शिक्षणाचा हक्क देणारा 2010 चा अधिनियम गुणवत्तेला पुरेसा न्याय देत नसला तरी NCERT, SCERT च्या माध्यमांतून त्या दिशेने काही प्रयत्न सुरू झाले आहेत हे मान्य करावे लागेल. तसेच अनेक ठिकाणी शिक्षणप्रेमी ह्या कामाला सजगपणे हातभार लावत आहेत. जागृती निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, हीसुद्धा मोठी जमेची बाजू आहे. परंतु कोणत्याही कामाचा झोत ठरवताना किंवा व्यूहरचना करताना मर्यादा (constraints) आणि संभाव्य अडचणी लक्षात घेणे उचित ठरते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संदर्भात ते काम या लेखाद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे. 1999-2000 पासून सुरू झालेल्या आमच्या बालवाड़ी व प्राथमिक विभागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यात बऱ्यापैकी यश आले असे आम्ही म्हणू शकतो. तो अनुभव गाठीशी धरून हा लेख लिहिला आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण, अध्ययन व अध्यापनाच्या संदर्भातील अडचणींना विशेष महत्त्व आहेच. परंतु याव्यतिरिक्त इतर अनेक बाबीसुद्धा महत्त्वाच्या ठरतात. त्यांचा विचार केला नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रयत्न अपुरे पडतील. त्या कामाला वेग येणार नाही, अश्या काही अडचणींचा विचार येथे करीत आहे. मर्यादित उद्दिष्टांनुसार केवळ अडचणींचा विचार येथे केला असल्यामुळे हा निराशावाद नाही, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षक: गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमके काय याबाबत सोप्या पद्धतीने समजावून सांगणे कठीण आहे. त्यासाठी NCF 2005 हा आधार असला तरी त्यांत सांगितलेले सर्व समजून घेऊन ते कोण व कसे अंमलात आणणार? तसेच भौगोलिक, सामाजिक, आर्थिक अशा अनेक कारणांमुळे संपूर्णपणे भिन्न परिस्थितीतून आलेल्या मुलांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार ‘अपेक्षा’ निश्चित करून गुणवत्तेचे स्वतंत्र निकष कसे लावायचे? त्यासाठी समज असणारे ताकदीचे पुरेसे शिक्षक आज उपलब्ध नाहीत, मूल का शिकत नाही, असा प्रश्न शिक्षकांना पडत नाही. कारण तसा विचार करण्याची त्यांना आजवर आवश्यकता वाटली नाही. केवळ पुस्तक शिकवणे, स्वाध्याय सोडवून घेणे आणि त्यावर आधारित परीक्षा घेऊन गुण देणे, इतके मर्यादित काम शिक्षक करत असतात. गुणवत्ता म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी जास्तीचा वेळही द्यावा लागेल. चाकोरी सोडून नवीन मार्ग शोधावे लागतील. हळूहळू काम करत करत शिक्षकांना ते सर्व समजून घेता येणे शक्य असले तरी या सर्व कामांसाठी लागणारी मानसिकता आणि मूल व शिक्षण या गोष्टींकडे बघण्याचा पोषक व सकारात्मक दृष्टिकोण आज अनेक शिक्षकांकडे नाही हे मान्य करावे लागेल. गुणवत्ताविकासासाठी ही एक प्राथमिक अडचण आहे, असे आग्रहपूर्वक नमूद करावे लागत आहे. त्यामुळे गुणवत्ताविकासाचे कोणतेही काम करताना शिक्षकांच्या मानसिकतेत व त्याच्या दृष्टिकोणात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हेतू सतत मनात बाळगावा लागेल. काय झाले तर माणसाला प्रेरणा मिळते, हे सांगणे कठीण असले, तरी त्यासाठी सजगपणे प्रयत्न करत राहिल्यास सकारात्मक बदल होऊ शकतात असा आमचा अनुभव आणि विश्वास आहे.
प्रत्येक शिक्षक असामान्य असेल अशी अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. पूर्वी प्रत्येक विषयाचा एक तरी व्यासंगी, जाणकार व तज्ज्ञ शिक्षक प्रत्येक शाळेत असायचा. त्याच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षक तयार होत असत. स्वतःच्या क्षमता वाढवीत असत. आज तसे घडताना दिसत नाही. कारण प्रज्ञावान या पेशाकडे येत नाहीत हे एक कटू सत्य आहे. येणाऱ्या शिक्षकांच्या शिक्षणाबद्दलच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट नसतात. हेतूची स्पष्टता त्यांना नसते. त्यांचे शिक्षण केवळ पुस्तकी असून विषयज्ञान, समज आणि वैयक्तिक क्षमताही बरेचवेळा बेताची असते. वाचन, छंद, व्यासंग या बाबतीतली परिस्थिती समाधानकारक नसते. या सर्वांसाठी केवळ शिक्षकांना जबाबदार धरता येणार नाही. त्यांना जसे शिक्षण मिळाले, तसेच ते शिकवणार…. पाठांतर, परीक्षातंत्र, काही पोर्शन ऑप्शनला टाकणे… Product of a system cannot be better than the system itself. स्वतंत्र विचार करायची स्वय त्यांना त्यांच्या शालेय जीवनात लागलेली नसते.
उत्तम नेतृत्वगुण असलेले कार्यक्षम मुख्याध्यापक सहसा मिळत नाहीत. शिक्षकांचे प्रशिक्षणही परिणामकारक व अर्थपूर्ण नसते. (हा एक महत्त्वाचा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.) त्यांच्यावर अशैक्षणिक कामांचा बोजाही असतो. तसेच शिक्षक-विद्यार्थीप्रमाणही अनुकूल नसते. अशा अनेक कारणांमुळे शिक्षकांना चाकोरीतून जाणे सुरक्षित वाटते. गुणवत्ता वाढवण्यासाठी धोके पत्करण्याची, त्यासाठी मेहनत करायची त्यांची सहसा तयारी होत नाही. या अडचणी दूर करण्यासाठी चालक, सुज्ञ पालक आणि शिक्षणप्रेमींनी मार्ग शोधले पाहिजेत. शिक्षकांबरोबर काम करून त्यांना त्यांच्या कामात मदत केली पाहिजे. शाळेत पोषक वातावरण राखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि नाउमेद न होता या सर्वांचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे…
याचबरोबर आणखी एक उल्लेख करणेही आवश्यक वाटते. तो म्हणजे, काही शिक्षकांचा दृष्टिकोण व त्यांची मानसिकता चांगल्या शिक्षणाला पोषक तर नसतेच, पण बरेचवेळा ती मारक ठरते. अतिसुरक्षिततेमुळे त्यांच्यात काम टाळण्याची प्रवृत्ती बळावते. आपली जबाबदारी ओळखून ती स्वीकारायची त्यांची तयारी नसते. त्याची गरज त्यांच्या लक्षातच येत नाही. कार्यक्षमतेची सांगड वेतनाशी घातलेली नसल्याचाही हा एक परिणाम आहे. अशा शिक्षकांचा विरोध पत्करूनही पुढे जाण्याची हिम्मत इतर शिक्षकांमध्ये तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
चालकांची भूमिका: चांगले काम करण्यासाठी प्रेरणा (motivation) आवश्यक असते. शिक्षकांना केवळ दोष देण्याऐवजी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून संस्थाचालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांनी स्वतः शिक्षणविषयक विचार समजून घ्यायला हवा. शिक्षकांना अनुभवाच्या नवीन संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात, शिक्षकांना गुणवत्तेबाबत स्पष्ट अशी उद्दिष्टे ठरवून द्यायला हवीत. त्याबद्दल अपेक्षा व्यक्त करायला हव्यात. चालक स्वतः या बाबतीत अनभिज्ञ असले, तर ते शाळेची शैक्षणिक धोरणे कशी ठरवू शकतील? शाळा चालवायची असेल, तर ती चांगली चालण्याची व शाळेत चांगले शिक्षण देण्याची जबाबदारीसुद्धा चालकांनी घेतली पाहिजे. दुर्दैवाने असे घडताना क्वचितच दिसते. शाळेच्या शैक्षणिक कामांत चालकांचा सहभाग नसतो किंवा सहकार्यही नसते. अनेक वेळा त्यांचा स्वतःचाच दृष्टिकोण सकारात्मक नसतो. चालकांकडून सहभाग, सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले तर शिक्षकांच्या कामाला गती येईल हे निश्चित. त्यामुळे गुणवत्तेबाबत काम करताना चालकांच्या प्रबोधनाचाही विचार करणे आवश्यक ठरते..
सरकार : गुणवत्ताविकासाच्या कामात सरकारला महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल यात शंका नाही. काही प्रयत्न सुरू झाले असले तरी खूप काही करायचे बाकी आहे. हे लक्षात घ्यावे लागेल आणि तेही वेगाने करावे लागणार आहे. आज शासनाकडे गुणवत्तेबाबत आणि एकंदरीत शिक्षणाबद्दल धोरणात्मक स्पष्टता व सातत्य नसल्याचे ठळकपणे जाणवते. सरकारी यंत्रणा व संस्थांमध्ये (NCERT, SCERT, DIET, BRC, URC, MIEPA, MPSP, SSC & HSC Boards etc.) पुरेशा समन्वयाचा, एकसूत्रतेचा व नियंत्रणाचा अभाव दिसून येतो. त्या त्या संस्थांच्या भूमिकांमध्ये अधिक स्पष्टतेची आणि कामांमध्ये समन्वयाची गरज आहे. तसेच ‘मातृभाषेतून शिक्षण’ हे सरकारने जाहीर केलेले धोरण असले तरी प्रत्यक्षात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतील असे निर्णय शासन सातत्याने घेत आहे. कायदेशीर जबाबदारी असूनही सरकार शिक्षणसंस्थांना पुरेसा निधीही देत नाही. राजकीय हस्तक्षेप व अशैक्षणिक विचारांना स्थान हे या दुरवस्थेमागचे एक महत्त्वाचे कारण आहे…
पालक व समाज : आज समाजातील कोणत्याही क्षेत्रात गुणवत्तेची व दर्जेदार कामाची मागणी होत नाही. सर्वत्र उथळपणा बोकाळला आहे. सुमार असलेले खपवून घेतले जाते. ‘जगात असेच चालते’ हा समज पक्का झाला आहे. आपण आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या ओळखून त्या स्वीकारीत नाही. स्वतःच्या कामाचा आपण अभिमान बाळगत नाही आणि झालेल्या चुकांची आपल्याला खंतही वाटत नाही. समाजाची अशी धारणा, विचारांची दिशा व पद्धत ही गुणवत्तेला पोषक नाही. समाजाच्या या मानसिकतेचे प्रतिबिंब शिक्षणक्षेत्रातही पडलेले स्पष्टपणे दिसते.
पालकांना नोकरी किंवा व्यवसायासाठी फक्त प्रमाणपत्र, इतरांपेक्षा जास्त गुण व त्यासाठी परीक्षातंत्र हवे असते. त्यांना गुणवत्तेशी, समज तयार होण्याशी किंवा शिक्षणाच्या मूळ उद्दिष्टांशी काही देणेघेणे नसते. त्यांना गुणवत्तेची गरज भासत नाही, असे खेदाने म्हणावे लागते. पालक गुणवत्तेबाबत सजग नसल्यामुळे तशी मागणी करीत नाहीत, परंतु इंग्रजी माध्यमासारख्या भ्रामक कल्पना मात्र जनमानसात ठामपणे रुजल्या आहेत. फाडफाड इंग्रजीबरोबरच, जे जे झगमगीत असेल ते ते चांगले, असा समज समाजात जाणीवपूर्वक करून दिला जात आहे. अशा परिस्थितीत गुणवत्तेची मागणी नसल्यामुळे पुरवठाही नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रमाणपत्राची मागणी प्रचंड असल्यामुळे परीक्षातंत्र देणारे शिकवणीवर्ग मात्र फोफावले आहेत, ते गुणवत्तेला मारक अशी शिकवण देतात व तसा प्रचारही करतात. त्याचा विपरीत परिणाम होतो. गुणवत्तेसाठी पालकांकडून दबाव येण्याकरिता याविषयी जनजागृती करणे हा ह्या कामाचा महत्त्वाचा भाग समजावा लागेल. तसेच हा जाहिरातबाजीचा जमाना असल्यामुळे हे काम आक्रमकपणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून कसे करता येईल, तेही विचारपूर्वक ठरवावे लागेल.
इतर काही बाबी : रोजच्या जीवनात आणि विशेषतः शिक्षणक्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. त्या बदलांचा वेगही प्रचंड आहे. त्या वेगाशी जुळवून घेणे सर्वांनाच अवघड ठरत आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वेगाने येत असणाऱ्या नवीननवीन ई-साधनांचा व उपकरणांचा वाढता प्रभाव शिक्षणक्षेत्रातही दिसू लागला आहे. केंद्रसरकारने ‘आकाश’ नावाचा टॅब्लेट पीसी आणला आहे. ‘आकाश’च्या 22 कोटी प्रती लागणार आहेत असे कळते. मुंबई विद्यापीठाने आताच 30 हजारांहून जास्त टॅब्लेट पीसींची मागणी केली आहे. हे लोण शालेय स्तरावर यायला वेळ लागणार नाही. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ‘यू ट्यूब’ने नवीन सेवा सुरू केली आहे. India Can Education Pvt. Ltd. सारख्या अनेक कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्या e-learning साठी प्रत्येक वर्गात interactive यंत्रणा बसवून देतात. यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मुलांकडून त्यासाठी भरमसाठ शुल्क आकारले जाते. या साधनांमुळे अध्ययन व अध्यापन सुलभ होईल असा त्यांचा दावा आहे. त्यासाठी वापरले जाणारे प्रोग्रॅम्स् मात्र उथळ असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. त्यांचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. अशा साधनांची मदत घ्यायची नाही, असे नाही. पण आंधळ्या मनाने त्यांचा वापर व्हायला नको. या साधनांमुळे मुलांचे आकलन वाढणार आहे की तेही वरवरचे शिक्षण असणार? अशा साधनांचा समजून वापर करणारे शिक्षक हवेत. ही साधने वापरली की चांगले शिक्षण मिळते असा चुकीचा समज रूढ व्हायला वेळ लागणार नाही. आक्रमक जाहिरातबाजीमुळे मुंबईत 200 शाळांमध्ये अशा यंत्रणा बसवून घेण्यात आल्याचे कळते. गैरसमजुतीमुळे उद्या पालकही इंग्रजी माध्यमाप्रमाणेच अशा साधनांची मागणी करू लागतील. ज्या शाळेत या सोयी उपलब्ध आहेत. ती शाळा चांगली अशी पालकांची धारणा होऊ लागली तर आश्चर्य वाटायला नको. गुणवत्ताविकासाच्या कामातला हा एक मोठा अडथळा ठरू शकतो.
झपाट्याने बदलणाऱ्या जगात असे बदल कायम होत राहणार व त्यांचा वेगही मोठा असणार, हे वास्तव मान्य करायला हवे. मोबाइल फोनप्रमाणेच शिकण्याशिकवण्याची नवीन साधनेही येत राहणार व जीवनाचा अविभाज्य भाग होणार हे वास्तव आहे. या सर्व गोष्टी शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालक ह्यांवर यापुढे कोसळणार आहेत. त्यामुळे अशा नवनवीन साधनांशी जुळवून क व त्यांचा वापर गुणवत्ताविकासासाठी कसा करून घ्यायचा, हेही शिक्षणप्रेमींपुढे एक आह्वान ठरणार आहे.
1 ला माळा, मेघदूत, सामंतवाडी, गोरेगाव (इ), मुंबई 400063.