मेंदूनीतिशास्त्र (Neuroethics) ही अगदी अलिकडे, म्हणजे एकविसाव्या शतकात उदयाला आलेली नवीन ज्ञानशाखा. ही इतकी नवीन आहे की ‘मेंदूनीतिशास्त्र’ या शब्दाची सर्वमान्य अशी औपचारिक व्याख्यासुद्धा अजून तयार झालेली नाही. नीतीनियमांशी निगडित असलेले मेंदू-विज्ञानातले प्रश्न, मेंदूवरील संशोधनातून उद्भवणाऱ्या समस्यांची कायदेशीर अंगे आणि त्यांचा समाजावर होऊ शकणारा परिणाम या सर्वांचा विचार मेंदूनीतिशास्त्रात केला जातो. मेंदूच्या रोगांवर उपचार करताना आणि मेंदूसंबंधात संशोधन करत असताना काय पथ्ये पाळायची, कुठल्या थराला जायचे, भलेबुरे कसे ठरवायचे, काय उचित आणि काय अनुचित याचा निवाडा कसा करायचा, या सगळ्याचा उहापोह या शास्त्रशाखेत केला जातो.
पाचव्या शतकातल्या भर्तृहरीने नीतिशतक लिहून नीतिशास्त्राचा पाया रचला. एकविसावे शतक हे मेंदू-विज्ञानाचे शतक समजले जाते. मेंदू-विज्ञानाच्या सहाय्याने आज अनेक संशोधक या नीतिनियमांमागचा जैविक कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न करत आहेत. रूढ समजांना धक्का देणाऱ्या कितीतरी आश्चर्यकारक गोष्टी या प्रयोगांतून समोर येत आहेत. त्यातूनच ह्या शास्त्रशाखेची वेगाने प्रगतीही होत आहे.
खरे तर मेंदूनीतिशास्त्र हा जैविक नीतिशास्त्र (Bioethics) या विषयाचाच एक उपविभाग. चाळीसएक वर्षापूर्वी जेव्हा जैवतंत्रज्ञानाचा (Biotechnology) आणि जनुकीय अभियांत्रिकीचा (Genetic Engineering) जन्म झाला तेव्हा या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग माणसे कसा करून घेतील याबद्दल जग साशंक झाले होते. जीवसृष्टीला, आणि विशेष करून मनुष्यजातीला, त्यापासून कोणते धोके संभवतील कोण जाणे या भीतीने देशोदेशीचे शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, विचारवंत अस्वस्थ झाले होते. सर्वसामान्य माणसे भयचकित होऊन त्याच्याकडे बघत होती. जैवतंत्रज्ञानाचा आणि जनुकीय अभियांत्रिकीच्या संशोधनावर नियंत्रण कसे ठेवायचे, त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून कोणते कायदेकानून करायचे, प्रयोगशाळेतून काय काळजी घ्यायची, यावर बराच खल झाला होता. पाश्चात्त्य देशांत मोठमोठे परिसंवाद घेण्यात आले होते. वृत्तपत्रांतून आणि इतर माध्यमांतून चर्चांना ऊत आला होता. त्या विचारमंथनातून जैविक नीतिशास्त्र जन्माला आले.
आजच्या घटकेला मेंदू-विज्ञानाची स्थितीही काहीशी अशीच आहे. नुकतेच जन्माला आलेले हे बाळ भविष्यात काय घोळ घालेल याबद्दल जाणकारांच्या मनात शंका आहेत. गेल्या चाळीस वर्षात जीवतंत्रज्ञानातल्या संशोधनामधून मानवजातीच्या दृष्टीने उपकारक अशा कितीतरी गोष्टी घडल्या. फारसे विपरीत मात्र सुदैवाने काही घडले नाही. येत्या काही वर्षांत मेंदूविज्ञानातल्या नवनवीन शोधांमुळे काय घडेल ते नक्की सांगता येत नाही. पण जीवतंत्रज्ञानातल्या शोधांच्या तुलनेत त्याचा समाजावर होणारा परिणाम जास्त दूरगामी व जास्त गंभीर असेल हे उघड आहे. कारण ते संशोधन इतर कुठल्या अवयवाशी नाही तर थेट मेंदूशी संबंधित असणार आहे.
जैविक नीतिशास्त्र या शास्त्रशाखेच्या अंतर्गत या विषयाचा पुरेसा अभ्यास होऊ शकत असताना ‘मेंदूनीतिशास्त्र’ अशी स्वतंत्र ज्ञानशाखा निर्माण करायची गरजच काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो चुकीचा नाही. पण गेल्या दहाबारा वर्षांत मेंदू विज्ञानाची प्रगती इतक्या झपाट्याने झाली की या विषयाचा सर्वांगीण अभ्यास होण्याची गरज वाटू लागली. असाध्य रोगाने मृत्युशय्येवर तळमळत असलेल्या रुग्णाला मृत्यू देऊन त्याची यातनांतून सुटका करायचा अधिकार उपचार करणाऱ्या डॉक्टरना आहे की नाही, मानसिक रोगांनी आजारी असलेल्यावर जर एखादी धोकादायक शस्त्रक्रिया करायची असेल तर ती त्याच्या मनाविरुद्ध करावी की करू नये, एखाद्या प्रयोगात भाग घेणाऱ्या माणसांच्या शरीराचे वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने निरीक्षण करताना त्याच्यात काही विकृती आढळली तर त्याबद्दल त्याला (किंवा त्याच्या नातेवाईकांना) सांगायला हवे की सांगण्याची गरज नाही? जीवशास्त्रामध्ये किंवा वैद्यकीय शास्त्रामध्ये असे अनेक नैतिक प्रश्न उभे राहतात. परंतु याहीपेक्षा कितीतरी अडचणीचे प्रश्न उद्या मेंदू-विज्ञानाच्या संदर्भात उभे ठाकणार आहेत. तेही अगदी नजिकच्या काळात. एका अंदाजानुसार आज जे प्रश्न मेंदूनीतिशास्त्रात केवळ सैद्धान्तिक पातळीवर चर्चिले जातात त्यांची नैतिक आणि कायदेशीर उत्तरे प्रत्यक्ष जीवनात शोधायची पाळी आणखी सातआठ वर्षांतच येऊ शकेल.
मेंदूनीतिशास्त्राची एक व्याख्या अशी: मेंदूनीतिशास्त्र म्हणजे मेंदू-विज्ञानाचे नीतिशास्त्र आणि नीतिशास्त्रामागचे मेंदू-विज्ञान. त्यातल्या मेंदू-विज्ञानाचे नीतिशास्त्र’ या भागात वर उल्लेखलेल्या प्रश्नांची चर्चा होते. मेंदू-विज्ञानाच्या संदर्भात समोर उभे रहाणारे असे नैतिक पेच हे एका परीने जैविक नीतिशास्त्रात चर्चिल्या जाणाऱ्या प्रश्नांचेच बदललेले रूप असते. पण त्यातला मेंदू-विज्ञानाचे नीतिशास्त्र’ हा भाग अगदी नवीन आहे. मुलाच्या वाढीबरोबर त्याचा मेंदू विकसित होताना त्यात नीतिशास्त्र कसे उपजते या प्रश्नाचा शोध त्यात घेतला जातो. सामाजिक नीतीनियमांचे आकलन मुलाला केव्हा होते, बरेवाईट कधी समजायला लागते, त्याचा अभ्यास या ‘नीतिशास्त्रामागचे मेंदू-विज्ञान’ भागात केला जातो.
पाच वर्षांपूर्वी एका बातमीने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली होती. परसिस्टंट वेजिटेटिव्ह स्टेटमध्ये (पीव्हीएस) असलेल्या, म्हणजे एक प्रकारच्या बेशुद्धावस्थेत असलेल्या, एका मुलीला आपले बोलणे ऐकू येते असा दावा अॅड्रियन ओवेन (Adrian Owen) या मेंदूतज्ज्ञाने तेव्हा केला होता. काही उपकरणांच्या सहाय्याने त्याने तिच्या मेंदूतल्या घडामोडींचा वेध घेतला आणि आपल्या बोलण्याला ती प्रतिसाद देते असे त्याला आढळून आले. 2009 मध्ये त्याने या प्रयोगाची पुढची पायरी गाठली. अशा रुग्णाकडून काही सोप्या सोप्या प्रश्नांना (उदाः तुझे नाव अमुकतमुक आहे का?) ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी उत्तरे मिळवण्यात ओवेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. उत्तर होकारार्थी असेल तर मेंदूतला एक विशिष्ट भाग उजळतो आणि नकारार्थी असेल तर वेगळा, असे त्याने दाखवून दिले.
परसिस्टंट वेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे एका परीने बेशुद्धावस्थाच. पण आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार कोमापेक्षा थोडी वेगळी. कोमातली व्यक्ती बहुधा काही दिवसांनी शुद्धीवर येते पण पीव्हीएसमध्ये मात्र माणसे महिनोन्महिने – कधीकधी तर अनेक वर्ष – राहू शकतात. असे रुग्ण दुर्दैवाने वर्षानुवर्ष निव्वळ भाजीपाल्याच्या पातळीवरचे जिणे जगत असतात (रुग्णाच्या नातेवाइकांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आजकाल व्हेजिटेटिव्ह स्टेट’ असा शब्द न वापरता त्याला ‘अनरिस्पॉन्सिव्ह बेकफुलनेस सिन्ड्रोम’ असे म्हणण्यात येते). पीव्हीएसमधून बाहेर येऊन सर्वसाधारण आयुष्य जगण्याचा संभव फार कमी. या अवस्थेतला माणूस एका परीने जागा असतो, पण त्याला त्याच्या अस्तित्वाचे भान नसते. निदान काही वर्षापूर्वी यावर सर्वांचे एकमत होते. पण अॅड्रियन ओवेनने केलेल्या प्रयोगामुळे हे सगळे बदलून गेले.
पीव्हीएसमध्ये असलेला रुग्ण ‘हो-नाही’ असे सांगू शकतो, या ओवेन यांच्या दाव्यामुळे विज्ञानजगतात वादळ माजले यात नवल नाही. त्यांच्या टीकाकारांच्या मते मेंदूतले ते भाग उजळून निघणे हा प्रतिक्षिप्त क्रियेचाच भाग होता. काही विशिष्ट शब्द ऐकल्यावर मेंदूने आपोआप दिलेला तो प्रतिसाद होता. तेवढ्यावरून तो रुग्ण भानावर आहे, जाणीवपूर्वक तसे करत आहे, असे मानणे योग्य होणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. पण ओवेनच्या प्रयोगात त्या रुग्णांनी दिलेल्या उत्तरांपैकी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त उत्तरे बरोबर आहेत, असे दिसून आल्यामुळे टीकाकारांची तोंडे बंद झाली.
रुग्णाच्या मेंदूत मिणमिणत्या स्वरूपात का होईना, पण जाणीव शिल्लक आहे आणि तो जाणीवपूर्वक उत्तरे देत आहे असे मानले तर आपण आणखीनच अडचणीत येतो. अशा रुग्णांना त्यांच्या स्थितीबद्दल काही प्रश्न विचारावेत का? ‘तुला बरे वाटते आहे का?’, ‘तुला वेदना होत आहेत का?’ अशासारखे. त्याच्याही पुढे जाऊन ‘तुला या स्थितीत जगत रहावेसे वाटते का?’ असा प्रश्न त्या रुग्णांना विचारता येईल का? मरण म्हणजे काय, ‘असे’ जगत राहणे म्हणजे काय, हे त्यांना समजत असेल का? समजा एखाद्याने नकारार्थी उत्तर दिले तर त्याला खरोखरच जगावेसे वाटत नाही असे म्हणता येईल का? ते खरे समजून त्याला दयामरण देणे उचित होईल का? त्याच्या फुफ्फुसाला जोडलेले कृत्रिम श्वासोश्वासाचे यंत्र काढून टाकणे योग्य होईल का? असे अनेक नैतिक प्रश्न त्यातून उभे रहातात.
ओवेन यांनी अशा चौपन्न रुग्णांवर प्रयोग केले. चोप्पन्नांपैकी एकाच रुग्णाने अशा प्रकारे प्रतिसाद दिला. बाकी त्रेपन्न रुग्णांचे काय? त्यांचा मेंदू मृत झाला आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येईल का? अशा रुग्णावरचे उपचार थांबवावेत का? समजा, त्यांच्या मेंदूत जाणीव शिल्लक आहे पण त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्यामुळे ते बहिरे झाले असले, तर? किंवा त्यांच्या मेंदूतले इतर भाग शाबूत असले तरी भाषेचे केन्द्र काम करत नसले तर? तरीही त्यांचा प्रतिसाद शून्यच असणार. प्रतिसाद नाही म्हणून त्यांच्यावरचे उपचार थांबवण्याचा निर्णय नैतिक ठरेल का? आणि दयामरणाबद्दल बोलायचे तर रुग्णाला किती वेदना होत आहेत त्यावरूनच जर आपण निर्णय घेणार असलो तर जास्त शुद्धीवर असलेल्या रुग्णाला जास्त वेदना होत असतात. म्हणजे मग कमी शुद्धीवर असलेल्या रुग्णापेक्षा जास्त शुद्धीवर असलेल्या रुग्णाला दयामरण द्यायला हवे! शिवाय अशा प्रसंगात रुग्ण या स्थितीतून बरा होऊन निरोगी आयुष्य जगण्याची किती शक्यता आहे त्याचाही विचार करायला हवा. कदाचित शुद्धीवर येऊन वेदनामय आयुष्य जगण्यापेक्षा असे अर्धवट बेशुद्धीत पडून राहणे रुग्णाला जास्त सुखकर वाटू शकेल.
राल्फ जॉक्स आणि काट्जा कुल्मेयर या दोन मेंदूतज्ज्ञांनी ‘री-कन्सिडरिंग डिसऑर्डर्स ऑफ कॉन्शसनेस इन द लाइट ऑफ न्यूरोसायन्टिफिक एव्हिडन्स’ या नावाने एक लेख लिहिला आहे. त्या लेखात यांनी रुग्णाला कृत्रिमरीत्या जिवंत ठेवण्याची वैद्यकीय उपकरणे काढून घेताना उद्भवणाऱ्या नैतिक प्रश्नांचा उहापोह केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ पीव्हीएसबद्दलच नव्हे तर इतर अनेक प्रकारच्या बेशुद्धावस्थेत असलेल्या रुग्णांबद्दल असा विचार करायला हवा (उदाहरणार्थ मेंदूच्या एक प्रकारच्या विकृतीमध्ये रुग्णाला पापणीसुद्धा हलवता येत नाही पण त्याच्या सर्व संवेदना जागृत असतात. त्यांचे काय?). मेंदूनीतिशास्त्र अशा प्रश्नांना हात घालते.
बेशुद्धावस्थेतल्या रुग्णांच्या संदर्भात जसे वर दिल्यासारखे वेगवेगळे नैतिक प्रश्न निर्माण होतात तसे प्रश्न अनेक परिस्थितीत, अनेक क्षेत्रांत आज निर्माण होत आहेत. मेंदूत घडणाऱ्या घडामोडींचा थांगपत्ता लावण्यासाठी जी नवनवीन उपकरणे शोधून काढली जात आहेत त्यामुळे माणसांचा खाजगीपणावर आक्रमण होऊ घातले आहे. उद्याच्या काळात एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती, तिचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, इतकेच नव्हे तर तिच्या मनातले विचारही अशा उपकरणांच्या सहाय्याने जाणून घेता येतील. हे तर काहीच नाही. माणसाच्या अबोध मनातले विचार, ज्यांची त्याला स्वतःलाही जाणीव नाही असे विचारसुद्धा या उपकरणांमुळे दुसऱ्याला कळू शकतील. याचा एक फायदा निश्चित होईल. गुन्हेगारांविरुद्ध पुरावा मिळवण्यासाठी आणि संभाव्य दहशतवाद्यांना पकडण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. पण त्याचा दुरुपयोग होण्याचीही पुष्कळ शक्यता आहे. डीएनए चाचण्यांतून मिळणाऱ्या माहितीपेक्षा ही माहिती खूपच जास्त स्फोटक ठरू शकते. ती अनधिकृतपणे दुसऱ्या कुणाच्या हाती लागली तर त्याचा उपयोग कुणी समाजकंटक ब्लॅकमेलिंगसाठी करू शकेल. डीएनए चाचणीच्या अहवालावरचे नाव पुसून टाकले तर तो अहवाल कुणाचा आहे ते शोधणे जवळपास अशक्य असते. पण या उपकरणाच्या सहाय्याने मिळवलेल्या मेंदूच्या प्रतिमांबरोबरच चेहऱ्याचीही भरपूर वैशिष्ट्ये त्यात येत असल्याने ती प्रतिमा कुणाची आहे ते शोधून काढणे सहज शक्य असते.
मेंदूवरील संशोधनातून जी नवनवीन औषधे निघत आहेत त्याचा उपयोग मानसिक रुग्णांवर उपचार करण्याकरिता केला जातो. काही प्रकारच्या औषधे त्याचे चित्त विचलित होऊ नये म्हणून दिली जातात. ही औषधे निरोगी माणसाने घेतली तर त्याची स्मरणशक्तीही वाढू शकते किंवा त्याचे मन एकाग्र होण्यासही मदत होते. अशी औषधे घेऊन एखाद्याने परीक्षेत जास्त गुण मिळवले तर ते योग्य ठरेल का? खेळांच्या स्पर्धेत उत्तेजकांवर जशी बंदी असते तशी बंदी या औषधांवर घालावी काय? जरी अशी बंदी घातली तरी काहीजण त्याचा चोरून वापर करणे अशक्य नाही. गर्भलिंग परीक्षेवर आज बंदी असूनही परीक्षा केली जाते तसा प्रकार या बाबतीतही होऊ शकेल. नव्हे तो होऊ लागलेलाच आहे! त्याचे दुष्परिणामही हळूहळू समोर येत आहेत.
मार्था फाराह (Martha J. Farah) या पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटीमधल्या सेंटर फॉर कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्समधील मेंदूतज्ज्ञ, मेंदू-विज्ञानातील प्रगतीमुळे भविष्यात कोणते सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उद्भवू शकतील यावर त्यांचा अभ्यास आहे. त्यांच्या मते मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी अशी औषधे घेतल्यामुळे तीन प्रकारचे परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे औषधांच्या साइडइफेक्ट्समुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम. या औषधाची सवय लागते. ते बंद केल्यावर स्मरणशक्ती पहिल्यापेक्षाही खालावते. दुसरे म्हणजे समाजावर होणारे विपरीत परिणाम. आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून रहाण्यासाठी प्रत्येकालाच अशी औषधे घ्यावीशी वाटतील. ज्यांना ती परवडतील ते पुढे जातील. त्यातून एका नव्या विषमतेचा जन्म होईल. तिसरा परिणाम मानवी नीतिमूल्यांशी संबंधित आहे. अशी औषधे घेऊन जर एखाद्याने पहिला क्र मांक पटकावला तर त्याला अनैतिक म्हणता येईल का?
मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत करणाऱ्या रिटालिन (मिथाईल फिनिडेट) नावाच्या औषधाचा खप गेल्या दहा वर्षांत अमेरिकेत आणि इतर पाश्चात्त्य देशात तिप्पटीने वाढला आहे. अमेरिकेत तीस टक्के मुले अशा प्रकारची औषधे घेतात असे एका पाहणीत आढळून आले. तीस टक्के हा आकडा सर्वत्रिक नसला तरी त्यातून या प्रश्नाची व्याप्ती दिसून येते. मुळात हे औषध मेंदूच्या काही विकारांवर (मुख्यतः अँटेन्शन डिफिसिट हायपरॲक्टीव्हिटी डिसऑर्डर) दिले जाते. पण आपल्या मुलाच्या मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत करण्यासाठी निरोगी मुलांचे पालकही मुलांना ते देतात हे उघड गुपित आहे. कारण काही वर्षांपूर्वी अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात या औषधांमुळे मुलांची अध्ययनक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते, ती भरभर शिकतात, त्यांची स्मरणशक्ती वाढते, असे दिसून आले. (मी वाचलेल्या एका लेखात तर या औषधाला मेंदूचे व्हायग्रा’ असेच म्हटले आहे! म्हणजे काय ते बघा). रिटालिन आपल्या देशात आयात केले जात नाही. कारण त्याला अतिशय जवळच्या अशा अॅम्फिटामाइन (Amphetamine) या कोकेनसदृश औषधावर भारतात बंदी आहे. पण रिटालिनला पर्यायी असे ‘अॅडवाइझ’ (Adwize) नावाचे औषध एका फार्मा या कंपनीने बाजारात आणले आहे. (‘अॅडवाइझ’ मधील ‘अॅडव्हाइस’ म्हणजे ‘सल्ला’ आणि ‘वाइझ’ म्हणजे हुशार, शहाणा याकडे संकेत करणारे नाव औषधाला देण्यामागची क्लृप्ती लक्षात घ्या). ॲडवाइझ डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय मिळत नाही. पण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय रिटालिन विकणाऱ्या अनेक कंपन्या आपल्या देशात आहेत आणि ‘आम्ही ते प्रिस्क्रिप्शनशिवाय विकतो’ असे बिनदिक्कत सांगणाऱ्या भारतीय उत्पादकांच्या जाहिराती इंटरनेटवर सर्रास पहायला मिळतात.
मेंदूवरच्या संशोधनातून मिळालेल्या माहितीचा उपयोग उत्पादक आपल्या फायद्यासाठी करून घेऊ शकतील. लोकांना कुठल्या प्रकारची उत्पादने भुरळ घालतात हे समजून घ्यायला सौदर्यसाधनांचे उत्पादक, साबणाचे निर्माते, वाटेल तितका खर्च करायला तयार असतात. मेंदू-विज्ञानाचा वापर लोकांचा कल जाणून घेण्यासाठी करून ते आपल्या उत्पादनात बदल करू शकतील. लोकांना मोहवणारे सुगंध, रंग वापरू शकतील. मार्केट रिसर्चवर लाखो रुपये खर्चुन जे साध्य होणार नाही ते यातून सहज शक्य होईल. शिवाय माणसांना स्वतःलाच जे नीटसे कळलेले नसते तेही अशा संशोधनातून बाहेर येऊ शकेल. भविष्यात मेंदू-विज्ञानाचा असा उपयोग होईल असे विज्ञानकथाकारांनाही कधी सुचले नव्हते!
माणसाच्या भावभावनांवर परिणाम करू शकतील अशा काही रसायनांचा शोध मेंदूवरच्या अभ्यासातून लागला आहे. उदाहरणार्थ माणसाच्या मनात जेव्हा प्रेमभावना जागी होते तेव्हा ऑक्सिटोसिन व व्हॅसोप्रेसिन अशी दोन रसायने मेंदूत मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. ही रसायने कृत्रिमपणे एखाद्याच्या मेंदूत घातली तर ती व्यक्ती प्रेमात पडेल, असा अंदाज, प्राण्यांवर केलेल्या प्रयोगावरून करता येतो. भविष्यात या रसायनांचा दुरुपयोग होण्याची दाट शक्यता आहे. ऑक्सिटोसिनचा उपयोग एखाद्या मुलीला प्रेमात पाडण्याकरता उद्या कुणी केला तर? ते अशक्य नाही. तो प्रकार बलात्कारापेक्षाही अनैतिक असेल. ऑक्सिटोसिन असलेली काही अत्तरे (पफ्यूम्स) पाश्चात्त्य देशातल्या बाजारपेठेत आलेलीही आहेत.
मेंदू-विज्ञानातील प्रगतीमुळे अशा प्रकारचा धोका संभवतो हे खरच आहे. पण काही बऱ्या गोष्टीही होऊ शकतील. ज्या जोडप्यांतले प्रेम आटायला लागले असेल त्यांना अशा रसायनांचा वापर करून प्रेमाचा ‘बूस्टर डोस’ घेता येईल! लग्नाआधी मेंदूची तपासणी करून तो आपल्या बायकोशी किंवा ती आपल्या नवऱ्याशी किती एकनिष्ठ राहील त्याचा अंदाज बांधणेही भविष्यकाळात शक्य होईल. प्रेम रोगा’वरची लससुद्धा कुणीतरी शोधून काढू शकेल. गद्धेपंचविशीतल्या वेड्या प्रेमावर हा जालीम उपाय ठरेल यात शंका नाही. उद्याच्या जगात कोणते नैतिक प्रश्न निर्माण होतील ह्याचे हे ओझरते दर्शन आहे.
आणखी वीसपंचवीस वर्षांनी अत्यंत सूक्ष्म अशी यांत्रिक उपकरणे, ज्यांना नॅनो मशीन्स म्हणतात ती, बनवायला सुरुवात होईल. ती माणसाच्या शरीरात घातली तर मेंदूत शिरून ती तिथल्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतील (हा प्रकार जॉर्ज ऑर्वेलच्या 1984 या प्रसिद्ध विज्ञानकादंबरीचाच पढचा भाग वाटायची शक्यता आहे!). मेंदवर अशा प्रकारे नियंत्रण ठेवता आले तर काय घडू शकेल या कल्पनेने छातीत धडकी भरते. आणखीही काही घडणे अशक्य नाही. ज्या भावना आपल्या मुलात यायला आपल्याला नको आहेत (उदाः लाजाळूपणा, संकोच) त्यांना पूर्णविराम देता येईल. तो मुलगा पोटात असताना मुलाच्या आईला काही औषधे देऊन, त्याच्याकडे ही भावना असावी का नसावी आणि असल्यास किती प्रमाणात असावी ते आपल्याला आधीच ठरवता येईल. उद्याचे जग कसे असेल, किती कोरडे असू शकेल, किती अप्पलपोटे असेल, याची ही केवळ झलक आहे. आता प्रश्न असा पडतो की माणूसपणाचे लक्षण असणाऱ्या लाज, संकोच ह्या सारख्या हळव्या भावना माणसात हव्यात की नकोत? औषधांच्या किंवा उपकरणांच्या सहाय्याने त्या काढून टाकण्याचा मार्ग स्वीकारावा की नाही?
मेंदूनीतिशास्त्रात अशा अनेक प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होत आहे.
आज सर्वसामान्य माणसाला मेंदू-विज्ञानाबद्दल फारशी माहिती माही. या विषयात होत असलेल्या नवीन संशोधनाबाबत तर तो बऱ्याच अंशी अनभिज्ञ आहे. त्यामुळे मेंदूनीतिशास्त्र या विषयावर अधिकाधिक लिखाण होणे, त्याचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर येणे, या संशोधनातून मानवजातील काय धोके संभवतात, काय काळजी घ्यायला हवी त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मेंदूविज्ञानातल्या शोधांचा समाजजीवनावर फार मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे या शास्त्रशाखेला भविष्यकाळात अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे यात शंका नाही.
अधिक वाचनासाठी:
*The Ethical Brain, Michael Gazzaniga (Dana Press), 2005 Neuroethics : Challenges for the 21st Century, Neil Levy (Kembridge University Press), 2007
*Neuroethics : The Practical and the Philosophical Farah Martha J., Trends in Cognitive Sciences, January 2005, Vol.9