‘मराठीकारण’ ह्या विषयावरील आजचा सुधारक चा हा विशेषांक वाचकांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. ‘मराठी’कडे निव्वळ एक भाषा म्हणून न पाहता त्या भाषेचे स्थान काय आहे, ते कुठे जात आहे आणि कुठे जायला पाहिजे याचा आलेख मराठीकारणात अपेक्षित आहे. हे मराठीचे स्थान अर्थातच मराठी माणसावर आणि हा माणूस आपल्या मातृभाषेकडे ज्या दृष्टीने पाहतो त्या दृष्टीवर अवलंबून आहे. ह्या अर्थाने मराठीचे स्थान हा आज एक चिंतेचा विषय बनला आहे. सच्च्या मराठी मनात त्याबद्दल असंतोषही आहे. एक दोन वर्षांपूर्वी मुंबईत मराठीकारणाच्या चळवळींनी वेग घेतला होता. त्यामधून काही चांगल्या गोष्टी घडल्यादेखील. ‘मराठीकारण’ हा शब्द लोकांना परिचित झाला. शासनाचे लक्ष ह्या विषयाकडे वेधले गेले. मराठी भाषा विभाग स्थापन झाला. पत्रकारितेचा अभ्यासक्रम मराठीतून सुरू झाला. माहिती तंत्रज्ञानात मराठीचा वापर हा विषय चर्चेत आला. परंतु त्यानंतर लवकरच चळवळ स्थगित झाली आणि सर्वकाही पूर्वपदावर आले. तरुणांच्या अशा चळवळी सुरू होणे हे सामाजिक परिवर्तनाचे एक चांगले लक्षण आहे, परंतु ती अल्पावधीत बंद पडणे हे अर्थातच नाही. यामध्ये मराठी मानसच प्रतिबिंबित झाले आहे.
आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः। हे मराठी तरुण किती गंभीरपणे काम करतात, एक संघटना म्हणून काम करताना त्यांचा प्राथम्यक्रम काय असतो, समाजातील वडीलधाऱ्यांकडून त्यांना कितपत मार्गदर्शन व पाठबळ लाभते ह्यासर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आजच्या ह्या अंधारयुगात मराठीकारणाची चळवळ सुरू होऊन बंद पडते म्हणजे काय ह्याचा लेखाजोखा मांडला पाहिजे आणि ते कार्य पुढे नेले पाहिजे. मराठीला आपली मातृभाषा मानणाऱ्या प्रत्येकाचीच ही जबाबदारी आहे.
आजचा सुधारक चा हा विशेषांक ही जबाबदारी पार पाडण्याचाच एक भाग आहे. ह्या अंकात मराठी आणि राजकारण ह्या विषयावरची मांडणी मुख्यतः केली आहे. मराठी प्रदेश म्हणून स्थापन झालेल्या ह्या राज्यात ‘मराठी’च्या मुद्द्यावर स्थापन झालेले दोन राजकीय पक्ष आहेत. ह्या दोहोंनीही, राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे स्थान कमावले आहे. इथल्या तरुणांमध्ये ते लोकप्रिय आहेत. ह्या पक्षीय राजकारणाचा विचार करताना मुख्यतः दोन मुद्दे डोळ्यांसमोर येतात. एक म्हणजे चांगल्या अर्थाने मराठी अस्मिता फुलविण्याचे काम ह्या पक्षांनी किती केले, म्हणजेच, मराठी समाज म्हणून एकत्रितपणे आपली उन्नती करण्याची प्रेरणा समाजाला ह्या पक्षांनी दिली काय? दुसरे असे, की हे अस्मितावादी राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? लोकशाहीकडून राष्ट्रवाद-प्रदेशवाद अशी तर आपली वाटचाल होणार नाही? कारण अस्मिता आणि अहंभाव यांमधील सीमारेषा फार पुसट असते.
ह्या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यां दोहोंची मुलाखत ह्या अंकात दिली आहे. आजचा सुधारक ने विचारलेल्या प्रश्नांची सूची स्वतंत्रपणे छापली आहे. डॉ.नीलम गो-हे यांनी मुलाखत दिली आहे, तर अनिल शिदोरे यांनी प्रश्नांना अनुसरून एक लेखच लिहून पाठवला आहे. वाचकांनी त्यामधून प्रश्नांची उत्तरे शोधून घ्यावीत.
महाराष्ट्राची स्थापना हा ‘भाषावार प्रांतरचना’ ह्या कार्यक्रमाचा परिपाक होता. त्यामळे आजच्या ‘महाराष्ट्राचा विचार करताना ही पूर्वपीठिका समजून घेणे अगत्याचे ठरते. महाराष्ट्राच्या स्थापनेमागील उद्दिष्टे काय होती, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय घडामोडींचा, पक्षीय राजकारणाचा त्या कार्यक्रमावर काय परिणाम झाला, शेवटी त्यामधून काय साध्य झाले? विविधतेतील एकता की सांस्कृतिक सपाटीकरण? यांचा आढावा घेणारा विलास सोनवणे ह्यांचा ‘भाषा व राजकारण’ हा लेख अंकाच्या सुरुवातीला दिला आहे. भाषिक अस्मितेच्या मर्यादांचे सूक्ष्म विवेचनही ह्या लेखात वाचायला मिळेल.
प्रमाण भाषेच्या मुद्द्याची जातीयतेशी सांगड घालणे कसे अयोग्य आणि घातक आहे याची दत्ता पवार यांनी केलेली चर्चा आणि सत्वशीला सामंत यांचे, मराठीच्या अवनतीस प्रमाण लेखनाकडे केलेले दुर्लक्षच जबाबदार असल्याचे निदान, वाचकांचा दृष्टिकोण समृद्ध करतील.
मराठी बोलणारे लोक कोण? मराठी ही फक्त हिंदूंची भाषा आहे, मुसलमानांची भाषा उर्दू किंवा दखनी आहे असा बहुतेकांचा समज असतो, पण महाराष्ट्रातील मुसलमानांची बोलण्याची/लिहिण्याची भाषा मराठी आहे. राजकीय हेतूसाठी त्यांना ‘बिगर मराठी’ ठरवण्यात आले आहे. अनेक मुसलमान कवींनी मराठीत काव्यरचना केली त्याचे सोदाहरण विवेचन ‘मराठी भाषा आणि मुसलमान’ या लेखात फक्रुद्दीन बेन्नूर यांनी केले आहे.
मराठी संस्कृतीचा आपल्या साऱ्यांनाच अभिमान आहे, पण त्यामध्ये खरोखर अभिमान बाळगण्यासारख्या गोष्टी कोणत्या, ह्याचे प्रकट चिंतन अशोक शहाणे यांनी मराठी, तरीही अभिजात! ह्या लेखात केले आहे. मराठी व इतर भारतीय भाषांची क्षमता व त्यांचे सामर्थ्य व्यक्त करणारा विनोबांचा लेखही ह्या अंकात समाविष्ट केला आहे.
मराठीकारणावर प्रकाशित करावयाच्या विपुल साहित्याला न्याय देण्यासाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर 2011 हे दोन अंक ह्या विषयावर काढण्याचे ठरवले आहे. पैकी हा पहिला अंक मुख्यतः मराठीचे राजाकारण ह्या विषयावर आहे. दुसरा-नोव्हेंबरचा अंक शासन-व्यवहारात, मराठी, न्यायव्यवहारात मराठी व ज्ञानभाषा मराठी ह्या तीन मुद्द्यांना धरून काढण्यात येईल.
भूमिका
मराठी भाषा आणि पर्यायाने मराठी संस्कृती ह्या विषयांवर सध्या खूप चर्चा झडत आहेत. उघड आहे, की स्थिती गोंधळाची आहे. मराठीच्या मुद्द्यावर राजकीय पक्ष स्थापन होत आहेत. दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. आपली मातृभाषा मराठीच आहे याबाबत आजच्या बालकांना खात्री नाही. शासनव्यवहार, न्यायव्यवहार आणि उच्च शिक्षण यांचे माध्यम मराठी असू शकते का, हा म्हटले तर वादाचा विषय आहे, पण यावर वाद सुरू नाही. सांगणारे काहीही सांगोत, सर्वसामान्य जनता ह्या वादात न पडता ‘नाही’ असा निष्कर्ष काढून मोकळी झाली आहे. थोडक्यात, मराठी भाषेची पीछेहाट, दुसऱ्या कुठल्याही भाषेने तिची जागा घेण्याची असंभाव्यता आणि मराटी भाषिकांच्या मानगुटीवर बसलेला न्यूनगंड अशी ह्या भाषाहीन समाजाची दिशाहीन अवस्था आहे.
ह्याचा विचार अर्थातच इतर भाषाभगिनींच्या संदर्भात करावा लागेल. ह्या भगिनी म्हणजे भारतीय भाषा, कारण त्या एका राष्ट्रात आहेत. शेजारीशेजारी आहेत. प्रत्येकीला स्वतंत्र भूप्रदेश वाटून दिलेले आहेत. प्रत्येकीची स्वतंत्र संस्कृती आहे. ही व्यवस्था म्हणजे भारताची भाषावार प्रांतरचना, आणि ह्या सर्व संस्कृतींना सामावून घेणारे, त्यांना मर्यादित स्वातंत्र्य देऊन त्यांच्यावर अंमल करणारे राष्ट्र म्हणजे भारत देश. तर आता राष्ट्र ह्या संकल्पनेचाच साकल्याने विचार करणे आले.
इथल्या विविध भाषा व संस्कृती यांची आवळ्याची मोट प्रथम बांधली ती इंग्रजांनी. भारतीय उपखंडावर त्यांनी एकछत्री अंमल सुरू केला व त्यातूनच स्वातंत्र्यानंतर हा भाषावार प्रांतरचना-वजा-विविधतेतील एकता असलेला भारत उदयास आला.
आजही ह्या देशात विभिन्न संस्कृती नांदतात, त्या मुख्यतः आपापल्या भाषेला धरून. भाषा म्हणजे त्या संस्कृतीचा चेहरा, तिची अभिव्यक्ती आणि तिची शक्तीदेखील. प्रत्येकीला आपापला स्वतंत्र अवकाश हवाच असतो, पण सर्वांमध्ये एक समान सूत्र आहे आणि सुखाने जगण्यासाठी त्यांना राज्यसंस्थेची गरज आहे. या कारणांमुळे भारत हे एक राष्ट्र निर्माण झाले खरे, तरीही राष्ट्र ही, काही झाले तरी कृत्रिम, लादलेली संकल्पना आहे. ती संस्कृतीवर कुरघोडी करू शकत नाही. उदाहरणार्थ स्वतंत्र भारतातील काश्मीरची पाकिस्तानशी आणि तामिळनाडूची श्रीलंकेशी असलेली जवळीक, आपुलकी आपण पाहतोच आहोत. मूळचे एक असूनही वेगवेगळे राहावे लागल्याच्या भावनेचे त्यांच्यात उद्रेक होत असतात. त्यातून, हे राष्ट्र आपले न मानण्याची बंडखोरी पुन्हा पुन्हा उफाळून येते. पंजाब आणि बंगाल यांना तर प्रत्यक्षच दुभंगले गेले. त्यामुळे त्याचे दुःख आणखी तीव्र असल्यास नवल नाही. अशा रीतीने, संस्कृती (भाषा) ही देशापेक्षा अधिक व्यापक व मूलगामी संकल्पना असल्यामुळे भाषिक अस्मितेकडे ‘देशद्रोह’ म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.
महाराष्ट्राच्या वाट्याला दुभंगलेपणाचे दुःख आले नाही, मात्र मराठी भाषिक आज अनेक खऱ्या खोट्या कारणांनी व्यथित आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी अस्मितेला आलेला फुलोरा कोमेजून गेला आहे. कला, साहित्य, समाजकारण (चळवळी व जनआंदोलने), राजकारण सगळ्यातच साचलेपण आले आहे. त्यातून नव्वदीच्या दशकात आलेले जागतिकीकरण, खुल्या अर्थव्यवस्थेने आणलेला चंगळवाद आणि व्यवस्थापनशास्त्राचे स्तोम वाढूनही चहूबाजूंनी ढासळणाऱ्या व्यवस्था यामुळे गोंधळात भरच पडत आहे. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय व तो कोणता, मराठी संस्कृती म्हणजे काय, मराठी भाषा म्हणजे काय, प्रमाण मराठी भाषा कोणती? मुख्य म्हणजे आजच्या आपल्या जगण्यात ह्या सर्वांची प्रस्तुतता काय?
हे प्रश्न आज आपल्याला सतावीत आहेत. त्या प्रश्नांना, लोक तीन ठोकळेबाज प्रकारांनी तोंड देताना आढळतात –
1.पुराणगौरव – महाराष्ट्राची परंपरा फार थोर आहे. आजवर मराठीने कितीतरी आक्रमणे पचवली. मराठी संस्कृती कल्पान्तापर्यन्त टिकाव धरून राहणार यात शंका नाही.
2. परिस्थितिशरणता – नव्या मनूच्या नव्या प्रवाहात आपल्याला सामील झालेच पाहिजे. नाहीतर आपण नामशेष होऊ.
3. असुरक्षितता – आज बदलत्या काळात जी मोठ्या प्रमाणात घुसळण चालू आहे, तीमध्ये खूप मोलाचे असे काहीतरी आपल्याजवळून निसटून जाते आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते धरून ठेवले पाहिजे.
ह्या तीन प्रकारांनी उत्तरे शोधणारे लोक स्वतःही त्यावर समाधानी नाहीत. पहिल्या दोन प्रकारांमध्ये, सगळे काही आपोआपच होत असते असे म्हणणाऱ्यांनाही, आपण केल्याशिवाय होणार नाही, पण करायचे काय? हा प्रश्न कुरतडत असतो. तिसऱ्या प्रकारात तर आपले अत्यंत मोलाचे म्हणणे नक्की काय तेच माहीत नसते. नऊवारी आणि नथ घालून स्कूटरवर बसलेल्या डोंबिवलीचया महिला दर गुढीपाडव्याला मिरवणूक काढून मराठी संस्कृती जपल्याचे समाधान मिळवतात. महाराष्ट्रात गुढीपा डव्याचे महत्त्व काय होते याचा विचार करायला कोणाला वेळ आहे?
द्वेषाधारित अस्मिता समाजात दुही माजवण्याचे कार्य करीत असली, तरी भाषा, अस्मिता ह्या गोष्टी अस्थानी नाहीत. उलट, आपल्या जगण्याला अर्थ व स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्याच त्या आहेत. तसा त्यांचा योग्य रीतीने विचार केला पाहिजे. तसा तो करण्याच्या आणि त्यांचा इतिहास, त्यांचे स्वरूप समजून घेण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र आणि मराठी ह्या विषयावर आजचा सुधारक चा विशेषांक काढायचा आहे.
शिरपूर, धुळे.
E-mail: anumohoni@gmail.com Mob. 9881442448