या वर्षाच्या सुरुवातीला Battle Hymn of the Tiger Mother नावाचे एक पुस्तक ब्लूम्सबरी पब्लिशिंग तर्फे बाजारात आले आहे, आणि बालसंगोपनाबद्दलचे पुस्तक म्हणून बहुवितरितही होते आहे. त्या पुस्तकाच्या लेखिका अॅमी चुआ ह्या मूळ चिनी वंशाच्या आणि त्यांच्या वडलांपासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या दोघी मुलींना खास चिनी पद्धतीने शिस्तीच्या धारेवर धरून कसे वाढवले, आणि मुलांना वाढवण्याची ही चिनी पद्धतच कशी योग्य आणि किफायतशीर आहे हे त्यांना सांगायचे आहे. पुस्तकाची सुरुवात त्यांनी तशीच केली आहे. पुस्तक लिहिण्याच्या भरात आपल्या विषयाशी सुसंगती ठेवणे मात्र त्यांना साधलेले नाही. त्यामुळे हे पुस्तक बालसंगोपनाबद्दलचे नवाटता आठवणींचे वाटते. त्या आठवणीही फक्त मुलींना वाढण्याबद्दलच्या नाहीत; तर त्यांच्या दोन कुत्र्या, किंवा त्यांच्या बहिणीचे कॅन्सरचे आजारपण असे अलाहिदा विषयही
त्याच येतात.
दुसऱ्या देशात स्थलांतरित झालेल्यांना आपल्या मूळ देशातील संस्कृती आणि नव्या देशातील संस्कृती यांतील तफावत जाणवत राहाते. आपण इथले नाही याची जाणीव ठाईठाई होत राहते, त्यातून काही लोक नव्या संस्कृतीशी जुळवून घेण्याचा, आपण वेगळे नाहीच असे दाखवण्याचा प्रयत्न करत राहतात. याउलट काहींना आपला वेगळेपणा, आपल्या मुळ देशाचा-संस्कृतीचा वारसा इतरांना दाखवण्याची तसेच आपल्याही मनात जागता ठेवण्याची गरज वाटत राहते. अॅमी चुआ यातल्या दुसऱ्या गटातल्या आहेत. हे वेगळेपण त्यांच्या आठवणींमधून उलगडते. अशा गोष्टी नोंदवल्या जाणे सामाजिक अभ्यासाच्या दृष्टीने लक्षवेधी असते. या दृष्टीने बाईंच्या लिखाणाकडे, त्यातून मांडल्या जाणाऱ्या वैयक्तिक जीवनाच्या पटाकडे आपण बघत असू तर तो फारसा आकर्षक नसला तरी प्रामाणिक जरूर आहे. आकर्षक नाही असे म्हणण्याची बरीच कारणे आहेत. त्यापैकी एक, गेल्या बीस वर्षात अमेरिकेत सामाजिक राजकीय स्तरावर घडत असलेल्या कुठल्याही घटनेचा पुस्तकात कुठे उल्लेखही नाही. आसपासच्या परिस्थितीचा संदर्भ न ठेवता पालकत्वाचा विचार केलेला तर अपुरा राहतोच, पण वैयक्तिक जीवनपटही साक्षेपी होत नाही.
असे असले तरी महाजालावर पालकत्वाबद्दलच्या साहित्यात ह्या पुस्तकाचा त्याचा उल्लेख आहे, त्यावर उलटसुलट चर्चा घडलेल्या आहेत, टाईम सारख्या नियतकालिकात त्यावर लेख छापून आलेला आहे, मुलाखती झडलेल्या आहेत, तेव्हा यात खरेच काही आहे की काय असा संभ्रम आपल्या मनात निर्माण होतोच. आपल्या संभ्रमांमागे अर्थात आपलीही कारणे आहेत. बालसंगोपनाबद्दल, त्यात शिस्तीची चौकट किती आणि कशी असायला हवी याबद्दल, भरपूर अभ्यास-संशोधने झालेली असली तरी प्रत्यक्षात आणताना नेमके काय करावे, कसे करावे याबद्दल जनमानसात एरवीच स्पष्टता अगदी कमी आहे. मुलांवर आपल्या अपेक्षांचे दडपण आणू नये, खाऊ खेळण्याची लाच आणि माराची भीति यांच्या चिमटीत त्यांना दाबू नये, हे बाह्यतः पटत असूनही न ऐकणाऱ्या मुलाला ताळ्यावर आणायचे तरी कसे हा प्रश्न पालकशिक्षकांना सहज सुटलेला नाही. मूल का ऐकत नाही ह्याकडे थोडे थांबून आत डोकावून बघितले तर ह्या प्रश्नाचे उत्तर मूल खरे म्हणजे आपल्यासमोर ठेवतच असते. फक्त आपले त्याकडे लक्ष जात नाही.
आपल्या मुलामुलीनी त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा अर्थ कसा लावावा हे पालकांना ठरवता येणारच नसते, तरीही अनेक पालक तसा विचार करत असतात. आपले मूल विलक्षण प्रज्ञावंत निपजावे, त्याने बालवयापासूनच संगीत किंवा त्यासारख्या क्षेत्रात विस्मयकारी कामगिरी करून दाखवावी, आणि आपण यशस्वी पालक म्हणून मिरवावे असे तर बहुतेकांना वाटतच असते. अशावेळी हे पुस्तक वाचून पाहायला हवे असे वाटणे अगदीच साहजिक आहे. ह्याचे कारण असे; कुशाग्र गणिती बुद्धीचे आणि असामान्य सांगीतिक क्षमतेचे मूल कसे वाढवायचे ते मला माहीत आहे, कारण मी ते केलेले आहे, अशीच या पुस्तकाची सुरवात लेखिकेने केलेली आहे. अर्थात चिनी पद्धतीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जाण्याचे आणखी एक वेगळेच कारण असावे. गेल्या दोनतीन दशकांत चिनी लोकांनी चौफेर आपले प्रभुत्व दाखवल्याने विशेषत: अमेरिकन समाजात त्यांच्याबद्दलची असुरक्षितता वाटू लागल्याचे तिथल्या राष्ट्रप्रमुखांच्या भाषणांमधूनही सातत्याने दिसते आहे. साहजिकच चिनी लोक मुले वाढवताना नेमके काय करतात ते जाणून घेणे त्यांना आणि इतरांनाही आवश्यक वाटत असावे.
चिनी पद्धतीत म्हणे प्रसन्न संवेदनशीलतेने मुलामुलींना वाढवण्याला जागाच नाही. चिनी पद्धतीची री ओढणारे पालक म्हणतात, आयुष्य खडतर आहे, आज जरी कडक शिस्तीचा मुलांना त्रास होत असला तरी नंतर त्यांना त्याचा फायदा उमगेल. तीन वर्षाच्या धाकटीला अॅमी चुआ या आईने, ती त्यांचे ऐकत नाही, पियानोच्या पट्ट्या एकएक करून वाजवत नाही यासाठी त्यावेळी हिमवर्षाव सुरू असूनही घराबाहेर काढले होते. इतक्या लहान मुलीला अशा प्रकारे छळल्याचे बाहेर कळले असते तर त्यांना शिक्षा झाली असती. याची त्यांना जाणीव असल्याचे दिसते. त्यामुळे मुलगी तरीही ऐकत नाही असे दिसल्यावर त्यांनी माघार घेतली, त्याचवेळी मुलीवर पुढच्या वेळी कुरघोडी कशी करता येईल असा विचार सुरू केल्याचे त्यांनीच म्हटले आहे.
अॅमी चुआ याच्या मते बालसंगोपनाचा(?) पाया म्हणजे अतिशय कठोर अपेक्षा, त्या पूर्ण न झाल्यास त्याहून कठोर शिक्षा हाच आहे. मूल एक स्वतंत्र माणूस आहे- ते सर्वश्रेष्ठ ठरण्यापेक्षा, प्रतिष्ठा मिळवण्यापेक्षा इतरांसह आनंदाने जगण्याचा निर्णय घेऊ शकते. चाचा तो हक्क आहे, याबद्दलची कणभरही जाणीव त्यांना नाही. आहे तो स्वत:चे म्हणणेच काय ते खरे करून दाखवण्याचा अट्टाहास. या त्यांच्या वागणुकीला त्यांच्या दोघी मुलींनी साहजिकच (शक्य झाले तेव्हा शक्य तेवढा) विरोध केला, धाकटीने तर जोरदार बंडखोरी केली. दोघी एकमेकींशी खिदळत आपल्या आईचे डोके फिरलेले(She is insane) असल्याचे बोलताना अॅमीनी ऐकलेले आहे. दोघी मुलींना वाद्यवादनाचा रोज सहा-सहा तास सराव त्या करायला लावायच्या. या त्यांच्या प्रयत्नांचा फायदा झाला नाही असे नाही, सरावाने कौशल्य वाढतेच, तरीही त्यांनीच लिहिलेले आहे त्याप्रमाणे …ही मुलगी तेरा वर्षांची झाल्यावर तिने आईच्या नियमांना झुगारून देऊन टेनिस शिकायला सुरुवात केली. कुठल्याही स्पर्धेत हरायचे नाही ही आईची अपेक्षा उडवून लावत संपूर्णपणे हरली, तरीही अत्यंत आनंदात घरी आली. तिच्या टेनिसबद्दल आईने आपल्याच पद्धतीने विचार करायला सुरुवात केली आहे ह्याची तिला कुणकुण लागल्याबरोबर, “माझ्या संगीताची तू वाट लावली आहेस आता टेनिसची वाट लावायची नाहीस’ असे तिने स्पष्टपणे बजावले. यावर लहान असती तर धरून बडवली असती पण आपल्याहून उंच वाढलेल्या मुलींना हाताला धरून काही करायला लावता येत नाही हेही चुआबाईंना कळते पण वळत मात्र नाही. अॅमी चुआ ह्यांनी राजकीय वा सामाजिक पर्यावरणाबद्दल जसे काहीही नोंदलेले नाही, तसेच लैंगिक शिक्षण, मूल्यशिक्षण, अशा अनेक गोष्टींबद्दल जणू काही त्या नसतातच असे मौन पाळलेले आहे. मुली ह्या केवळ अभ्यास करणे, वादनाचा सराव करणे एवढ्याच गोष्टींसाठी त्यांनी जन्माला घातल्या आहेत अशी त्यांची समजूत ह्या पुस्तकातून व्यक्त होते.
चिनी लोकांचा एक विशेष मानला जातो, तो म्हणजे प्रचंड कष्ट करणे. अॅमी आंनीही त्यांच्या दोघी मुलींसाठी अक्षरश: प्रचंड कष्ट केले आहेत. पानापानांवर ते वाचताना आपल्याला जशी त्या मुलींची दया येते, तशी त्यांच्या आईचीही येते. कॉलेजमधली नोकरी, मुलींना शाळेत नेणे आणणे, घरातील इतर कामे हे सगळे संभाळून दिवसाकाठी सहासहा तास मुलींच्या पियानो किंवा व्हायोलीन वादनाची तालीम करून घेणे हे सर्व त्या वर्षानुवर्षे कश्या करत असतील ह्याचा विस्मय वाटत राहतो. आपल्याकडेही पालक आपल्या मुलामुलींना धरून धोपटतातच फक्त, पण स्वत:ला विसरून इतके अपरंपार कष्ट उचलणारे त्यात अभावानेच दिसतात.
अॅमी चुआंच्या चौकोनी कुटुंबातला एक महत्त्वाचा घटक त्यांचे पती जेड. हे ज्यू आहेत. स्वतः अॅमीनी आईवडिलांशी बंडखोरी करून चिनी नसलेल्या ह्या माणसाशी लग्न केले होतेच. बालसंगोपनाच्या अॅमीच्या पद्धतीबद्दल जेडला मान्यता असावी असे पुस्तकातल्या संदर्भावरून वाटत नाही, पण आईवडिलांमधील मतांतरांचा मुलांना त्रास तरी होतो किंवा ती त्याचा गैरफायदा घेतात, यासाठी जेडनी प्रथमपासूनच माघार घेतलेली आहे.
तरीही मधूनमधून अॅमीला बाजूला घेऊन ‘जरा हळू’ असे सांगायचा यत्न ते करत राहिलेले आहेत.
अॅमी चुआनी आपल्या मुलींच्यासाठी काही नियम केले होते. त्यात टीव्ही बघायचा नाही, कॉम्प्युटरखेळ खेळायचे नाहीत, मित्रमैत्रिणींकडे राहायला जायचे नाही, असे कदाचित इकडच्या अनेक पालकांना बरे वाटतील असे नियम होतेच पण त्याशिवाय आपल्या आवडीने आपले छंद मुलींनी ठरवायचेच नाहीत, आईने सांगितलेले छंदच जोपासायचे, अ शिवाय कुठलीही श्रेणी मिळवायची नाही, वर्गात सतत पहिलेच येणे आवश्यक आहे, पियानो आणि व्हायोलीन खेरीज दुसरे काही वाजवायचे नाही, ते मात्र न कंटाळता तासन्तास वाजवताना मध्ये पाणी प्यायला किंवा शू करायलाही थांबायचे नाही असे अनेक भयंकर नियमही होते. अॅमीच्या वडलांनीही अॅमीला ह्याच पद्धतीने वाढवले असावे. अॅमी त्यांच्या लहानपणची गोष्ट सांगतात, एका स्पर्धेत त्या दुसऱ्या आल्या होत्या. बक्षीस समारंभाला त्यांचे वडील आले होते. कार्यक्रमानंतर वडील म्हणाले, पन्हा अशी नामुष्कीची वेळ माझ्यावर येऊ देऊ नकोस.
अॅमी चुआ म्हणतात त्याप्रमाणे अमेरिकेतील चिनी बालकाला जर ब श्रेणी मिळाली (अमेरिकेत तशी मिळण्याची शक्यता मुळातच कमी आहे, पण जर मिळालीच) तर त्याची आई बाजारातून त्या विषयाच्या असंख्य प्रश्नपत्रिका मिळवते आणि आपल्या बालकाकडून सोडवून घेते. अॅमीची थोरली लेक एकदा शाळेतल्या एका चाचणीत दुसरी आली. त्यानंतरच्या आठवडाभर तिला त्या विषयाच्या अनेक प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागल्या. आई शेजारी वेळ लावून पाहत असायची. सुट्टीत मुलींना अभ्यास करा असे त्या म्हणतात तेव्हा तुम्ही केला नाहीत तर त्या अमुकतमुकच्या मागे पडाल, कारण तो/ती आत्ता अभ्यास करत असणार, असे स्पर्धात्मकच समर्थन येते. मूल शिक्षेने ऐकत नाही तेव्हा त्याला बक्षिसांची लाच देऊन आपला कार्यभाग साधण्याची ह्या बाईंची पद्धत अगदी नकोशी आहे. आपल्या मुलीला इतर मुलामुलींपेक्षा लवकर यावे यासाठी ती वर्षभराची असल्यापासून अंकवाचन, अक्षरवाचन घोकायला लावणारी ही आई आहे. त्या वयातल्या मुलामुलींनी तरी आसपासच्या जगातून हजार गोष्टी शिकण्याचं सोडून अक्षरवाचन का शिकावे? त्यांची नजर तोवर तयार झालेली नसते, अश्यावेळी डोळ्यांना भलभलता ताण का द्यावा? पण नाही, अभ्यासविषयांत, शाळेत आपल्या मुलांनी प्रावीण्य मिळवणे हाच यशस्वी पालकत्वाचा दाखला आहे. असे अॅमी चआंचे ठाम(?) मत आहे. अभ्यासक्रम योग्य आहे की नाही, शिकवण्याच्या पद्धतीत काही कमतरता तर नाही ना, विद्यार्थ्यांना ते समजावून घेताना काही अडचणी तर येत नाहीत ना, असे प्रश्न असू शकतात याची त्या दखलही घेत नाहीत. कुठल्याही अधिकाराला आव्हान देणे हेच चिनी पद्धतीत मुळातच बसत नसल्याने ते चूकच असल्याचे ॲमी मानतात. त्यामुळे विद्यार्थ्याने एखाद्या शिक्षकाबद्दल तक्रार केली, त्याला/तिला शिकवलेले कळत नसल्याचे, किंवा विनाकारण शिक्षा केल्याचे म्हटले तर पालकांनी काहीही न ऐकता पाहता शिक्षकाचीच बाजू घ्यायला हवी असे त्यांचे मत आहे. आता या बाईपुढे कोण काय म्हणणार?
संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर मला वाटले की ह्या बाईं प्रांजळ आहेत, प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत पण त्यांना त्यांच्याजवळ सामान्य माणसांकडे असतो तेवढा किमान विवेक नाही. याची पुस्तकात अनेक उदाहरणे दिसतात.1. मुली वाद्यवादनाच्या सरावाला बसतील तेव्हा जर ह्या बाई तिथे नसणार असल्या, तर जणू काही आपण तिथेच आहोत अशी कल्पना करून प्रत्येक वेळी मुलींना सूचनांची पानेच्या पाने लिहून ठेवणे. एकदा त्या लपवायच्या विसरल्या म्हणून ती त्यांच्या विद्यार्थ्याने वाचली आणि तो त्यातल्या अतिरेकी मागे लागण्याच्या पद्धतीमुळे थक्क झाला. 2.सुट्टीमध्ये सफरीवर गेल्यावर प्रत्येक ठिकाणी जिवापाड कष्ट करून कुठेतरी पियानो मिळवून तिथे त्या मुलींना घेऊन जायच्या. यातून त्यांचे कष्ट दिसतात, पण त्यात मुलींचा सफरीचा आनंद हरवतो, सोबतच्या मंडळींचा वेळ वाया जातो याची तमा बाईंना अजिबात नाही. 3. त्यांच्या मुली चांगल्या वाजवत, पण शक्य त्या सगळ्या ठिकाणी मुलींबद्दल त्या थोडी जास्तच बढाई मारत असाव्यात असे त्यांच्या लिखाणावरून आपल्यालाही जाणवते. 4. चिनी पद्धतीत आपल्याहून थोरांना विरोध करणे बसत नाही, म्हणून बाईंनी सासूला तोंडावर कधीही विरोध केला नाही, मात्र नवऱ्याकडे केला. तरीही मुलींना आपल्या आईला आज्जीबद्दल प्रेम नाही हे कळलेच. पण म्हणजे शब्दांनी विरोध केला नाही तरी शारीर बोलीतून तो दिसत होताच, त्यापेक्षा समजदारपणे तो व्यक्त करणे अधिक बरे असे मात्र त्यांना वाटल्याचे दिसत नाही. 5. मुलीने वाढदिवशी दिलेले शुभेच्छापत्र नाकारून, “मी तुमच्यासाठी इतके कष्ट घेतलेले आहेत, की याहून उत्तम शुभेच्छापत्र मिळण्याची माझी पात्रता आहे असे त्या तिला म्हणतात. मुली त्याहून चांगले शुभेच्छापत्र तयार करू शकल्या असत्या, ह्याची त्यांना जाणीव आहे, पण तरीही ते तसे न करण्यातून त्या( मुली) काही सांगू पाहत आहेत, ते मात्र ह्या आईला समजत नाही. 6. मुलींच्या पियानो/व्हायोलीन शिक्षणासाठी सारासार विचार न करता त्यांना प्रत्येक ठिकाणी नेत राहिल्या, त्यात अनन्वित पैसा आणि वेळ आणि श्रम घालवले. 7. हे सगळे करूनही उपयोग होत नाही, मुली बिथरून अधिकच बंडखोरी करू पाहत आहेत, नवरा असे करू नको हे सांगत आहे, चिनी आईवडीलसुद्धा नको ग इतकी खेचूस त्या मुलींना असे म्हणत आहेत, हे पाहूनही बाईनी आपला हट्ट सोडला नाही.
‘आपल्याला परिस्थितीचा साकल्याने विचार करता येत नाही, घोकंपट्टी पद्धतीने शिकावे लागल्याने असेल कदाचित, पण बऱ्यावाईटाचा आपल्यापुरता न्यायनिवाडाही जमत नाही आणि हे आपले चुकते आहे’ हे या लेखिकेला कळतच कसे नाही याचे आश्चर्य आपल्याला वाटत राहते. पुस्तकभर त्या ह्या आकलनाच्या अगदी जवळ पुन्हापुन्हा पोचतात, पण त्यांच्या हातात ते येत नाही. याची चुणूक खालील प्रसंगात दिसते. लेखिका आणि त्यांच्या नवऱ्याचे एकदा भांडण झाले. ‘तू मुलींवर इतकी डाफरत जाऊ नकोस’, असे नवरा म्हणत होता, अॅमी त्यावर संतापून म्हणते, ‘तू स्वत:च्या पलीकडे कशाचा विचार करतोस का? केला आहेस का काही विचार, थोरलीच्या भविष्याची स्वप्नं, धाकटीच्या भविष्याची स्वप्नं, कोकोच्या भविष्याची स्वप्नं पाहिली आहेस कधी?’ (कोको ही त्यांची कुत्री आहे.)
कोकोच्या भविष्याच्या स्वप्नांचा उल्लेख झाल्यावर अॅमीच्या पतीला काही सुचेनासेच झाले असावे. ‘कोकोचे भविष्य म्हणालीस तू?’ त्याने विचारले. ‘हो, कोकोच्या भविष्याची स्वप्नं…’
यावर सगळे भांडण सोडून देऊन तो अॅमीच्या जवळ आला, तिच्या डोक्यावर थोपटून ‘जाऊ दे अॅमी, आपण बघू, काहीतरी करू’ असे म्हणून तिथून निघून गेला. ॲमी चुआंनी हे सगळे असे लिहून आपल्याला दिले आहे, आणि म्हटले आहे की भांडण मिटल्याने मलाही बरेच वाटले.
हा प्रसंग वाचल्यावर सुरुवातीपासून या माता व्याघेश्वरीची काय गडबड होते आहे ते आपल्या लक्षात येते. या बाई पंचेचाळीशीच्या आणि अमेरिकेत राहात असलेल्या असूनही अगदी असमंजस असाव्यात असे दिसते. त्यांना परिस्थिती दिसते पण कळत नाही. त्याचमुळे त्या एका प्रकारे मुलींशी बरोबरीने भांडतात, वेडेपणाने बढाया मारतात. आपल्याला हवेसे असणारे आयुष्य मुलींच्या माध्यमातून जगू पाहतात. त्या दुष्ट नसकव्यात, पण भाबड्या आहेत. पालकत्व इतके एकेरी असू नये. ते कसे असावे हे काही ही अनुभवमंजूषा आपल्याला सांगत नाही; किंबहुना कसे नसावे हेच त्यातून आपल्याला पाहायला मिळते. ते आधीच कळलेले असेल तर या पुस्तकाचा नव्याने काहीच उपयोग नाही, पण जर आधी कळलेले नसेल तर आपापल्या जबाबदारीवर तुम्ही हा धोका स्वीकारायला माझी हरकत नाही.
( Battle Hymn of the Tiger Mother, Ami Chua, Published by Penguin publications)
अश्लेषा अपार्टमेंटस्, सुवर्ण-स्मृती कार्यालयाजवळ, डेक्कन जिमखाना, पुणे 417004.