भांड्यात दूध उकळत ठेवले तर ते उतू जाते. असे का घडते हे मला माहीत नाही, आणि माहीत करून घ्यावेसे वाटलेही नाही. या प्रश्नावर मला कोणी छेडले तर मी बहुधा त्याचे कारण हे देईन की दुधाच्या ठिकाणी उतू जाण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. ते तसे खरेही आहे, पण त्याने काहीच स्पष्ट होत नाही. पण मग मी काही भौतिक शास्त्रज्ञ नाही. त्याचप्रमाणे भूतकालीन घटनांविषयी, त्या तश्या का घडल्या हे जाणून घेण्याची इच्छा न बाळगता एखादा त्याच्यासंबंधी वाचन किंवा लेखनही करू शकेल. किंवा एखाद्याला इतके म्हणणे पुरेसे वाटेल, की दुसरे जागतिक महायुद्ध घडून आले. कारण हिटलरला युद्ध हवे होते. आता हेही खरे आहे, पण त्याने काहीच स्पष्ट होत नाही. पण मग अशा माणसाने आपण इतिहासाचे अभ्यासक आहोत किंवा इतिहासकार आहोत अशी हास्यास्पद भाषा करू नये. इतिहासाचा अभ्यास म्हणजे कारणांचा अभ्यास. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे इतिहासकार हा सतत ‘का’ हा प्रश्न विचारीत असतो आणि त्याला उत्तर मिळण्याची जोपर्यंत आशा असते, तोपर्यंत तो स्वस्थ बसू शकत नाही. महान इतिहासकार – किंवा अधिक व्यापक शब्द वापरायचा तर महान विचारवंत तो, की रोज नवनव्या बाबींसंबंधी आणि नवनव्या संदर्भात ‘का’ हा प्रश्न विचारतो.