औद्योगिक क्रान्तीमुळे पडलेला फरक —
अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रान्ती झाली. तिची बीजे मात्र त्यापूर्वी अंदाजे 500 वर्षे आधी पडली. गतानुगतिक विचारांतून इंग्लंडचे लोक बाहेर पडू लागले. ह्याचा पहिला पुरावा मॅग्ना कार्टा च्या स्वरूपात दिसतो. इंग्लंडच्या सरदारांनी मिळून राजाचे अधिकार सीमित केले, ह्याचा तो दस्तावेज आहे. आणखी काही वर्षांनी इंग्लंडने पोपचे वर्चस्व झुगारून दिले. ह्या दोन्ही घटना आपल्या इतिहासात महत्त्वाच्या मानल्या जातात. चाकोरीबाहेरचा विचार करण्याचे आणि तो अंमलात आणण्याचे सामर्थ्य एका समाजाने समूहशः दाखविले. बहुतेक सारा यूरोपच सरंजामशाहीतून मुक्त होण्याची धडपड करू लागला.
यंत्रांचा उपयोग जास्तीत जास्त करणे म्हणजे औद्योगिक क्रान्ती आणणे नव्हे. नवनवीन यंत्रांच्या कल्पना करणे, ती घडविण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे, ती घडल्यानंतर त्यांच्यांत सतत सुधारणा करून ती अधिकाधिक यूजर फ्रेंडली’ (कार्यतत्पर) करणे हे औद्योगिक क्रान्तीचे लक्षण आहे. सामुदायिक प्रयत्न केल्याशिवाय मोठमोठी जहाजे, आगगाड्या, विमाने घडत नसतात. अश्या कोणत्याच वस्तू भारतात पहिल्याने घडल्या नाहीत. ह्या वस्तू जेव्हा युरोपात घडल्या तेव्हा त्या कश्या घडवाव्या, हे सांगणारी पुस्तके त्यांच्याजवळ नव्हती. नव्या नव्या कल्पना करून त्या तर्कशुद्ध पद्धतीने अंमलात आणल्याशिवाय, पूर्वीच्या संशोधकांनी प्राप्त केलेले अनुभव जाणून घेतल्याशिवाय नवी यंत्रे अस्तित्वात येत नाहीत. एकूणच विचारपद्धतीला नवे वळण लागल्याशिवाय औद्योगिक क्रान्ती घडू शकत नाही. औद्योगिक क्रान्तीचे परिणाम माणसाच्या सुखसोयी वाढण्यात झाले असले. तरी तिने काही नुकसानही केले. पाहिल्याने सुखसोयींचा विचार करू.
एकदा यंत्रांचा वापर सुरू झाल्यानंतर त्यांचे संशोधक चूप बसले नाहीत. त्यांनी यंत्रे बनविणारी यंत्रे बनविण्यास सुरुवात केली. ऑटोमेशन सुरू झाले. ह्याचा अर्थ असा की प्राण्यांच्या स्नायूंपासून मिळणारी ऊर्जा वापरणे बंद झाले. परिणाम असा झाला की माणसाच्या कमीत कमी श्रमांत भराभर उत्पादन वाढू लागले. हे वाढते उत्पादन माणसाच्या तेवढ्याच श्रमांत उपलब्ध होऊ लागले. ह्याचा अर्थ असा की पूर्वी वारा घेण्यासाठी हाताने पंखा हलवावा लागत होता. जुन्या कचेऱ्यातून जे मोठमोठे पंखे लटकवलेले होते आणि ते चालविण्यासाठी एक माणूस नेमावा लागत होता ते बंद झाले. घरोघर विजेचे पंखे आले. बागांमध्ये झाडांना पाणी पुरवण्यासाठी मोटा आणि रहाट-गाडगी, ओकती वापरत असत तीही नष्ट झाली. पाण्याचा उपसा यांत्रिक पद्धतीने होऊ लागला. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी वाफ, ज्वलनशील तेले किंवा वीज वापरात आली. विजेचा वापर सुरू झाल्यापासून प्रचंड फरक पडला आणि माणसाची बैठी कामे भराभर वाढू लागली.
ज्यावेळी श्रमविभाजन पुरेसे माहीत नव्हते, त्यावेळी बलुतेदारीचा उदय झाला. बलुतेदारी हा श्रमविभाजनाचा पहिला टप्पा मानता येईल. खेड्यातल्या काही जणांनी अनोत्पादन करायचे, त्या अन्नाचे वाटप सर्वांमध्ये करायचे व बाकीच्यांनी आपापली कामे करून खेड्याला समृद्ध करायचे. सुतार आपले काम करीत असताना, विणकर कापड विणत असे, शेतकरी शेतात नांगरणी करीत असताना, सुतार आणि गवंडी त्याचे घर बांधून देत असत. माणसाला लागणाऱ्या सर्व गरजा पुरविण्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वतःच बनविण्याची त्याची गरज संपली. एक माणूस शाळेत शिकवत असताना इतर लोक त्याच्यासाठी घर बांधतात. त्याच्यासाठी वाहन तयार होत असते. करमणुकीची साधने रेडिओ, टीव्ही इ.) तयार होत असतात आणि त्याला त्याने केलेल्या श्रमाच्या मोबदल्यातच हे सारे मिळत असते. म्हणजे त्याला ह्या साऱ्या वस्तू फुकट मिळू लागतात. ज्या वस्तूंसाठी कोणालाही कोठलेही जास्तीचे श्रम करावे लागत नाहीत ती वस्तू फुकट मिळते असे माझे मत बनले आहे.
कारखान्यातून बाहेर आलेल्या वस्तूंची साठेबाजी करता येत नाही. त्या ग्राहकापर्यंत पोहोचवाव्याच लागतात. आपण मोटारीच्या कारखान्याचे उदाहरण घेऊ. रोज अमुक इतके उत्पादन झाले पाहिजे अशी त्याची रचना असते आणि तसे ते झाले नाही तर कारखाना डबघाईस येतो. महिन्याला 50 हजार किंवा वर्षाला 5 लाख मोटारी अशी काही संख्या मनात ठेवून, त्या सगळ्या कारखान्याची रचना केलेली असते. आणि ते झालेले उत्पादन साठवून ठेवणे त्यांच्यासाठी अशक्य असते. ग्राहकाला ह्या अश्या वस्तू घेणे परवडावे ह्यासाठी त्या हप्तेबंदी(इन्स्टॉलमेंट)ने देतात आणि त्याचवेळी सरकार जास्त नोटा उपलब्ध करून देते किंवा त्या वस्तू कर्जाऊ घेता येतील अशी सोय सरकारी बँका लोन मेळ्याच्या रूपाने करून देतात.
सध्या आपले सरकार निरनिराळ्या निमित्ताने झपाट्याने चलनवृद्धी करीत आहे. कधी महागाई भत्ता म्हणून तर कधी वेतन-आयोग नेमून शासन कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवून दिले जाते. हे वाढीव वेतन देण्यासाठी सरकारला चलनवाढ करावीच लागते. हे एक दुष्टचक्र आहे. चलनवाढीमुळे, म्हणजे बाजारात जास्त पैसा उपलब्ध झाल्यामुळे, सगळ्या वस्तूंचे भाव भराभर वाढतात. नित्याच्या गरजेच्या वस्तू महाग होतात. आणि त्या महाग झाल्या की सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून द्यावा लागतो. कागदी चलनाचा वापर एवढ्यामुळेच करावा लागतो. आणि कागदी चलन छापणे (प्रसृत करणे) सहज शक्य असल्याकारणाने त्याच्या निर्मितीला बंधन राहत नाही. आपल्या देशात सरकारी नोकरांचे प्रमाण (संख्या) इतर देशांपेक्षा पुष्कळ जास्त आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांची इच्छा आपले राहणीमान सतत वाढते असावे अशी असते आणि ते स्वाभाविक आहे. राहणीमान वाढते ठेवण्यासाठी उपभोग्य वस्तूंची निर्मिती जास्त प्रमाणात करावी लागते. हे वाढते उत्पादन कारखान्यांना खपवावे लागते. आणि उपलब्ध चलनाच्या मानाने उत्पादन वाढले तर मागणीच्या अभावी त्या मालाच्या किंमती कमी कराव्या लागतात आणि किंमती कमी ठेवल्या किंवा तश्या कराव्या लागल्या तर कारखान्याला तोटा होतो आणि तो बंद करावा लागतो. म्हणजे वाढत्या उत्पादनाबरोबर त्या वाढीच्या प्रमाणात चलनदेखील वाढते ठेवावे लागते.
आपल्या देशात अजून औद्योगिक क्रांतीचे परिणाम स्थिरावले नाहीत. आमची मने अद्याप क्रांतिपूर्व काळातच वावरत आहेत. पूर्वी गरजेप्रमाणे मालाचे उत्पादन होत असे. आता मालाचे उत्पादन अगोदर करून तदनुरूप गरज निर्माण करण्यात येत आहे.
गरज प्रत्येकाची वेगवेगळी असते. शेतकऱ्याची कपड्याची गरज फक्त एका लंगोटीपुरती मानली जाई. गावातल्या कुळकाला लांडा पंचा पुरत असे. आणि सरदार, राजेरजवाडे यांना लाबरुद धोतरे, अंगरखे, फेटे यांची आवश्यकता आहे असे मानले जाई आणि गावातले विणकर त्या बेताने वस्त्रे निर्माण करीत. महिलांना वर्षा-दोन वर्षांत एखादे लगडे वापरायला मिळे. तोपर्यंत ते फाटले तर त्यांनी ते गाठी मारून किंवा ठिगळ लावून वापरावे अशी अपेक्षा असे. (जोतीबा फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी तिसरे लुगडे मागितले असताना ‘तिसरे कशासाठी’ असे त्यांनी विचारल्याचे संदर्भ मिळतात. जोतीबा हे संपन्न कुटुंबातले होते. त्यांच्या घरीसुद्धा दोन लुगड्यांच्या वर कोणीही नेसत नसत असे त्यावरून दिसून येते.
घरेसुद्धा गरजेप्रमाणे आपापली बांधून घ्यावीत अशी पद्धत होती. खेड्यापाड्यातून भाड्याने देण्यासाठी एकही रिकामे घर नसे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीसुद्धा रिकामी घरे असू शकत नव्हती. एखादी धर्मशाळा तेथे असली म्हणजे गावकऱ्यांची गरज भागत असे. शहरे जशी वाढली तशी तेथे गरजेप्रमाणे घरे बांधली जाऊ लागली व नवीन येणाऱ्यांना भाड्याने घर मिळण्याची सोय झाली. आज घरबांधणीचे कारखाने निघाले आहेत. डेव्हलपर्स अगोदर घरे तयार करतात व मागाहून ती लोकांनी खरेदी करावी यासाठी जाहिराती करतात. कितीतरी मध्यमवर्गीयांची आज एकापेक्षा अधिक घरे आहेत, मुबईत एक, पुण्यात एक, पुण्यात एक नाशकात एक, नाशकात एक मुंबईत एक. हे का घडू शकले तर सिमेंटचे आणि लोखंडाचे प्रचंड कारखाने उभे राहिले. आणि त्याचा माल खपविण्यासाठी घरबांधणीचे प्रकल्प हाती घ्यावे लागले. सर्वांचे राहणीमान वाढते ठेवण्यासाठी हे असे उत्पादन आवश्यक आहे.
आज कपडा इतका निर्माण होतो. की दुकानातली फडताळे ओसंडून वाहत आहेत आणि रस्त्याच्या कडेला तयार कपडे घेऊन लोक विक्रीला बसले आहेत. एकाची किंमत द्या, दोन घेऊन जा!’ अश्या जाहिराती फडकत आहेत. ही निराळ्या फरकाची जीवनशैली आहे. गरजेच्या आधीच माल तयार करायला, नंतर गि-हाईक शोधायचे. ह्याचा अर्थ असा होतो की, आम्ही सगळ्यांसाठी आता पुरेशा वस्तू तयार करू शकतो, कोणालाही घरावाचून राहण्याची आवश्यकता नाही. अन्न-वस्त्र-निवारा ह्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे पूर्वी अवघड होते; आता ते तसे राहिलेले नाही. आपण निर्माण केलेल्या वस्तू सर्वांपर्यंत पोचत नाहीत ह्याचे कारण आपल्या मनात आहे, त्यासाठी असणाऱ्या साधनांच्या अभावात नाही. साधने उपलब्ध आहेत पण मने अजून असुरक्षिततेच्या, अभावांच्या, सवयीतून बाहेर पडली नाहीत. सगळ्या म्हणजे यच्चयावत् जनतेच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आज आपल्याला उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानांत आहे. वस्तू निर्माण करीत जाणे व त्या वाटत राहणे, हे जर आपण करू शकलो तर सगळ्यांना कोणत्याही जास्तीच्या श्रमाशिवाय मिळेल, चोरी करायलासुद्धा त्यांना जास्तीचे श्रम पडतील.
आजच्या बहुतेक साऱ्या अर्थविषयक समस्या सर्वांना रोजगार दिला पाहिजे ह्या समजुतीतून उद्भवल्या आहेत. सर्वांना रोजगार देणे हे पूर्वी कधीही शक्य झाले नव्हते व पुढेही अवघडच होणार आहे. आपल्या गरजेच्या वस्तु निर्माण करणे ह्यासाठी माणसांना निराळ्या प्रकारचे श्रम करावे लागत.
आपला देश शेतीप्रधान आहे. शेतीमध्ये पूर्वी अंदाजे 80 टक्के लोक गुंतले होते. बाकीचे बलुतेदार म्हणजे लोहार, सुतार, चांभार, कुंभार, सोनार, माळी, साळी-पद्मशाली (शाल विणणारे), परीट, मांग, असे उद्योग करणारे होते. ह्यांच्यापैकी कोणालाही आठवड्यातून सहा दिवस 48 तास काम करीत नसे. गरजेपुरता माल तयार करीत व बाकी वेळ विरंगुळ्याच्या गप्पा, खेळ किंवा इतर गोष्टी करीत असत. जेव्हा पैसे मिळविण्यासाठी, नफा कमविण्यासाठी उद्योग सुरू झाले तेव्हा साऱ्या समस्या निर्माण झाल्या. मंदी येणे हा रोजगाराच्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम आहे. रोजगाराच्या गरजेतून आपण कच्च्या मालाची विलक्षण नासाडी करीत आहोत. नफा मिळविण्यासाठी पूर्णवेळ काम आणि उत्पादन जास्त करावे लागते आणि ते विकावे लागते. तोटा टाळण्यासाठी जाहिराती. रोजगार मिळाला पाहिजे ह्या कल्पनेतून अनावश्यक उत्पादन करायचे व ते विकायचे, त्यासाठी परस्परस्पर्धा. पानपानभर जाहिराती करायच्या. कंपन्या अनावश्यक हजारो काढायच्या, तीच तीच औषधे आपापल्या (वेगवेगळ्या) नावाने विकायची. वाहनांचेही तसेच.. । लागते.
आपल्याला अधिकाधिक उत्पादन आणि सर्वांना रोजगार ही वाट सोडून देऊन दुसरी वाट चोखाळावी लागणार आहे.
गौरीवंदन, 123, शिवाजीनगर, नागपूर 440010