पेण-खोपोली रस्त्यावरचे छोटसे गाव ‘वावोशी’. गाव पुष्कळ जुने. पुणे-मुंबई रस्त्याजवळ असल्याने पुष्कळ बदललेले, मुख्य रस्त्यापाशी पुष्कळ दुकाने, बसगाड्या, आणि फाट्यापासून आत जावे तसे 20-25 वर्षे एकदम मागे नेणारे गाव-दर्शन. खास कोकणी घरे-अंगणे, अबोलीची झाडे. आणि दुतर्फा घरांच्या मधून जाणारा चिमुकला रस्ता. हा रस्ता जिथे संपतो तिथे डोंगरांचीच सुरवात होते. डोंगरातही वस्त्या आहेत, धनगरांच्या, कातकऱ्यांच्या. तिथपर्यंतचा रस्ता पायी. 30-40 वर्षांपूर्वीपर्यंत इथे मजबूत भात होत असे. डोंगरावर चांगली झाडी. त्यामुळे जगण्यासाठीची सगळी सामग्री पंचक्रोशीतच होती. पण मुंबई जवळ असणे म्हणजे काय हे या गावाने पुरेपूर अनुभवले. इथे हमरस्त्याजवळ उत्तमगॅल्वा सारखे स्टील कारखाने, पारले आणि इतर मोठ्या उद्योगांनी तळ ठोकला. त्यांचे power plants धडाडू लागले. त्यांना आजूबाजूच्या जंगलांनीही कोळसा पुरवला. त्यांचे सांडपाणी नद्यांमध्ये मिसळू लागले. आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे इथल्या स्थानिक माणसांना रोजगार मिळू लागला! ट्रकच्या रांगाच्या रांगा कंपनीच्या गेटशी उभ्या रहायला लागल्या. वावोशीतल्या पण कितीतरी मंडळींना इथे नोकऱ्या मिळाल्या. आता भातशेती करायला माणसेच पुरे पडेनात. पोह्याच्या गिरण्याही बंद पडायला आलेल्या. आता शेतच करायचे नाही तेव्हा माती ठेवून तरी काय करायचे. कुत्र्याच्या छत्रीसारख्या वीट भट्ट्या सगळीकडे कधी उगवून आल्या; कुणाला कळले सुद्धा नाही. वावोशी गावातून ट्रक भरभरून माती बाहेर जायला लागली. जेसीबी घुमायला लागले. उद्योग आले म्हटल्यावर त्यांच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्थाही आलीच. इथे दोन धरणांचे प्रकल्प उभे राहिले. आता नवा आणि सगळ्यात जास्त बदल घडवून आणणारा प्रकल्प उभा राहातो आहे तो बाळगंगा नदीवर. हे पाणी नव्या मुंबईला जायचे आहे. कोयना विस्थापितांना या परिसरात एकेकाळी जमिनी दिल्या होत्या. त्या विस्थापितांना इथून परत विस्थापित व्हायचे आहे. परिसरातला सर्वात बुलंद आणि बुजुर्ग माणिकगड हे सारे बदल शांतपणे बघतो आहे.
ही सारी पार्श्वभूमी सांगण्याचे कारण असे की जर कधी आपण एखाद्या रविवारी किंवा शाळांना सुटी असणाऱ्या दिवशी इथे याल तर तुम्हाला 7-8 वर्षापासून ते 17 18 वर्षे वयोगटाची मुले इथे ओढ्यापाशी काम करताना दिसतील, आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ही मुले काय करताहेत? कशासाठी? कुणाच्यातरी विकासासाठी ओरबाडल्या गेलेल्या या परिसरात या मुलांच्या कामानी काय मोठेसे होणार आहे? हे प्रश्न मनात आले तर काही अवाजवी नाही. पण या मुलांच्या मनात हे प्रश्न नैराश्याचा किंवा भीतीचा बागुलबुवा निर्माण करत नाहीत. किंवा असे म्हणूया की ही मुले प्रश्नांच्या
एवढ्या मोठ्या डोंगराकडे बघतच नाहीत. त्यांच्या खऱ्या-खुऱ्या डोंगरातून उगम पावणारा, पावसाळ्यात दुथडी भरून वाहाणारा, मासे, खेकडे पुरवणारा ओढा त्यांना दिसतो. त्यांना दिसते की उन्हाळ्यात हा ओढा सुकला की गावाचे पाणी आटते आणि मग टँकर बोलवायला लागतो. पावसाळ्यात सांडपाणी मिसळलेले पाणी विहिरीत आले तर पोटाचे रोग होतात. या साऱ्या गोष्टी त्यांना सर्वाधिक महत्त्वाच्या. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे उघड्या आकाशाखाली, रानावनात, ओढ्याच्या काठाने, मनसोक्त भटकणे, ओढ्यात उतरणे, चिखलात हात घालणे, वरून पाण्यात सूर मारणे, हातांनी खेकडे विंचू पकडणे, फुलपाखरांच्या मागे धावणे आणि हे सगळे झाल्यावर या अभ्यासाची नोंद करून खाऊ खाऊन घरी जाणे. मुले हे सगळे मनापासून करतात.
गेली तीन-चार वर्षे या ओढ्यावर गावातली मुले काम करताहेत. त्यांनी कुठले पक्के बंधारे नाही घातले पण सुट्या दगडांच्या वेगवेगळ्या रचना तयार केल्या की ज्यामुळे पाण्याचा वेग कमी होईल, गाळ अडकेल. त्यांनी उन्हाळ्यात बिया गोळा केल्या, रोपे बनवली, बिया योग्य त्या जागा बघून नुसत्या फेकल्या, टोकल्या, रोपे लावली. हे सगळे करताना असे बघितले की खास ओढ्याकाठच्या, टिकायला सक्षम, वाढीला चांगल्या अशा वनस्पती कुठल्या? मग करंज, जांभूळ, बांबू यांची जास्त करून निवड झाली. अर्थात या झाडे लावा कार्यक्रमात काही विशेष यश मिळाले नाही. कारण मोकाट गुरे आणि विघ्नसंतोषी लोकांचा उपद्रव काही त्यांना थांबवता आला नाही. ओढ्याच्या कादावर बहुतेक ठिकाणी शेती आहे. तिथले बांध ढासळतात. माती ओढ्यात येते. शेतकऱ्याचेही नुकसान होते आणि ओढ्याचेही. म्हणून शेतकऱ्यांना सामील करून घेण्याचे प्रयत्न झाले. परंतु त्यालाही बेताचेच यश मिळाले.
खरा फरक पडला तो 2010 च्या उन्हाळ्यात. आदल्या वर्षीचा पाऊसही चांगला झाला होता आणि सुट्ट्या दगडांच्या विविध रचनांनी आपले कामही चोख बजावले होते. या वर्षी विहिरींना पाणी शेवटपर्यंत टिकले. आणि प्रथमच गावातल्या काही मंडळींना असे वाटले की हा या मुलांच्या धडपडीचा परिणाम तर नसेल? तेव्हा पासून गावसहभागाचे चित्र जरा पालटते आहे. खरे तर विहिरींना पाणी राहाणे हा एक जाणवलेला परीणाम होता पण ओढा अभियानाचे ते एकमेव उद्दिष्ट नव्हते. पाण्याच्या बरोबरीने रानवा वाढणे, ओल टिकणे, जैविक विविधता वाढणे अशाही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण त्याचे जाणवतील एवढे परिणाम होईपर्यंत काम चालू ठेवणे भाग आहे. आणि ही मुले ते आनंदाने करताहेत. नुसते ओढ्यावरचे कामच नव्हे तर पाऊस मोजणे, नोंदणे, तापमान, आर्द्रता नोंदणे, पाण्याची प्रत बघणे असा शास्त्रीय अभ्यासदेखील इथे चालू आहे.
आणि या सगळ्याच्या मागे आहेत ते मुलांचे टिळक आजी-आजोबा! या सर्व कार्यक्रमाचा आधार, प्रेरणा अशी सर्व विशेषणे कमी पडतील असे या टिळक आजी आजोबांचे काम आहे. श्री. रमेश टिळक आणि सौ. विद्याताई टिळक यांचे हे मूळ गाव, गेली दीड दोनशे वर्षे या टिळक मंडळींचा इथे जन्माष्टमीचा उत्सव चालू आहे. रमेश काका आणि विद्याताई यांनी निवृत्तीनंतर इथे ‘आनंदवर्धिनी’ या आपल्या संस्थेमार्फत एक अभ्यासिका सुरू केली. हेतू हा की मुलांना अभ्यासाचे वातावरण मिळावे. अवघड विषय समजायला मदत व्हावी. त्यांची मैत्री व्हावी. टिकावी आणि त्यांना मनोरंजनातून विधायक कामाची गोडी उत्पन्न व्हावी. आज या अभ्यासिकेतून अभ्यास करून मोठी झालेली मुले इथली ताई-दादा आहेत. दरवर्षी नवीन येणाऱ्या चिल्यापिल्यांबरोबर काम करताहेत आणि आपली मुले त्यांच्यावर सोपवून पालकही निर्धास्त आहेत.
या संस्थेशी ‘निर्मल गंगा अभियाना’मार्फत 3-4 वर्षांपूर्वी आमचा संपर्क आला. आणि तेव्हापासन आम्ही जोडले गेलो. या मलांशी. विद्याताई – रमेशकाकांशी. गावाशी आणि इथल्या ओढ्याशी. ही मैत्री फुलते आहे, फळते आहे, विकासाच्या ओरखड्यांवर कुंकर घालते आहे.
आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी पत्ता – मृणालिनी बनारसे, अमोल गजेवार
आवर्तन, 5, हिल व्ह्यू सोसायटी, 4614, एरंडवणे पौड रोड, पुणे-38 भ्रमणध्वनी : 9822000862