हा अंक म्हणजे मराठीकारण ह्या विषयावरचा दुसरा अंक ऑक्टोबर व नोव्हेंबर 2011 हे दोन्ही अंक मिळून आ.सु.चा मराठीकारण विषेषांक तयार होतो. पहिल्या ऑक्टोबरच्या अंकात मुख्यतः ‘मराठी भाषा आणि राजकारण ह्या विषयावर चर्चा केली होती. ह्या अंकात मराठीकारणचे तीन आधारस्तंभ ज्यांना म्हणता येईल, अशा 1. शासनव्यवहारात मराठी, 2. न्यायव्यवहारात मराठी आणि 3. ज्ञानभाषा मराठी, ह्या तीन पैलूंचे विवेचन करण्यात आले आहे. शासनव्यवहारात राजभाषा मराठीची प्रतिष्ठापना करण्यासाठी 1960 साली जे भाषा संचालनालय स्थापन करण्यात आले त्याच्या कार्याबद्दल ‘राजभाषा ही लोकभाषा झाली पाहिजे’ ह्या लेखात माहिती दिली आहे. न्यायव्यवहारातील मराठीबद्दल अॅड. संतोष आग्रे यांनी लिहिले आहे. ह्या दोन क्षेत्रांमध्ये मराठीकडून (खरे तर मराठी बोलणाऱ्या माणसांकडून आणि महाराष्ट्र राज्याच्या शासकीय अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा होत्या आणि त्या कश्या अपूर्ण राहिल्या ते ह्या दोन लेखांमधन स्पष्ट व्हावे आणि आता लोकशाहीचा चौथा स्तंभ ‘बाजारबावरी’ ह्या लेखात जयदेव डोळे यांनी प्रसारमाध्यमांतील मराठी ह्या विषयाचा ऊहापोह केला आहे.
‘ज्ञानभाषा मराठी’ ह्या लेखात कालिदास मराठे यांनी मराठीतून/मातृभाषेतून शिक्षण हा विषय सूत्ररूपाने मांडला आहे. ते महत्त्वाचे आहेच, परंतु ‘ज्ञानभाषा’ ह्या शब्दामध्ये उच्चशिक्षणाचे माध्यम मराठी असणे; विज्ञान-तंत्रज्ञान व इतर मूलशास्त्रे उपयोजित शास्त्रे यांच्यावर मराठीतून ग्रंथरचना केली जाणे, माहिती तंत्रज्ञानाचा मराठीतून सफाईदारपणे वापर होणे; थोडक्यात म्हणजे इंग्रजी न जाणणाऱ्या सामान्य माणसालाही ह्या सर्वांचा लाभ घेता येणे – त्याचा भाग बनता येणे – हे अभिप्रेत आहे. यांपैकी शास्त्रविषय परिभाषा कोशांबाबतची माहिती भाषा संचालनालयाच्या लेखात आली आहे. सुमारे 35 कोश ही मराठी परिभाषा निर्मितीची प्रगती डोळे दिपविणारी असली तरी तिचा वापर करून ग्रंथरचना केल्याचे प्रयत्न मात्र नगण्य आहेत. इतकेच नव्हे तर ह्या परिभाषेची माहितीही अजून मराठी भाषकांपर्यंत पोहोचलेली नाही. हे मराठी समाजासाठी अतिशय लज्जास्पद आहे. माहिती तंत्रज्ञानातील मराठीच्या पिछाडीबद्दल अशोक शहाणे यांनी आपल्या लेखात परखड विवेचन केले आहे. वर्ष 2003 मध्ये लिहिलेला हा लेख पुढे (लवकरच) पुनर्मुद्रित करू, कारण एक युनिकोड ह्या विषयाची प्रगती सोडली, तर लेखात निर्देशिलेल्या इतर बाबतीत फार फरक पडलेला नाही. राममोहन खानापूरकर यांनी प्रत्यक्ष संगणकावर मराठीतून कामकाज कसे करावे हाल फार चांगले विवेचन केले आहे. ते वाचून काम सुरू करता यावे.
या तीन पैलूंशिवाय इतरही आनुषंगिक महत्त्वाचे विषय ह्या अंकात घेतले आहेत. बोलीभाषा व प्रमाणभाषा कोणास म्हणावे, त्यांचे कार्य कोणते, त्या एकमेकील पूरक कश्या ठरतात आणि त्यांनी सवतींसारखे एकमेकींशी भांडण्याचे कारण का नाही यावर एक समर्पक लेख दिवाकर मोहनींनी लिहिला आहे.
मराठी माणूस अर्थार्जन आणि अर्थकारण यांमध्ये कच्चा आहे. मराठी म्हणत आपली अस्मिता टिकवायची असेल तर ह्या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सागर विद्वांस यांनी आपल्या लेखातून मराठी माणसाला उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले आहे.
मराठी बोलणारे लोक कोण? मराठी ही फक्त हिंदूंची भाषा आहे, मुसलमानांच भाषा उर्द किंवा दखनी आहे असा बहतेकांचा समज असतो. पण महाराष्ट्रातील मुसलमानांची बोलण्याची/लिहिण्याची भाषा मराठी आहे. राजकीय हेतूसाठी त्यांना ‘बिगर मराठी’ ठरवण्यात आले आहे. अनेक मुसलमान कवींनी मराठीत काव्यरचना केली त्याचे सोदाहरण विवेचन ‘मराठी भाषा आणि मुसलमान’ या लेखात फक्रुद्दीन बेन्नूर यांनी केले आहे.
मागील अंकाचे वाचकांनी जसे खुल्या दिलाने स्वागत केले, तसेच ह्या अंकाचेही होईल अशी आशा आहे. किमानपक्षी मराठीची पीछेहाट नेमकी कोणत्या बाबतीत कोणत्या कारणांमुळे होत आहे हे लक्षात यावे. अलिकडे मराठीतून भरभरून निघणा चित्रपट, नाटके व इतर साहित्य पाहून हरळून न जाता मराठीच्या ह्या अंगांचाही चिकित्सकपणे विचार करावा, एवढी अपेक्षा तर आ.सु. च्या जागरूक वाचकांकडून
आहेच आहे.
सूचना पहिल्या एकवीस वर्षांतील आजचा सुधारक च्या अंकांचे प्रत्येक वर्षाचा एक याप्रमाणे 21 बांधीव खंड उपलब्ध आहेत. संचाची किंमत रु.6000/- (पोस्टेजसह) (अक्षरी रुपये सहा हजार फक्त) आहे. इच्छुकांनी कृपया डिमांड ड्राफ्टने किंमत पाठवावी. चेकने पाठविल्यास वटणावळीपोटी रु.50/- जास्तीचे द्यावे. प्रतिवर्षाप्रमाणे सुटे खंडही उपलब्ध आहेत.
संपादक