विस्थापित झालेले लाखो लोक आज अस्तित्वातच नाहीत. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ते त्या इतिहासातही नसतील, तेव्हा आकडेवारी म्हणूनही नसतील. काहीजण तर तीन-चार वेळा विस्थापित झालेले आहेत. एखादे धरण, दारूगोळा सरावासाठी जागा, युरेनियमची खाण, एखादा ऊर्जा प्रकल्प…! एकदा घसरण सुरुवात झाली की थांबायला वावच नसतो. त्यातले बहुसंख्य लोक, यथावकाश आपल्या मोठ्या शहरांच्या परिघावरील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन पडतात आणि स्वस्त बांधकाम मजुरांमध्ये सामावले जातात. हे खरे आहे की त्यांना नष्ट केले जात नाही किंवा गॅसचेंबर्समध्येही पाठविले जात नाही. पण माझी खात्री आहे की त्यांचे जगणे हिटलरच्या कोणत्याही छळछावणीपेक्षाही भयानक असते. ते कैदेत नसले तरी स्वातंत्र्याची पुन्हा एकदा व्याख्या करण्यास भाग पाडतात.