बोलीभाषा व प्रमाणभाषा ह्यांचे एकमेकींशी नाते समजून घेण्याच्या आधी आपण त्यांचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. बोलीभाषा ही बहुधा न लिहिली गेलेली भाषा असते. तिचे क्षेत्र मर्यादित असते. तिचे स्वरूप दर दहा कोसांवर बदलू शकते; इतकेच नव्हे तर एका प्रदेशात राहणाऱ्या निरनिराळ्या जातींची बोली विभिन्न असू शकते. ठाणे जिल्ह्यात धोडी, वारली, कातकरी अश्या निरनिराळ्या आदिवासी जमाती आहेत. त्या प्रत्येकीची बोली निराळी आहेत. नागपुरात राहत असलेल्या कोष्टी जातीच्या लोकांची (ज्यांची संख्या लाखावर आहे), एकमेकांशी बोलण्याची भाषा म्हणजेच बोली इथल्याच पण वेगळ्या जातीच्या लोकांच्या भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आणि अशी उदाहरणे ठिकठिकाणी सापडतील. ही सगळी मंडळी घरात वेगळी भाषा म्हणजे ‘बोली’ बोलतात व घराबाहेर पडल्यावर इतरांशी वेगळी म्हणजे प्रादेशिक भाषा बोलतात.
बोलीची लक्षणे पाहिली तर तिच्यामध्ये शब्दसंख्या फार मोठी नसते. इतकेच नव्हे तर त्या भाषेत वस्तूंची नावे असली तरी भाववाचक नामांचा व पारिभाषिक शब्दांचा अभाव असतो. बोलीभाषेला व्याकरण असते. ते ती बोली बोलणाऱ्या प्रत्येकाला अवगत असते. पण ते लिखित स्वरूपात नसते. कारण लेखनविद्या तेथे प्रगत झालेली नसते. ह्या सर्वांचे कारण म्हणजे त्या लोकांचा दूरवरच्या लोकांशी संपर्कच नसतो. आपल्या मनातील भावभावना किंवा विचार दूरच्या, वेगळी बोली बोलणाऱ्या लोकांपर्यंत पोचविण्याची गरजच तेथे निर्माण झालेली नसते. म्हणून माणसाच्या प्राथमिक गरजा पुऱ्या करण्याच्या व्यवहारापर्यंतच तिची मजल असते. पण जसजसा एका ठिकाणच्या लोकांचा दूरवरच्या लोकांशी संपर्क वाढतो तसतशी बोलीतील शब्दसंपत्ती वाढत जाते व तिची प्रादेशिक बोलीकडे वाटचाल सुरू होते.
आपण येथे हिन्दी भाषेचे उदाहरण घेऊ. हिन्दीची प्रमाणभाषा ‘खडी बोली’ म्हणविली जाते. ती खडी बोली दिल्ली-मेरठ च्या जवळपासची स्थानिक बोली आहे असे म्हणतात. ह्याचा अर्थ इतकाच की ह्या प्रमाणभाषेने शब्दसंपत्ती स्थानिक बोलींमधून किंवा संस्कतमधन व अरबी-फारसी भाषांमधन बहशः उचलली असली तरी तिची व्याकरणप्रक्रिया दिल्ली-मेरठच्या आसपासची आहे. आणि ह्या खडीबोलीची गरज मुख्यतः मुद्रण सुरू झाल्यानंतर वाटू लागली आहे.
हिन्दीच्या ज्या बोली आहेत, त्यांना बोली म्हणावे की प्रादेशिक भाषा म्हणावे असा संदेह वाटतो, कारण त्या बोलींमध्ये वाङ्यच नव्हे तर साहित्य निर्माण झाले आहे. मैथिली, अवधी, व्रज ह्या बोलीभाषांमध्ये उच्च प्रकारचे काव्य लिहिले गेले आहे. म्हणून त्यांना प्रादेशिक भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे…
भाषांचे मुद्रणपूर्व व मुद्रणोत्तर असे भाग करायला हरकत नाही. मुद्रणपूर्वकाळात प्रमाणभाषा ही धार्मिक ग्रंथ आणि आनुषंगिक कीर्तने-प्रवचने ह्यात लिहिली व बोलली जात होती. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी की सगळ्या जुन्या धार्मिक रचना ह्या गद्याऐवजी पद्यातच लिहिल्या गेल्या आहेत. व मराठीची मुद्रणपूर्वकाळातील प्रमाणभाषा ही पद्यासाठीचच तयार झालेली आहे. पद्यातील भाषा ही गद्याच्या भाषेपेक्षा वेगळी असते. पद्यामध्ये लय व मात्रा ह्यांचा विचार अपरिहार्य असतो. त्यामुळे कमीत कमी अक्षरांत तिची अर्थवाहकता वाढविणे क्रमप्राप्त असते. ह्या गरजांमुळे शिवाय धार्मिक वाङ्मयाची मागणी व त्याचा उपयोग दूरवरच्या प्रदेशांपर्यंत दीर्घकाळपर्यंत लोकांना होत असल्यामुळे तिचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊन ती त्या पूर्ण प्रदेशात समजली जाणारी भाषा म्हणून तिला प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त होतो. तसेच दीर्घकाळपर्यंत वापरली गेल्याने तिला परंपरा निर्माण होऊन तिच्यातील शब्दांना अर्थसातत्य प्राप्त होते. ह्या तिच्या गुणामुळे ती इतिहासाला जोडणारी अशी भाषा असते. हे झाले मुद्रणपूर्व काळातील पद्याच्या भाषेबद्दल. त्या काळात गद्यलेखन बहुधा राज्यकारभाराविषयी केले जाई आणि ते मोडी लिपीत लिहीत असत. मराठीतील गद्यलेखनाला बहर मुद्रणोत्तर काळातच आला. पद्यासाठी तयार झालेली प्रमाण मराठी लेखनपद्धती गद्यासाठी जशीच्या तशी स्वीकारली गेली.
भाषेचे दोन वर्ग आहेत. पहिल्या प्रकारची भाषा आपल्याला हवे ते शब्द घडवू शकणारी असते. व दुसऱ्या प्रकारची भाषा इतर भाषांमधील घडविलेले शब्द आयते उचलणारी असते. सगळ्या बोलीभाषा ह्या दुसऱ्या प्रकारात मोडतात. मराठीची आजची प्रमाणभाषा हीदेखील दुसऱ्या प्रकारात मोडणारी म्हणजे दुसरीकडून शब्द आयते घेणारी आहे. इंग्रजी भाषादेखील ह्याच दुसऱ्या प्रकारात मोडणारी आहे. ती आपल्यासारखीच इतर भाषांमधून तयार शब्द आयते उचलून समृद्ध होत जाते. तथापि नवीन अर्थवाहक शब्द घडवायचे असल्यास, आपणाला जसे संस्कृतची मदत घ्यावी लागते, तशी इंग्रजीला ग्रीक व लॅटिन ह्या भाषांची मदत घ्यावी लागते. संस्कृत, ग्रीक व लॅटिन ह्या मात्र स्वयंपूर्ण अश्या भाषा आहेत.
नवीन शब्द घडविण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळेच विज्ञान-तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान व इतर शास्त्रे ह्यांतील नवनव्या संकल्पना व अमूर्तभावना, कल्पना व्यक्त करण्यासाठी आवश्यक असणारे नवनवीन अर्थवाहक पारिभाषिक शब्द मिळविण्यासठी पहिल्या वर्गातील भाषांचाच आश्रय करावा लागतो. कारण हे सामर्थ्य बोलीभाषेत नसतेच. मराठी भाषादेखील त्याबाबतीत पांगळी आहे हे लक्षात घेणे जरूरीचे आहे.
पारिभाषिक शब्द हे प्रत्येकाने आपल्या उच्चाराप्रमाणे लिहून चालत नाही. कारण ते घडविलेले असतात व त्यांची घडण त्यांच्या लिखित रूपातही स्पष्ट दिसेल. अशाच म्हणजे प्रमाण पद्धतीनेच ते लिहावे लागतात. त्यायोगे त्या नवीन शब्दांची फोड करता येते व त्याची उकल करून शब्दांमधील अर्थाच मागोवा घेणे वाचणाऱ्याला शक्य होते. आणि विशेष प्रयास न करता त्याचा अर्थ समजून घेता येतो. ह्याप्रमाणे भाषेतील शब्दांचे तत्सम, तद्भव व देशज असे तीन वर्ग होतात. तत्सम म्हणजे मूळ रूपाप्रमाणे लिहिलेले, तद्भव म्हणजे मूळ शब्दाचे अपभ्रष्ट रूप असलेले व देशज म्हणजे स्थानिक बोलीभाषेतले.
प्रमाणभाषा व बोलीभाषा ह्यांच्या परस्परसंबंधांविषयी वेगवेगळे समज आहेत. पहिला समज असा की प्रमाणभाषा ही शुद्ध भाषा व बोलीभाषा ही अशुद्ध भाषा. ह्याच समजातून दुसरा समज असा निर्माण झाला आहे की प्रमाणभाषा श्रेष्ठ व बोलीभाषा कनिष्ठ दर्जाची आहे.
प्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की खाजगी किंवा अनापचारिक बोलण्यात ‘अशुद्ध’ म्हणण्यासारखे काहीही नसते. कारण त्या बोलण्याचा संदर्भ व अर्थ परस्परांना समजत असतो किंवा बोलणे प्रत्यक्ष घडत असल्यामुळे, न समजल्यास तेथल्या तेथे विचारता येतो. तसेच जेव्हा दोघे किंवा अनेकजण प्रत्यक्ष बोलत असतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यातील चढउतार व हावभाव त्यांच्या मनातील आशय समोरच्या माणसापर्यंत पोचविण्यास मदत करीत असतात. जे बोलणे परस्परांना समजू शकते व त्यांच्यापर्यंतच मर्यादित असते, ते त्या ठिकाणी शुद्धच म्हटले पाहिजे. औपचारिक भाषणामध्ये मात्र शुद्धाशुद्धतेचा विचार करावा लागतो, कारण श्रोतृसमुदायात अनेक ठिकाणचे, निरनिराळ्या बोली बोलणारे लोक असू शकतात व त्या सर्वांना ते एकाचवेळी व असंदिग्धपणे समजावे, यासाठी तेथे प्रमाणभाषा वापरावी लागते. उदा. एखाद्यास रेडिओवर भाषण करायचे असेल व ते सर्व महाराष्ट्रभर प्रसृत केले जाणार असेल, तर कोणत्याही एका बोलीत बोलून तेथे चालेल का? अहिराणी ही मराठीची एक बोली आहे. ती अशा भाषणासाठी वापरल्यास सर्वांना समजू शकणार नाही. म्हणून, अशा ठिकाणी कोणतीही बोली न वापरता प्रमाणभाषाच वापरावी लागते व तीही बोलीभाषांमधील हेल वगळून प्रमाणभाषेच्या पद्धतीनेच उच्चारावी लागेल.
प्रमाणभाषेला ‘शुद्ध भाषा’ म्हणण्याचा प्रघात पडला आहे. पण तो सर्वथैव गैर आहे हे वरील विवेचनावरून समजेलच. प्रमाणभाषा व बोलीभाषा ह्या दोन्ही भाषा शुद्धच आहेत. व त्या समकक्ष म्हणजे समान दर्जाच्याही आहेत. फक्त त्यांची कार्यक्षेत्रे वेगळी आहेत इतकेच. तसेच बोलीभाषा ही स्वाभाविक व अनौपचारिक तर प्रमाणभाषा ही औपचारिक, कत्रिम व मद्दाम घडविलेली अशी आहे. तसेच प्रत्येकीला विशिष्ट असे आपले स्थान आहे व मानवी जीवनात प्रत्येकीचे तितकेच महत्त्वही आहे. पूर्वी बोलीभाषेला काहींनी ‘अशुद्ध’ म्हणून हिणविले असले तरी ते त्यांच्या अज्ञानातून व जात्याभिमानातून घडले आहे असे समजून त्याकडे आता दुर्लक्ष करावे. व यापुढे ‘शुद्ध-अशुद्ध’ असा भेद न करता त्याऐवजी प्रमाण भाषा व बोलीभाषा असे म्हणावे.
भाषण हे कानांसाठी असते व लेखन हे डोळ्यांसाठी. प्रत्येक बोलीलाही व्याकरणाचे नियम असतात (जरी ते लिखित स्वरूपात नसले तरी) व ते ती बोली बोलणाऱ्या सर्वांना अवगत असतात. ह्या बोलीच्या नियमांनुसार केलेले लिखाण ‘अशुद्ध’ मानण्याचे काहीही कारण नाही. ते त्या बोलीचे शुद्धलेखनच होय. तसेच प्रमाणभाषेचेही व्याकरणाचे नियम असतात व ते लिखित स्वरूपात उपलब्ध असतात व त्या नियमांनुसार केलेले लेखन हे प्रमाणभाषेचे ‘शुद्ध’लेखन होय. शब्द व अशुद्ध हे शब्द भाषण किंवा लेखन त्या त्या भाषेच्या नियमांना धरून झाले आहे किंवा नाही एवढेच दाखवितात. कोणतीच भाषा अशुद्ध नसते. तिचा वापर चुकीचा होत आहे की बरोबर हे बघायचे.
लिखित प्रमाणभाषा डोळ्यांसाठी असते व ती कृत्रिम व औपचारिकही असते. त्यामुळे डोळ्यांना, दुसऱ्या कशाच्याही मदतीखेरीज अर्थ समजावा ह्यासाठी शब्दांची विशिष्ट रूपेच, न चुकता, तिच्यात वापरावी लागतात. एवढ्यासाठी कोणता शब्द कसा लिहायचा यासंबंधी केलेले नियम (ह्रस्व-दीर्घ-अनुस्वार इ.) कठोरपणे तंतोतंत पाळावे लागतात. त्यामुळे प्रत्येक शब्दाचे रूप म्हणजेच आकृती एकाच पद्धतीची, नेहमीसाठी ठेवावी लागते. असे केल्याने शब्दाचा विशिष्ट अर्थ दीर्घकाळपर्यंत व दूरवरच्या प्रदेशापर्यंतच्या लोकांना सहजपणे समजू शकतो..
भाषण प्रत्यक्ष ऐकण्यापेक्षा दृश्य संकेतांवरून अर्थ समजून घेणे अतिशय जास्त कष्टाचे आहे. म्हणून लेखनामध्ये एकसारखेपणा टिकविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे केल्याशिवाय वाचनाला गती येत नाही. आणि गती न आल्यास वाचन नीरस होते. मन भरकटू लागते. व डोळ्यांपुढे असलेल्या आकृतींपासून अर्थबोध होत नाही. वाचनामध्ये आवश्यक ती गती प्राप्त करण्यासाठी भाषेच्या लेखनाचे म्हणजे व्याकरणाचे नियमही अवगत असावे लागतात. कारण द्रुतवाचनात लिहिलेले अक्षर अन् अक्षर वाचायचे नसते. म्हणून एक शब्द वाचल्यावर पुढे काय येणार ह्याची अपेक्षा करायची व तो तसा आहे ही डोळ्यांनी ओझरते पाहून खात्री करून पुढे जायचे असे करावे लागते. यासाठी जोडाक्षरांची रूपेही पूर्वीपासून चालत आलेली असतील तर ती तशीच पुढेही कायम टिकवावी लागतात. कारण आपल्याला जुने वाङ्मयही वाचायचे असते व त्यातही गती यावी लागते.
बोलीभाषा व प्रमाणभाषा ह्यांच्यात उच्च-नीच-भाव असण्याचे काहीच कारण नाही. त्यांचे मानवी जीवनातील स्थान वेगवेगळे आहे. त्यांचे प्रयोजनच भिन्न आहे. त्या एकमेकींची जागा घेऊ शकत नाहीत. ज्यांनी कोणी प्रमाणभाषेला घरामध्ये बोलण्याची भाषा म्हणून वापरण्यास सुरुवात केली, त्यांची चूक झाली आहे. ती चूक त्यांनी सुधारायला हवी असे माझे मत आहे.
प्रमाणभाषा परक्या भाषेसारखी शिकायला हवी. तसेच ती औपचारिक कामासाठीच वापरायला हवी. शाळांतून शिक्षकांनी सुरुवातीच्या काही काळात म्हणजे 8 वी – 9 वी पर्यंत बोलीभाषेचा वापर करायला हवा. आणि मुलांना क्रमाक्रमाने प्रमाणभाषेकडे न्यावे. याचा अर्थ असा की प्रमाण मराठी भाषासुद्धा बोली मराठी भाषेतून शिकविली गेली पाहिजे – जशी पूर्वी इंग्रजी भाषा मराठी भाषेतून शिकविली जात होती तशी.
काही मुलांना प्रमाण भाषेवर पकड येणार नाही हे समजून घेऊन, त्यांना तिचे आकलन होते किंवा नाही याकडे शिक्षकांनी आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. भाषाशिक्षणाकडे ज्यांचा स्वाभाविक कल आहे, त्यांना प्रमाणभाषेवर तर पकड येईलच; इतकेच नव्हे तर ती मुले इतरही भाषा सहजपणे शिकू शकतील व त्या आत्मसात करून त्यांमधून चांगल्या रीतीने अभिव्यक्तीही करू शकतील. म्हणून ज्यांना प्रमाणभाषा समजते पण त्यावर पकड येत नाही, त्यांना हीन लेखण्याचे कारण नाही.
गौरीवंदन, 123, शिवाजीनगर, नागपूर 440010.
बोलीभाषा अशुद्ध व प्रमाणभाषा अशुद्ध ही कल्पनाच चुकीची आहे हा महत्त्वाचा मुद्दा .दोन्हींचे प्रयोजन वेगवेगळे आहे .त्यांच्याशी जातीचा संदर्भ जोडू नये हे देखील मुद्दाम सांगितले आहे आणि ते आवश्यकच होते.लेख आवडला.