अस्तित्वाविषयीच्या गहन प्रश्नांची उत्तरे शोधणे मानवी संस्कृतीच्या इतिहासात नवे नाही. जगभरच्या संस्कृतीत तत्त्वज्ञ आणि धर्मज्ञ यांनी ती शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. साहित्य नाट्य अशा कलाप्रकारांद्वारेदेखील असे प्रयत्न झाले आणि आजही होत आहेत. आधुनिक विज्ञानपरंपरेतून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याला मात्र एवढी दीर्घ परंपरा नाही. आपल्याला ज्ञान असलेले जग कसे अस्तित्वात आले याचा शोध वैज्ञानिक घेत आले आहेत; पण ते का अस्तित्वात आले असावे, किंवा माणसाच्या जगण्याचे प्रयोजन काय, अश्या प्रश्नांना विज्ञानाच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न तुलनेने नवे आहेत. मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या मानसशास्त्रासारख्या विषयाला एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून स्थान मिळणे हीदेखील तुलनेने अलीकडची, म्हणजे गेल्या शे-दोनशे वर्षांतली घडामोड आहे. याच काळामध्ये वैज्ञानिक प्रगतीचा झपाटा वाढला आणि पूर्वी अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानामुळे शक्य झाल्या. वैज्ञानिक प्रगतीचा एक पैलू म्हणजे मेंदू-विज्ञानाद्वारे मानवाच्या भावना आणि विचार यांच्याविषयीचे ज्ञान वाढले. तत्त्वज्ञ किंवा कलाकार हे मानवी स्वभाव किंवा प्रेरणा यांविषयी काही अंदाज बांधत असत; पण मेंदू-विज्ञान आणि मानसशास्त्र या ज्ञानशाखांमधल्या संशोधनामुळे त्यांविषयी अधिक खात्रीलायक विधाने करता येऊ लागली. नव्याने उपलब्ध झालल्या या ज्ञानाचा उपयोग करून मानवी अस्तित्वविषयक प्रश्नांना उत्तरे शोधता येतील का प्रयोग-निरीक्षणे-निष्कर्ष अशा तर्कशुद्ध पद्धतींनी सिद्ध झालेल्या गोष्टींतून अस्तित्वविषयक प्रश्नांकडे पाहिले तर काय होईल; तत्त्वज्ञांनी आधीच जे मांडले आहे त्याला पुष्टी देता येईल का; की त्याहून काही वेगळे सापडेल, अशा विचारांनी प्रेरित होऊन पॉल बैंगार्ड यांनी The Brain and the Meaning of Life हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तुत लेखात त्याचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहे.
थंगार्ड हे कॅनडातल्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉटर्ले येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत; शिवाय मानसशास्त्र, संगणकशास्त्र, संगणकविज्ञान, मेंदू-विज्ञान अशा विविध शाखांचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांना असा प्रयत्न करून पाहावासा वाटणे त्यामुळे साहजिकच आहे. मानवी आयुष्याच्या प्रयोजनाचा शोध धर्माद्वारे घेणे हे एकेकाळी रूढ होते; परंतु श्रद्धा हाच जिचा पाया आहे अशा प्रकारच्या धर्मसंकल्पनेला ज्ञानशाखेचा दर्जा देणे किंवा तीतून अंतिम सत्यांचा शोध घेणे, हे आधुनिक विज्ञानवादी विचारांत बसत नाही. धर्माविषयीचे हे आक्षेप आता तसे नवीन नाहीत. तत्त्वज्ञान या ज्ञानशाखेमध्येसुद्धा प्रत्यक्ष प्रयोगांपेक्षा चिंतन आणि विचारप्रयोगांना (thought experiments) अवाजवी महत्त्व दिले जाते, असा थेगार्ड यांचा आक्षेप आहे. तत्त्वज्ञ ज्यांच्या मुळापाशी जाऊ इच्छितात असे काही मानवी अस्तित्वविषयक प्रश्न घेऊन मानसशास्त्रात आणि मेंदू-विज्ञानात पुराव्यांनिशी सिद्ध झालेल्या ज्ञात गोष्टींच्या आधाराने त्यांची उकल करण्याचा प्रयत्न करणे, असे पुस्तकाचे स्वरूप आहे. हे प्रश्न कोणते ते आधी पाहू :
वास्तव म्हणजे काय?
आपल्याला वास्तवाचे ज्ञान कसे होते?
जीवन जगण्यालायक का असते?
एखादी कृती चूक की बरोबर हे कशामुळे ठरते?
या प्रश्नांची उत्तरे शोधली तर जगण्याचा अर्थ सापडू शकेल असे /गार्ड यांना वाटते. त्या प्रश्नांना आपली उत्तरे काय आहेत हे ते पहिल्या प्रकरणातच सांगतात. स्नेह, कार्य आणि क्रीडा या गोष्टी मानवी जीवनाला अर्थपूर्ण करतात; कारण मानवाच्या कळीच्या गरजा त्यांद्वारे भागतात, असा /गार्ड यांचा दावा आहे. हे पटू शकेल असे उत्तर आहे. मानवी मनातल्या भावना, निर्णयप्रक्रिया आणि नीतिमत्ताविषयक संकल्पना यांचा मेंदूतल्या जैविक प्रक्रियांशी कसा संबंध लागतो ते कळले, तर कोणत्या मानवी कृती मनात कोणत्या भावना उत्पन्न करतात याचा पत्ता लागेल आणि जीवनाला अर्थपूर्ण करणाऱ्या गोष्टी कोणत्या यांचा त्याद्वारे थांग लागेल असे /गार्ड यांना वाटते.
आपले विचार, स्मृती, भाषा, वास्तवाविषयीचा बोध आणि एकंदर आकलन हे कसे निर्माण होतात याविषयीचे जीवशास्त्रीय विवेचन पुस्तकात आहे. मेंदूत मानवाचे मन असते; आत्मा वगैरे गोष्टींना काही जीवशास्त्रीय आधार नाही असे लेखकाचे प्रतिपादन आहे. चेतापेशींमधून (neurons) होणाऱ्या संदेशवहनामुळे चेतापेशींमध्ये त्यानुसार आकृतिबंध (patterns) कसे हळूहळू निर्माण होतात आणि त्यांतून मेंदूला बोध कसा होतो याचे तपशीलवार वर्णन करून ते आपल्या या प्रतिपादनासाठी आधार म्हणून लेखक वापरतो. मेंदूला वास्तवाचे आणि अमूर्त संकल्पनांचे आकलन कसे होते याविषयीही लेखक सौंगतो. ज्ञानेंद्रियांमधून मेंदूपर्यंत संदेश पोहोचत असतानाच त्याला समांतर अशा अर्थबोधनाच्या अनेकविध प्रक्रिया एकाचवेळी चालू होतात. त्यासाठी चेतापेशींचे वेगेवेगळे गट कार्यरत असतात. म्हणून हे समांतर होऊ शकते. आपल्याला आधीपासून असलेले ज्ञान या चेतापेशींच्या विविध गटांत साठवलेले असते; जेव्हा ज्ञानेंद्रियांमधून संदेश येऊ लागतात तेव्हा ते या ज्ञानापैकी कशाशी कितपत जुळतात त्यानुसार चेतापेशींचे वेगवेगळे गट कार्यरत होतात. आलेल्या संदेशाशी त्यांपैकी जे सर्वाधिक जुळते त्यावरून आपले वास्तवाचे आकलन काय ते ठरते. म्हणजे उपलब्ध पुराव्यांचे त्यातल्या त्यात सर्वाधिक सुसंगत अर्थबोधन ज्यांतून होते ते अनुमान स्वीकारण्याची वैज्ञानिक दृष्टी ही मेंदूच्या रचनेतच अंतर्भूत आहे, असे लेखक सांगतो. पुस्तकातले हे एक महत्त्वाचे विधान आहे. जर-तर, कार्यकारणभाव, काळ अशा अमूर्त संकल्पनांचे मेंदूला होणारे आकलन याविषयीचे विवेचनसुद्धा पुस्तकात आहे. मानवाच्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमता इतर अनेक सजीवांच्या तुलनेत मर्यादित आहेत; पण अशा अमूर्त संकल्पनांचे मानवाला होणारे आकलन या मर्यादांना ओलांडून जाते. माणूस आणि इतर प्राणी यांच्यातला हा एक महत्त्वाचा फरक आहे.
मेंदूला बोध किंवा आकलन कसे होते याविषयी सांगून झाल्यावर लेखक भावनांकडे वळतो. मेंदूतल्या कोणत्या भागात भावनांचा उगम होतो याविषयीचे शास्त्रीय विवेचन इथे येते. संशोधन, कलानिर्मिती अशा गुंतागुंतीच्या सर्जनशील प्रक्रियांमध्ये नवीन काही गवसण्याचा आनंद, अपयशाची भीती अश्या भावना असतात आणि त्यांतून प्रेरणा घेत माणसे काहीतरी घडवतात. भावनांमुळे वेगवेगळ्या विचारांना आणि कृतींना कमीअधिक चालना मिळते; त्यांशिवाय विचारांना आणि कृतींना, आणि पर्यायाने जीवनाला अर्थ राहिला नसता असे एकंदरीत लेखकाचे म्हणणे आहे.
निर्णय घेताना मेंदूत होणाऱ्या प्रक्रियादेखील लेखकाने विशद केल्या आहेत, आणि भावनांशी निर्णयांचा कसा संबंध लागतो हेही समजावून सांगितले आहे. एक महत्त्वाचे विधान या विवेचनावरून केले जाते. ते असे : आपण ज्याला संकल्पस्वातंत्र्य (Free Will) मानतो तो एक आभास असतो, असे लेखक म्हणतो. व्यक्तीला जाणवणारा ‘स्व’ हा एकसंध असतो. त्याला संकल्पस्वातंत्र्य असते. वैज्ञानिक दृष्टिकोणात मात्र ही ‘स्व’संकल्पना विविध जैविक-रासायनिक प्रक्रियांतून उद्भवणारी एक गुंतागुंतीची आणि विविधांगी गोष्ट आहे. त्यामुळे माणसाला खरोखर कितपत संकल्पस्वातंत्र्य असते याविषयी संदेह निर्माण होतो. सामाजिक चौकटीत व्यक्तीला स्वतःच्या कृतींबद्दलची नैतिक जबाबदारी मात्र घ्यावी लागते. तेव्हा या ‘स्व’संकल्पनेत पायाभूत असणाऱ्या अंतर्गत प्रक्रिया, व्यक्तीला जाणवणारे संकल्पस्वातंत्र्य आणि तिचे नैतिक उत्तरदायित्व यांची सुसंगती लावणे अत्यावश्यक ठरते. स्वनियंत्रण, अभिव्यक्ती, व्यक्तिविशेष, विवेकाधिष्ठित विचारप्रक्रिया वगैरे संकल्पस्वातंत्र्यात अंतर्भूत असे काही निवडक घटक खरोखरच मनुष्याला उपलब्ध असतात, पण संपूर्ण संकल्पस्वातंत्र्य मात्र नसते असे लेखक मानतो.
स्नेह, कार्य आणि क्रीडा यांत जीवनाचा अर्थ आहे असे आपल्या मांडणीच्या आधारे लेखक सिद्ध करू पाहतो. या दाव्याला दोन बाजू आहेत. या गोष्टी जीवनाला अर्थपूर्ण बनवतात यासाठीचे पुरावे सादर करणे ही एक बाजू आहे; तर ‘तसे असायला हवे. कारण यामागचा कार्यकारणभाव मेंदूच्या रचनेतच अंतर्भूत आहे’ असा लेखकाचा दावा ही त्याची दुसरी आणि महत्वाची बाजू आहे
स्नेह आणि क्रीडा यांच्याशी संबंधित ‘चांगले’ असे भावनिक मूल्यांकन सर्वसामान्य मेंदूत कसे होते, ते मेंदू-विज्ञानातल्या संशोधनातून कळलेल्या जीव-रासायनिक प्रक्रियांसह लेखक मांडतो. (संगीत किंवा वाचन अश्या आस्वादयोग्य गोष्टींचा समावेश लेखकाने क्रीडेमध्ये केलेला आहे.) कामात पुरेशी गुंतागुंत असेल आणि ती माणसाला रोचक वाटत असेल, तर कामातल्या यशायशामुळे मेंदूत ज्या भावना निर्माण होतात, त्यांचेही वर्णन इथे केले आहे. मेंदूला ज्यामुळे चालना मिळते, अशा कामाचे मूल्यांकन ‘चांगले’ असे होते; तर एकसुरी, कंटाळवाण्या कामाचे मूल्यांकन तसे होत नाही, असे लेखक म्हणतो.
स्नेह, कार्य आणि क्रीडा यांमुळे माणसाला समाधान का मिळते, त्यामागची कारणमीमांसा करताना काही मानसशास्त्रीय सिद्धान्तांचा आधार घेतला आहे. सक्षमता (competence), स्वायत्तता (autonomy) आणि संबद्धता (relatedness) या माणसाच्या मूलभूत प्रेरणा असतात; त्यामुळे त्या माणसाच्या मूलभूत गरजा असतात असा काही मानसशास्त्रज्ञांचा दावा इथे आधार म्हणून घेतलेला आहे. ज्यात आपला कस लागेल किंवा ज्यात आपण प्रावीण्य प्राप्त करू शकू अशा क्रिया करत राहण्यामुळे मनुष्य सक्षम होत असतो. आपण जे करतो ते आपण आपल्या निवडीने आणि आवडीने करतो असे वाटणे, हे स्वायत्ततेमध्ये अंतर्भूत आहे. इतरांशी आणि परिसराशी जवळीक साधणे आणि त्यातून सुरक्षिततेची भावना मिळवणे हे संबद्धतेमध्ये येते. या घटकांचा माणसाच्या समाधानाशी संबंध आहे, हे मानसशास्त्रीय संशोधनाअंती सिद्ध झाले आहे; पण हे घटक मानवी समाधानाला कारणीभूत आहेत, असे मात्र अजून तरी खात्रीशीरपणे सिद्ध करता आलेले नाही, हे लेखक मान्य करतो.
स्नेह, कार्य आणि क्रीडा यांचा वर उल्लेख केलेल्या तीन घटकांशी संबंध आहे हे वाचकाच्या सहज लक्षात येईल. कंटाळवाण्या, एकसुरी कामामुळे समाधान लाभत नाही; त्याउलट बौद्धिक किंवा शारीरिक क्षमतांचा कस लागेल अशा गोष्टी (मग त्या तुमच्या व्यवसायाचा भाग असोत किंवा तुमच्या छंदांचा भाग असोत) समाधान मिळवून देतात. म्हणजेच कार्य आणि क्रीडा या दोन्हींतून आपण सक्षम आहोत असे माणसाला जाणवते आणि त्यातून त्याला समाधान लाभते. मैत्री, अनुकंपा, प्रेम अशा गोष्टींतून मनुष्य आपल्या परिसराशी आणि परिसरातल्या सजीवांशी जवळीक साधतो. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींसाठी कष्ट करायला बरीचशी माणसे तयार असतात, कारण आपली जैविक रचनाच त्याला अनुकूल असते. त्यामुळे सक्षमता ही एक मूलभूत प्रेरणा आहे असे लेखक मांडतो. एखादी गोष्ट पालकांकडून आयती घेण्यापेक्षा ती स्वतः करून बघण्याची इच्छा मुलांमध्ये वयाच्या दुसऱ्या वर्षातच दिसू लागते. पालकांकडून ती करून घेतल्याने तात्काळ इच्छातृप्ती होईल; पण आपण करून पाहिली तर वेळ लागेल किंवा हवी तशी चांगली होणार नाही हे माहीत असूनही मूल एखादी गोष्ट आपली आपण करून पाहते. यामागे स्वायत्ततेसाठीची प्रेरणा असते असे लेखक म्हणतो.
नैतिकता आणि नीतिविषयक संकल्पनांचा मेंदूशी कसा संबंध आहे हेसुद्धा लेखक उलगडून दाखवतो. नैतिकता केवळ व्यक्तिनिष्ठ न राहता वस्तुनिष्ठ अशी काही नैतिकता मेंदूच्या रचनेत अंतर्भूत असते का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. आपण आणि आप्तस्वकीय सोडून इतरांविषयीच्या (म्हणजे निःस्वार्थी म्हणता येतील अशा) कणव, अनुकंपा वगैरे भावना निसर्गतः माणसांत असतात, असे काहीसे हे विवेचन आहे. ‘मिरर न्यूरॉन्स’ या संकल्पनेचा आधार इथे घेतलेला आहे. इतरांच्या भावभावनांचे प्रतिबिंब आपल्या मेंदूत उमटते. याद्वारे आपल्या मनात इतरांविषयी अनुकंपा निर्माण होते. साहित्य किंवा चित्रपटाचा आस्वाद घेताना त्यातल्या पात्रांच्या सुखदुःखाशी आपण समरस होतो, किंवा बातम्यांमध्ये दिसणाऱ्या दूरदेशीच्या माणसांच्या हालअपेष्टा पाहून आपण कळवळतो, यामागे हे ‘मिरर न्यूरॉन्स’ असतात. नीती-अनीतीच्या संकल्पनांची सैद्धान्तिक मांडणी करण्यासाठी मेंदूवैज्ञानिक गेल्या काही वर्षांपासून या प्रणालीचा आधार घेऊ लागले आहेत. त्यामुळे केवळ स्वार्थ हे माणसाच्या नीतिमत्तेचे कारण असत नाही. इतरांच्या वेदनांची आणि दुःखांची अनुभूती आपल्याला होते यामागे जैविक कारण आहे आणि त्यामुळे इतरांचे हित सामावून घेणारी अशी समावेशक नीतिमत्ता शक्य होते, असे हे विवेचन आहे.
पुस्तकात मांडलेल्या मुद्द्यांचा हा धावता आढावा झाला. पुस्तकाचे एकंदर मूल्यमापन कसे करता येईल ते आता पाहू.
तत्त्वज्ञांनी पूर्वी मांडलेले वेगवेगळे सिद्धान्त सांगण्यात पुस्तकाची पुष्कळ पाने खर्च होतात. विषयाच्या नीट मांडणीसाठी काही वेळा ते आवश्यकही असते. मेंदू-विज्ञान किंवा मानसशास्त्र यांमधल्या ताज्या संशोधनातून मानवी मनोव्यापाराविषयी जे ज्ञात झाले आहे, त्यामुळे वाचकांच्या स्वतःविषयीच्या आणि एकंदरीत जगाविषयीच्या आकलनात मोठी भर पडेल, असा लेखकाचा दावा आहे. त्याविषयीचे विवेचन मात्र मग त्या तुलनेत त्रोटक वाटते. पुस्तकातली वैज्ञानिक माहिती अगदी ताजीही नाही. या विषयात रस असलेल्या सामान्य वाचकाला ती दर्जेदार वृत्तपत्रांमध्ये किंवा मासिकांमध्ये वाचायला मिळालेली असेल. त्यामुळे लेखकाची मांडणी पुरेशी स्वतंत्र किंवा फारशी मूलगामी वाटत नाही; उपलब्ध ज्ञान एकत्रित करून सुसंगत मांडले आहे एवढेच म्हणता येते.
स्नेह, कार्य आणि क्रीडा यांद्वारे मानवाच्या महत्वाच्या गरजा पूर्ण होतात म्हणून जीवनाचा अर्थ त्यांत असतो असा लेखकाचा प्रमुख दावा आहे. त्यापढे जाऊन ते असेही म्हणतात, की स्नेह, कार्य आणि क्रीडा यांत जीवनाचा अर्थ असायला हवा अशीच मानवाची रचना आहे. हा दावा मग केवळ अंदाज वाटतो आणि त्यामुळे काहीसा पोकळ वाटतो. त्यात भर म्हणून लेखक ‘कसे जगावे’ पद्धतीचे उपदेश करतो; त्यामुळे हे पुस्तक ‘सेल्फ-हेल्प’ धर्तीचे वाटू लागते. या सर्वांमुळे लेखनाचे बौद्धिक वजन कमी होते. हा या लेखनातला एक मोठाच दोष म्हणता येईल.
लेखक म्हणतो तशी नीतिमत्तेची प्रेरणा आपल्यामध्ये असली तर विवेकवादी आणि उदारमतवादी विचारसरणीला त्यातून मोठेच बळ मिळेल. पण असे मानले तरीही काही प्रश्न अनुत्तरित राहतात. उदाहरणार्थ : जगात युद्धे, खून यांसारख्या अनेक गोष्टी घडत असतात. हिंसक किंवा इतरांच्या अहिताची कृत्ये करणाऱ्यांच्या मेंदूची रचना सामान्यांहून वेगळी असते म्हणून ते असे वागतात असे मानले, तर तो त्यांचा दोष समजावा का? अशा कृत्यांसाठी मग त्यांना जबाबदार धरावे का? पुरेसे संकल्पस्वातंत्र्य नसूनही व्यक्ती आपल्या निर्णयांना का जबाबदार असतात, त्याचे लेखकाने दिलेल्या स्पष्टीकरण काहीसे गुळमुळीत आहे. लेखकाच्या विवेचनावरून त्याचे हे निष्कर्ष अपरिहार्य वाटत नाहीत. ते पाहता आणि पुस्तकाच्या सुरुवातीचे लेखकाचे दावे पाहता हे सर्व अपुरे वाटते आणि परिणामकारक वाटत नाही. किंवा, ‘मिरर न्यूरॉन्स’ आणि अनुकंपा यांत परस्परसंबंध आहे हे मेंदू-विज्ञानाने सिद्ध केले आहे असे मानले तरीही अनेक प्रश्न उपस्थित होतात. उदा.: एखादा नृशंस क्ररकर्मा वंशसंहार करण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या मेंदत काय चालते. याविषयी किती तपशील उपलब्ध आहे? रस्त्याने जाताना मागे लागलेल्या एखाद्या कुत्र्याच्या पिलाच्या पेकाटात क्वचित कधीतरी लाथ हाणण्याइतपतच ज्यांचे क्रौर्य सीमित आहे, अशा व्यक्तीही (त्या क्रियेपुरता) अनुकंपेचा अभाव दाखवतात. नरसंहार करणारे क्रूरकर्मा मानसिक रुग्ण गणले जातील, पण अनुकंपेचा असा तात्पुरता आणि किरकोळ अभाव दाखवणाऱ्या व्यक्ती बहुधा मानसिक रुग्ण म्हणता येणार नाहीत. क्रूरकर्मा आणि अशा व्यक्ती यांच्या मेंदूतला अनुकंपेचा अभाव मग वेगळा असतो का? भावना, निर्णय आणि नीतिमत्ता यांविषयी लेखक जे दावे करतो त्यात अशा गुंतागुंतीच्या आणि वेगवेगळ्या पातळ्यांच्या मानवी व्यवहारांविषयी फार तपशील नाहीत. त्यांना या पुस्तकात जागा नाही असे कदाचित म्हणता येईलही; पण खुद्द लेखक अनेक ठिकाणी हे मान्य करतो, की अजून पुष्कळ संशोधन व्हायचे आहे आणि मेंदूतल्या पुष्कळशा महत्त्वाच्या प्रक्रिया नक्की कशा चालतात याविषयीचे तपशील हळूहळू उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आपले दावे सिद्ध करण्यासाठी लेखकाला मानसशास्त्र आणि समाजशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा आधार घ्यावा लागतो.
पुस्तकात व्यक्त झालेली अनेक मते ही सर्वसामान्य व्यवहारज्ञान बाळगणाऱ्या आणि विवेकवादावर भिस्त ठेवणाऱ्या कुणालाही सहज सुचतील, असे एकंदरीत जाणवत राहते. मेंदूची रचना आणि मानवी भावना किंवा निर्णयप्रक्रिया यांत परस्परसंबंध (corre lation) सिद्ध करणे त्यामानाने सोपे आहे; पण कार्यकारणभाव (causality) सिद्ध करण्यासाठी अधिक संशोधन व्हावे लागेल. त्यासाठी वेगळे प्रयोग घडवावे लागतील. एकंदरीत, पुस्तकातले अनेक दावे ह्या अटकळीच वाटत राहतात. ते सर्वच दावे चुकीचे नसतीलही; पण उपलब्ध ज्ञानातून सर्वाधिक सुसंगत निष्कर्ष काढले आहेत असे वाटण्याइतपत पुरेसे ज्ञान जर अजून झाले नसेल, तर मग थेगार्ड यांच्या पुस्तकाचे मूळ प्रयोजन साध्य होत नाही असा निष्कर्ष काढणे भाग पडते.