समता (भाग 2) पुस्तकपरिचय : द स्पिरिट लेव्हल

[गेल्या अंकात विषमता आणि चिंता, विषमतेचे माप, आसास निर्देशांक हे भाग पूर्ण आले. आलेख आणि सांख्यिकी याची सुरुवात येथे पुन्हा देत आहोत.]
TSL मधील सर्व आलेख खालच्या डाव्या कोपऱ्यात सुरू होतात. आडव्या अक्षावरील मापे उजवीकडे वाढत जातात, तर उभ्या अक्षावरील मापे वरच्या दिशेने वाढत जातात. अशा आलेखांत डावीकडे खाली सुरू होऊन उजवीकडे वर जाणारी रेषा दोन मापांचा थेट संबंध दाखवते; म्हणजे आडवे माप जास्त तर उभेही माप जास्त. याउलट डावीकडे वरून सुरू होऊन उजवीकडे खाली जाणारी रेषा व्यस्त संबंध दाखवते, की आडवे माप जास्त तर उभे माप कमी.
या रेषा संबंधसूत्र (Corelation Theory) वापरून काढल्या जातात. हे गणिती शास्त्र आहे व त्यात मेरी मर्जी प्रकार नाही. माहितीचा, मापांचा संच ठरला, की संबंधाचा आलेखही ठरलाच. जेव्हा मापबिंदू आ.3 सारखे आलेखाच्या जवळ दाटलेले असतात तेव्हा निकटचा संबंध आहे, असे ठरते. उलट जर आ.4 सारखे मापबिंदू विखुरलेले असतील तेव्हा सबंध नाही, किंवा असलाच तर क्षीण आहे, असा निष्कर्ष निघतो.
TSL च्या युक्तिवादाचा तपशील (God/devil is in the details!)
1. परस्पर-विश्वास
वर्ल्ड व्हॅल्यूज स. या संस्थेने 1999-2001 या काळात जगातल्या अनेक देशांतल्या अनेक लोकांना एक प्रश्न विचारला : “बहुतेक माणसे विश्वासार्ह असतात, हे विधान तुम्हाला पटते का?” नॉर्वे, स्वीडन यांसारख्या सम देशांत 65%-70% लोकांना विधान पटत होते. सिंगापूर, पोर्तुगाल या विषम देशांत इतरांना विश्वासार्ह मानण्याचे प्रमाण फक्त 10%-15% होते.
अविश्वासातून विषमता येते, की विषमतेमुळे इतर लोक बेभरवशाचे वाटू लागतात? एरिक उस्लानर हा मेरीलंड विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यासक-अध्यापक आहे. इस.स.1960 ते 1998 या काळातल्या अभ्यासांमधून तो त्याचे मत सांगतो, “विश्वासाचा विषमतेवर थेट परिणाम होत नाही. कार्यकारणभावाचा बाण (causal arrow) विषमतेपासून सटतो.” किती टक्के लोक विश्वासार्ह वाटतात, या प्रश्नाच्या अभ्यासाचा आलेख जिनी निर्देशांकाशी ताडला गेला. विश्वासार्हता अगदी नेमकेपणाने विषमतेच्या व्यस्त प्रमाणात जाताना दिसते : विषमता जास्त तर विश्वासार्हता कमी.
समाजातले स्त्रियांचे स्थान, देशांच्या उत्पन्नाचा किती भाग परदेशांना मदत म्हणून दिला जातो, अशा वेगवेगळ्या अप्रत्यक्ष वाटांनी विषमता सामाजिक संबंधांमधल्या परस्पर-विश्वासाला मारक ठरताना दिसते.
2. हिंसेचे मूळ
हार्वर्ड वैद्यकीय विद्यालयातल्या हिंसा अभ्यासकेंद्राचा संचालक जेम्स मिलिगन सांगतो, की त्याने पाहिलेल्या सर्व हिंसेच्या घटना कोणीतरी अपमानित होणे आणि त्याने त्या लज्जास्पद अपमानाचे निराकरण करू जाणे, यांतूनच होतात. (शूर्पणखेच्या अपमानातून रामायण आणि दुर्योधनाच्या मयसभेतल्या अपमानातून महाभारत, अशी दोन अपमान निराकरणाची उदाहरणे तर आपण जाणतोच!)
दर दशलक्ष प्रजेमागे दरवर्षी होणाऱ्या खुनांचे प्रमाण थेटपणे विषमतेशी संबद्ध आहे; सम जपानमध्ये 5, तर विषम पोर्तुगालमध्ये 35. आलेख स्पष्ट, थेटचा आहे, अमेरिका (USA) याला अपवाद आहे. त्या देशात दर दशलक्ष प्रजेमागे दरवर्षी 65 खून होतात! जवळपास USA इतक्याच विषम UK मध्ये मात्र याच्या बऱ्याच कमी, 15च्या आसपास खून होतात.
खुनी व्यक्तींच्या वयांचेही विश्लेषण केले गेले आहे. बहुतेक खून 15 ते60 वर्षे वयांचे लोक करतात, तेही मुख्यतः पुरुष. हा कर्तबगारीचा काळ आहे, ज्या काळातील अपमान सर्वांत जास्त दुखतात. त्यातही गपंचविशी हे सर्वांत जास्त खून करण्याचे वय आहे! या अभ्यासांतही USA तील खुनांची प्रमाणे UK तील प्रमाणांच्या कैक पट आहेत. याचा संबंध बंदुका-पिस्तुले यांच्या उपलब्धतेशी आहे.
ऐतिहासिक कारणांमुळे USA मध्ये हत्यार बाळगण्याचा अधिकार जवळपास मूलभूत नागरी हक्कांसारखा मानला जातो. हा घटक विचारात घेतला तर काय होते याबद्दल TSLचे उत्तर संदिग्ध आहे : “जर बंदुकांच्या मालकीचाही विचार केला तर खुनांच्या प्रमाणाचा विषमतेशी संबंध जरा जास्तच घट्ट होतो” (If we allow for gun ownership, we find a slightly stronger relationship between inequality and homicides).
या साऱ्यामुळे TSL विषमतेला रचनात्मक हिंसा मानतो.
3. कारावास
याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे प्रजेतील कैद्यांचे प्रमाण. जपानसारख्या सम देशात दर लाख माणसांपैकी चाळीसेक माणसे तुरुंगांत असतात, तर सिंगापूरमध्ये हे प्रमाण तीनशेजवळ आहे. USA चे प्रमाण (नेहेमीसारखे!) 576 आहे. (स्रोत : यूनो).
जास्त विषम समाज आपल्या प्रजाजनांना जास्त सहजपणे तुरुंगांत डांबतात. नेदर्लंड्समध्ये गुन्हेगाराला विचारी आणि भावनाशील व्यक्ती मानून त्याच्याशी संवाद साधला जातो व गरज वाटल्यास मानसोपचारही केला जातो. जपानची पद्धतही लवचीक आहे. उपरती झालेल्या, पश्चात्ताप व्यक्त करणाऱ्या गुन्हेगारांवर सहसा विश्वास ठेवला जातो, व शिक्षा सौम्य केली जाते. या समाजांत शिक्षा हा दुरुस्ती चा मार्ग असतो.
याउलट अमेरिकन तुरुंगांमध्ये गंभीर मनोविकार उत्पन्न होतात, असे जॉन इर्विन या गुन्हेगारीशास्त्र्याचा अहवाल दाखवतो. कैद्यांना एकांतवासात डांबणारे सुपरमॅक्स दर्जाचे USA तले तुरुंग यूनोच्या छळांबाबतच्या समितीला अमानुष वाटतात. ओबामालाही बंद पाडता न आलेल्या ग्वांतानामोचा तुरुंग या प्रकारचा आहे. जरी USA मध्ये तुरुंगांना सुधारगृह (correctional facility) म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात ते खून का बदला खून (retributive) वृत्तीचे असतात.
4. वर्गबदल-सोय
एखादी व्यक्ती आपला जन्मजात वर्ग सहज बदलू शकत असेल, तर वर्गबदल सोईचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीची प्रजा आपल्या कर्तृत्वाने किंवा नाकर्तेपणाने मोजपट्टीत वर-खाली जाऊ शकत असेल, तर तिथेही वर्गबदल सोईचा असतो. पण असे बदल शोधायला दीर्घकाळ चालणारे अभ्यास लागतात. असा एक अभ्यास लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने केला. त्यात आठच देश तपासले गेले. नॉर्वे, स्वीडन, फिनलंड व डेन्मार्क या सम देशांत वर्ग बदलण्याची सोय आढळली, तर UK, USA या विषम देशांत ती आढळली नाही. कॅनडा व जर्मनी या दोन टोकांच्या अध्येमध्ये आहेत.
आईवडलांच्या सामाजिक स्थानाचा परिणाम मुलांच्या सामाजिक स्थानावर कितपत होतो, याबाबतचा एक अहवाल द स्टेट ऑफ वर्किंग अमेरिका 2006-07 या नावाने प्रकाशित झाला. तो केवळ USA पुरता मर्यादित आहे. त्यात मुलांच्या उत्पन्नातला किती टक्के भाग पितरांच्या उत्पन्नांनुसार ठरतो, हे ठरवले गेले. 1950-60 या दशकात पुत्र उत्पन्नात 16% भाग पिता-उत्पन्नाने ठरत असे. 1980-90 मध्ये हे प्रमाण 11% इतके खाली आले होते. 2000-10 मध्ये मात्र ते झपाट्याने वाढून 34% झाले. हा काळ USA साठी वाढत्या विषमतेचा मानला जातो.
गरीब लोकांना झोपडपट्ट्यांबाहेर पडणे कितपत सोपे जाते याचे अभ्यास UK, USA मध्ये झाले आहेत. त्यांतही विषम समाजांत वर्गांच्या सीमा अभेद्य झाल्याचे दिसते.
वरच्या माणसाने खालच्यांना दाबण्याने खालची माणसे आपल्या खालच्यांना दाबू लागतात. ही दाबादाब वास्तविक नसली, काल्पनिक असली तरी पुरते. TSL या प्रकाराबाबत मजेदार किस्से-कहाण्या पुरवते, पण त्यांतून विषम समाजांमध्ये वर्गसीमा ओलांडणे अवघड जाते याचा ठोस पुरावा मिळत नाही.
वरील चार सामाजिक समस्याच्या तुलनेत पुढील आरोग्याबाबतच्या समस्यांविषयीचा पुरावा सज्जड आहे.
5. मानसिक स्वास्थ्य
जागतिक आरोग्य संघटने ने (WHO) वेगवेगळ्या देशांतील मानसिक स्वास्थ्य तपासण्याचा एक प्रकल्प 1998 मध्ये सुरू केला. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये चांगली मनःस्थिती म्हणजे काय, याबाबत वेगवेगळ्या धारणा असतात. WHO ने ज्या देशांबाबत पाहणी केलेली नाही अशा तीन देशांमध्ये इतर मार्गांनी मानसिक स्वास्थ्याबाबत अंदाज बांधता येतात. TSL या एकूण बारा देशांमधील मनोरुग्णांचे प्रमाण विषमतेशी ताडून दाखवते. (WHO बाहेरील) जपान या सम देशात सुमारे 9% लोकांना मानसिक समस्या आहेत, तर (WHO तील) USA त प्रमाण 25% पेक्षा जास्त आहे.
यापेक्षा तुलना करण्यास सोपा असा वर्ल्ड ड्रग रिपोर्ट चा व्यसनग्रस्तता निर्देशांक आहे. व्यसनेही अखेर मानसिक समस्यांकडेच निर्देश करतात. हा निर्देशांक स्पष्टपणे वाढत्या विषमतेसोबत वाढताना दिसतो.
6. आरोग्य आणि आयुर्मान
TSL नमुन्यातील राष्ट्रांमध्ये आयुर्मानाचा उत्पन्नांशी संबंध नाही (आ.4), पण विषमतेशी संबंध आहे (आ.3), हे आपण पाहिलेच आहे. पण यात एक शक्यता अशी आहे, की काही श्रीमंत देश आरोग्यावर फारसे लक्ष देत नसतील. ही शक्यता तपासायला TSL आयुर्मानाचा दरसाल-दरडोई वैद्यकीय खर्चाशी संबंध तपासते (आ.5). आश्चर्य म्हणजे, वैद्यकीय खर्चाचा आयुर्मानाशी संबंध दिसत नाही! सर्वांत खर्चिक आरोग्यसेवा पुरवणारे USA खालून तिसरे आयुर्मान दाखवते, तर आरोग्यसेवांवर फार खर्च न करणारे जपान व स्वीडन भरपूर जगणाऱ्यांचे देश आहेत.
विषम समाजांमध्ये ताण व चिंता नित्याच्या असतात (chronic). माणसांची शरीरे तात्कालिक ताण सहज हाताळतात, तर सततचे ताण शरीरांना इजा करतात.
सुबत्तेने सार्वजनिक आरोग्य सधारते व साथींचे रोग सौम्य होतात. यानंतर हृद्रोग, कॅन्सर यांसारखे रोग मारक ठरू लागतात. एके काळी असे मानले जात असे, की हे रोग जास्त काम पडणाऱ्यांना होतात, तर कमी काम करणारे रोगांना फारसे बळी पडत नाहीत. UK तील व्हाईटहॉल 1 व 2 हे अभ्यास मात्र असे दाखवत नाहीत. हे अभ्यास UK च्या मंत्रालयासाठी, नोकरशाहीसाठी केले गेले, त्यांचा निष्कर्ष असा, की हृद्रोग व काही प्रकारचे कॅन्सर्स निम्न दर्जाच्या नोकरशहांमध्ये जास्त दिसतात, तर उच्च दर्जाच्यांमध्ये कमी. सोबतच काही श्वसनरोग, काही पचनरोग, पाठीचे (कण्याचे) विकार, विकारी खिन्नता, आत्महत्या, आजारामुळे अनुपस्थिती वगैरे बाबीही साहेब लोकांपेक्षा बाबू लोकांत जास्त असतात.
एकूणच हृद्रोगाच्या बाबतीत वर्गभेद तीव्र आहे. ती समस्या श्रीमंत एक्झिक्यूटिव्हस्पेक्षा कचोरी-समोसेवाल्या लोकांना जास्त प्रमाणात मारते! उलट प्रोस्टेट कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर हे प्रश्न वर्गनिरपेक्ष आहेत.
एक विक्षिप्त आणि मजेदार अभ्यासही पाहायला हवा. जेव्हा एखादा देश युद्ध लढत असतो तेव्हा विषमता कमी होते. गरीब लोकांना जास्त रोजगार मिळाल्याने त्यांची स्थिती सुधारते, तर उच्चवर्गीयांच्या संभाव्य नफेखोरीला आळा बसतो. यातच जर अन्न मर्यादित असल्याने रेशन-व्यवस्था लागू झाली तर गरिबांचा पोषणस्तरही सुधारतो. एकूण विसाव्या शतकातील प्रत्येक दशकात UK तील आयुर्मान किती वाढले ते तपासले गेले. 1911-20 (पहिले महायुद्ध) व 1941-50 (दुसरे महायुद्ध) या काळांत (सैनिक वगळता) लोकांची आयुर्माने 6-7 वर्षांनी वाढली. अन्य दशकांच्या तुलनेत ही वाढ दुप्पट किंवा जास्त होती. कोणत्या का कारणाने असेना, समता आरोग्यदायी असते!
7. लठ्ठपणा
लठ्ठपणा मोजायला बॉडी मास इंडेक्स (BMI) हे माप वापरतात. त्यानुसार कमी वजन, सामान्य वजन, जास्त वजन व लठ्ठ, असे चार वर्ग पाडले जातात. लठ्ठपणासोबत अनेक आजार येतात, त्यामुळे ती बाब साध्या आरोग्यसमस्यांपेक्षा सुटी केली जाते. तिचे मोजमापही जास्त नेमकेपणाने करता येते.
विषमता जास्त तर लठ्ठपणा जास्त, हे अत्यंत स्पष्ट आहे. जास्त विषम समाजात जास्त कॅलरी खाल्ल्या जातात, असेही काही अभ्यास दाखवतात. व्यायामाचे प्रमाणही वाढत्या विषमतेसोबत घटते, असे मानायला जागा आहे.
ताणाखालील माणसे नुसते जास्तच खातात असे नाही तर त्यांचे ज्यादा अन्न अनारोग्यकारक प्रकारचे असते असेही दिसून येते. मांस (विशेषतः लाल मांस), चीज, दारू, चॉकलेट, असे अन्न ताणाच्या स्थितीत माणसांना जास्त मोहवते. फास्ट फूड, चाट, समोसे-कचोऱ्या, कोलांचे प्रकार, हे सारे अनारोग्यकारक असते. (मुंबईत नवरा-बायको दोघेही काम करतात अशी झोपडपट्ट्यांतील कुटुंबे फारदा वडा-पाव व तत्सम अन्नाकडे वळतात. यावर उपाय म्हणून काही चळवळी झोपडपट्ट्यांतील स्त्रियांसाठी स्वयंपाक व पोषण यांचे वर्ग चालवतात!)
8. बालमृत्यू
दर हजार जन्मांमागे किती बालके पाच वर्षांच्या आत मरण पावतात, हेही थेटपणे सामाजिक विषमतेशी निगडित आहे. जपान, स्वीडन येथील तिनाजवळचे प्रमाण USA त साताला जाते, पोर्तुगाल, न्यूझीलंडही सहाला पोचतात.
9. कुमारवयातील गर्भधारणा
पंधरा ते एकोणीस वर्षे वयांत मुलांना जन्म देण्याचे प्रमाण विषमतेसोबत वाढत जाते. जपानमध्ये दर हजारांत पाचाजवळ प्रमाण आहे, तर UK व न्यूझीलंडमध्ये 30 आणि USA मध्ये 50 च्याही वर! हे बहुतकरून गरीब लोकांतच जास्त आढळते. एकूण प्रजेला उत्पन्नांनुसार चार भागांत वाटले, तर सर्वांत गरीब लोकांत 4.8%, मग 2.9%, त्यानंतर 2.4% व सर्वांत श्रीमंतांमध्ये 1.2% या प्रमाणांत कुमारवयात मुलांना जन्म दिला जातो, असा USA तील एक अभ्यास दाखवतो. गरीब लोकांमध्ये हा प्रकार का दिसतो, इतरांपेक्षा प्रमाण जास्त का असते, याची काही कारणे TSL सुचवते. परंतु विषमतेशी संबंध कसा जुळतो हे तितकेसे स्पष्ट नाही. संबंध असतो हे मात्र नक्की.
10. शिक्षण
तेवीस श्रीमंत देशांच्या या विश्लेषणात एक भारतीय मुलांबाबतचे संशोधन उद्भूत केले आहे, व तेही अत्यंत चपखल बसणारे. 2004 साली वर्ल्ड बँकेच्या दोन अर्थशास्त्रज्ञ, कार्ला हॉफ आणि प्रियंका पांडे यांनी एक प्रयोग केला. भारतातील वेगवेगळ्या खेड्यांतील 321 उच्च-वर्णी मुलगे व 321 खालच्या जातीचे मुलगे, असे दोन गट घडवले. सर्व मुले 11-12 वर्षांची होती. कोणालाच आपली जात सांगू दिलेली नव्हती. या सर्व मुलांना वर्तमानपत्रांच्या बाल-पुरवण्यांत येतात तशी चक्रव्यूह कोडी (nazes) सोडवायला दिली. ठराविक वेळात किती कोडी सोडवता आली ते मोजले गेले. दोन्ही गटांची कामगिरी जवळपास सारखीच होती. खरे तर खालचा गट जरा चांगला होता.
नंतर प्रत्येक मुलाला आपले नाव, वडलांचे व आज्याचे नाव, गावाचे नाव व जात जाहीर करायला सांगितले गेले. सर्व मुलांना पुन्हा चक्रव्यूह कोडी सोडवायला दिली. आता मात्र वरच्या जातीच्या मुलांची कामगिरी सुधारली, तर खालच्या जातीच्या मुलांची ढेपाळली! वरच्या जातींची सरासरी कामगिरी खालच्या जातींच्या पुढे गेली..
आपल्याकडे इतर लोक कोणत्या दृष्टीने पाहतात, आपले काय मूल्यमापन करतात यानुसार आपली शैक्षणिक कामगिरी बदलते. आपल्याला कमी लेखले गेले, तर आपण खऱ्या क्षमतेपेक्षा कमी कामगिरी करतो! ह्या प्रकारचे प्रयोग USA तील गोरे काळे, मुले-मुली अशा वेगवेगळ्या जोड्यांबाबत केले गेले आहेत. सगळीकडेच हॉफ पांडे प्रयोगातल्यासारखे फरक दिसतात. अमेरिकन प्रयोगकर्ते असे मानतात, की ठोकळेबाज मूल्यमापनांनुसार आपण हलके मानले जातो, ही भावना कामगिरी बिघडवते. हा स्टीरिओटाईप थ्रेट (stereotype threat) प्रकार इतरत्रही भेटतो. (अगदी भारतीय क्रीडापटूंमधला किलर इन्स्टिंक्टचा अभाव ही मुळात ठोकळेबाज मूल्यमापनाच्या धास्तीतून उपजतो, असे माझे मत आहे.)
सुस्थित आणि सुशिक्षित पालकांची मुले गरीब आणि नुकत्याच शिकू लागलेल्या घरांमधील मुलांपेक्षा चांगली कामगिरी करतात, हे अनेकानेक अभ्यास दाखवतात. 2000 सालापासून अनेक देशांत प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टूडंट असेसमेंट (PISA) हा शिक्षण-मापनाचा प्रकल्प अस्तित्वात आहे. पंधरा वर्षे वयाच्या मुलांचे मूल्यमापन दर तीन वर्षांनी केले जाते. वाचन, गणित व वैज्ञानिक साक्षरता या तीन बाबी तपासल्या जातात. मुले ज्ञान व कौशल्ये किती चांगल्या प्रकारे वापरतात यावर लक्ष केंद्रित केले जाते. आणि स्पष्टपणे विषमता जास्त तर PISA कामगिरी हलकी, असा प्रकार दिसतो. USA प्रांतांमध्येही हाच कल दिसतो; सोबतच अर्ध्यातून शिक्षण सोडणाऱ्यांची प्रमाणे वाढत्या विषमतेसोबत वाढताना दिसतात.
पालकांचा शिक्षणस्तर आणि पाल्यांची साक्षरता यांच्यात थेट संबंध असल्याचे डग्लस विल्यम्सचे संशोधन दाखवते. तो कॅनडातील न्यू बुन्स्विक विद्यापीठात शिक्षणशास्त्र शिकवतो. त्याने चार देशांचा अभ्यास केला, फिन्लंड, बेल्जियम हे सम देश, आणि UK, USA विषम देश, सातत्याने या चार देशांतील विद्यार्थी फिन्लंड, त्याखाली बेल्जियम, नंतर UK व शेवटी USA असा क्रम दाखवतात. पण देशादेशांमधले फरक केवळ प्राथमिक शिक्षण घेतलेल्या पालकांच्या मुलांत जास्त आहेत, आणि उच्चशिक्षित पालकांच्या मुलांत कमी आहेत!
एक शेवटचा मुद्दा नोंदून हा तपशील संपवू. किती मुले कमी कौशल्याची कामे करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतात, हे UNICEF ने तपासले. सम समाजांत अश्या हलक्या महत्त्वाकांक्षा जास्त प्रमाणात भेटतात, तर विषम समाजांमध्ये हे प्रमाण कमी
असते. याचा अर्थ असा की विषम समाजांतील विद्यार्थी जास्त हळवे असतात!
कार्यकारण?
TSL ची मांडणी पाहिल्यावर एक शेरा येतो, की हे तर सारे उघडच होते. पूरक मत येते, की विषम समाजांत गरीब लोक जास्त प्रमाणात असतात, आणि म्हणून समस्या जास्त असतात. त्या इतक्या जास्त असतात, की एकूण देशाचीच आकडेवारी बिघडते. हे खरे नाही! TSL यासाठी बरेच पुरावे देते; त्यांपैकी एक आहे इंग्लंड (व वेल्स) आणि स्वीडन यांच्यातील तुलनेबाबतचा.
एकटी आई मूल वाढवत असताना इंग्लंडात दर हजारी बालमृत्यू चौदाजवळ आहेत, तर स्वीडनमध्ये सात. आईबाप दोघेही असतानाची स्थिती बापाच्या सामाजिक स्थानानुसार तपशिलात तपासली आहे. समाजाचे सहा भाग पाडले आहेत, आपण त्यांना 1 ते 6 असे क्रमांक देऊ , पहिला तो सर्वांत कमी स्थानाचा, तर सहावा सर्वोच्च सामाजिक स्थानाचा. आकडे दर हजार जन्मांमधल्या बालमृत्यूंचे आहेत.
सामाजिक स्थान इंग्लंड स्वीडन
पहिला वर्ग 13 5
दुसरा वर्ग 12 6
तिसरा वर्ग 9 6
चौथा वर्ग 8 3
पाचवा वर्ग 8 5
सहावा वर्ग 7 6
(TSL मधील आकृतीवरून आकडे ठरवले आहेत).
अशीच एक तुलना UK व USA साठी आहे, जिच्यात पाच रोगांबाबत समाजाच्या तीन वर्गांची तुलना आहे. प्रत्येक रोगाबाबत, प्रत्येक वर्गाबाबत USA तील प्रमाणे UK तील प्रमाणांपेक्षा जास्त आहेत; आणि त्या मानाने एकाच देशातील उच्च, मध्यम व निम्न वर्गांमधले फरक कमी आहेत. मायकेल मॅौट हा साथ-शास्त्री तर सांगतो, की तुम्ही सर्व गरिबांच्या आरोग्य-समस्या काढून टाकल्या तरी एकूण समाजांतल्या आरोग्य-विषमता बदलत नाहीत! जपान्यांच्या आयुर्मानापेक्षा USA वासी सरासरीने 4.5 वर्षे कमी जगतात. पण याचा अर्थ असा नव्हे, की USA तील सर्वांत गरीब 10% लोक पंचेचाळीस वर्षे कमी जगतात, तर इतर 90% जपान्यांइतकेच जगतात.
(ह्याच्यासारखे एक वेगळे उदाहरण आठवते. एका स्नेह्यांशी भारतीय खेळाडूंच्या ऑलिंपिक कामगिरीबाबत बोलणे सुरू होते. त्याकाळी भारतात दरसाल-दरडोई क्रीडाखर्च पंचेचाळीस पैसे असे, आणि पूर्व जर्मनीत साडेचारशे रुपये! स्नेह्यांचे म्हणणे असे, की अनेक श्रीमंत भारतीय दरवर्षी साडेचारशे रुपयांपेक्षा जास्त रकमा खेळांवर खरचतात. त्यांचा आकडा नक्कीच एखाद्या कोटींवर जातो. मग नॉर्वे-स्वीडनसारख्या एखाद्या कोटीच्या कमी लोकसंख्येच्या देशाइतकीही भारतीय कामगिरी का नाही? आकडेवारीसाठी एखाद्या समूहाचा पूर्णच विचार करता येतो, भाग निवडून त्यांवर उत्तरे बेतता येत नाहीत. जर एखादी कामगिरी सरासरीशी निगडित असेल, तर ती वेगवेगळे भाग सुटे करून मोजल्यास चूक होईल.)
याच संदर्भात TSL मध्ये इंग्लंड व वेल्सच्या परगण्यांबाबत (Counties) एक आलेख आहे. उभ्या अक्षावर मृत्युदर आहेत, तर आडव्या अक्षावर परगण्यातील लोकांची सरासरी (खरेतर मध्यस्थित किंवा median) उत्पन्ने आहेत. दोन रेषा काढलेल्या आहेत, एक सम परगण्यांसाठी आणि दुसरी विषम परगण्यांसाठी. दोन्ही रेषा वाढत्या उत्पन्नांसोबत घटते मृत्युदर दाखवतात. पण विषम रेषा सम रेषेच्या वर आहे, म्हणजे विषम परगण्यांत मृत्युदर जास्त आहे.
अर्थातच दर देशाबाबत काही विशिष्ट बाबी आकडेवारीला जराजरा वैशिष्ट्य पुरवतात. जसे, विषम देशांच्या यादीत पहिल्या सहांत USA, UK, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येतात (उरले सिंगापूर व पोर्तुगाल). यातून एक सूचना आली, की इंग्रजी भाषकांचे देश जास्त समस्याग्रस्त असतात! पण कॅनडा विषमतेत बारावा आहे, इंग्रजी बोलतो, व कमी समस्याग्रस्त आहे. स्पेन व पोर्तुगाल सख्खे-शेजारी आहेत. भाषा सारख्या, संस्कृती व इतिहास सारखे. विषमतेत मात्र पोर्तुगाल तिसरा, तर स्पेन चौदावा समस्यांतही पोर्तुगाल स्पेनच्या बराच वर!
सामाजिक शास्त्रांमध्ये नियंत्रित प्रयोग करून तत्त्वे, सूत्रे निष्पादित करता येत नाहीत. एका तबकडीवरील विषमता वाढवून इतर तबकड्यांवरील समस्यांचे काय होते ते तपासता येत नाही. उपलब्ध माहितीवरून सूत्रे सुचतात, व शक्य तेवढ्या स्पष्टीकरणांचा विचार करून सामान्य तत्त्वे रचावी लागतात.
1950 साली USA चे आयुर्मान जवळजवळ सर्वोच्च होते, तर जपानचे बरेच खाली. 1990 पर्यंत जपान जास्त जास्त सम होत गेला, तर USA विषम. आज जपानी आयुर्मान USA च्या बरेच पुढे आहे.
विषमता व आसास यांचे चढउतार एकत्रपणे होतात. असे तर नसेल, की समस्याग्रस्त माणसे कमी कमावू लागतात, व त्यामुळे त्यांच्या समाजांत विषमता येते? आणि यातून समस्या जास्त तर विषमता जास्त, हा संबंध घडतो? (इथे पुन्हा समाजाचे तुकडे पाडले जात आहेत!).
TSL चा निष्कर्ष असा : एक समाज आणि दुसरा समाज यांच्यात सामाजिक स्थान निम्न होण्यासोबत समस्याही वाढून प्रचंड फरक पडतात, याचे स्पष्टीकरण विषमता या सामान्य घटकाच्या विचाराशिवाय करणे अवघड आहे. विषमता अत्यंत मारक ठरते. (It is very difficult to see how the enormous variation which exists from one society to another in the level of problems associated with low social status can be explained without accepting that inequality is the common denominator, and a hugely damaging force.)
अल्टिमेटम चा खेळ
माणसे हावरट असतात, त्यांना जास्त हवे असते, इतरांपेक्षा जास्त हवे असते, हे सारे उघडपणे दिसत असते. याचाच परिपाक म्हणून इतरांवर सत्ता गाजवणेही माणसांना आवडताना दिसते. माणूस हा कपि-गटा तला प्राणी आहे. बबून या एका कपीवर एक अभ्यास बेतला गेला. बबून्सच्या अंगांवरील जखमा व जुन्या जखमांचे व्रण तपासून त्यांचे मूळ शोधले गेले. सर्वांत जास्त प्रमाण आढळले, ते उच्च-बबून्सनी निम्न-बबून्स वर हल्ले करण्यातून झालेल्या जखमांचे! तेव्हा श्रेणीबद्ध, उच्चनीच विभागणी असलेले, विषम समाज हे कपि-गटांमध्ये अपरिहार्य मानायला हवेत का? तसे जर असेल तर माणसे सम समाज घडवूच शकणार नाहीत. जर कुठे असे घडलेही, तर तो क्षणभंगुर, अनैसर्गिक प्रकार असेल.
पण एक अर्थशास्त्रीय खेळ माणसे काही बाबतीत कपींच्या श्रेणी घडवण्यापासून दूर सरकल्याचे दाखवतो. या खेळाला द अल्टिमेटम गेम (The Ultimatum Game) म्हणतात. खेळाचे स्वरूप असे — एखाद्या समूहातून स्वैरपणे माणसे निवडून त्यांच्या स्वैरपणे जोड्या पाडल्या जातात; पण एका जोडीतील माणसांना एकमेकांना भेटू दिले जात नाही. प्रत्येक जोडीतील एक जण दाता (proposer) असतो, तर दुसरा पाता (responder). प्रत्येक दात्याला काही एक सर्वांपुढे जाहीर केली गेलेली रक्कम दिली जाते. त्या दात्याने आपण या रकमेपैकी किती भाग पात्याला द्यायला तयार आहोत, ते मध्यस्थांमार्फत सांगायचे. पात्याने केवळ तो ही रक्कम घेऊ इच्छितो की नाही ते सांगायचे. जर पात्याने रक्कम घेण्यास नकार दिला, तर दोघांनाही काहीही मिळत नाही. पण जर पात्याला दात्याने देऊ केलेला वाटा मंजूर असला, तर दाता व पाता दोघांनाही पटलेले वाटे दिले जातात. एक महत्त्वाची बाब म्हणजे हा खेळ एकदाच खेळला जातो. “यावेळी असे असे वागून पाहू. न जमल्यास पुढच्या वेळी जास्त देऊ करू/कमी मान्य करू.”, असा विचार करायला वाव नसतो. अनुभवातून धोरण ठरवता येत नाही. एकच संधी, आणि तीही “घ्यायचे तर घे, नाहीतर दोघेही बुडू.”, अशी. अल्टिमेटम, निर्वाणीचा निरोप, तो हा!
या खेळात खरे तर पात्याने जे मिळेल ते घ्यायलाच हवे, कारण पर्यायच नाही. दात्याला मात्र फार कमी वाटा देऊ करणे धोक्याचे, कारण पात्याने तो वाटा नाकारला तर सारेच मुसळ केरात! किमान मान्य होईलशा वाट्यापेक्षा काहीही जास्त देणे आत्मघातकी(!), कारण ते स्वतःचे हित साधत नाही. चिंपांझी नेमके असे वागतात माणसे मात्र असे वागत नाहीत.
माणसांना जेव्हा हा खेळ खेळायला लावता तेव्हा “अर्धे देतो” असे म्हणणाऱ्या दात्यांची संख्या सर्वाधिक होती. वेगवेगळ्या गटांमध्ये हाच प्रकार दिसला. गटांमध्ये दात्यांनी सरासरीने किती देऊ केले, तर 43% ते 48%
पाते 20% पेक्षा कमी देऊ केले तर ते नाकारताना दिसले. यात त्यांचा तोटा होता (माझा एक पंजाबी मित्र म्हणत असे तसे “ले ले ओय! बीस टके, कम नहीं होते, तुझ जैसे फटीचर के लिये!”). पण फार कमी देऊ पाहणाऱ्या दात्याला अद्दल घडावी म्हणून नकार दिला जाई. खरे तर अद्दल घडवणेही निरर्थक आहे, कारण खेळ पुन्हा खेळला जाणार नसतो. तरी दुसऱ्याला शिक्षा करायची मानवी इच्छा निःस्वार्थी शिक्षा किंवा परोपकारी शिक्षा (altruistic punishment) म्हणून ओळखली जाते. .
पण जास्त महत्त्वाची बाब ही, की “कसे वागणे योग्य आहे?” या प्रश्नाला बहुतेक वेळा समतावादी उत्तर येते. माणसे बहुशः कर्मठ स्वार्थी नसतात! पूर्णपणे अनोळखी व पुन्हा कधीही ज्याच्याशी संबंध येणार नाही अशांशीही बरोबरीने वागण्याचा प्रयत्न केला जातो.
शरीरशास्त्र व शारीरक्रियाशास्त्र
प्राणिसृष्टी जर एक वंशवृक्षाच्या रूपात दाखवली तर माणसे इतर कपींपासून सुमारे साठ-सत्तर लक्ष वर्षांपूर्वी सुटी झाली. त्याच वेळी मूळ फांदीला इतर दोन फांद्या फटल्या. चिंपांझी आणि बोनोबो (bonobo). चिंपांझी समाज (?) पर्णपणे श्रेणीबद्ध असतात. एक मोठा शक्तिमान नर गटाचे नेतृत्व करतो, व माद्याही त्याच्या पक्षाच्या असतात. इतर सारे नर एका ठराविक क्रमाने त्याच्या खालची स्थाने धरून असतात.
बोनोबोंमध्ये अश्या श्रेणी दिसत नाहीत. त्यांच्यात गटांतर्गत भांडणे कमी असतात, आणि वेगवेगळे गटही एकमेकांशी फारसे भांडत नाहीत. नर आणि माद्या यांच्यात सत्तेबाबत, महत्त्वाबाबत बोनोबोंमध्ये फार फरक नसतो. आणि या समतेच्या भावभावनांमध्ये वाढीव कामव्यवहार हे एक महत्त्वाचे अंग असते; बोनोबोंचे अभ्यासक फ्रान्स डि वाल आणि फ्रान्स लँटिंग सांगतात, “जर सेक्स (कामव्यवहार) आणि सत्ता या जोड-संकल्पना वापरल्या तर चिंपांझींना दुसरीची भूक असते, आणि बोनोबोंना पहिलीची, चिंपांझींमध्ये कामव्यवहाराबाबतचे संघर्ष सत्तेद्वारे सोडवले जातात, तर बोनोबोंमध्ये सत्तेचे वाद कामव्यवहारातून शमवले जातात.”
आता याचा माणसांशी संबंध काय? इतर कपींच्या तुलनेत माणसे जास्त कामुक असतात, हे बरीच वर्षे माहीत आहे. आता असेही सांगितले जात आहे, की डीएनएचा सामाजिक व्यवहार, कामव्यवहार आणि पालकत्वाशी संबंधित एक तुकडा असतो. या तुकड्याचा विचार करता माणूस चिंपांझींपेक्षा बोनोबोंच्या जवळ आहे.
एका व्यक्तीला इतर किती व्यक्तींची बरी ओळख मेंदूत साठवता येते याचे अभ्यास केले गेले आहेत. असा ओळखीचा गट बोधन-गट (cognitive group) म्हणून ओळखला जातो. व्यक्ती आपल्या बोधन-गटातील व्यक्तींची बाह्य परिस्थितींवर काय प्रतिक्रिया असेल, हे बऱ्याच नेमकेपणाने सांगू शकतात. माणसांचे नवमेंदू (neo cortex) यात कळीचे असतात. आजच्या माणसांचे मेंदू इतर कपीपेक्षा आणि माणसांच्या पूर्वजांपेक्षा मोठे तर असतातच, पण हा फरक मुख्यतः नवमेंदूत असतो. त्यामुळे समाजात वागण्याची कौशल्येही मिळतात, आणि माणसे इतरांच्या स्वतःबद्दलच्या मतांना महत्त्वही जास्त देतात.
यात वरिष्ठांपुढे नमणेही येते, आणि कनिष्ठांना नमवणेही येते. वस्तुवाटपाबाबत माणसे जागरूक असतात हेही यातून उपजते. नमणे-नमवणे फार त्रासदायक ठरू नये यासाठी सर्व माणसे काही तंत्रे वापरतात. न्याय्य काय याबद्दलची भूमिका हा यातला महत्त्वाचा भाग असतो. अगदी लहान मुलांमध्येही अन्यायाबाबत हळवेपणा दिसतो. एखाद्या गटात एकीचा, आम्ही चा भाव असणेही या नमणे-नमवणे सौम्य करण्याला मदत करते. इतरांच्या उपयोगी पडल्याने समाधान लाभणे, हाही याचाच भाग (पुण्य पर उपकार। पाप ते परपीडा। आणिक नाही जोडा । दूजा यांसी – तुकाराम).
आपण दुसऱ्यांना एखादा अनुभव घेताना पाहतो तेव्हा आपल्या मनांतील तो अनुभव घेणारे भाग चेततात. हा प्रकार आजचे मज्जाविज्ञान तपासत आहे, मिरर-न्यूरॉन्स (mirror neurons) नावाने. सहानुभूती असते, अगदी सह-अनुभूतीच्या रूपात असते, हे आता सिद्ध झाले आहे.
वाळीत टाकले जाणे हे मेंदूतील थेट शारीरिक वेदनांनी जागणारा भाग जागवतात, हेही दाखवता आले आहे.
या सर्व शारीर रचनांचा, शरीरांतील जैवरासायनिक व्यवहारांचा एकूण अर्थ काय? माणूस जसा स्वार्थी व स्पर्धात्मक स्वभावाचा असतो, तसाच तो सहकारी वृत्तीचा, सहानुभूतीने वागणाराही असतोच!
पर्यावरण, शाश्वती, वगैरे
TSL काही मजेदार आलेखांमधून पर्यावरणाची हानी, शाश्वत विकास, इत्यादींचा समता/विषमता यांच्याशी काही संबंध आहे का ते तपासते.
एका आलेखात आडव्या अक्षावर दरडोई कार्बन डायॉक्साईडचे (CO2) उत्सर्जन आहे आणि उभ्या अक्षावर आयुर्मान. उत्सर्जनांत विकसनशील मानले जाणारे बहतेक देश CO2 उत्सर्जनांत चार टनांहून कमी आहेत (जे सर्व जगाचे सरासरी उत्सर्जन आहे). नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड वगैरे सम देशही माणशी पाचेक टन CO2 उत्सर्जनच करतात. पण त्यांची आयुर्माने माणशी 19-20 टन CO2 उत्सर्जन करणाऱ्या ऑस्ट्रेलिया, USA, सौदी अरेबिया, यूनायटेड अरब अमिराती वगैरे देशांपेक्षा जास्त आहेत. जास्त जगण्यासाठी CO2 उत्सर्जन वाढवणे एका मर्यादेपलिकडे फारसे उपयोगी नाही!
नवे शोध लावणे विषम समाजांत जास्त असते कारण श्रीमंत माणसे जास्त असली तर त्यांना संशोधनाला मोकळीक मिळते, असे एक मत कधीकधी व्यक्त केले जाते. हेही पुराव्यावर टिकत नाही. फिन्लंडसारखा सम देश दर दशलक्ष प्रजेमागे वर्षाला 36 च्या आसपास पेटंटे घेतो, तर UK, USA, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, हे विषम देश दर दशलक्ष प्रजेमागे एखादेच पेटंट घेतात!
वस्तूंचा पुनर्वापर (recycling) या निकषावरही जपान, स्वीडनसारखे सम देश बरेच वर, तर UK, USA सारखे विषम देश बरेच खाली (तळाशी!) आहेत.
एकूण पाहता नुसते नवे तंत्रज्ञान पर्यावरणाला शाश्वती देत नाही. त्यासाठी सामाजिक समताही लागते.
विषमता येते कुठून?
या प्रश्नाचे सर्व देशांना, सर्व काळांमध्ये लागू पडेल असे एकच उत्तर अर्थातच नाही. कधी वेगवेगळ्या पेशांमधली वेतने वेगवेगळी असतात. कधी करभार विषमतेला चालना देतो. कधी काही लोक बेकार, तर इतर कुटुंबांना दोन वा अधिक रोजगार मिळतात. कधी कामगार यूनियन्स आपली सौदेबाजीची क्षमता गमावून बसतात. कधी अशिक्षितांच्या श्रमांना मागणीच उरत नाही व सोबतच शिक्षण-प्रशिक्षण देण्याच्या सोई नसतात. वेळोवेळी यांपैकी कोणते तरी कारण विषमता वाढवताना दिसते.
UK व USA मध्ये 1975 पासून 2005 पर्यंत विषमता कशीकशी कमीजास्त झाली याचे आलेख TSL पुरवते. दोन्ही आलेख कोणत्याही क्षणी असलेली विषमता 1975 च्या विषमतेच्या किती पट होती ते नोंदतात. UK मध्ये विषमता 1992 च्या आसपास दीडपट झाली, व 2005-06 मध्येही 1.35 जवळ आहे. USA मध्ये 1993 94 मध्ये सुमारे 1.4 च्या जरा जास्त जाऊन आज विषमता जराशी खाली आहे. दोन्ही आलेखांच्या आडव्या अक्षावर वर्षांसोबतच UK साठी पंतप्रधान कोण होते, तर USA साठी राष्ट्राध्यक्ष कोण होते, हेही नोंदले आहे. दोन्ही आलेख एकत्र पाहता जाणवते की रॉनल्ड रेगन USA त, मार्गरेट थैचर UK त, अशी जोडगोळी जमली, व विषमता वाढण्याला वेग मिळाला. हे दोन्ही राष्ट्रप्रमुख मुक्त बाजारपेठे चे पुरस्कर्ते होते.
इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्राची वाढती मागणी, विकसित देशांचा अनेक वस्तु (उदा. कापड, कपडे) आयात करण्यावर भर, एकूण कुशल कामगारांची गरज वाढणे वगैरे कारणे बाजारपेठवादी अर्थशास्त्र सुचवते. पॉल क्रुग्मन हा नोबेल विजेता अर्थशास्त्री मात्र ही कारणे दुय्यम मानतो. त्याच्या मते उत्पादनाशी संबंधित संस्था, आदर्श (norms) आणि राजकीय सत्ता यांच्यातील बदल जास्त महत्त्वाचे आहेत.
ट्रेड यूनियन्स खच्ची केल्या गेल्या, उत्पादकतेशी निगडित बोनस व्यवस्था सोडून दिल्या गेल्या, राजकारण जास्तजास्त उजवे होत गेले आणि परिणामी करांमध्ये श्रीमंतांना सवलती देणे वाढले. USA तील किमान वेतन कायदे ही क्षीण झाले. (जॉन केनेथ गॅल्ब्रेथचे अमेरिकन कॅपिटॅलिझम हे 1952 सालचे पुस्तक ट्रेड यूनियन्स व कॉर्पोरेशन्स एकमेकांवर वचक ठेवून समतोल राखतात, हा मुद्दा ठसवते. पुस्तकाचे उपशीर्षकच द कन्सेप्ट ऑफ काऊंटरव्हेलिंग पॉवर असे आहे. 1929-39 ची महामंदी, नंतरचे दुसरे महायुद्ध यांच्यानंतर हे सत्तासंतुलन-सत्ता USA तील विषमता कमी ठेवत होते. रेगन थेंचर काळात ही यंत्रणा कोलमडली. TSL जरी यावर फार काही मांडत नसले तरी सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर USAतील स्वयंनियंत्रण कमी झाले, हेही खरेच आहे.)
या सगळ्यांतून कॉर्पोरेशन्सची आर्थिक ताकद प्रचंड वाढली. एकेकाळी सामंती जमीनदारांकडे जशी प्रचंड संपत्ती साठली होती, तशी आता लहानथोर कंपन्यांच्या व्यवस्थापक वर्गाकडे प्रचंड संपत्ती साठली. वेगवेगळ्या देशांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) पगारांची सससरी कामगारांच्या पगारांशी प्रमाणे तपासली गेली आहेत. ही सरासरी कामगारांबाबत आहेत, सर्वांत कनिष्ठ कामगारांबद्दल नाहीत. प्रमाणे अशी, जपान – 16 पट, स्वीडन – 21 पट, UK – 31 पट, USA – 44 पट.
परंतु कॉर्पोरेट CEO चे पगार, कॉर्पोरेट्सची प्रचंड ताकद, यांवर विकसित देशांत टीका होत नाही. 2008 च्या मंदीनंतर चित्र जरासे बदलते आहे, परंतु आजही TSL च्या भाषेत कॉर्पोरेट्सची ताकद हा दिवाणखान्यातील हत्ती आहे. तो दिसतो तर सगळ्यांनाच, पण त्याचा उल्लेख मात्र केला जात नाही!
यूनोची व्यापार व विकास परिषद (UNCTAD) सांगते की जगातल्या शंभर सर्वांत मोठ्या आर्थिक हस्ती मध्ये (entities) एकोणतीस आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेशन्स आहेत (TNC किंवा MNC). इतर विश्लेषणे अर्धी संख्या MNC ची मानतात.परिणामी उत्पादनाची साधने मूठभरांच्या हातांत एकवटली आहेत. अगदी 2008 च्या मंदीनंतरचे उपायही यात फार बदल करू शकलेले (धजलेले!) नाहीत. आजच्या विषमतेचे मूळ इथे आहे. CEO व त्यांच्या निकटवर्ती व्यवस्थापकांची वेतने अकल्पनीय होत जातात. या सत्ताकेंद्राजवळील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी नसावी यासाठी त्यांची वेतने वाढतात. CEO ते हे दुय्यम-तिय्यम दर्जाचे लोक, यांपैकी कोणीच खरे उत्पादक नसतात. त्यांचे स्थान अखेर इसापच्या कथेतील देवाची मूर्ती वाहून नेणाऱ्या गाढवाचे असते. कोठेतरी या नको त्या वेतनांची कसर भरून काढावी लागते, आणि बहुतेक भार खऱ्या उत्पादकांवर व उपभोक्त्यांवर पडतो.
ही प्रक्रिया जेव्हा काही बहराष्ट्रीय कॉर्पोरेशन्सना काही देशांपेक्षा मोठे करते, तेव्हा विषमता-विकृतींना वेग येतो. हे अतिश्रीमंत लोक राजकीय निर्णय विकत घेऊ लागतात. पुढे तर हे लोक आणि राजकारणी वर्ग यांच्यात फरकच उरत नाही, USA चा एक राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांसाठी मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स असा शब्द वापरत असे. आयसेनहॉवर सेनानी होता, व पुढे राजकारणीही झाला. त्याचे हे नामकरण तो राजकारणी असतानाचे आहे. त्याने मिलिटरी इंडस्ट्रियल-पोलिटिकल कॉम्प्लेक्स म्हणणे त्यावेळी सोईचे नसावे, पण ती संज्ञा जास्त योग्य होईल हे आज दिसते.
टॉम शोल्झ हा यंत्रज्ञ संशोधक आणि रॉक संगीतकार सिएरा क्लब या पर्यावरणवादी संघटनेला मुलाखत देताना म्हणाला : “कॉर्पोरेशन्सना मोकळीक देणे आणि नफा कमावण्याच्या इच्छेला स्वैराचार करू देणे, हा जास्त सुसह्य, जगण्याला पोषक असे जग घडवण्याचा मार्ग नाही.” (Turning corporations loose and letting the profit motive run amok is not a prescription for a more liveable world.)
TSL ची मुख्य मांडणी येथे संपली.
गरीब देशांचे काय?
TSL च्या मते विकसनशील (म्हणजे गरीब) देशांत विषमतेतून येणारे समाजिक स्थानांबाबतचे चिंताजनक/तणाव निर्माण करणारे घटक कमी महत्त्वाचे असतील, तर मुळात सोयी-सुविधा नसणे जास्त महत्त्वाचे असेल. पण अशा स्थितींमध्येही जर जास्त समता असली तर चांगलेच होईल. आज (7 सप्टें.2011) सोमालियातील साडेसात लाख माणसे भूकबळी होण्याच्या बेतात आहेत. सोमालियाच्या सरकाराच्या अग्रक्रमांत या लोकांना अन्न पुरवणे हे समता पुरवण्याच्या वर असायला हवे. पण अन्न पुरवणेच समताही पुरवेल, याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? आज सोमालिया यादवी आणि चांचेगिरीसाठी बदनाम आहे. जास्त सम धोरणांतून हे शमवता येईलच. त्यासाठी सुबत्तेची एकूण पातळी वाढण्याची वाट बघणे गरजेचे नाही!
193, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर 440010

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.