आजच्या जीवशास्त्र्यांपैकी एक मोठा माणूस अटै मायर, याने काही वर्षांपूर्वी एक मत व्यक्त केले. तो पृथ्वी सोडून इतरत्र कुठे बुद्धिमान जीव सापडू शकतील का, यावर बोलत होता. त्याला असे जीव सापडण्याची शक्यता अगदी कमी आहे असे वाटत होते. उच्च बुद्धिमत्ता म्हणजे माणूसप्राण्यांत दिसते तश्या रचनेची बुद्धिमत्ता जीवांना कितपत परिस्थितीशी अनुरूप करते, यावर मायरचा युक्तिवाद बेतलेला होता. मायरच्या अंदाजात पृथ्वीवर सजीव रचना अवतरल्यापासून आजवर सुमारे पन्नास अब्ज जीवजाती उत्पन्न झाल्या आहेत; ज्यांपैकी एकाच जीवजातीपाशी संस्कृती घडवण्याला उपयुक्त अशी बुद्धिमत्ता आहे. या जीवजातीला ही बुद्धिमत्ता सुमारे एक लाख वर्षांपूर्वी प्राप्त झाली. या जीवजातीतला एक लहानसा गट बऱ्याच आपत्तींमधून वाचला, आणि आपण सारे त्या गटाचे वंशज आहोत, असे आज मानले जाते.
मायरच्या कल्पनेनुसार आजची मानवी नमुन्याची बुद्धिमत्तेची रचना नैसर्गिक निवडीत टिकून राहणारी नाही. तो सांगतो, की जीवसृष्टीचा इतिहास “बुद्दू असण्यापेक्षा बुद्धिमान असणे चांगले”, या सूत्राविरुद्ध पुरावा देतो. ही केवळ जीवशास्त्रीय यशापयाशावर बेतलेली कल्पना आहे. उदा. भुंगे आणि बॅक्टीरिया टिकून राहणे या निकषावर माणसांपेक्षा प्रचंड प्रमाणात जास्त यशस्वी आहेत. मायरने एक खिन्न-गंभीर निरीक्षणही नोंदले; “सरासरीने प्रत्येक प्रजाति एखादा लाख वर्षे टिकते.”
आज आपण बुद्द असणे चांगले की बुद्धिमान असणे चांगले, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल अशा मानवी इतिहासाच्या टप्प्यावर आहोत. त्या प्रश्नाचे उत्तर न मिळाले तर बरे, असे माझे मत आहे. जर उत्तर मिळाले, तर ते मानवजात ही एक जीवशास्त्रीय चूक होती, असेच असेल. आणि या जीवजातीने आपल्या नेमून दिलेल्या लाख वर्षांत स्वतःचा आणि इतर बऱ्याच गोष्टींचा नाश केला, असेही दिसेल..
असे विनाशकारी काम करण्याची क्षमता या जीवजातीने नक्कीच कमावली आहे. एखादा परग्रहावरचा जीव जर हे पाहत असेल, तर त्याला काय दिसेल? या जीवजातीने तिच्या संपूर्ण इतिहासात ही क्षमता दाखवली आहे. आणि गेल्या काही शतकांमध्ये तर जीवनाचा आधार असलेले पर्यावरण, व्यामिश्र जीवांमधील विविधता, वगैरेंच्या विनाशाची क्षमता नाट्यपूर्ण रीतीने वाढवली आहे. हा विनाश, जीवजातींमधला इतरांचा विनाश संयत, हिशेबी रानटीपणाने केला जात आहे.
[हेजिमनी ऑर सहायव्हल या नोम चोम्स्कीच्या पुस्तकाच्या (पेंग्विन, 2003) सुरुवातीचा हा उतारा.]