मुक्त मनाचा माणूस
(एखाद्या) माणसाच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत विझलेली नाही, याचा पुरावा काय? मुक्त मनाचा माणूस असे आपल्याला कोणाविषयी म्हणता येईल? आपल्या जागृत सदसद्विवेकबुद्धीद्वारे ज्याला आपले हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांचे भान असते, त्याला मी मुक्त म्हणतो. जो परिस्थितीचा गुलाम न बनता, तिला बदलवून आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी तत्पर व कार्यरत असतो, त्याला मी मुक्त मानतो. जो निरर्थक रूढी, परंपरा व उत्सवांचा, अंधश्रद्धांचा गुलाम नाही, ज्याच्या मनात विवेकाची ज्योत तेवते आहे. त्याला मी मुक्त मानतो. ज्याने आपले इच्छास्वातंत्र्य गहाण ठेवले नाही; आपली बुद्धिमत्ता वस्वतंत्र विचारबुद्धी यांचा त्याग केला नाही, इतरांच्या शिकवणुकीनुसार जो आंधळेपणाने वागत नाही, वैधता व उपयुक्तता तपासल्याशिवाय व विश्लेषणाशिवाय जो कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारत नाही, आपल्या हकांच्या रक्षणासाठी जो सदैव सज्ज असतो, लोकनिंदा व अन्याय्य टीका यांची जो पत्रास बाळगत नाही, आपण इतरांच्या हातातील बाहुले बनू नये यासाठी आवश्यक विवेक व स्वाभिमान ज्याच्यापाशी आहे, त्यालाच मी मुक्त मानव मानतो. इतरांच्या निर्देशानुसार न वागता जो स्वतःच्या बुद्धीनुसार आयुष्याचे ध्येय व त्यानुसार जगण्याचा मार्ग ठरवितो, थोडक्यात म्हणजे जो स्वतःच्या स्वातंत्र्याचा स्वामी आहे, त्यालाच मी मुक्त मानव समजतो.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर