स्टाईनबेकसारखाच 1902 साली जन्मलेला एरिक ब्लेअर. वडील बंगालात एक्साईज खात्यात होते. स्पष्ट सांगायचे तर अफूचे पीक नियंत्रित करणाऱ्या खात्यात होते. मुलगा शाळेत जायच्या वयाचा झाल्यावर इंग्लंडमध्ये निवासी शाळा शोधल्या गेल्या. त्या काळची इंग्रजी शिक्षणव्यवस्था ग्रामर म्हणजे प्राथमिक शाळा, प्रेपरेटरी किंवा प्रेप शाळा या माध्यमिक, आणि चांगल्या उच्चशिक्षणासाठी पब्लिक स्कूल्स. खरे तर पब्लिक स्कूल्स अत्यंत प्रायव्हेट आणि महाग असायची. त्यातूनही जरा चांगल्या, ख्यातनाम पब्लिक स्कूल्समध्ये प्रवेश कठीण असायचा, आणि शिष्यवृत्त्या आणिकच अवघड. मध्यम दर्जाच्या सनदी अधिकाऱ्याच्या मुलाला शिष्यवृत्ती नसली तर सामान्य, अनिवासी प्रायव्हेट शाळा हाच पर्याय; अत्यंत असमाधानकारक, पण एरिक हुषार होता. ग्रामर स्कूल सहज ओलांडून निवासी प्रेप-स्कूलमध्येही शिष्यवृत्ती मिळाली. तसल्या शाळांनाही “आमची मुले ईटन आणि हॅरोत जातात” असे सांगायला आवडत असे. त्या दर्जाची मुले स्वस्तात स्वीकारली जात. शाळा बहुधा एखादे जोडपे आपल्या मोठ्याशा घरातच चालवायचे. विशेष विषयांसाठी बाहेरचे शिक्षक, आणि सौ. हेडमास्तरच मुलांवर देखरेख करणाऱ्या मेट्रन, रेक्टर, काय म्हणाल ते.
अशा एका प्रेप-स्कूलमध्ये एरिक दाखल झाला. मेट्रनबाई लागट बोलणाऱ्या; शिष्यवृत्तीवाल्या मुलांना सतत उपकाराची आठवण करून देणाऱ्या. पुढे सच, सच वेअर द जॉईज या कठोर लेखात या शाळेचे वर्णन आले. योगायोगाने एक दुसरा चांगला निरीक्षक मुलगाही एरिकसोबत होता, सिरिल कॉनोली नावाचा. एरिकला प्रेप-स्कूल दखली तेव्हढी कॉनोलीला दखली नाही. पण तो पूर्ण फी देणारा होता, शिष्यवृत्तीवाला नाही. एरिकने पुढे स्वतःचे वर्णन निम्न-उच्च-मध्यमवर्गी असे केले. सत्तावीस वर्गामध्ये विभागलेला समाज कल्पनेने उभारला, व स्वतःला वरून बाराव्या वर्गात घातले. कॉनोली एखादेवेळी एक पायरी वरचा मध्यम-उच्च-मध्यमवर्गी असावा. पण एरिक शब्दच्छल करत नव्हता स्वतःला निम्न-उच्च-मध्यमवर्गी म्हणताना. त्याने या वर्गाचा लक्षणगुणही नोंदला, की हाऊस-पार्टीला बोलावले असताना नोकरांना टिप किती द्यायची ते माहीत असलेला पण हाऊस-पार्थ्यांना बोलावला न जाणारा हा वर्ग! पी. जी. वुडहाऊसशी ओळख असणाऱ्यांना हा प्रकार समजेल. वुडहाऊस स्वतः बहुधा मध्यम-मध्यम-उच्च वर्गातला, वरून पाचव्या वर्गातला. असो. हे पातळ्या पिंजणे पुरे झाले. हा सगळा वर्ग ग्रस्त, क्लास-रिड्न इंग्रज समाजातला प्रकार स्टाईनबेकबाबत करावा लागला नव्हता.
एरिक हुषार तर होताच. 1915-16 साली, बहुधा प्रेप-स्कूलमध्ये तो कॉनोलीला म्हणाला, “पण तुला हे जाणवलंच असेल, की या युद्धात काहीही होवो, युद्धानंतर इंग्लंड हे दुय्यम दर्जाचं राष्ट्र असेल.” वय वर्षे तेरा-चौदा. वार्ता केली जाते आहे राजकीय ऐतिहासिक विषयाची. बरे, आढ्यताही नाही. “तुला हे जाणवलंच असेल”! तर एरिक ईटन या अत्युच्च वर्गातल्या पब्लिक स्कूलसाठी शिष्यवृत्तीसकट निवडला गेला. तिथे शिष्यवृत्तीवरून हिणवणे नव्हते. तिथल्या आयुष्यावर एरिकने फार लिहिलेले नाही. कॉनोली मात्र ईटनच्या संध्याकाळी वर्गभावनेने आणि त्यातही समलिंगी वृत्तीने लडबडलेल्या असत, असे एनिमीज ऑफ प्रॉमिसमध्ये सुचवतो. ईटनमध्ये यश म्हणजे ऑक्सफर्ड केंब्रिज या विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवणे. ते एरिकला जमले नाही. स्वतः खर्च करून कॉलेजात शिकणे, विशेषतः ऑक्सफर्ड-केंब्रिजमध्ये, हे शक्य नव्हते. तर एरिकचे शिक्षण ईटनमध्येच संपले.
1979 साली मी आपद्धर्म म्हणून दीडदोन वर्षे रोटरी क्लबचा सदस्य झालो. योगायोगाने त्याकाळात एक जॉन कोट्स (?) नावाचा पाहुणा नागपूरच्या मुख्य रोटरी क्लबात आला. तो थिऑसॉफिकल सोसायटीचा मोठा पदाधिकारी होता. त्याचा जन्म 1902-03 आणि तो ईटोनियन, हे ऐकून मी भाषणानंतर भेटायला गेलो. विचारले, “तुम्हाला ईटनमध्ये एक एरिक ब्लेअर म्हणून होता, तो आठवतो का? पुढे त्याने जॉर्ज ऑर्वेल हे टोपणनाव घेतले, असा?” कोट्सने माझ्याकडे सभ्य प्रेमाने पाहिले. “टॉल, थिन् बॉय? फ्रेंड ऑफ युवर्स?” मला भरून, भरभरून आले. मी, आणि तरुण जॉर्ज
ऑर्वेलचा मित्र! “नो, आय नो हिम अॅज अॅन ऑथर, जॉर्ज ऑर्वेल” असे म्हणालो. तो दुसऱ्या प्रश्नकर्त्याकडे वळला, आणि मी मागे सरकलो. पण माझी जॉर्ज ऑर्वेल-एरिक ब्लेअरशी ही पहिली ओळख नव्हे. ती एका पिढीआधी, 1955 साली झाली होती.
त्या समाराला मला चष्मा लागला, आणि मैदानी खेळ माझ्या आयुष्यातन जवळपास बाद झाले. वाचणे हा आधी छंद झाला. मग ते व्यसन झाले. पंचावन्न साली संध्याकाळी घरापासून दूर आईच्या दवाखान्यात घालवल्या जात. उजेड असेपर्यंत सायकल चालवणे, हुंदडणे, आणि दिवेलागणीला शेजारच्या जिल्हा वाचनालयात जाणे. आज पत्रकार भवन आहे तिथे हे वाचनालय होते. तिथे एक लहानसे विक्षिप्त पुस्तक होते. काही जनावरे आपल्या मानवी शेतमालकांना हाकलून देऊन स्वतःचे राज्य स्थापतात. ही क्रांती पुढे विकृत होत जाते. एका टप्प्यावर धीरूभाई आणि वीरूभाई नावांची दोन डुकरे राज्यकर्ती होतात. मला वयाच्या नवव्या वर्षी जॉर्ज ऑर्वेलचे अॅनिमल फार्म भेटले होते. पण आज मराठी पुस्तकाचे नाव, भाषांतरकाराचे नाव वगैरे काहीही आठवत नाही.
आणखी तीनचार वर्षांनी हिंदी भाषा सुधारायच्या प्रयत्नांत नाइन्टीन एटीफोर भेटले, कॉम्रेड यशपालने हिंदीत आणलेले. पहिल्याच पानावर तेराचे टोले देणारे घड्याळ, आणि फाटका, फडफडणारा इश्तिहार (पोस्टर) याने खरे तर खचून गेलो. पण काहीतरी महत्त्वाचे सांगितले जात आहे हे मात्र जाणवले. हिंदी सुधारली नाही ती नाहीच.
आज नाईन्टीन एटीफोरचीही पारायणे झाली आहेत. जॉन हंटने विन्स्टन स्मिथची भूमिका साकारलेला चित्रपटही तीनचारदा पाहिला आहे. नाइन्टीन एटीफोर असे का लिहावे, 1984 का नाही. हे समजले आहे. लिहिण्यातली काटकसर म्हणून मात्र यापुढे बहुधा 1984 च लिहीन.
पण एरिक ब्लेअरचा जॉर्ज ऑर्वेल होण्यातला, ईटोनियन मुलापासून ऑर्वेलियन . हे विशेषण घडवणारा प्रवास सोपा नव्हता. कॉलेज जमत नाही म्हटल्यावर त्यावेळच्या इंग्लंडात तीन वाटा फुटत; सर्व्हिसेस ऊर्फ सेना, क्लर्जी ऊर्फ धर्मगुरू होणे, आणि कॉलनीज ऊर्फ वसाहतींमध्ये जाणे. वडलांची भारतीय पार्श्वभूमी पाहता एरिकने कॉलनीज निवडणे साहजिक ठरते. तसाही योद्धेपणाचा, धार्मिकतेचा मागमूस सापडत नाही. एरिकने त्याकाळच्या इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये नोकरी धरली. आजही त्या दलाला तेच नाव आहे. लोकसेवा आयोगातली वरून तिसरी पायरी, आय.एफ.एस., आय.ए.एस. यांच्या खालची आय.पी.एस.
वडलांनी साम्राज्याच्या थेट गुन्हेगारी अंगात मदत केली होती. आता एरिक काळ्यापिवळ्यांचे दमन करणाऱ्या खात्यात शिरला. नेमणूक ब्रह्मदेशात झाली, जो त्यावेळी इंडिया चा भाग होता. साम्राज्यवाद म्हणजे काय, तो कसा राबवला जातो, वगैरेचे ज्ञान झाले. आणि तेही राज्यशास्त्रातले प्रकरण म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष सहभागातून. सोबतच अप्रत्यक्ष देशनिकाला झालेल्या राज्यकर्त्यांच्या आयुष्यांशीही ओळख झाली. त्यांच्या वागणुकीकडेही सहानुभूतीने पाहता येऊ लागले. त्यांचा वंशवाद, त्यांची “आपण ह्या लोकांचे ओझे वाहतो आहोत’ या भावनेची निकड, सारे समजले. त्यातून बर्मीज डेज ही पहिली कादंबरी घडली. अ हँगिंग आणि शूटिंग अॅन एलेफंट हे अप्रतिम निबंध घडले. पढे रूडयार्ड किप्लिंग व गांधी यांच्या मूल्यमापनांत सहिष्णु धारदारपणा आला. हे लिखाण सारे जॉर्ज ऑर्वेल या नावाने प्रकाशित झाले. सेंट जॉर्ज हा इंग्लंडचा खास संत, घोड्यावरून, चिलखत-भाला पेहरून ड्रॅगन्सना मारणारा, ऑर्वेल ही एक मध्यम इंग्लिश नदी.
पण आयपीएसची नोकरी फार काळ सहन होणे शक्य नव्हते. लवकरच ती सोडून एरिक, आता ऑर्वेल झालेला, इंग्लंडला परतला. बहुधा त्याने पुन्हा कधी युरोपबाहेर पाऊल टाकले नाही. लेखणीवर जगायची इच्छा होती. फूटभर शेल्फ व्यापेल इतके लिहायचे होते. पण यावर पोट भरणे सुरुवातीला तरी अवघड होते. झपाट्याने ऑर्वेल दारिद्र्यात लोटला गेला. दरिद्री लोकांसाठीच्या धर्मादाय संस्थांची शेल्टर्स, फुटकळ नोकऱ्या, बिअर बनवायला लागणारी हॉप्स फळे तोडणे, मजुरी अश्या त-हेने ऑर्वेल जगू लागला. लेखन मात्र सुरू राहिले. डाऊन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन या नावाने दारिद्र्याचे अनुभव नोंदले गेले.
वुई टॉक अबाऊट गोइंग टु द डॉग्ज. वेल, हिअर वेअर द डॉग्ज.
त्या कठोर सच्चेपणामुळे लेखनासाठी पैसे मिळू लागले. शिकवण्या, पुस्तकांच्या दुकानांत नोकऱ्या मिळू लागल्या. कीप द अॅस्पिडिस्ट्रा फ्लाइंग, द क्लर्जीमन्स डॉटर, कमिंग अप फॉर एअर या कादंबऱ्यांमधून हे अनुभव मांडले गेले. वातांकन, पुस्तक परीक्षणे, निबंध, यांना प्रकाशक मिळू लागले,
एव्हाना जगभर महामंदीचा प्रकोप दिसू लागला होता. बेकारी वाढत होती. इंग्लंडमध्ये काही लोकांना उत्पन्न चाचणी (means test) घेऊन बेकार-भत्ता (dole) दिला जाऊ लागला होता. लोकांना बेकारी तर अपमानास्पद वाटत होतीच, पण तीवरचा चाचणी-भत्ता उपाय तर फारच अपमानास्पद होता. विगन हे इंग्लंडातल्या कोळसा खाणींचे आणि उद्योगांचे एक मोठे ठाणे. खाणींमधले काम घटलेले, त्यामुळे कितीही जाचक अटी असल्या तरी काम करू इच्छिणारे मिळायचेच. ज्यांना असे काम मिळत नसे ते वाट्टेल ते उपाय शोधत जगू पाहायचे, आणि शेवटी मीन्स टेस्ट-डोलचा लाजिरवाणा पर्याय स्वीकारायचे. या साऱ्याची पाहणी करून वार्तांकन करायचे काम ऑर्वेलकडे आले. अमेरिकेतले शेतकरी उद्ध्वस्त होऊन पश्चिमेकडे गेले. इंग्रज खाण कामगार स्वतःच्याच घरांत कुढत बसले. त्यांची कथा द रोड टु विगन पियर या अप्रतिम सामाजिक सर्वेक्षणातून ऑर्वेलने मांडली. अशा परिस्थितीतही कामगार-बेकार तरुणांमध्ये लग्ने होत, यावर ऑर्वेलने आशादायी सूर लावला. इतर काही आशादायक नव्हते.
आणि याच सुमारास दुसऱ्या महायुद्धाचे ट्रेलर्स किंवा प्रोमोज असावे, तशी दोन युद्धे घडली. साम्राज्यवाद हा शब्द बहुतेक लोकांना इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, फारतर बेल्जियमची आठवण करून देतो. पण जपानही मोठे आणि उद्दाम साम्राज्यवादी राष्ट्र होते हे विसरले जाते. रशियात झारशाहीला खिळखिळे करण्यात रूसो-जपानी युद्धाचा वाटा होता. आता चिनी-जपानी युद्ध सुरू झाले. जपानसाठी हा पुढच्या महायुद्धाचा सराव होता. शांघायवर तर बलात्कारच झाला. विस्कळीत चीन स्वतःला धड वाचवूही शकत नव्हता. पण हे सारे युरोपपासून दूर होते.
युरोपात रशियन राज्यक्रांतीने सर्व स्थितिवादी उजवे लोक हादरलेले होते. बऱ्याच देशांत औपचारिक राजघराणी होती. कधीकधी राजेराण्या नामधारी राष्ट्रप्रमुख, आणि प्रत्यक्षात सांसदीय लोकशाही अशी स्थिती असे. इंग्लंडात ही पद्धत आजही आहे. स्पेनमध्ये 1930-33 च्या सुमारास हीच पद्धत होती. आणि तिथे समाजवादी निष्ठा असलेल्या पक्षाने निवडणूक जिंकली. याने बिथरून सेनाध्यक्ष जनरल फ्रान्सिस्को फ्रैंकोने सैनिकी सत्तापालट करून सत्ता काबीज केली. (पुढे 1970-71 मध्ये पाकिस्तानात असाच मुजीबुररहमान निवडून आला व याह्याखान ह्या सेनापतीने सत्ता काबीज केली, आणि अखेर पाकिस्तानातून बांगलादेश सुटा झाला.) स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाले. निर्वाचित सरकारच्या बचावाला रशियन सैनिक आले, तर फ्रैंकोची पाठराखण करायला नाझी जर्मन आले.
समाजवाद आणि एकणच डाव्या लोकांमध्ये नेहेमीच दोन पक्ष पडलेले दिसतात कर्मठ मार्क्सवादी लोकांना हिंसेचे वावडे नसते. सौम्य समाजवादी-लोकशाहीचे पुरस्कर्ते मात्र निवडणुकांमधून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतात. एक तिसराही विचारप्रवाह असतो, की केंद्रसत्ता नकोच: प्रत्येक गावाने किंवा गावांच्या समहाने आपापले शासन-प्रशासन चालवावे. हा विचार गांधींच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेजवळचा आहे. त्याला राज्यशास्त्रात सामाजिक अराजकवाद, सोशल अॅनार्किझम म्हणतात. या सर्व विचारधारांची उदाहरणे स्पेनमध्ये भेटत होती. रशियाच्या आधारावर उभे असलेले कट्टर कम्युनिस्ट, निर्वाचित पण-उलथवलेल्या सरकारचे समर्थक, सामाजिक अराजकवादी पंथाचे सिंडिकॅलिस्ट, असे अनेक गट होते. एक गट आंतरराष्ट्रीय समाजवाद समर्थकांचा होता. त्यात जगभरातले आदर्शवादी तरुण होते. (या इंटरनॅशनल ब्रिगेड मध्ये नागपूरचे बाळाजी हुद्दार होते.). काही स्पॅनिशेतर लोकांना तर इतपतही सहभाग घ्यायचा नव्हता. ते रुग्णवाहिका चालवणे, खऱ्या बातम्या जगापुढे मांडणे, वगैरेंवरच समाधानी होते (यांत अर्नेस्ट हेमिंग्वे होता). जॉर्ज ऑर्वेलने यांपैकी एका सिंडिकॅलिस्ट गटात सपत्नीक प्रवेश मिळवला.
एकीकडे विचारधारांचा गलबला, दुसरीकडे कठोरपणे भावी युद्धांचा सराव करणारे जर्मन आणि त्यांच्या आडून सत्ता भोगणारा को, असे हे यादवी युद्ध होते. रशिया गटाला फ्रैंको-जर्मनांना हरवण्यापेक्षा आपल्यातले पंथभेदी-शिइमॅटिक्स संपवण्यात जास्त रस होता. अर्थातच या गृहकलहाने फंकोचा विजय निश्चित झाला. रशियन सैन्याकडून सिंडिकॅलिस्टांवरच्या एका हल्ल्यात ऑर्वेलला गोळी लागली. तो आणि त्याची पत्नी इंग्लंडला परतले. ऑर्वेलने ही सर्व कहाणी होमेज टु कॅटॅलोनिया या नावाने लिहून काढली. अनेकांना हे आतले पंथभेद चव्हाट्यावर मांडणे आवडले नाही. ऑर्वेलवर चांगल्या राजकीय विश्लेषणाला उगीच वार्ताहरकीच्या पातळीवर आणल्याचा आरोप झाला. ऑर्वेलला मात्र कर्मठ कम्यूनिस्टांची सर्वंकषसत्तावादी, टोटलिटेरियन वृत्ती चांगली समजली.
पण स्पॅनिश यादवीनंतर लगेचच दुसरे महायुद्ध सुरू झाले. ऑर्वेलला बीबीसीच्या आशिया खंडासाठीच्या रेडिओ-विभागात काम मिळाले. गैरइंग्रजांसाठी एक बेसिक इंग्लिश भाषा घडवली गेली, मर्यादित शब्दसाठा वापरणारी. या कामामुळे मरणासन्न साम्राज्यवादी नोकरशाहीशी ओळख झाली. ब्रह्मदेशातला संबंध तसा मध्यमवयी साम्राज्यवादाचा होता; आता वार्धक्य होते. काय केल्याने एखाद्या वादा ला मृत्यू टाळता येईल, यावरही विचार झाला असणारच.
महायुद्ध संपले. हिटलरची जर्मनी, मुसोलिनीची इटली, टोजो-हिराहितांचा जपान. सगळे संपले. फ्रैंकोचा स्पेन मात्र कायम राहिला. कम्युनिस्टविरोधक म्हणून अमेरिका इंग्लंड फ्रैंकोचे कौतुक करू लागले. पुढे 1973-75 च्या काळात तेव्हाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने, रिचर्ड निक्सनने निष्ठावान मित्र म्हणून फ्रँकोला नावाजले. 1975 मध्ये फंकोच्या मृत्यूनंतरच स्पेन सांसदीय रुळांवर आला. पण ऑर्वेलला हे असे होणार याचा अंदाज होता. 1945 सालच्या अॅनिमल फार्म च्या शेवटच्या दृश्यात हे स्पष्ट आहे.
शेतावरच्या जनावरांनी क्रांती केली. नेपोलियन नावाचे शहाणे डुक्कर चार पाय चांगले, दोन पाय वाईट या घोषणेतून राज्यावर आले. त्याच्या दोन शिष्यांत स्पर्धा सुरू झाली. शिकारी कुत्रे जनावरांवरच वापरले जाऊ लागले. सर्व प्राणी समान आहेत हे मूलतत्त्व क्षीण होऊ लागले. नेपोलियनच्या मृत्यूनंतर एका शिष्याने दुसऱ्याला हुसकावून राज्य हिसकून घेतले. मूलतत्त्वात बदल झाला. सर्व प्राणी समान आहेत, पण काही जास्त समान आहेत. अखेर आसपासचे मानवी शेतकरी आणि विजयी डुक्करराजा यांच्यातला फरक कळेनासा झाला. आणि या दृश्यासोबत अॅनिमल फार्म संपले.
ते जगभर अफाट लोकप्रिय झाले. नेपोलियन (लेनिन), विजयी डुक्कर (स्तालिन), हसकावलेले डक्कर (टॉटस्की) ही समरूपता तर स्पष्ट होतीच. सोबतच मेहेनती घोडा (अवजड उद्योग), नटवी घोडी (बॅलेसारखी कलाक्षेत्रे), असल्या ओढूनताणूनच्या तुलनाही होऊ लागल्या. जगातल्या बहुतेक भाषांत पुस्तक पोचले.
पण हा उपहास होता. जीवनाची सर्व अंगे व्यापणारी शासनव्यवस्था, टोटलिटेरियन व्यवस्था हा खरा शत्रू आहे, असे ऑर्वेलचे मत होते. ब्रिटिश साम्राज्यवाद, रशियन कम्यूनिझम, नात्झी फॅसिझम, अशी टोटलिटेरियनिझमची तीन रूपे त्याने जवळून निरखली होती. त्यांची प्रसारतंत्रे, टिकावतंत्रे, चिमूटभरही स्वातंत्र्य न देणारी वृत्ती, हे सारे सूत्रबद्ध करायचे होते. दारिद्र्य आणि स्पॅनिश जखमेच्या साथीला मोठा पाहुणा आला होता, राजयक्ष्मा ऊर्फ क्षयरोग, 1945-50 मध्ये असाध्य असलेला. आणि आपले नियोजित काम करायला ऑर्वेलला एकांत हवासा वाटू लागला.
उत्तरेच्या एका बेटावर त्याने घर केले, सोबतीला एक क्षयरोग नसल्याचे प्रमाणपत्र असलेली गाय. हाडे गोठवणाऱ्या थंडीत पुस्तक लिहायला घेतले. साल 1948. शेवटच्या दोन आकड्यांची उलटापालट करून नाव दिले 1984. पण ही युगत लपवायला नाव अक्षरांतच लिहायचे ठरले, नाईंटीन एटीफोर असे.
जरा वाट बदलतो. व्हाय आय राईट नावाच्या एका निबंधात ऑर्वेलने स्वतःच्या लेखनामागच्या चार प्रेरणा नोंदल्या आहेत. आपले नाव व्हावे ही स्वकेंद्री ईगॉटिस्टिक प्रेरणा आणि काहीतरी सुंदर घडवावे ही आभिरौचिक एस्थेटिक प्रेरणा. या दोन्ही प्रेरणा स्वतःत क्षीण असल्याचे ऑर्वेल नोंदतो.
तिसरी प्रेरणा ऐतिहासिक, हिस्टॉरिकल. आपल्याला समजलेले जगाबाबतचे सत्य नोंदण्याची ही प्रेरणा. काटेकोर बौद्धिक सचोटी हा ऑर्वेलचा लक्षणगुण. आपले जगाचे आकलन शक्य तितक्या नेमकेपणाने जगापुढे मांडायला भाषा स्पष्ट, स्वच्छ हवी. क्रिस्टफर हिचेन्स हा ऑर्वेलचा समीक्षक “भाषा ही सत्याची भागीदार आहे, याच्याशी बांधिलकी असलेला’, असे ऑर्वेलचे वर्णन करतो. “तावदानासारखे स्वच्छ गद्य’, (प्रोज अॅज क्लिअर अॅज अ विंडोपेन), “स्फटिक-स्वच्छ वृत्ती”, (द क्रिस्टल स्पिरिट), अशी विशेषणेही ऑर्वेलसाठी वापरली गेली आहेत. ऑर्वेलच्या आधीच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये, वार्ताकनामध्ये ही प्रेरणा स्पष्ट आहे.
चौथ्या प्रेरणेला ऑर्वेल राजकीय, पोलिटिकल म्हणतो. जग कसे असावे ते सुचवणारी ही प्रेरणा 1984 च्या आधीच्या कादंबऱ्यांमध्ये ही प्रेरणा नेहेमी ऐतिहासिक प्रेरणेच्या आडूनच दिसते. ललितेतर लेखनामध्ये मात्र ही प्रेरणा वाजतगाजत स्पष्ट केलेली आहे. कधीकधी तर ही प्रेरणा प्रचारकी पातळीला जाते, असाही आरोप झाला आहे. पण जिथे ही प्रेरणा क्षीण होती तिथे आपले लिखाण नटमोगरे purple prose झाले आहे, असे ऑर्वेलचे मत आहे. 1984 मध्ये मात्र जांभळ्या रंगाचा मागमूसही नाही. तिथे फक्त काळ्या रंगाच्या छटा आहेत. काळ्या रंगात छटा नसतात, म्हणता? ऐका —
1984 चा नायक एक गरीब वस्तीतली खोली भाड्याने घेतो. खिडकीतून खालच्या अंगणात कपडे वाळत घालत असलेली कामगारवर्गी बाई दिसते. बटबटीत भावनाप्रधान गाणे गुणगुणत असते –
इट वॉज अ होपलेस फॅन्सी,
अँड इट पास्ड लाईक अॅन एप्रिल डे, बट् अ साँग अँड अ वर्ड,
अँड द ड्रीम्स दे स्टर्ड, हॅव स्टोलन माय हार्ट अवे.
किंवा,अमानुष दमन-यंत्रणेने पिळून, चोथा करून टाकून दिलेले तीन जुने पार्टी कार्यकर्ते एका उपाहारगृहात बसलेले असतात. मागे गाणे
अंडर द स्प्रेडिंग चेस्टनट् ट्री
आय सोल्ड यू, अँड यू सोल्ड मी.
तर काय, काळ्या रंगातही छटा असतात. ऑर्वेल त्या नेमक्या दाखवू शकतो, कारण त्याची प्रेरणा पक्की आहे. राजकीय निबंधात अगदी प्रचारकी पम्पलेटांतही तो रस ओतू शकतो. आणि माणसांचे परिस्थितीला प्रतिसाद नोंदण्यातून तो राजकीय मतप्रवाह सुचवू शकतो. आपण वस्तूंच्या, परिस्थितींच्या पृष्ठभागांवर प्रेम करतो, हे तो स्वतःच नोंदतो. फार गूढ अर्थही पृष्ठभागावर दिसतात, जर दाखवणारा सक्षम असेल तर.
ऑर्वेल, स्टाईनबेक, दोघेही मानवतावादी. माणसांची गरिमा कायम राखणारी समाजव्यवस्था हवी. ती फक्त स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या त्रयीतूनच येऊ शकते. यांपैकी कशाचाही संकोच, कशातही अधिक्षेप माणसांच्या गरिमेवर, डिग्निटीवर घाला घालतो. तसे करू पाहणारे सारेच त्याज्य, या सगळ्यावर दोघांचाही जबर विश्वास. पण या साम्यासोबत फरकही होते.
स्टाईनबेकचे वडील जर्मन आणि आई आयरिश. दोन्ही समाजांच्या परंपरा भावनांना मान देणाऱ्या, वाट करून देणाऱ्या. उलट ऑर्वेल अंतर्बाह्य इंग्रज. उनोक्तीला अतिशयोक्तीपेक्षाच नव्हे तर साध्या सत्यकथनापेक्षाही वरचे मानणारी ती परंपरा, स्टिफ अपर लिप ची.
स्टाईनबेकचे अभ्यासाचे क्षेत्र म्हणजे जीवशास्त्र, तेही थेट निसर्ग-निरीक्षणातून शिकायचे. ऑर्वेल घोटीव राज्यकर्त्यांच्या पंडिती परंपरेतून शिकलेला. खेळांच्या मैदानांमधून साम्राज्य घडते, या विश्वासावर बेतलेल्या परंपरेतला.
स्टाईनबेक अन्नसुबत्ता असलेल्या सनी कॅलिफोर्निया त जगला-वाढलेला. त्याची गरिबी तुलनात्मक; थेट अभाव नसलेली. ऑर्वेलचे दारिद्र्य उपासमार आणि दमट थंडीचे. चेहेऱ्यावरच्या रेषा आणि आठ्यांमध्ये धूळ, धूर, मळ रिचवून चेहेरा रेखणारे दारिद्र्य ते.
या साऱ्याचा परिणाम स्पष्ट. स्टाईनबेकला दोन माणसे चवड्यांवर बसून बोलतात यातून समाजरचना दिसते. ऑर्वेल बटबटीत होपलेस फॅन्सी चे गाणे काही महिने कामगार बाईच्या मनात रुजले, यातून तिचे पूर्ण जीवन सुचवतो. स्टाईनबेक “माणसे काही गोष्टी करतात, येवढेच’, असे म्हणून ते पुरेसे मानणारा. ऑर्वेल कादंबरीरूपी निबंधात स्वल्पतंत्र समूहवादाची तत्त्वे आणि वापर (The Theory and Practice of Oligarchical Collectivism) नावाचा थेट निबंधच न लाजता घालतो. स्टाईनबेक नाव न घेताच विल्यम रॅडॉल्फ हार्ट या माध्यम-सम्राटाची टिंगल करतो. ऑर्वेल विचार मर्यादित ठेवू पाहणारी न्यूस्पीक भाषा आणि कादंबऱ्या लिहिणारी यंत्रे कल्पनेने उभारतो.
पण हे तसे वरवरचे फरक. मूळ फरक वृत्तींमधला. स्टाईनबेक उपरोधाने, “राज्यांनो, या माणसांवर बाँब टाका-नाहीतर मराल!” असे सांगतो. ऑवेल त्याच्या दुनियेसाठी माणसाच्या चेहेऱ्यावर सदासाठी रोवलेली बुटाची टाच हे रूपक वापरतो. आशावाद-निराशावाद.
स्टाईनबेकला मूल गमावलेली तरुणी भुकेल्या म्हाताऱ्याला स्तन्य पाजताना दिसते. ऑर्वेलचा नायक क्लेश टाळण्यासाठी प्रेयसीचा बळी देत “हे ज्यूलियाला करा!” असे म्हणतो. आशावाद-निराशावाद.
स्टाईनबेकला भांडवलवादात अपरिहार्यपणे उपजणाऱ्या विकृती दुरुस्त करता येतीलसे वाटते. ऑर्वेल नायक-नायिका पकडले जाण्याच्या रुद्रभीषण घटनेत एक अतुलनीय काटकसर गाठतो.
“आपण मेलेलो आहोत.” तो म्हणाला.
“आपण मेलेलो आहोत.” ज्यूलियाचा कर्तव्यपरायण प्रतिसाद आला.
“तुम्ही मेलेले आहात.’ त्यांच्या मागचा लोखंडी आवाज म्हणाला.
दोघेही साधारणपणे एकाच ठिकाणाहून माणसांकडे, त्यांच्या व्यवहारांकडे, त्यांच्यावर सत्ता गाजवू पाहणाऱ्यांकडे बघतात.
स्वस्थ, सुदृढ, सुबत्तेत वाढलेल्याला आपत्ती-विपदा तात्पुरत्या वाटतात. शेवट गोडच होईल असे वाटते.
आजारी, गांजलेल्याला सगळे नरकप्राय पातळीलाच स्थिरावेल अशी भीती वाटते.
फरक मुख्यतः तब्येतीचा, पण ती कालपरवाची नव्हे, आयुष्यभराची.
193, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपर 440 010