषेत वाङ्मयीन सौंदर्य ठासून भरलेले असताना ते लिहिताना अडचण जाणवते. आजही त्यांचे लोकसाहित्य मौखिक परंपरेवरच टिकून आहे. ते दुसऱ्या भाषेत लिपिबद्ध होताना अर्थहानी होण्याची शक्यता अधिक आहे.
आश्चर्यकारक प्रथा, परंपरा, पोशाख, खानपान, केशरचना इ. :
आदिवासींच्या पोशाख, दागिने, परंपरांचे आकर्षण फिल्मी दुनियेलाही आहे. . आदिवासींच्या, खासकरून भिल्ल-पावरा आदिवासी, स्त्रियांचे पोषाख गर्द जांभळे, गुलाबी, लाल, पिवळे, निळे असे निसर्गातील रंगासारखे असतात. फिक्कट, इंग्लिश कलरशेड त्यांना आवडत नाहीत. गर्द रंगाचे पातळ नऊवार पण त्यांचे दोन वेगळे तुकडे असतात, नेसता आणि पांघरता! साडीचा नेसता तुकडा नवा असेल तर त्या स्त्रिया पांघरता पदर जुना असतो किंवा पांघरता नवा असेल तर नेसता जुना असतो. असे असले तरी दोन तुकड्यांची रंगसंगती आकर्षक असते. दोन वेगळे साडीचे तुकडे नेसण्यामागचा हेतू वेगळा असतो. आई, मुलगी, सून, सखी, बहीण, यांपैकी कुणीही जर नवी साडी घेतली तर ती संपूर्ण नवी साडी एकटी नेसत नाही. तिचे दोन तुकडे करून आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीला अर्ध्या साडीचा तुकडा वापरायला देते. अतिशय दारिद्र्यामुळे नवे कपडे पटकन घेणे शक्य होत नाही. तेव्हा असे अर्धे-अर्धे नवे पातळ नेसून एकीपेक्षा दोनजणी त्याचा आनंद उपभोगतात काय? नव्या साडीचे दोन तुकडे करणे, ते दुसऱ्यांना देणे, एका स्त्रीच्या संदर्भात हे अशक्यप्राय आहे. ते शक्य होताना दिसते फक्त आदिवासी समाजातील स्त्रियांच्या संदर्भात. त्यांचे दागिने चांदीचे असतात. वेल्या, वाळ्या, बाजूबंदपासून पायातील मासोळीपर्यंत दागिने शुद्ध चांदीचे असतात.
पुरुष :- आखूड धोतर, सदरा, डोक्याला फेटा, पूर्वी लंगोटी व डोक्याला मुंडासे बांधत. पुरुषही चांदीचे दागिने घालतात.
खानपान :- अतिशय साधे, कमीत कमी तेलात अन्न शिजवतात. अन्न शिजवण्यासाठी मातीची भांडी वापरतात व ती स्वतः बनवितात. पाटा-वरवंटा यावर वाटून मिरची मसाला तयार करायचा आणि दही, ताक, आंबाडी, चिंच, महू, उंबर घालून कालवण करायचे! कालवणासाठी कुकडी (कोंबडी) मासे, खेकडी, पशु-पक्षी जास्त आवडतात. सोबत ताजी, पहिल्या धारेची महुची दारू बस्स.
पंजायत पद्धती :- आजही आहे. बदल झालेला दिसतो तो विवाहात – नागरी संस्कृतीप्रमाणे जरी भिल्ल-पावरा समाजात विवाह होऊ लागले असले तरी त्यांची अशी पद्धती आहे की पति-पत्नीमधील एक मयत झाला की, एकाकी आयुष्य तो जगत नाही. लगेच पुनर्वसन केले जाते. शिवाय पति-पत्नीचे पटले नाही तर लोक काय म्हणतील याचा विचार न करता झगडा भरायचा आणि काडीमोड करून मोकळे व्हायचे! आजही या परिसरात वधू-वर संशोधनासाठी भोंगऱ्या बाजार भरतात. तेथे जोडीदाराची निवड केली जाते. आणि पटले नाही तर एक सोडून दुसरा जोडीदार निवडला जातो.
म्हणजे येथे आपल्या जोडीदाराला निवडण्याची संपूर्ण संधी स्त्रीला तर आहे. शिवाय न पटल्यास सोडून देण्याची पद्धती आहे. आता परंपरेतील हा भाग बराचसा कमी झाला असला तरी ही पद्धत पूर्णतः नष्ट झालेली नाही.
व्यसन -अंधश्रद्धा-अज्ञान-जादूटोणा
शिक्षण अल्प म्हणून अंधश्रद्धा, म्हणून जादूटोणा, डाकीण, भूत इ. प्रकाखंना बळी पडणे, हा प्रकार आजही जीवघेणाच आहे. आजारपणावर आजही भगतावर जास्त जिश्वास ठेवला जातो. मृत व्यक्तीचा आत्मा संचारतो व त्रास देतो ही भ्रांती अजूनही संपलेली नाही. नवस, मानता फेडण्यासाठी पशु-पक्षी बळी देणे अजूनही संपलेले नाही. बाजऱ्या रंगाची कोंबडी बळी देण्यासाठी/नवसासाठी शुभ मानतात. स्वतः कर्जबाजारी होऊन देवतांचे पूजन, सण, पूर्वजांचे पूजन करतात. त्यात पशु-बळी देणे, दारू, गावजेवण देणे यात गरीब आदवासी संपतो. बरे व्यसन दोघांनाही असते. पूणेत दारूला, मटणाला स्थान असल्याने जणू व्यसनाचे परमिटच मिळते. पुरुषाच्या बरोबरीने स्त्रिया व्यसन करतात. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होते. पीडित जीवन कंठावे लागते. त्यामुळे आयुष्य मर्यादा फारच कमी झालेली दिसते. म्हणून जन्माला येणारे बाळ कुपोषित जन्माला येते. यावर अनेक सामाजिक संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉक्टर, शासन, शिक्षक आदिवासी समाजसुधारक व आदिवासी संस्था यांनी भरपूर प्रयत्न केले. करत आहेत. त्यामुळे प्रमाण कमी झाले पण अजिबात बंद झाले असे म्हणता येत नाही. कारण आजही या समाजात डाकीण, भानामती, जादू, भूत यावरचा विश्वास कमी झालेला नाही हे सत्य आहे.
नावीन्याचे आकर्षण नसते :- आदिवासी सामुदायिक लोकांमध्ये नव्या गोष्टी स्वीकारण्यासंबंधी मनात कमालीची भीती असते. नव्या गोष्टीचा स्वीकार केला तर निसर्गाची अवकृपा होईल का? देवता आपल्यावर रागवला तर दुष्काळाला सामोरे जावे लागेल. रोगराई येईल. पूर्वज कोपतील आणि सात जन्मांचे दारिद्र्य आपल्याला भोगावे लागेल त्यामुळे ते जास्त परंपराप्रिय असतात.
समान जीवनपद्धती :- आदिवासी समाजाचा सर्वांत लक्षणीय विशेष म्हणजे समान बोलीभाषा, समान धर्माचरण, समान संस्कृती, समान सामाजिक नियम व त्या नियमानुसार आचरण, जीवनपद्धती. हे नियम जाचक आहेत का हा प्रश्न येथे महत्त्वाचा नाही. ते संपूर्ण समाजाच्या हिताचे समजून, परिस्थिती बघून आखलेले असतात. त्यामुळे ते मोडण्याचे धाडस शक्यतो कुणी करीत नाही. आणि हाच वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित होतो. हे जीवन बघून कुणी त्यांना मागास म्हटले काय? किंवा कुणी अॅडव्हान्स म्हटले काय? त्यांना काही फरक पडत नाही. ते आपल्या समाजाच्या चौकटीत जीवन जगणे पसंत करतात आणि मग हेच त्यांचे विशेष म्हटले तर नवल नाही. उदाहरणच घ्यायचे झाले तर भिल्ल-पावरा लोकांची होळी, दिवाळी, जन्म, विवाह, मृत्यू हे संस्कार यात फारसा बदल झालेला नाही. लोक शिकले-सवरले तरी देवतांचा कोप नको, समाजाचा रोष नको म्हणून पारंपरिक पद्धतीनेच सण उत्सव व संस्कार करतात. म्हणजे सामाजिक नियमांचे पालन करणे हा त्यांचा धर्म बनतो. एकत्रितपणे विचार करण्याची प्रवृत्ती तर असते. शिवाय त्यांच्यात एकजिनसीपणा वाढीस लागलेला दिसतो.
स्वतंत्र व साधी अर्थव्यवस्था :- आजही आदिवासींच्या अर्थव्यवस्थेत आयात निर्यातीचे नियम नसतात. त्यंच्यात वस्तुविनिमयाला जास्त प्राधान्य देण्यात येते. त्यांचे उत्पादनच मुळात खूप कमी प्रमाणात असते. शेतीसाठीची मोठी अवजारे, बी-बियाणे, खते, तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने शेती डोंगराळ भागात. ती ओलिताखाली असणे अवघड. ह्या सर्व समस्या तेथील सर्व आदिवासींच्या समान असल्याने ते वस्तुविनिमयाला प्राधान्य देतात. काही आदिवासी शेतीला जोड, पशुपालन, दुग्धव्यवसाय करताना दिसतात.
आदिवासी आणि लोकसाहित्य :- आदिवासींची संस्कृती ज्या साहित्यामध्ये प्रतिबिंबित होते अशा मौखिक किंवा लिखित साहित्याला आदिवासी लोकसाहित्य म्हणता येईल, किंवा आदिवासी लोकसाहित्याचा आत्मा आदिवासी लोकसंस्कृती आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
निसर्गातील पशू, पक्षी, पाने, फुले, फळे, झरे,तारे, काजवे, आकाश. चंद्र, चांदण्या, सूर्य, अग्नी, वारा, माती, पाणी, निसर्गाचे रंग, जीवनातील प्रेम, दुःख वेदना, विरह, संकट, देशांचा अभिमान सगळ्यांवरच गीते, कथा, म्हणी वाक्प्रचार, लोकनाट्ये आहेत. आपल्या सुंदर मुलींचे वर्णन एक आदिवासी स्त्री पुढीलप्रमाणे करते.
“जैसा बाना टिंजकेन मालाय गोंडोनी डो
जैसा बाना टिंजकेन मालाय गोंडोनी डो
आमनी टिंगडी डो, मालाय चोजाआ डो
कँडानी खंबो निडो, जामा टॅगडी डो
देखला जेमी, पोपटांनी डो, जामा बुतुमडो
जैसा बाना टिंजकेन मालाय गोंडोनी डो”
माझ्या सुंदर मुलीचे पाय केळीच्या खांबासारखे चमकदार सुंदर आहेत, नाक पोपटाच्या चोचीसारखे वाकदार असून ओठ कापलेल्या टरबुजासारखे लालबुंद आहेत. दोन डोळे चंद्र-सूर्यासारखे तेजस्वी चमकदार आहेत. गाल करंजीसारखे ! अरे गोंडाच्या मुली असतातच सुंदर असा अभिमानही आईला आहे.
एक आदिवासी प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो :
“गोदना भरला कालवाटा
तावा दारोटाने
कबसेर निमे बरा संगो
ममी मराटोते ।।
‘हे प्रिये माझ्या ओल्या-ओल्या मातीने लिंपलेल्या अंगणात तुझे हिरवेकंच गोंदणाचे पाय पडू दे. बघ माझ्या अंगणाबरोबर माझे मनही दरवाजा उघडून तुझ्या येण्याची वाट बघते आहे.’ निरक्षर म्हणविणाऱ्या आदिवासी समाजाला एवढी प्रतिभा आली कुठून ? आश्चर्यचकित करतील अशा उपमा, रूपके अलंकारांचा भरणा त्यांच्या लोकगीतांतून दिसतो. मग ती गीते, जात्यावरची असोत, होळीची शृंगारगीते असोत की, विरहभाव
व्यक्त करणारी करुणगीते असो. त्यांची प्रतिमा कुठेही कमी वाटत नाही.
पोरी इंगा साहोले
मीषा तेरी डोरे
खालबो साहोते
भाई लोला डोरे
आई-बाबा जगात सर्वांत श्रेष्ठ. जगात सर्वोच्च प्रेम हे त्यांचे असते. इतरांचे प्रेम स्वार्थी असते. बाबा तुमची ही सुंदर चिमणी बापाच्या छायेत, आईच्या कुशीत लाडाने वाढली, ती आता दूर उडून जात आहे. आज मी परक्याच्या घरी जात आहे. तुमचे हे पाखरू खुल्या विश्वात जात आहे. तेथे तुमच्यासारखी प्रेम देणारी माणसे मिळणार नाहीत. मग दुःखी झाल्यावर मी राना-वनात, जंगलात, झाडा-झाडावर जाऊन रडेन. तेच आता माझे सखे-सोबती, माझे अश्रू पुसणारे.
शेवटी हेच म्हणावेसे वाटते, आदिवासी संस्कृती आणि लोकसाहित्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आदिवासी संस्कृतीस समजून घेण्याची वाट लोकसाहित्यातूनच जाते.
कला,वाणिज्य महाविद्यालय, शहादा