खरे तर असा नियमच हवा की प्रत्येक मराठी कवीने आयुष्यातून एकदा तरी महाराष्ट्र-गीत लिहायलाच हवे. म्हणजे शेलीच्या म्हणण्याप्रमाणे कवी – जर का कायदेमंडळाचे अनभिषिक्त. सभासद असतील किंवा ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे ते जर का ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ असतील तर आपापल्या काळाच्या इतिहासातली एक नोंद म्हणून तरी का होईना पण प्रत्येक कवीने महाराष्ट्र-गीत लिहायलाच हवे. आधीच्या कवींनी तसा पायंडा पाडलाच होता नि गोविंदाग्रजांपर्यंत तो पाळला पण जात होता. पुढे मात्र ही परंपरा तुटलेली दिसते नि त्यामुळे मराठी लोक आपल्या देशाला, भाषेला, संस्कृतीला काय समजतात ते कळायची आपल्याला फारशी सोयच राहिलेली नाही.
इतर कैक देश किती का सुंदर न संपन्न असेनात, तरी आम्हाला आपला आमचा महाराष्ट्रच आवडतो असे म्हणणारा कवी अप्रत्यक्षपणाने महाराष्ट्र तितकासा सुंदर नाही नि श्रीमंत नाही अशी ग्वाहीच देत असतो. आमच्या मायबोलीला आज नसेल ऐश्वर्य, अगदी भिकारीण असली तरी ती आमची माउलीच आहे, असा निर्वाळा पण देणारा कवी भेटतोच. अन् त्यालाही आधी ज्ञानेश्वराचा दाखला असतोच.
ज्ञानेश्वरालासुद्धा आपल्या रांगड्या बोलाचे कौतुकच आहे नि तो तर थेट अमृताशी पैज लावायला पण तयार असतो. ती पैज त्याने जिंकली हे तो मरून सातशे वर्षे होऊन गेल्यावर आपण प्रत्यक्षच बघू शकतो.
गोविंदाग्रज हे महाराष्ट्र-गीत लिहिणाऱ्या कवींमधले शेवटचे. त्यांनी चक्क महाराष्ट्राला हाकच घातली आहे. हा राकट, कणखर, एवढेच कशाला पण सरळसरळ दगडाचा देश आहे, असे त्याचे म्हणणे. अर्थात त्याच्या या देशाला दुसरी बाजू पण आहे. तो कोमल पण आहे, फुलांचाही आहे. याच्यानंतर मात्र त्यांनी महाराष्ट्राचे एका कडव्यात केलेले वर्णन त्यांच्याच भाषेत स्मरलेले बरे.
तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकोंडा ।
वहाण पायीं, अंगिं कांबळी, उशाखालिं धोंडा ॥
विळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात ।
इकडे कर्नाटक हासतसे, तिकडे गुजरात ।।
आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल ।
इकडे इस्तंबूल थरारे, तिकडे बंगाल ॥
या चार-सहा ओळीतच कवीनं आपला महाराष्ट्र उभा केला आहे. ‘वरी नागली न् कणीकोंडा’ ही याची भूक भागवायची साधने. पोषाख कसा? तर पायांत वहाणा, खांद्यावर कांबळे. (कासेला लंगोटी गृहीत धरलेली दिसते बहुतेक.) अन् रहायला घर बहुदा नाहीच. गाद्यागिरद्यांची बातच नको. उशाखाली धोंडा असला की तेवढासुद्धा खूप झाला. पुढच्याच ओळीत इथल्या माणसाला दिगंबरच म्हणून टाकलंय. म्हणजे लंगोटी पण गेली का काय? हातात विळा किंवा कोयता घेऊन इथला माणूस राबत असला की इकडे कर्नाटक न् तिकडे गुजरात त्याला हसतात. थोडक्यात इतकी गरिबी. अठराविश्वे दारिद्र्य म्हणतात ते बहुदा यालाच. पण मग कधीतरी हा मराठी माणूस, तोही कसा तर चक्क कंगाल, हातात भाला घेतो नि इकडे इस्तंबूलचा तर तिकडे बंगालचा थरकाप उडतो.
गोविंदग्रजांच्या ‘वाग्वैजयंती’मधले हे महाराष्ट्र-गीत पाचेक पानी असूनसुद्धा अपूर्णच आहे, कदाचित आपल्या देशाबद्दल किती सांगू असे कवीला झाले असेल, त्यामुळे त्यांचे सांगून संपलेच नाही. म्हणूनसुद्धा नंतरच्या दरेक मराठी कवीने आपल्यापुरता का होईना पण महाराष्ट्र नोंदून ठेवायची गरज आहे.”
मराठीतले अख्खे संतवाङ्मय धुंडाळून पाहिले तरी तेव्हाच्या खायच्या पदार्थांची फारशी मोठी यादी हाताला लागत नाही. (मक्ताबाईला तर सैंपाक येत होता की नाही, अशी शंकाच यावी. जनाबाईला निदान पंचामृत तरी येत होते. म्हणजे खोबरे-दाणे गूळ-चिंच वगैरेवाले पंचामृत. बाकी ती शेण्या गोळा करायची, पण त्या पेटवून त्यांच्यावर शिजवायची काय कोण जाणे. खाण्यापिण्याचे प्रस्थ वाढले ते खूप नंतर. पेशवाईत म्हणजे नानासाहेब गादीवर बसल्यावर. एरवी बाजीराव तर घोड्यावर मांड ठेवून जाता जाता कणसे तोडून हुरड्याला मिरची चोळून खायचा म्हणे. हे पहिल्या बाजारीरावाचे. दुसरा बाजीराव अळूचे फदफदे नि श्रीखंड वगैरेमध्ये गुंतून पडला. पण ते आता. कसेबसे दोनशे वर्षांपूर्वी.)
बरे, इथल्या माणसांचा पोषाक काय होता? पुरुषमाणसांच्या पोषाखाच्या गोविंदाग्रजांच्या वर्णनाला जनाबाईने केलेल्या नामदेवाच्या वर्णनाचा आधार आहे. जनाबाई म्हणते –
सुंभाचा करदोटा । रकट्याची लंगोटी
नामा वळवंटी । भजन करी ।
आजच्या मराठीत हा अगदी उघडाबंब झाला. अर्थात दुसरी, चांगली प्रतिष्ठित मंडळी वेगळा काही पोषाख करत असतील. फक्त त्याची नोंद नाही कुणी करून ठेवलेली. अर्थात् एक गोष्ट साफ आहे, अंगावर बेतलेले, शिंप्याने शिवलेले कपडे अजून इथे येऊन पोचलेले नव्हते. ते मुसलमानांनी आणले. त्यांच्या आधी असलेच तर खाली धोतर न् वर उपरणे की मामला खतम. पण म्हणजे धोतर किती खालपर्यंत? गुडघ्यांपर्यंत? का खाली पोटऱ्या झाकेल इतके? का अगदी पायघोळ? काय प्रकार होता?
पेशवेमंडळींची धोतरजोडी म्हणे काड्यापेटीत मावण्याइतकी तलम असायची. म्हणजेच ही तर ढाक्याच्या मलमलीची. एक प्रकारे तिकडून ‘इंपोर्ट’ केलेली. बाकीच्या लोकांना आपली ‘कासेची लंगोटी’च का काय?
अन् बायका? त्यांचे काय? पुरुषमंडळींचा रोख पांढऱ्या कपड्यांवरच असतो, रंगीबेरंगी कपड्यांचे वेड बायकांनाच. जगभरच. तेव्हा रंगीत साडी – तेव्हा बहुदा लुगडे म्हणत असतील – अशी पद्धत असणार.
अन् रंग? महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य म्हणून कानावर येते ते इरकली लुगडे नि धारवाडी खण. पण हे तर कर्नाटकी झाले. महाराष्ट्रातल्या लोकांना खास कोणत्या रंगांची आवड होती? अर्थात शेंदूर ठाऊक होता. गुलाल ठाऊक होता. आबीर पण ठाऊक असेल. म्हणजे ते ते रंग आले. अन् हळद ती तर चांगलीच ओळखीची. नि त्यात चुना मिसळला की होणारे कुंकू. बुक्का बहुदा संतमंडळींनी शोधून काढला. काळाशार. हा घोंगडीचा रंग म्हणून आधीपासूनच ठाऊक होता. या रंगाचा मेळ घडवून काही रंगीबेरंगी कपडे? कोण जाणे. अर्थात पैठणी होती. केव्हापासून कोण जाणे. कदाचित सातवाहन राजांची राजधानी पैठणला असल्यापासूनच. पण पैठणीची खासियत रंगसंगतीत नाहीच. तिचं वैशिष्ट्य आहे ते किनारीच्या नक्षीत. अन् चौपदरी रेशमी धाग्यात. म्हणजे महाराष्ट्रातल्या बायकांना रंगांची खास आवडच नाही का काय? अर्थात चंद्रकला आहे. काळे अंग नि वर खडीच्या चांदण्या. इथला दगडही काळाकभिन्न. सह्याद्रीचे उभेच्या उभे काळे कडे नि पावसाळ्यात पांढरेशुभ्र तुषार उडवत खाली कोसळणारे धबधबे. की झाली काळी चंद्रकला. पण बाकी राजस्थान गुजरातेत जसे ‘मारवाडी’ रंग आहेत बायकांच्या कपड्यांना, किंवा तामिळनाडूमध्ये किंवा आंध्र-कर्नाटकात, किंवा तिकडे बंगाल-बिहारमधले मातकट रंग – तसले काही खास महाराष्ट्रात नाही बहुदा नि नव्हतेही कधीच. रंग आपण आंध्र-कर्नाटकातून उचलले.
लोकांच्या चालीरीतीचा अभ्यास केलेल्या दुर्गा भागवतांचे तर म्हणणेच आहे की आंध्र, कर्नाटक नि महाराष्ट्राची संस्कृती एकच आहे; भाषा मात्र वेगवेगळ्या आहेत. असे म्हणे जगात आणखी कुठेच आढळत नाही. यात अर्थात महाराष्ट्राची जागा गरीब नातलगाची. एक प्रकारे आश्रिताची..
महाराष्ट्रात दगड उदंड. पुण्याच्यासुद्धा आसपास खडकी, खडकवासला, पाषाण वगैरे गावांची नावंसुद्धा याची साक्ष देतात. अन् दगड अस्सल प्रतीचा. नि कुठे कुठे सलग पण एकसंध. म्हणूनच तर इथे लेणी कोरली गेली. अर्थात ती कुणी कोरून ठेवली कोण जाणे. आमच्याच बापजाद्यांनी कोरली असे म्हणायची काही हिम्मत आपल्याच्याने करवत नाही. कारण हे कसब आज महाराष्ट्रात औषधाला सापडत नाही. पाथरवटाचे काम करणारे वडारीसुद्धा मूळचे आंध्र प्रदेशातून आलेले. ते जात्यांना टाकी लावत फिरायचे. तीसुद्धा आमच्या मराठी मंडळींना लावणे जमत नसेल. मग मूर्ती कोरण्याची कलाकुसर कोरता येण्याचे नावच कशाला! आमची शिल्पकला म्हणजे महाराष्ट्रभर पसरलेले अष्टविनायक. ते एकजात सगळे स्वयंभू किंवा गावोगावचे मारुती. उगाच नाही कुठल्याही दगडाला शेंदूर फासून देव बनवण्याची म्हण मराठीत पडली. तेव्हा वेरूळ-कााचं कोरीव काम आमच्याने होण्याजोगे नव्हतेच. आम्ही फक्त दगड तेवढा पुरवला. पुरवला म्हणजे काय, तो होताच की लाखो वर्षांपासून पडलेला. तो कोरावा असे आमच्या कुणाच्या डोक्यात काही आलेच नाही. आम्ही फक्त गडांना तटबंदी करून किल्ले बांधले. वाड्यांना जोती बांधून घेतली.
घरे तरी बांधता येत होती म्हणावे तर शनवारवाड्यासकट सगळ्या मोठाल्या वाड्यांची कामे राजस्थानातून माणसे येऊनच करत होती. बाकीचे लोक आपले कुडाच्या माती लिंपलेल्या भिंती नि वर गवताची शाकारणी असलेले छप्पर असल्या निवाऱ्यातच राहात होते. त्याला ना रंग, ना रूप, ना आकार. अर्थात घरादारांपेक्षा वास्तुकला-वास्तुकला म्हणून म्हणतात ती कुठेही देवळातच जास्त दिसून येते. मग ती मशीद असो की चर्च असो. वास्तकलेचे अस्सल नमने तिथेच दिसतात. तशी देवळे महाराष्ट्रात जवळपास नाहीतच. जैन मंडळींना ही कला अवगत होती. त्यांनी कोल्हापूरला एक देऊळ बांधले पण आता तिथे अंबाबाईचे बि-हाड कधी केले कोण जाणे, मशिदींचे घुमट बघून मराठे मंडळींनी पण गाभाऱ्यावर घुमट उभारायला सुरुवात केली.. नि वरती कळस. म्हणजे एक प्रकारे मशिदीवरच कळस चढवला की झाले यांचे देऊळ. बाकी स्वयंभू गणपतीची घरेसुद्धा स्वयंभूच म्हणता येतील अशी.
बहुतेक लोकांना प्रचंड काबाडकष्ट केल्याशिवाय जगणे अशक्यच होते. एकूण मग शीण हलका करायला गाणी म्हणणे आलेच. जात्यावरच्या ओव्या त्यातूनच तर आलेल्या! ज्ञानेश्वरांनी त्यांना एक साहित्यिक रूप दिले एवढेच किंवा अंगाया झाल्या, शेतीच्या मशागतीची गाणी झाली, मोटेवरची गाणी झाली, धनगरी गाणी झाली, हे सगळे इथे पण होतेच. लढाया सुरू झाल्या तसे पोवाडे पण आपसूकच रचले गेले. पेशवाईमध्ये तर सैन्याच्या करमणुकीसाठी नाचणाऱ्या-गाणाऱ्या बायकांचे ताफे छावणीतल्या रात्री रंगवू लागले नि ‘लावणी’ उभी राहिली. अर्थात गाणेबजावणे ऐकणारे रसिक म्हणून मिरवत होते नि गाणेबजावणे करणारे अस्पृश्यांपेक्षाही खालचे मानले जात होते, ही गोष्ट वेगळी. गाण्याबजावण्याची ‘करिअर’ करायला प्रोत्साहन नव्हते, तरी ते थोडेथोडके का होईना टिकून राहिले हे एक आश्चर्यच. पेशवाईच्या शेवटी शेवटी पुण्यात जरा स्थिरस्थावर झाली होती. बावनखणी वसली होती. हाच महाराष्ट्रातल्या गाण्याचा उत्कर्ष.
चित्रकलेची काय हालत होती महाराष्ट्रात? रांगोळ्या होत्या. पण अख्ख्या दीडेकशे वर्षांच्या मराठेशाहीच्या कारकिर्दीत दरबारच्या आसऱ्याने का होईना चित्रकलेची कसलीच शैली पैदा झाली नाही. इथे मोगल नि राजपूत मंडळींच्या पुढे महाराष्ट्राचे नाव घेणेसुद्धा अवघड आहे.
मोगलाईत फार्शी शिकून पोट भरणाऱ्यांनी कंपनीच्या राज्यात इंग्रजी शिकायला घेतले. पेशवाईत लागला नाही एवढा कारकुनांचा ताफा नव्या राज्याला लागत होता. इंग्रजीला वाघिणीचे दूध मानून लोकांनी त्याचे रतीबच लावले. न्यायमूर्ती रानडे तेलंगसारख्यांनी ग्रंथ रचून नाव मिळवले. मराठीची कास धरली ती जोतीबा फुल्यांनी. त्यांनी महाराष्ट्राच्या सगळ्या अवकळेबद्दल भटांना दोषी धरले. मुलींना शिक्षण द्यायला तयार नसलेल्या ब्राह्मणांच्या नाकावर टिच्चून मुलींची पहिली शाळा काढली. अस्पृश्यतेचा डाग धुऊन काढायची मोहीमच उघडली. हे इतके सगळे मान्य नसलेली पण नामांकित मंडळी होती. तीच तेव्हाची बडी प्रस्थे. त्यांना इंग्रजांची सतीबंदी पण कबूल नव्हती. संमतिवयाचा कायदा पण मान्य नव्हता. अर्थात त्यांना ब्रिटिशांचे जोखड पण नको होते.
पण तरी इंग्रजी आमदनीत पहिल्याप्रथमच कायद्याचे राज्य आले. असा कायदा जो राज्यकर्त्यांना नि प्रजेला सारखाच लागू पडत होता. हा कायदा राबविण्याकरिता अशी कोर्ट जी सरकारच्या विरुद्ध पण निकाल देऊ शकत होती, नि तो निकाल निमूट पाळण्यावाचून सरकारला गत्यंतर नव्हते. राज्य ब्रिटिशांचे नव्हते, त्यांनी केलेल्या कायद्याचे होते. साहजिकच कायदा करायचा हक्क मिळाला की लोक स्वतंत्र होणार होते. त्यासाठी धडपडी चालू होत्या. त्यात अर्थात महत्त्वाचा भाग म्हणजे आपणही कुणी कमी नाही अशी भावना लोकांत पसरवायची. ‘सारे जहाँ से अच्छा’ कारण ‘हिंदोस्तां हमारा’ मध्ये कवीने ही नाडी बरोब्बर पकडली.
हे सगळे चाललेले असतानाच मूठभर मंडळी स्वातंत्र्यासाठी झटत होती. ची समजूत इंग्रज मंडळींना हाकलून लावले की आले स्वातंत्र्य.
अन् एक दिवस इंग्रज मंडळी खरोखरीच गेली की निघून. जाताना परत देशाचे दोन तुकडे करून गेली. एक देश मुसलमानासाठी, दुसरा इतरांसाठी. स्वातंत्र्य मिळालं नि पूर्वीच्या ‘व्हाइसरीगल लॉज’मध्ये राष्ट्रपती राहायला लागले. एकेक टुमदार बंगले एकेका मंत्र्याला दिले गेले नि कारभार तसाच सरू राहिला. फरक इतकाच झाला की दर पाच वर्षांनी निवडणूक व्हायला लागली. पाच वर्षांनी गादीवर बसणारी माणसे बदलायची मुभा मिळाली. पण बाकी काहीच बदलले नाही. सरकारची अंमलदार मंडळी तीच राहिली. कायदे होते तेच राहिले.
आता आपण स्वतंत्र झालो, तेव्हा आधीचे आपण राहिलो नाही, मग आता आपण कोण म्हणन शोधाशोध सरू झाली. साहित्यातन, गाण्यातन, नाटक-सिनेमातन. चित्रकलेतून, शिल्पकलेतून-सगळ्या वाटांनी. राजकीय नि सामाजिक अंगांनीही. संबंध देशाने स्वतःचे ‘भारत’ म्हणून बारसे केले. हे नाव सबंध देशाला कोणत्याच काळी नव्हते. नि आता देशातले सगळे ‘भारतीय’ बनले. प्रतिष्ठा होती. दोनेक हजार वर्षांपासूनची भाषा होती. किमान हजार वर्षांपासूनची, त्या भाषेत साहित्य होते. किमान सातकेशे वर्षांपासूनचे. ते सगळे पाठीशी बांधून वाटचाल सुरू झाली.
मराठी साहित्याला परंपरा होती ज्ञानेश्वरादिकांना वाळीत टाकायची नि तुकारामाच्या वह्या बुडवायची. त्यातच महारांनी धर्म सोडून दिलेला, नि शिकूनबिकून घेतलेले, तेही उत्साहाने लिहायला लागले. वेळवखत बघून प्रतिष्ठितांनी त्यांच्यासाठी दलित साहित्य म्हणून वेगळी चूल मांडून दिली. पूर्वीची अस्पश्य मंडळी मराठीत लिहून हा प्रांत काबीज करणार अशा भीतीपोटी शहरी साहित्यिकांनी आपली पोरे इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालायला सुरुवात केली. एका पिढीच्या आत पोराला बापाने लिहिलेले वाचता येईना अशी स्थिती आली. भाषेशी नाळ तुटलेली ही पोरे मग सरळ इंग्लंड-अमेरिकेतच पोटापाण्यासाठी जाऊन तिकडेच बस्तान बांधायला लागली. इकडे म्हातारा-म्हातारी पोराच्या आठवण काढत मराठीत काही ना काही लिहीत राह्यली.
सिनेमावाल्यांना आपला मराठीपणा तमाशाच्या लावणीत सापडला. लावणीखेरीज मराठी सिनेमा निघेना. सिनेमाची आपली स्वतःची बाषा असते, ही भाषा तोंडची भाषा नव्हे, कॅमेऱ्याची भाषा असते, याची जाण मराठी सिनेमावाल्यांना यायला अजून अवकाश आहे. कैक मराठी सिनेमावेले मोठ्या बाजारपेठेच्या नादाने हिंदीतच सिनेमे काढत गेले.
स्वातंत्र्य मिळाल्यामिळाल्या पांचट प्रेमाच्या गाण्यांना पण ऊत आला. त्यांना भावगीत असे नवे नाव मिळाले. मुलगी दाखवताना ही गाणी म्हटली जायला लागली. बाकी लग्ने पूर्वीसारखीच मुलगी आठेक वर्षांचीच असल्यासारखी आईवडीलच ठरवत होते नि अजूनही ठरवतात. मग लग्नापेक्षा लग्नातल्या देण्याघेण्याला महत्त्व न आले तरच नवल. तर मुलाकडले लोक मोठाले हंडे मागायले लागले. हुंडा धड दिला नाही म्हणून सालसरचे लोक बिनदिक्त सुनेला छळायला लागले, जाळूनसुद्धा टाकायला लागले. त्यांची बरी सोय झाली. सून जिवंत जाळायला मुलगा मरायची वाट नाही पाह्यला लागत.
चित्रकला-शिल्पकला या तर भाषेशी, जमिनीशी उघड नाते नसलेल्या कला. त्या एकदम मोकळ्या झाल्या. मराठी चित्रकार-शिल्पकार म्हणून ओळखता येण्याजोगे काम झालेच नाही, नि आधीही तशी काही ठळक परंपरा नव्हतीच, त्यामुळे ही कमतरता कुणाच्या लक्षात पण आली नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच उच्च शिक्षणाच्या सोयी वाढल्या. तशी त्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी झुंबड पण मोठी उडाली. जो तो डॉक्टर नाही तर- इंजीनियर बनायला लागला. ज्यात नंतर पैसा जास्ती त्या ‘लाईन’ला जायचे एवढे एकच गमक राहिले. एवढे सगळ्यांना उपासमारीच्या भीतीने ग्रासून टाकले.
थोडक्यात, स्वातंत्र्य मिळाल्यापासून एका बाजूला आपली मराठी माणूस म्हणून चालत आलेली ओळख, आत्ता नव्यानं मिळालेली भारतीय म्हणून ‘आयडेंटिटी’ नि स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून जगाच्या रिंगणात स्वतःला प्रस्थापित करायची गरज-अशा तिहेरी पेचात सापडलेला मराठी माणूस अजून तरी गोंधळलेलाच दिसतो. त्यात प्रतिष्ठितांनी आपला कौल देशाच्या सरहद्दी ओलांडायच्या बाजूने साफ देऊन टाकलाय. आपण बाहेर पडावे नि महाराष्ट्र आपल्याला काय देऊ केले म्हणून विचारावे, हा त्यांचा खाक्या.
अभिजातपणा अंगी मरायचा असेल तर आसपास सगळ्यांच्याकडेच बऱ्यापैकी संपन्नता असावी लागते. तसा संपन्न महाराष्ट्र कधीच नव्हता. त्यामुळे एक भाषेखेरीज आणखी काही संपन्न साधन मराठी माणसाजवळ कधीच नव्हते. भाषेचा हा समृद्ध वारसा ओळखता येण्याची कुवत असलेली माणसे इथे पुरेशा संख्येने निघालीच नाहीत. त्यामुळे आज राजभाषा असूनही मराठी आपली भिकारीणच राहिलेली आहे. नि सर्वांत कहर म्हणजे याची कुणालाच काडीइतकीही फिकीर पडलेली नाही.
महाराष्ट्रातल्या अभिजात म्हणवणाऱ्या मंडळींनी महाराष्ट्राबाहेर पडायच्या बाजूने आपला कौल कधीच देऊन टाकलाय.
5, वृंदावन, 2-बी, रहेजा टाऊनशिप, मालाड (पूर्व), मुंबई-400097.
अशोक शहाणे यांचा खास त्यांच्या वेगळ्याच शैलीतील वाचनीय लेख .’ अप्रियस्य च पथ्यस्य श्रोता वक्ता च दुर्लभ ‘ याचे उदाहरण म्हणून पाहावे असा लेख आवडला ,अनेकांनी वाचावा.