[डेव्हिड ब्रूक्सच्या सीकिंग मॉरल रिअॅलिस्ट्स (इंडियन एक्सप्रेस (14 एप्रिल 2012)/द न्यूयॉर्क टाइम्स ) या लेखाचा हा मथितार्थ.]
आजकाल बरेचदा चांगली सामाजिक कामे करत असलेले तरुण भेटतात जगातल्या गरीब देशांमधल्या प्रवासांतून त्यांना केवळ स्वतःत न गुंतता काही सामाजिक उद्योग करायचे सुचलेले असते. त्यांच्यात एरवी भेटणारा तुच्छतावाद नसतो, तर या युगाला नैतिक विचार देण्याची इच्छा असते. हे पाहून आपणही ताजेतवाने होतो. पण त्यांच्या या सेवाव्रतांत, सेवाधर्मांत काही त्रुटीही असतात.
एक म्हणजे त्यांना वाटत असते, की राजकारण टाळता येईल. त्यांना पायाभूत कामांमधूनच समाजात बदल होतात, राजकीय प्रक्रियेतून नाही, असे वाटते. हा भ्रम आहे. जर एखाद्या समाजात कायद्याचे राज्य नसले, राज्यकर्ते प्रजेला भक्ष्य मानत असले, तर कितीही गैरसरकारी सेवाभावी संस्था उभारल्या तरी बदल होणार नाही. कामे करणाऱ्यांमध्ये मतभेद असणारच. ते सोडवायची यंत्रणा नसली तर संघर्ष, त्यांतून उपजणारा द्वेष, याने सारेच व्यवहार दूषित होतील. तेव्हा मतभेदांमधून मार्ग काढायला तरी निरोगी राजकीय प्रक्रिया, यंत्रणा, ह्या लागणारच.
देशांत म्हणा की कुटुंबांत, क्लेश आणि गरिबीचे मूळ अव्यवस्थेत असते. ती हटवून सुव्यवस्था रचायला बरीच मेहेनत लागते. सवयी रुजाव्या लागतात, लोकांमागे कटकट (प्रबोधन!) करावी लागते, नीतिनियम, थोडीशी जोरजबरी, अशा साऱ्यांतूनच अव्यवस्थेची सुव्यवस्था होते. बरेच सामाजिक उपक्रमकर्ते याकडे लक्ष देत नाहीत. वेगवेगळ्या पेशांसाठी आचारसंहिता रचणे, त्या न पाळल्या गेल्या तर ‘दंडविधाने’ नेमून देणे, या साऱ्यांऐवजी कार्यकर्ते बचतगट आणि शाश्वत शेतीवरच थांबतात; कारण ते सोपे असते.
मी जरा आगाऊपणे असे सुचवेन, की सामाजिक कार्यकर्त्यांनी डॅशिएल हॅमेट आणि रेमंड चँड्लरच्या डिटेक्टिव्ह कथा वाचाव्या. त्या कथांचे नायक थेटपणे षड्रिपूंना आणि भ्रष्टाचाराला सामोरे जातात. त्यांना माणसे काळी गोरी न दिसता बहुरंगी, राखाडी दिसतात, आणि हे स्वतःबाबत तर जास्तच स्पष्ट असते. त्यांचा कठोरपणा, रासवटपणा, आपल्या गाभ्यातील ‘स्व’ला जपणाऱ्या चिलखतासारखा असतो. ते नायक असंवेदनशील, अबोल, तुसडे वाटतात, कारण त्यांचा आत्मसन्मानाचा भाग व भ्रमनिरासातून येतो. ते जणू म्हणत असतात, “हो, हे जग कधीकधी चुकीच्या गोष्टींचा पुरस्कार करते, पण आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत गवनिच जगायला हवे. त्यांचे मुखवटे तुच्छतावादी असतात, पण त्यांच्या आडून सुव्यवस्थेची जाण, अव्यवस्थेला शिक्षा, असे सारे डोकावत असते. आपल्या कामाने आपण कधीकधी मलिन होऊही, पण ते करत राहावेच लागते.
या नैतिक वास्तववादाने प्रेरित एका पिढीने गुन्हेगारी, फॅसिझम, कम्युनिझम वगैरेंशी मुकाबला केला. आजच्या सेवाव्रतींना पूरक असा हा आवश्यक भाव आहे.