गोळप, सह्यगिरीच्या निसर्गरम्य अशा परिसरात विसावलेले हे गांव रत्नागिरी शहराला अगदी जवळ, भाट्याची खाडी ओलांडली की सहा मैल अंतरावर, पावस पूर्णगड मार्गावर श्री स्वामी स्वरूपानंदांचे जन्मस्थान व समाधिक्षेत्र असलेले पावसगाव, त्या गावाच्या जवळ असलेले हे गोळप गाव. गावाच्या चहू बाजूला समाधी लावून बसलेले हिरवेगार डोंगर. त्यावर विहार करण्यास येणारे निरनिराळे पशुपक्षी, गावातून वाहणारी नदी. नारळी-पोफळी यांच्या बागा, आमराईत डौलाने डोलणारा हापूस, कोकणातील माणसांचे स्वभाव दर्शन घडविणारा फणस, हरत-हेची फुले, फळे यांच्या बागा. असा नयनरम्य परिसर म्हणजे गोळप. साडेतीन हजार लोकवस्तीचा हा गाव समृद्ध आहे. शेती बागायतीमुळे गावकरी समाधानी आहेत. गावात रस्ते, पथदीप, नळ-पाणी योजना अशी विकासकामे सुरू आहेत. माझ्या कॉलेज जीवनात म्हणजे 1974-75 च्या सुमारास गावामधून पूर्वी वाहणाऱ्या बारमाही नदीत मनसोक्त डुंबण्याचा आनंद मी अनुभवत होतो.
पण गेल्या 30 वर्षांपासून नदीतील गाळाची समस्या आहे. नदीच्या पाण्यावर गावातील शेती बागायती संपन्न झाली होती. पण गाळामुळे शेती अडचणीत आली आहे. तसेच नळ-पाणी योजनेला काही वेळा समस्यांना तोंड द्यावे लागते. काही ठिकाणी पावसात शेतीत नदीचे पाणी घुसून नुकसान होते. तसेच काठावरची जमीन खचत आहे.
काहीतरी करायला पाहिजे. विचार करीत बसण्यात अर्थ नव्हता. “पाणी अडवा पाणी जिरवा”, “झाडे लावा झाडे जगवा” ह्या घोषणा फक्त फलकावर पहाण्यात समाधान मानणाऱ्यातला मी नाही. म्हणूनच ठरवले कृती करायची. एकदा का तुम्ही कृती करावयाची ठरवली की मार्ग सापडत जातात. आपला विचार इतरांना बोलून दाखवला की अनेक पर्याय उपलब्ध होतात. काही तुम्हाला मदत करणारे पुढे येतात, तर काही ‘बघा बुवा, मला तर कठीण वाटतं’ असे म्हणणारे. परंतु निश्चय दृढ असला की नकारात्मक विचार आपोआप बाजूला ढकलले जातात. अशाच चर्चेतून एक नाव पुढे आले ते म्हणजे श्री.उल्हास परांजपे, विश्वस्त जलवर्धिनी ट्रस्ट. त्यांच्याशी भेटी झाल्या. पाणी ह्या विषयात सहकार्याचे आश्वासन घेऊनच आम्ही रत्नागिरी गाठले. गोळपला पोहोचलो.
गावातील नदीला भेट दिली असता असे दिसले की, गोळप गावातील ज्या नदीला बऱ्याच वर्षांपूर्वी बाराही महिने पाणी असायचे तशी परिस्थिती आज आपल्याला दिसली नाही. अनेक ठिकाणी नदी गाळाने भरली आहे. पाण्याचा प्रवाह कित्येक ठिकाणी दिसेनासा झाला आहे. नदी पूर्ववत करण्यासाठी ज्या काही बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यांपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नदीच्या पात्रात साठलेला गाळ काढणे, ‘शुभस्य शीघ्रम्’ या विचाराने प्रतीकात्मक म्हणून आम्ही थोडासा गाळ काढून ह्या शुभकार्यास सुरुवात केली.
नदीच्या पात्रातील गाळ काढल्यामुळे पुढील फायदे होणार आहेत :
1. नदीच्या पात्राची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे. (पूर्ववत होणार आहे)
2. गाळ काढल्यामळे आजूबाजूचे जे बांध ढासळत चालले आहेत त्यास प्रतिबंध होईल. म्हणजे ढासळण्याचे प्रमाण कमी होईल.
3. नदीचा गाळ म्हणजे सुपीक माती असते. ही जर शेतकऱ्याने आपल्या शेतात पसरली तर जमिनीची सुपीकता वाढेल.
4. या ठिकाणी गाळामध्ये बारीक व मोठे दगड असल्यामुळे त्यांचा उपयोग इतर कारणांसाठी करता येईल.
5. माती निसर्गात तयार होण्यासाठी बराच मोठा कालावधी लागतो. त्यामळे जमा झालेली माती किंवा गाळ जो वाहून समुद्राला मिळणार आहे त्यास प्रतिबंध होईल. कारण आपण सर्वजण गाळ काढून तो परत जमिनीवर योग्य त्या ठिकाणी वापरण्यासाठी देणार आहोत.
6. नदीच्या पात्रामध्ये व नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याच्या मागे गाळ जमा झाल्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ते प्रमाण वाढेल. तसेच बंधाऱ्याच्या मागे पाणी उपलब्ध झाल्यामुळे ते पाणी शेतकरी वापरू शकतील.
7. आजुबाजूच्या विहिरीतील व विंधण विहिरीतील पाण्याची उपलब्धता वाढेल.
त्याच सुमारास श्री. उल्हास परांजपे यांचे पाणी या विषयावर एक व्याख्यान गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते. श्री.उल्हास परांजपे यांचे जलसंवर्धनाचे विविध मार्ग, उपाय यांच्या विषयीचे व्याख्यान चालू असताना नद्यांमधला गाळ उपसला तर मोठे कार्य होईल असा विचार त्यांनी मांडला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने या प्रस्तावाला लगेच मंजुरी दिली. श्री चॅरिटेबल ट्रस्ट ने या आयोजनातली आर्थिक बाजू उचलली. त्याकरिता त्यांचे सहकारी श्री. विलास गोगटे (ऑरेंज कौंटी फाऊंडेशन ) व श्री. शिर्के (प्रयोग फाऊंडेशन ) पुढे आले व त्यातूनच एका महाशिबिराचे आयोजन करण्याचे ठरले. मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, श्री चॅरिटेबल ट्रस्ट चे हितचिंतक, गोळपचे ग्रामस्थ, या व अन्य अनेकांच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकार झाला.
राज्यातून तसेच राज्याबाहेरून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे महाशिबिर दिनांक 26 डिसेंबर 2010 ते 2 जानेवारी 2011 ह्या कालावधीत गोळप येथे आयोजित केले गेले. सकाळी 7 ते दुपारी 1.30 पर्यंत श्रमदान व नंतर इतर बौद्धिक व करमणुकीचे कार्यक्रम अशी योजना होती. श्रमदानाला जेसीबी व डंपर यांचीसुद्धा मदत होत होती. शेतामध्ये तंबू ठोकून ह्या मुला/मुलींची रहावयाची सोय केली होती. नाश्ता, चहा व भोजनाची सोय सुद्धा तेथेच करण्यात आली होती.
या विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांचे दृश्य स्वरूप तिसऱ्या दिवशीच दिसायला लागले. जसजसा गाळ उपसला जाऊ लागला, जुने बंधारे दुरुस्त केले गेले, काही ठिकाणी नवीन बंधारे बांधले गेले तसतसा पाण्याचा साठा वाढू लागला. पहिल्या, दुसऱ्या दिवशी आंघोळीसाठी इतर भागातल्या विहिरी गाठणारे विद्यार्थी श्रमदान झाल्यावर लगेचच पाण्यात डुंबू लागले.
ज्या पाटांना पाणी मिळत नव्हते त्या पाटांतून पुन्हा पाणी वाहू लागले. एका ठिकाणी तर आम्हाला मुद्दाम पाट दुसऱ्याच्या शेतात वळवावा लागला, नाहीतर ज्या शेतात मुलांची रहावयाची सोय केली होती ते शेतच पाण्याखाली गेले असते.
महाराष्ट्रामध्ये प्रथमच अशा स्वरूपाचे काम झाले. एका अर्थाने हा पथदर्शी प्रकल्प आहे. युवकांच्या आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून हे कार्य सिद्धीस गेले. इथे सहभागी झालेला प्रत्येक स्वयंसेवक आपापल्या गावात, भागात जलसंवर्धनाचा आणि युवाशक्तीचा संदेश घेऊन गेला आणि अनेक कार्यक्रम यापुढे राज्यभर, देशभर होतील ही या मागची अपेक्षा पूर्ण होईल या आशावादासह आमची पुढील वाटचाल चालू राहील. 5, अनिरुद्ध सोसायटी, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई – 400 057 भ्रमणध्वनी : 9869002285