माणसाने जीवन जगण्यास तयार होणे हा शिक्षणाचा मूळ हेतू. मग काय ‘शिक्षण’ ही संस्था निर्माण होण्याच्या आधी माणसे जीवन जगत नव्हती? निश्चितच जगत होती. खरे तर शिक्षण ही संस्था सुरू होण्यापूर्वीच अग्नी, चाक, शेती असे माणसाच्या जीवनात आमूलाग्न बदल घडवून आणणारे क्रांतिकारक शोध लागले होते. माणसास अनेक कौशल्ये प्राप्त झाली होती. पण ती विभागलेली होती. नवीन पिढीलाही हे विखुरलेले ज्ञान एकत्रितपणे देणे तसेच समूहात जीवन जगताना लागणारी कौशल्ये, पाळावयाचे नियम, जबाबदाऱ्या, कर्तव्ये यांची जाणीव करून देणे व समाजाच्या कल्याणासाठी जागरूक व कर्तव्यतत्पर असलेली पिढी घडविणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण ही संस्था उदयाला आली.
अनेक आशावाद उराशी बाळ आम्ही मुलांना शाळेत पाठवतो. प्रत्येक लहान मूल प्रचंड जिज्ञासा, कुतूहल, हळवेपणा आणि इवलेसे भय सोबत घेऊन शाळेत पहिले पाऊल टाकते. काही मुले चुणचुणीत, हजरजबाबी, तीव्र स्मरणशक्तीची असतात. त्यांना सुरुवातीपासूनच गुरुजींची वाहवा मिळत जाते. गुरुजी पुस्तक शिकवतात. आकलन, स्मरण चांगले असल्यामुळे त्यांना ही पुस्तके लवकर कळतात. तो लवकर पुस्तक शिकतो अन् हुशार होतो.
काही मुले अशी चुणचुणीत दिसत नाहीत. त्यांना पुस्तकांत आणि गुरुजींच्या शिकवण्यात फारसा रस नसतो. तरी ती जराशी अज्ञाधारक असतात. जसे सांगत आहेत तसे केले पाहिजे अशी त्यांची प्रामाणिक धारणा असते. त्यामुळे मनाला, बुद्धीला पटत नसेल तरी बिचारी हळू हळू अभ्यास करत राहतात. पास होण्यापुरते म्हणजे 35 ते 40 च्या दरम्यान गुण मिळवत राहतात.
काही मुले जराशी वेगळी असतात. त्यांचे मन दुसरीकडेच कुठेतरी अडकलेले असते. निर्जीव शिकवणे आणि निर्जीव पुस्तके त्यांचे मन आकर्षित करू शकत नाहीत. ही मुले आपल्याच विश्वात हरवलेली असतात. शिकवलेले त्यांच्या लक्षात राहत नाही. समजत नाही. मग या मुलांवर सरळसरळ ‘समस्याग्रस्त मुले’ असा शिक्का मारला जातो.
तर अशी ही वेगवेगळ्या प्रकारची मुले शाळेत आपापल्या परीने शिक्षणव्यवस्थेशी लढा देत असतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांचे मूल्यमापन एकाच पद्धतीने केले जाते. पूर्वी मुलांना गुणांनी जोखले जायचे तर आता श्रेणीने जोखले जाते. ज्या मुलांना 80-90 च्या वर गुण मिळायचे ती पेढे वाटायची. 60-70 वाली मुले समाधानी व्हायची. 40-50 वाली मुले हुश्श व्हायची. श्रेणी पद्धत आली तरी अ + वाल्यांनी पेढे वाटले. ब + वाल्यांना समाधान झाले. क + वाले म्हणाले ठीक आहे, चालतंय. ड वाले बिचारे फारच दीनवाणे झाले.
काय देते शाळा मुलांना? एक असा कागद ज्यावर–च्या वर गुण लिहिलेले असतील किंवा-श्रेणी ती वरची असेल तर त्यातून जगण्याची हमी मिळणार नाही तर आत्मविश्वास गडगडणार! असा तो कागद!! सुरुवातीला चैतन्यशील, कतहलांनी काठोकाठ भरलेली मुले वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या त्या कागदाप्रमाणेच निर्जीव बनतात. – वाली मुले संवेदनाहीन तर बाकी उदासीन, नकारात्मक, दैववादी.
आपण मुलांना शाळेत का घालतो? त्यांना काय येत नाही, तो कोठे कमी आहे हे सांगण्यासाठी की त्याला काय येते हे सांगण्यासाठी? पहिल्या वर्गात मुले दाखल होतात. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले तर त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे ती पुढे जात राहतात. काही मुले पहिल्या वर्गात लिहायला-वाचायला शिकतील तर काही तिसऱ्या वर्गात गती पकडतील. काय हरकत आहे? काय लिहिणे-वाचणे म्हणजेच जीवन आहे? एखाद्याला वेगाने लिहिता वाचता आले म्हणून त्याला -+ शेरा द्यायचा आणि एखाद्याला नाही जमले लेखन-वाचन तर त्याला क, ड श्रेणीत नेऊन ठेवायचे? मला वाटते की या वयातल्या कुठल्याही मुलाला काही येत नसेल तर ती त्याच्या/तिच्या शिक्षकासाठीची एक सूचना आहे, त्याने ती ध्यानात ठेवावी आणि त्यानुसार आपल्या योजनेत आवश्यक असेल तर काही बदलही करावेत.
मी तर पहिल्या वर्गापासूनच तू कसा चांगला आहेस हेच त्याला सांगत गेले, काहीही झाले तरी तू A-1- च आहेस हे बिंबवत गेले, त्याच्या प्रगतिपुस्तकात त्याचे प्रतिबिंब उमटले तर त्याचा आत्मविश्वास केवढा वाढेल! आत्मविश्वास वाढला म्हणजे तो गती पकडेल. त्याला स्वतःविषयी गौरव वाटेल. त्याच्यात उपजत असलेल्या क्षमतांचा आपण आदर केला म्हणजे तो वेगाने प्रगती करेल. तिसऱ्या वर्गापर्यंत वेगाने लिहू वाचू शकेल. पुढे त्याला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयातील ज्ञान तो मिळवेल. आवडीच्या क्षेत्रात पुढे जाईल. काय हरकत आहे? माझ्या पहिल्या वर्गातील मुलांना मी लेखन वाचनासाठी कधीच जबरदस्ती करीत नाही. काही मुले लिहिता-वाचता न येताच दुसऱ्या वर्गात जातात. यातल्या बहुतेकांना दुसऱ्या वर्गात माझी मदत फारशी लागतच नाही. ती न घेताच ते लिहायला-वाचायला लागतात. त्यांना आतूनच तशी प्रेरणा होते. कारण मी त्यांना तू कमी आहेस, मागे आहेस, तुला येत नाही असे कधीच म्हणत नाही. माझ्या दृष्टीने प्रत्येक मूल A-1 आहे आणि ते मी त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करते. ही प्रेरणाच त्याला पुढे अभ्यासाला प्रवृत्त करते. जीवनात पुढे पुढे जायला प्रवृत्त करते.
आपल्या शिक्षणशास्त्रात वाचन, लेखन या मूलभूत, प्राथमिक क्षमता मानलेल्या आहेत. आणि ज्ञान, आकलन, उपयोजन या त्यानंतरच्या क्षमता मानलेल्या आहेत. इथेच आपण फार मोठी चूक करून बसलो. खरे तर शाळेत येण्याच्या पूर्वीच बालकांच्या ज्ञान, अकलन, उपयोजन, कार्यात्मक व्याकरण, भाषेचा व्यवहारात उपयोग, शब्दसंपत्ती या क्षमता आधीच विकसित झालेल्या असतात. वाचन, लेखन ही केवळ ज्ञान मिळवण्याच्या आणि ते ग्रहण करण्यासाठीची साधन-क्षमता आहेत. ज्ञान देण्या-घेण्याच्या या दोन माध्यमांनाच आपण शिक्षण म्हटले आणि परीक्षेपुरते मर्यादित केले आहे. आपण काय करतो? मुलगा शाळेत आला की त्याच्यापाशी कोणते ज्ञान आहे, या ज्ञानाचे उपयोजन तो कसे करतो, त्याची आकलन क्षमता कोणत्या विषयात अधिक प्रगल्भ आहे हे जाणून न घेता, ते व्यक्त करण्याची संधी त्याला न देता, या क्षमता प्रगत होताना होणाऱ्या आनंदाची अनुभूती त्याला घेऊ न देता आपण त्याच्यावर एकदम श्रवण, भाषण, वाचन, लेखन यांचा भडिमार करतो. मुलांची श्रवण समता विकसित करताना आपण त्याचे बोलणे आदराने, आनंदाने ऐकून न घेता आम्ही जे बोलतो ते तो कितपत ऐकतो आणि प्रतिसाद देतो याचा विचार करतो. विद्यार्थ्यांची श्रवण समता वाढवायची असेल तर प्रथम त्यांची आपल्याला निरर्थक वाटणारी बडबड प्रेमाने, आनंदाने, उद्गारांसह, चेहऱ्यावरील भावांसह ऐकून घ्यायला हवी.
सध्या शासनाने सर्व मुलांना आठवीपर्यंत पास करण्याचे धोरण ठेवले आहे. शासनाचे हे धोरण स्वागतार्हच आहे. पण आठवीपर्यंतच सर्वांना पास करण्यापेक्षा दहावीपर्यंत पास केले तर हे अधिक चांगले होणार नाही का? दहावीच्या पुढे मग ज्याला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्राकडे तो वळेल. दहाव्या वर्गात मुलांना अडकवून आपण काय साध्य करणार आहोत? शिवाय पहिल्या वर्गापासून त्याला तो -A-1 आहे हे त्याच्या मनावर बिंबवत राहिल्याने तो दहाव्या वर्गापर्यंत चांगलाच तयार होईल. त्यामुळे तो आणि त्याचे पालक योग्य क्षेत्र त्याच्यासाठी निवडू शकतील. अर्थात यातली शिक्षकांची जबाबदारी अनुल्लेखून चालणार नाही.
माझ्या मते तर मुलांना बारावीतही अडकवू नये. बारावीतून बाहेर पडल्यानंतर बनावेगळ्या क्षेत्रांत जाण्यासाठी प्रवेशपरीक्षा असाव्यात. सध्या तश्याही आपण प्रवेश-परीक्षा पेतच आहोत. त्यांचे स्वरूप आणखी विस्तारित करावे. त्यात शेतीला आणि श्रमप्रतिष्ठेलाही विचारात घ्यावे. ज्या त्या क्षेत्रात आवड असलेली मुले तिकडे वळतील. त्या क्षेत्राचा अभ्यास करतील. उद्या चांगले शिक्षण घेतलेला हा मुलगा प्रयोगशील शेती करेल. आनंदाने रस्त्यावर माती टाकेल. समाजासाठी काम करेल. त्याच्यामध्ये असलेल्या नीतिमूल्यांना विकसित करत आपल्या मन, बुद्धी, आणि हातांनी आपले जीवन आणि जग सुंदर करेल.
द्वारा तुलेश चालकुरे, बालवीर वार्ड क्र.56, काँग्रेसनगरजवळ, स्वादल बोर्डिंग, बिंबा रोड, चंद्रपूर 442402