मानवी मनाला स्मृतिशक्तीची देणगी लाभलेली असल्यामुळे, आपल्या जन्माच्या आधी हे जग चालत आलेले असणार असा विश्वास ठेवणे आपल्याला भाग पडते; आणि जर जगाला सुरुवात असेलच तर ती सुरुवात करणारी शक्ती आहे असे गृहीत धरण्याच्या भूमिकेची सुरुवात होते…ह्यामुळे, जम्म जो वास्तविक केवळ अत्यंत शारीरिक असा अनुभव आहे त्याला पारलौकिक स्वरूप प्राप्त होत जाते. मुलगा आणि वडील, मुलगी आणि आई ह्यांच्यात असलेल्या द्वंद्वात्मक संबंधांमुळे प्रत्येक व्यक्तीला तिचा जन्मदाता अथवा जन्मदात्री ह्यांच्यात विलीन होऊन नाहीसे होण्याची एक अनिवार्य, सुप्त इच्छा असते. ह्या प्रेरणेचे स्वरूप कित्येकदा त्यांची नक्कल करणे असेही दिसू शकते पण ही प्रेरणा बऱ्याच वेळा रचनात्मक स्वरूपातही पुढे येते आणि प्रत्यक्ष जन्मदात्याऐवजी, जो कधीच मृत्यू पावणार नाही अशा एका जन्मदात्याची कल्पना केली जाते. ह्या सगळ्या प्रेरणांमुळे मानवी मनोविश्व ईश्वराच्या कल्पनेने झपाटून गेलेले आहे (पशूचे नाही).
इतर पक्षी, पशू, वनस्पती आणि मानव ह्यांच्यामधील मुख्य फरक फक्त वाचाशक्ती व भाषाकौशल्य नव्हे, पण श्रद्धा-विश्वासाचाही आहे. मराठीत त्याला अक्षर असेही म्हणू शकतो. अनेक धर्मांच्या सुरुवातीला जो भारावून टाकणारा विचार येतो, तशा विचाराला spripture असाही शब्द वापरतात. अक्षर ह्या शब्दाला ईश्वर आणि लिहायचा शब्द असे दोन्ही अर्थ संस्कृत व मराठी दोन्हीमध्ये आहेत. कदाचित लिपी आणि ईश्वर ह्यांचा मानवाने बांधलेला हा संबंध मानव आणि इतर प्राणी ह्यांच्यातला मूलभूत भेद दाखवणारा असावा. …
लिपीचा विकास झाला, तो मुळात गणिताच्या जरूरीमुळे. लिपी म्हणजे केवळ तीन किंवा चार प्रकारच्या रेघांनी बनविलेली एक सांकेतिक स्मृतिसंचयपद्धती. संचय करण्याच्या गरजेपोटी गणित व गणिताच्या गरजेपोटी लिपी निर्माण होते. जर लिपी आणि ईश्वर ह्यांचे नाते असेल तर वानप्रस्थाची इच्छा आणि ईश्वरनिर्मितीची गरज ह्या दोन्ही प्रेरणा शेतीप्रधान जीवनाकडे संक्रमण करणाऱ्या मानवी समाजात उद्भवल्या.