निसर्ग माणसांना धार्जिणा नाही. तो (खरे तर ती व्यवस्था) कोणत्याच सजीवाला धार्जिणा नाही. तो त्याच्या नियमांप्रमाणे चालतो, आणि वेगवेगळ्या जीवजाती त्यात आपापली कोंदणे घडवून जगतात. माणसेही बहुतांश काळ अशी निसर्गाच्या सांदीकोपऱ्यांत जगत आलेली आहेत. आपल्याला जे हवे असेल ते घ्यायचे, नको ते टाळायचे, हेच केवळ करता येते; असे मानत माणसे जगत आलेली आहेत. आजची माणसे सुमारे एक
लक्ष वर्षे पृथ्वीवर जगत आहेत, आणि या आयुष्याचा जवळपास नव्वद टक्के भाग माणसे अन्नसंकलक म्हणून जगत आहेत.
कधीतरी दहाबारा हजार वर्षांपूर्वी माणसे जाणीवपूर्वक अन्न पाळू लागली. प्राण्यांपैकी काही पाळले गेले. वनस्पती पेरल्या जाऊ लागल्या, आणि माणसे शेतकरी झाली, अन्नोत्पादक झाली. ही प्रगती होती की अधोगती यावर वेगवेगळी मते आहेत(च!).
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी माणसांच्या व्यवहारांत इंधन महत्त्वाचे झाले. अन्न शिजवणे, भांडी भाजणे, जुजबी धातुकाम, यांऐवजी इंधन सर्वच व्यवहारांना ऊर्जा पुरवू लागले. त्यावेळेपर्यंत माणसांची व पशूचीच ऊर्जा वापरात होती. आता या नव्या ऊर्जेचे नवे उपयोग शोधले जाऊ लागले. माणसे औद्योगिक झाली.
पण माणसांची शरीरे, वृत्ती, वागणूक हे सारे परिस्थितीशी जुळत जाणारेच असावे लागते. आणि हे जुळत जाणे संथ गतीनेच होते. यामुळे माणसांची शरीरे व वागणूक आजही अन्नसंकलनाशी जुळती आहेत. त्यांना शेती जरा तरी झेपते. औद्योगिक त-हेने जगणे मात्र आज जड जाते.
हा जुळते होण्याचा प्रकार फक्त शरीरांपुरता, वागण्यापुरताच होत नाही. माणसांच्या सामाजिक संस्थाही अशाच जीवनपद्धतीशी जुळत जातात. आता माणसांच्या बहुतेक आयुष्यात कुटुंब आणि त्यांतून घडलेली टोळी, या दोनच संस्था असत. अन्न गोळा करत जगण्याला त्या पुरत असत. शेतीने यात आणखी काही संस्था जोडल्या. मालकी हक्क, वस्तूंना आणि सेवांना किंमतींनी मोजणे, या आणि अशा कल्पनांची गरज भासू लागली. खेडी, गावे, प्रांत, शासन-प्रशासन अशा संस्थांचे पेव फुटले. या संस्थांशी जुळत असतानाच, त्या संस्थांची नेमकी रूपे ठरत असतानाच औद्योगिक जीवनपद्धती उपजली. संस्थांमधले बदल शरीरांमधल्या बदलांपेक्षा वेगाने होतात हे खरे. पण तरीही त्या प्रक्रियेला वेळ लागतोच. त्या तात्काळ, क्षणार्धात होत नाहीत.
जर माणसांच्या इतिहासाच्या पटाकडे पाहिले तर कोपरांचा टेनिस एल्बो, कण्यांचा स्पाँडिलायटिस, गर्दीतच उपजणारा परात्मभाव आणि लोकशाही विरुद्ध जनआंदोलने हे सारे एकाच प्रकारचे प्रश्न आहेत. प्रत्येकच ठिकाणी एका जीवनपद्धतीची सवय झालेली असताना वेगळ्या जीवनपद्धतीने जगणे घडते. एका दृष्टिकोनातून ते लादले जाते. तर दुसऱ्या दृष्टिकोनातून नवी जीवनपद्धती आवश्यक असते. सर्व त्रासांचे मूळ इथे भेटते.
यांत मूल्यविचार आणि त्यांवर उभी राहणारी प्रश्नचिन्हे ही एक महत्त्वाची बाब असते. या अंगाने यूरोपातील विसाव्या शतकाचे चित्रण जॉन बर्जरच्या (जन्म 1926) इंटू देअर लेबर्स या कादंबरी-त्रयीत भेटते. पिग अर्थ (Pig Earth, 1979), वन्स इन युरोपा (Once in Europa, 1983) आणि लायलॅक अँड फ्लॅग (Lilac and Flag, 1990) अशी तीन पुस्तके मिळून 1992 साली इंटु देअर लेबर्स (Into Their Labours) घडले आहे. “अदर्स हॅव् लेबर्ड अँड यी आर एंटर्ड इंटु देअर लेबर्स’ या बायबलातील वचनावरून बर्जरने नाव निवडले.
खरे तर रूढार्थाने लायलॅक अँड फ्लॅगलाच फक्त कादंबरी म्हणता येईल. पिग् अर्थ मध्ये आठ कथा आणि दर कथेनंतर एक कविता अशी रचना आहे. वन्स इन युरोपात पाच कथा आणि पूर्ण संचाच्या आधी व नंतर अश्या दोन कविता भेटतात. एकूण तेरा कथा आणि नंतरचे लायलॅक यांच्यात काही पात्रे एकापेक्षा जास्त वेळा भेटतात तर इतर काही एका कथेतल्या पात्रांचे उल्लेख इतर कथांमध्ये भेटतात. पण तीन्ही पुस्तके मिळून एक विस्तृत कादंबरी नक्कीच घडते. खुद्द बर्जर मात्र स्वतःला कथेकरी, स्टोरीटेलर म्हणवून घेतो; कादंबरीकार नाही. सोबतच बर्जरने लेबर्सला एक विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे, जी शेतीवरचा नव्हे तर तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांवरचा एक अप्रतिम निबंध आहे. इथे हे स्पष्ट करायला हवे की बर्जर स्वतःला मासिस्ट मानवतावादी म्हणवतो.
प्रस्तावनेची सुरुवातच अशी “शेतकऱ्यांचे जीवन तगून राहण्याला पूर्णपणे बांधील असते.” जरा वेळाने, पण पहिल्याच परिच्छेदात बर्जर म्हणतो, “गेल्या दीडेक शतकांत शेतकऱ्यांची तगून राहण्यातली चिकाटी प्रशासक आणि तत्त्वकांना गोंधळवते आहे.” आणखी जरा अवकाशानंतर, पण तरीही पहिल्याच परिच्छेदात बर्जर सांगडो, “पण प्रथमच अशी स्थिती उद्भवली आहे की हा तगून राहणाऱ्यांचा वर्ग तगू शकणार नाही.
आणखी शतकाभरात शेतकरी उरणार नाहीत.”
बर्जरच्या काही गोष्टी अगदी साध्या, वर्णनात्मक आहेत. आपल्या शेळीला बोकडाकडे फळायला नेणारी बाई, एका गाईचा खाटकाच्या हाताने होणारा मृत्यू आणि नंतरचे विच्छेदन, एका डुकराच्या मृत्यु-विच्छेदनातून आजा आणि नातू यांच्यातले बंधन नव्या पातळीवर जाणे, असे सरळसोट कथन आहे.
पण यांतच एक जन्मभर लहानखुरी राहिलेली मुलगी भेटते. ती कार्यक्षम आणि मेहेनती असते. तिच्या कामेच्छा मात्र सामान्य पद्धतीने पूर्ण होत नाहीत, विवाह आणि पुढे कुटुंब घडणे-वाढणे तर दूरच. अखेर तिला गाव सोडावे लागते, आणि उंच डोंगरांतल्या एका झोपडीत जगावे लागते. तिथे राहन रानमेवा गोळा करून आणि तो फ्रान्स-इटली. फ्रान्स-स्वित्झर्लंड या सीमापार जाऊन विकून ती जगू लागते. श्रीमंत होते.
बर्जर मूळचा इंग्रज, पेशा चित्रकाराचा, कलासमीक्षकाचा, लेखकाचा. इंग्लंडात राहणे आवडेनासे झाल्याने सुमारे 1962 सालापासून तो फ्रेंच आल्प्समधील एका खेड्यात राहतो आहे. ग्रामीण जीवन पाहत त्याला आधारभूत ठरणाऱ्या कथाकहाण्या गोळा करतो आहे. पिढी-दर-पिढी जराजराश्या बदलणाऱ्या या कहाण्या हा ग्रामीण संस्कृतीतला सूत्ररूप धागा आहे. त्या संस्कृतीचा तो कणा आहे. त्या जगायच्या पद्धतीतली मूल्यव्यवस्था अश्या कहाण्यांवर बेतलेली आहे.
एका शहरातून खेड्यात आलेले जोडपे. त्यातली स्त्री एका खेडवळाला मोहवते. हा खेडवळ बॉरिस काहीसा बेजबाबदार, पण खेड्याला सुसह्य वाटणारा. तो आपल्या प्रेमपात्राला भेटून लैंगिक संबंध घडवतो. दिलदारीने तिला वस्तू व सेवा पुरवत राहतो. ती, तिचा नवरा, ही मदत स्वीकारत त्याच्या कामेच्छेला शमवत राहतात. वरवर पाहता दुतर्फा (की तितर्फा?) खुषीचा व्यवहार. पण बॉरिसला मूल हवे असते, आणि हे त्याच्या प्रेमपात्राला, तिच्या नवऱ्याला कळत नाही.
एकदा हिम-बर्फाच्या काळात वीज पडून बॉरिसच्या कैक मेंढ्या मरतात. मुळात त्याच्या बेजबाबदार निष्काळजीपणानेच हे घडते. पण तो धीराने सर्व मेंढ्या जाळून टाकून नव्याने सुरुवात करायला तयार असतो. त्याचे मेंढ्या जाळणे हा एक मोठा आणि अवघड प्रकल्प असतो. सारा गाव तो पाहायला लोटतो, त्यात बॉरिसचे प्रेमपात्र आणि तिचा नवराही असतात. बॉरिसची धैर्याची, पण धीरोदात्त नसलेली कृती पाहताना त्याचे प्रेमपात्र ओळखही देत नाही. बॉरिस खचतो, मरतो, आणि तो मेल्यावर त्याने आपल्या संभाव्य अपत्यजन्मासाठी केलेली तयारी आपल्याला दिसते. ही निर्मम, कठोर कहाणी संपत नाही. बॉरिसचे प्रेमपात्र लायलॅकची निवेदक आहे असे मानायला जागा आहे!
अशा सुट्या वाटणाऱ्या कहाण्यांमधून बर्जर हळूहळू विस्थापित होत जाणाऱ्या शेतकऱ्यांची कथा सांगतो.
बर्जर माझा मित्र नाही. माझ्या पत्नीला तिच्या एका स्नेह्यामार्फत निर्मल वर्मा या ज्ञानपीठ विजेत्या हिंदी लेखकाची ओळख झाली. त्याच्या रोजनिशीतल्या एका संदर्भाचा धागा पकडून आम्ही इंटु देअर लेबर्सपर्यंत पोचलो. त्याची ओळख आधी त्याच्या वेज ऑफ सीईंग या पुस्तकातल्या द नेकेड अँड द न्यूड या निबंधातून झाली होती. त्या निबंधाचा सारांश एका सचित्र लेखातून आजचा सुधारकने प्रकाशित केला आहे. (सप्टेंबर 2005, अंक 16.6). तो आजचा सुधारक मधला पहिला दृश्य लेख!
एखादा लेखक नवव्या-बाराव्या वर्षी भेटणे (ऑर्वेल) सोळा-अठराच्या वयात भेटणे (स्टाईनबेक) आणि साठीत भेटणे, यांत जमीनअस्मानाचा फरक आहे. बरे, बर्जर ऑर्वेल-स्टाईनबेक यांच्याइतकाही सुगम नाही. बहुधा यामुळेच तो भारतीय-मराठी वाचकांच्या ओळखीचा नाही. त्यातूनही आधुनिकोत्तर विचारांच्या काळात तो थेट आधुनिक मानवतावादी इंग्रजी लेखक आहे. मार्कीझ, व्हार्गास आणि योसा (चूकभूल देणेघेणे!) यांच्या काळातही तो इथे पोचलेला नाही, यावरून काय ते समजून घ्या!
पण बर्जर शेतकरी समाजातले लोक औद्योगिक जगाशी जुळत जाताना होणारे खटके-झटके नोंदतो. सफरचंदे पिकवणारे युरोपीय शेतकरी त्या फळांचा रस काढून, त्याला सौम्यसे आंबवून सायडर (cider) हे पेय करतात. चोथ्यापासून न्योले (?) (gnole) ही जास्त कडक दारू बनवतात. ती उकळून, उत्कलन करून (distil करून) बनवली जाते. शुद्ध शेतकरी या पेयांवर कर देणे गैर मानतो. त्याच्यामते अशी पेये बनवणे, वापरणे, पिणे, हा त्याचा जन्मसिद्ध, श्रमसिद्ध हक्क आहे. तपासनिसांना छळणेही मूळ शेतकरी मूल्यव्यवस्थेत पाप समजले जात नाही. उलट त्या तपासनिसांना छळणारा शूर मानला जातो. बर्जर एक कहाणी या प्रकारावरही लिहितो.
पण औद्योगिकता साध्या मानवी-पाशवी श्रमांच्या शेतीवर अतिक्रमण करतेच. अनिच्छेने का होईना, नव्या पिढ्यांमधले तरुण, नई उमर की नई फसल असलेले तरुण यंत्रे वापरू लागतातच. याने कमी माणसांत जास्त शेती करता येते, भलेही शेतीतली सांदीकोपऱ्यांतली उप-उत्पादने नष्ट होतात. मग लोकसंख्या न वाढताच शेतकरी समाजातले लोक शेतीबाहेर लोटले जाऊ लागतात. त्यांना बाहेर जायला शहरांचाच पर्याय असतो, आणि पूर्णतः अनोळखी धंदे-पेशेच पोट भरू देतात. या उखडलेल्या माणसांचे वर्णन येते लायलॅक अँड फ्लॅग मध्ये.
मुळात शेतकरी म्हणजे कोण? या प्रश्नाचे उत्तर बर्जर थिओडोर शनिनच्या तोंडून देववतो. “शेतकरी म्हणजे साध्या हत्यारांनी आणि आपल्या कुटुंबांच्या श्रमांनी शेती करणारे लोक; ज्यांचे उत्पादन मुख्यतः स्वतःच्या वापरासाठी आणि राजकीय आणि आर्थिक सत्ताधाऱ्यांप्रति जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी वापरले जाते.” (Peasants and Peasant Societies, Theodor Shanin, London, 1976). इथे व्यापारासाठी उत्पादन ही संकल्पना नाही. ती अन्नोत्पादक समाजात बिनमहत्त्वाची आहे. तिला महत्त्व येणे ही औद्योगिकतेतून येणारी बाब आहे. पैसे, वरकड मूल्य, काय वाटेल ते नाव द्या, पण मुळात शेती हा उपजीविका अधिक करभार यांवर बेतलेला प्रकार आहे. ते पैसेबियसे नंतर उद्योगांनी आणले. बर्जरच्या एका गोष्टीचा नायक मार्सेल यावर विचार करतो. तो मुख्यतः सफरचंदाची झाडे लावणारा म्हणून त्याच्या खेड्यात प्रसिद्ध असतो. बर्जर ऐका –
पण मार्सेल तत्त्वज्ञ होता. तो संध्याकाळी दिवसाभरात काय घडलं ते स्वतःला समजावून द्यायचा, म्हणजे पुढेही त्या समजुतींनुसार वागता येते.
सफरचंदांची नवी झाडं लावण्याचं त्याचं स्पष्टीकरण असं:
माझे मुलगे शेतावर काम करू इच्छीत नाहीत. त्यांना कामांचे ठराविक तास, शनिवार-रविवार आणि इतर सया, असं हवं असतं. त्यांना खिशात पैसे हवे असतात, खर्चायला. ते पैसे कमवायला गेले आहेत, आणि पैशांबाबत पागल आहेत. मिशेल कारखान्यात आणि एदुआर्द व्यापारात. (तो व्यापार म्हणाला, कारण त्याला धाकट्या मुलाबद्दल जास्त कठोरपणे बोलायचं नाही आहे.). मला वाटतं की ते चुकताहेत. दिवसभर काहीतरी विकत राहणं, आठवड्यात पंचेचाळीस तास कारखान्यात काम करणं, हे माणसाचं आयुष्य नाही. त्यानं माणसं अडाणी होतात. ते पुन्हा शेतावर येणार नाहीत. शेत अखेर निकोलला [ पत्नी] आणि मलाच करायचं आहे. जे मरू घातलं आहे त्यावर येवढं काम का करायचं? तर माझं उत्तर आहे : काम करणं म्हणजे ज्ञान टिकवून ठेवणं आहे. माझी मुलं हे गमावताहेत. मी खड्डे खोदतो. योग्य ऋतूत रोपं लावतो. हे माझ्या मुलांसाठी उदाहरण आहे, जर त्यांना ते पाहायचं असेल तर. नाहीतर ते माझ्या वडलांना, त्यांच्या वडलांना सांगणं आहे, की त्यांनी मला दिलेलं ज्ञान मी टाकून दिलं नाही आहे. त्या ज्ञानाशिवाय मी काहीच नाही.
यानंतर आपल्या न्योले वर कर आकारणाऱ्या सरकारी तपासनिसांना मार्सेल कोंडून घालतो. आणि अखेर स्वतः तुरुंगात जातो! (द व्हॅल्यू ऑफ मनी, पिग् अर्थमधून)
पण मार्सेलच्या या तत्त्वचिंतनानंतर धाकटा एदुआर्द एक सेकंडहँड ट्रॅक्टर विकत घेऊन घरी आणतो. मार्सेल आणि निकोलचे याबद्दलचे संभाषण ऐका –
कशासाठी ही यंत्रं आहेत माहीत आहे?
ती नांगरतात, कडबा पसरवतात, खत पसरवतात, दूध काढतात …. यंत्रावर असतं ते, निकोल म्हणाली.
सगळी यंत्रं एक काम करतातच.
त्यानं तिच्या नजरेला नजर भिडवली, अगदी गंभीरपणानं. अनुभव खूप असूनही निकोलचे डोळे निष्पाप होते. त्यांनी आजारपणं पाहिली होती, उभी पिकं जळताना पाहिली होती, मरेस्तोवर कामं करणारी माणसं पाहिली होती, जीवघेण्या वेणा भोगणाऱ्या बायका पाहिल्या होत्या, पण नकाशावर नजरा रोखून योजना आखणारी माणसं पाहिली नव्हती.
त्यांचं काम आहे आपल्याला नष्ट करणं.
आणि जरा वेळाने बर्जर/मार्सेल नोंदतो –
सपाट मैदानांवर गरीब माणसांना श्रीमंतांसाठी काम करण्याला पर्यायच नसतो. गरीब जेव्हा फक्त पैशासाठी काम करतात, तेव्हा त्यांच्याकडे श्रीमंती घडवण्याची ताकदच नसते. तिथे यंत्रं आली, फार पूर्वी. यंत्रं साधी, ढोरमेहनत उत्पादक करतात, आणि ती जी श्रीमंती कमावतात ती यंत्रांच्या मालकांकडे जाते. सपाट मैदानांवर मला हा हर्निया झाला नसता, कारण तिथे एका यंत्रानं दुसऱ्या यंत्रावर खत लादून ते पसरवलं असतं.
शेतकऱ्यांमध्ये सातत्याने दिसणारे हे तीन भाव; आपल्याला खरेखुरे ज्ञान आहे, आपण जीवतोड श्रम करतो आणि यंत्रे वाढल्याने फायदा यंत्रमालकांचाच होतो. आणि या धारणा, भूमिका, भावना चुकीच्याही नाहीत.
शेती करताना पदोपदी निर्णय घेत एका अत्यंत किचकट व्यवस्थेतून आपल्याला इष्ट ते परिणाम घडवायचे असतात. पिके कोणती घेऊ? पेरणी केव्हा करू? बियाणे कोणते वापरू? हे वाण सुरुवातीला जास्त पाणी पिते, पण पावसाने दडी मारली आहे, तर काय करू? कापणी आज केल्याने ऊस जास्त भरेल, की आणखी आठवडाभर पाणी देऊ? माझ्या समजुतीप्रमाणे इतर कोणत्याही पेशात इतक्या सातत्याने, इतके कळीचे निर्णय घ्यावे लागत नाहीत. बरे, निसर्ग इतका व्यामिश्र आहे, की निर्णय घेणे यांत्रिक नसते. असे सांगतात, की 2007-08 ची अमेरिकन मंदी स्टॉक मार्केटातले अनेक खरेदी-विक्रीचे निर्णय यंत्रांनी (संगणकांनी) घेण्यातून सुरू झाली. म्हणजे ते करोडो अब्ज डॉलर्सबाबतचे निर्णय लाख-करोड डॉलर्सची पॅकेजेस घेणाऱ्यानी घेतले नव्हतेच! असा उंटावरून शेळ्या हाकण्याचा अॅब्सेंटी लँडलॉर्ड प्रकार शेतीत मारक ठरतो.
जिवंत गोष्टी हाताळताना त्यांच्या कलानेच घ्यावे लागते. माझे दोन काका दुधाचा धंदा करत. गाईम्हशी सकाळ-संध्याकाळ दोहाव्याच लागतात, आणि यात वर्षाभरात खंड पडत नाही. माझ्या काकांनी सुट्टी घेतल्याचे मला आठवतच नाही. पेरणीची वेळ टाळता येत नाही याबद्दलची मढं झाकन चाडं धरावं लागतं ही म्हणही हीच बाब ठसवते. बरे, आयटी तज्ज्ञांचे ते रात्रीबेरात्रीचे कॉल्स गि-हाइकांच्या सोयीपायी करावे-घ्यावे लागतात. अडीअडचणीत “मी उद्या पहाटे मेल करतो, आत्ता माझ्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी आहे.”, असे म्हणता येते. गायीला न दोहल्यास दूध आटू शकते आणि गायीला इजा होऊ शकते. या साऱ्यामुळे शेतीतले श्रम झटक्याझटक्याने आणि एकुणात जास्त असतात. मार्सेलने खत वाहण्यातून उपजलेला हर्निया टाळला असता तर त्याचे पर्यवसान उपासमारीत होऊ शकले असते.
यंत्रे वाढल्याने यंत्रमालकांनाच खात्रीने फायदा होतो, तर यंत्रे चालवणारे, वापरणारे नेहमीच दुय्यम, सीमान्त राहतात. याची उदाहरणे देणे गरजेचे नाही. किंबहुना थेट निसर्गातून वस्तू कमावण्यापासून आपला पेशा जितका दूर जातो तितके उत्पन्न वाढते, हेही दाखवून देता येते.
शेतीतले कष्ट, शारीरिकही आणि बौद्धिक-मानसिकही, बर्जरच्या पहिल्या दोन पुस्तकांत केंद्रस्थानी आहेत. ग्रामीण जीवनाच्या कोणत्याही चित्रणात ते भेटतात. उदा. पांगिरा, पडघवली, तहान, बारोमास, तणकट, इ.इ. बर्जरचे वेगळेपण हे, की तो गोष्ट दर-गोष्ट विस्थापन आणि त्याचे परिणाम यांच्या पातळ्या पिंजतो. आणि हे इतक्या तरलपणे होते, की आपण कुठून निघालो, कुठे पोचलो, हा प्रवास जाणवतही नाही.
जसे, लायलॅक चे कथानक एका ट्रॉय नावाच्या गावात घडते. ट्रॉय म्हणजे पॅरिस असे काही समीक्षक सांगतात. गावातल्या पेठांची, चौकांची, रस्त्यांची नावे पाहता मात्र ट्रॉय म्हणजे नागर-युरोप, हाच निष्कर्ष निघतो. पिग् अर्थमध्ये पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्सचा ग्रामीण शेतकरी भेटतो. लायलॅक पर्यंत माणसे ग्रीक, इटालियन, अगदी तुर्कीही होतात, आणि काळ विसावे शतक संपतानाचा येतो.
हातभट्टी दारू गाळण्याच्या हक्कासाठी सरकारी अधिकाऱ्यांना छळणारा मार्सेल विनोदी वाटतो. पुढे मात्र दुसऱ्यांचे पासपोर्ट चोरणारे, ते विकून अत्यंत तात्पुरती मजा मारणारे नायक-नायिका वाचकाला सुन्न करतात.
पिढ्यान्पिढ्यांची जीवनपद्धती बदलणे सहज होत नाही. त्यात ज्या अनेक गोष्टी हरवतात त्यांमध्ये मूल्यव्यवस्था ही सर्वांत महत्त्वाची असते, हा मला बर्जरमधून घडलेला मोठाच साक्षात्कार.
193, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर 440010