प्रोफेसर माटे यांचा जन्म १८८६ साली दिगंबर-श्वेतांबरी जैन यांचे तीर्थक्षेत्र असलेलया वाशिम जिल्ह्यातील शिरपर (जैन) येथे व्हावा हा विलक्षण योगायोग मानला पाहिजे. कारण जैन तत्त्वज्ञान तत्त्वतः वर्णव्यवस्थेविरुद्ध असलेले वेदांचे प्रामाण्य नाकारणारे नास्तिकदर्शन. प्रोफेसर माटे यांचे जीवितकार्य अस्पृश्योद्धार. त्यांनी अस्पृश्य-दलितांसाठी शाळा चालविल्या; त्यांना आरोग्याचे धडे दिले; त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची प्रसंगी व्यवस्था केली. त्यांच्या व्यथेला वाचा फोडणारे उपेक्षितांचे अंतरंग ही व्यक्तिचित्रे सादर केली. त्यामध्ये ‘बन्सीधरा तू कोठे जाशील’ यासारखी हृदयद्रावक कथा लिहिली. बहुतांची अंतरे राखून अस्पृश्योद्धाराचे कार्य केले म्हणून त्यांना बहुधा सनातनी सुधारक म्हणत असावेत. प्रक्षोभक कार्य न करता विधायक कार्य केले.
प्रोफेसर माटे हे विवेकवादी होते. प्रा. पु.ग. सहस्रबुद्धे यांनी, त्यांनी आम्हाला विचार करायला शिकविले असे उद्गार काढले. यापरती त्यांच्या चिंतनशील विचारप्रवर्तक व्यक्तिमत्त्वाला आणखी पुरावा-प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ या पुस्तकात त्यांच्या विज्ञाननिष्ठ विवेकवादी दृष्टिकोणाची सैद्धान्तिक बैठक त्यांनी लिहिली. प्रोफेसर माटे यांचे वर्णन जन्माने वऱ्हाडी, बालपणी सातारी व कर्तृत्वाने व वास्तव्याने पुणेरी असे करता येईल.
प्राचार्या भालेराव यांनी या पुस्तकांत मनोवेधक व ओघवत्या भाषेत त्यांचे चरित्र लिहिले असून त्यांच्या व्यक्तिमत्वाची व कार्याची यथार्थ ओळख करून दिली आहे.
‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या कोटीतील त्यांचे वक्तृत्व होते हेही त्या सांगतात. सभा जिंकणारा, श्रोत्यांच्या कानावर प्रभुत्व असणारा शब्दप्रभू म्हणून लेखिकेने त्यांचा वर्णनात्मक गौरवही केला आहे.
तळमळीचे व प्रभावी जर्मन मेथड वापरणारे प्राध्यापक विद्यार्थी प्रिय असे. समाजकारणांमध्ये रस असणारे विचारवंत, चतुरस्त्र लेखक अशी यथार्थ अशी त्यांची प्रतिमा लेखिकेने उत्तम रीतीने उभी केली आहे. यांत शंका नाही.
त्यांच्या स्वाभिमानी व करारी व्यक्तिमत्त्वाचीही उदाहरणे प्राचार्या भालेरावांनी दिली आहेत.
अनेक सामाजिकआणि साहित्यिक विषयांवर लिहिणारे असे चतुरस्त्र लेखक म्हणून त्यांचा परिचय पुस्तकाला जोडलेल्या ‘संपूर्ण वाङ्य सूचींवरून लक्षात घेणे होतो.
प्रोफेसर माटे यांचे व्यक्तिमत्त्व आणि कामगिरी, त्यांचे प्रापंचिक जीवन, सौभाग्यवतीवरील त्यांचे प्रेम, त्यांची मुले नातवंडे, जावई या गोकुळीतील त्यांच्या स्वकष्टार्जित घरांतील जीवन लेखिकेने मोठ्या उत्तम रीतीने रेखाटले आहे. अथपासून इतिपर्यंत वाचत राहावे अशा शैलीत लिहिलेले हे पुस्तक प्रोफेसर माटे यांच्या संबंधीच्या माहितीचा ज्ञानकोश असे या ग्रंथाचे समर्पक रीतीने वर्णन करता येईल.
सकृतदर्शनी तरी पंडित-सुधारक श्री. म. माटे या पुस्तक शीर्षकाचे औचित्य लक्षात येत नाही. प्रोफेसर होण्याची व असण्याची त्यांना रुचि होती असे याच पुस्तकात लेखिकेने नमूद केले आहे म्हणून समाजसुधारक प्रोफेसर श्री.म. माटे हे नाव समर्पक राहिले असते असे एक माझे मत.
पुस्तक संग्राह्य व वाचनीय.
लेखक : प्राचार्य डॉ. विमल भालेराव महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला (मंच). संपादक • अरुण टिकेकर, द.ना.धनागरे, प्र.ना.परांजपे – प्रकाशक – गंधर्व वेद प्रकाशन, पुणे ३०. महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सवी वर्ष २०१०. पृ. १७५, मूल्य रु. १८०
१०३ धनश्री बिल्डिंग, स्वरनगरी, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ४११०५१ फोन. ०२०-२४३५४६८५.