मेंदू-विज्ञान ह्या विषयावरचा सुदीर्घ विशेषांक आजचा सुधारक च्या वाचकांच्या हातात देताना विशेष आनंद होत आहे.
मेंदू-विज्ञान हे शरीरशास्त्र व मानसशास्त्र (वर्तनशास्त्र ह्या अर्थाने) दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे शास्त्र आहे. अलिकडच्या काळात ह्या शास्त्राने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. अनेक ज्ञानशाखांमध्ये क्रांती घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली आहे. तत्त्वज्ञान ही तर सर्व शाखांची जननी मानली जाते. मेंदूविज्ञानाच्या प्रगतीने तत्त्वज्ञानावर कसा प्रभाव पाडला आहे हा आज जगभरच्या शास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा विषय आहे. तसा तो आसु च्या संपादक मंडळालाही वाटला. म्हणून या विषयावर अंक काढायचे आम्ही ठरवले होते.
आमच्या मूळ कुतूहलाचा विषय हा की मनुष्याचे (व इतर प्राण्यांचे) वर्तन कशाने निर्धारित होत असते. त्याची चेतासंस्था, मेंदूत सवणारी संप्रेरके, त्याची सामाजिक चौकट ह्या सर्वांचा कसकसा व किती परिणाम त्याच्या वर्तनावर होतो. ह्याशिवाय त्याचे स्वत्व म्हणून काही शिल्लक असते की नाही. माणसाची इच्छा ही त्याचे स्वत्व जाहीर करणारी आदिम गोष्ट आहे. कारण माणसामाणसांमधील भिन्नता ही त्यांना होणाऱ्या इच्छांमधील भिन्नताच असावी असे भासते. मग माणसाला अशी इच्छा धारण करण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही? असल्यास कोणत्या बाबतीत व किती? ह्या अंगाने मूळ विषयाचा वेध घेण्यात आला आहे.
मेंदू-विज्ञान ह्या विषयावर मराठीत अद्याप काहीच लिहिले गेले नसल्यामुळे असा अंक काढणे हे आह्वानच होते. परिभाषा घडविण्यापासून सुरुवात करायची होती. परंतु विज्ञानलेखक सुबोध जावडेकर आणि आनंद जोशी हे आमच्या मदतीला आले. मोजक्या वेळात त्यांनी सुंदर अंक घडवला. त्या विषयाबद्दल वाटणारा जिव्हाळा व आमच्याविषयीचे प्रेम ह्यांमुळेच हे साध्य झाले आहे. आसु परिवाराचे एक प्रिय सुहृद ह्यांनी आम्हाला नुकतीच देणगी दिली आहे, जीमुळे एवढा मोठा विशेषांक काढणे सुकर झाले. त्यांनी नाव जाहीर न करण्याची व आभार न मानण्याची अट घातली असली तरी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते.
ह्या विषयावर आजतागायत अधिकाधिक लेखन इंग्रजीतून झाले आहे. त्यामुळे विषयाचा परिचय, आवाका व वाटचाल स्पष्ट करण्यासाठी बहुतांश लेखन अनुवादस्वरूप आहे. मात्र हे वाचून वाचकांच्या मनात ह्या विषयाला चालना मिळेल आणि नंतर त्यावर मराठीतून विचारमंथन घडेल अशी आशा आहे.
– कार्यकारी संपादक