1. प्रस्तावना:
पाणलोट क्षेत्र विकास व ग्रामीण विकास हे परस्पर पूरक शब्द आहेत असे मानला जाते. ज्या भागांत पाणलोट क्षेत्र विकास हा कार्यक्रम राबविला त्या भागातील खेड्यांचा विकास झाला असे मानले जाते. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्र विकास हा पाण्याशी संबंधित आहे असे समजले जाते. पाणलोट क्षेत्र विकासातून पाण्याची उपलब्धी वाढते व त्यातूनच आर्थिक विकास होतो असा पण समज आहे.
वरील विधानांची योग्यायोग्यता तपासून पहाणे आवश्यक आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम कसाही राबविला तरी त्यातून ग्रामीण विकास साधला जातो हा निव्वळ गैरसमज आहे. कार्यक्रम राबविण्याच्या कामांत मजुरांना मजुरी मिळते किंवा मशीनने माती काम केल्यास मशीनमालकाचा लाभ होतो व प्रकल्प कार्यान्वयन अभिकरणाच्या संचालकांचा वैयक्तिक आर्थिक लाभ होतो. परंतु सर्वांगीण ग्रामीण विकास होतोच असे आढळून आले नाही. दुसरी बाब म्हणजे पाणलोट क्षेत्र विकासाचा संबंध फक्त ‘पाणी मुरवा पाणी जिरवा’शी जोडला जातो. तो तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे. वास्तविक पहाता पाणलोट क्षेत्र विकासामध्ये माती व पाणी या दोन्ही नैसर्गिक संसाधनांचा विचार केला जातो व त्याबरोबरच पर्णाच्छादनाचा पण त्यांत समावेश असतो. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये वरील बाबीवर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मला तरी असे वाटते की, माती अडविण्याचा म्हणजेच धूप थांबविण्याचा – मग ती धूप जमिनीची असो किंवा जलप्रवाहाची असो – उद्देश, नजरेसमोर ठेवल्यास पाणी आपोआपच जिरते व त्याबरोबरच जलप्रवाह उपचार व जलपुनर्भरणाची जोड दिल्यास जलसंधारण पण साधले जाऊ शकते.
2. पाणलोट क्षेत्र संकल्पना :
पाणलोट क्षेत्र हे नैसर्गिक एकक आहे व ते क्षेत्र व त्यातून वाहणाऱ्या जलप्रवाहाशी, संबंधित आहे. जलप्रवाहाची सुरुवात एका छोट्याश्या चिलकी पासून होते व त्याचे रूपांतर मोठ्या नदीमध्ये होते. परंतु पाणलोट क्षेत्राचा संबंध असतो त्या प्रवाहांत ज्या क्षेत्रातून पावसाचे जमिनीवरून वाहणारे पाणी म्हणजे अपधाव येते त्याचेशी, म्हणूनच पाणलोट क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की, ज्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी जमिनीवरून वाहणारे पाणी त्यातून वाहणाऱ्या जलप्रवाहास मिळते व त्यावरील संबंधित बिंदू मधून बाहेर जाते. अशा रीतीने पाणलोट क्षेत्राचा संबंध क्षेत्र, जलप्रवाह व त्यावरील संबंधित बिंदूशी येतो. प्रत्येक क्षेत्र हे कोणत्या तरी पाणलोटाचा भाग असून ते फक्त एकाच पाणलोटाचा भाग असू शकते.
3. पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना :
पाणलोट क्षेत्रात सर्व सजीव व निर्जीव सष्टी आपणास पहावयास मिळेल. सजीव व निर्जीव सष्टीचे जवळचे नाते आहे हे पण लक्षात येईल किंबहना निर्जीव सृष्टी शिवाय सजीव सृष्टी अस्तित्वांत राहू शकत नाही. आप, तेज, पृथ्वी, वायू व आकाश ह्या पाच नैसर्गिक घटकामध्ये आप व पृथ्वी म्हणजे पाणी व माती या घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्यांची उपलब्धता सीमित असून त्यांचे जतन किंवा संधारण करणे सजीव सृष्टीच्या अस्तित्वाकरता आवश्यक आहे.
पाणलोट क्षेत्र विकासात म्हणून नेमका या दोन घटकांचा विचार करण्यात येतो. पाणलोट क्षेत्रांत माती व पाण्याचे योग्य व्यवस्थापन यालाच आपण पाणलोट क्षेत्र विकास म्हणतो. माती व पाण्याची पाणलोटात योग्य व्यवस्था म्हणजे काय हे पण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पाणलोट क्षेत्रांत माती सर्व दूर असते. ती काही ठिकाणी कमी जाडीची तर काही ठिकाणी तिची जाडी जास्त असते. काही ठिकाणी मातीच नसते. पाणलोट क्षेत्रांत माती ज्या ठिकाणी आहे तेथे ती अडवून धरणे याला मातीचे योग्य व्यवस्थापन म्हणता येईल. पाण्याचा मुख्य स्रोत पाऊस आहे व भूपृष्ठावरील किंवा भूजल म्हणून उपलब्ध पाणी पावसामुळेच मिळते. पावसाचे पाणी पाणलोट क्षेत्रांत जेथे पडते तेथेच ते साठविणे याला पाण्याचे योग्य व्यवस्थापन म्हणतात.
निसर्ग खडकापासून माती तयार करतो व ही प्रक्रिया निसर्गात अविरत सुरू असते. उष्ण कटिबंधात 1 सेंमी माती तयार करण्यास तेथील वातावरणानुसार 100 ते 250 वर्षे लागतात. जमिनीची सतत धूप होत राहिल्यास निसर्गाने तयार केलेली माती ठिकाणावर राहूच शकत नाही व म्हणून मातीची जाडी सतत कमी होत राहते व काही ठिकाणी मातीच दिसून येत नाही. जमिनीची धूप थांबविल्याबरोबर अस्तित्वात असलेली माती स्थलांतरित होत नाही व निसर्गाने तयार केलेली माती पण त्याच जागी राहते म्हणून मातीची जाडी वाढण्यास मदत होते. मातीच्या जाडीवरच मातीतील उपलब्ध पिकाच्या वाढीकरता लागणारी मुख्य व सूक्ष्म द्रव्ये अवलंबून असतात. त्याच बरोबर मृदजल साठवून ठेवण्याची क्षमता पण मातीच्या जाडीबरोबर वाढते.
वर पाऊस पाणलोट क्षेत्रांत ज्या ठिकाणी पडतो तेथे तो साठविणे असे म्हटले आहे. पावसाचे पाणी पाच प्रकारे साठविले जाऊ शकते. 1) मृदजलाच्या स्वरूपांत भूपृष्ठावरील मातीत, 2) भूजल म्हणून भूपृष्ठाखाली, 3) जमिनीवर जलाशयाच्या स्वरूपांत, 4) हवेमध्ये आर्द्रतेच्या स्वरूपात व 5) थंड प्रदेशांत बर्फाच्या स्वरूपांत.
पाणलोट क्षेत्र विकासाच्या दृष्टीने मृदजल, भूजल व भूपृष्ठजल ह्या तीनही प्रकारची साठवण महत्त्वाची आहे व त्या दृष्टीने पाणलोट क्षेत्र विकासाचे नियोजन करताना लक्ष देणे गरजेचे आहे. पाणलोट क्षेत्र विकासातून फार मोठ्या प्रमाणांत सिंचन क्षमता पाणलोट क्षेत्रांत वाढेल हे अपेक्षित नाही. काही प्रमाणांत ती वाढू शकते परंतु मृदजलांचा साठा वाढवून कोरडवाहू शेतीतील उत्पादन वाढविणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपचाराचे नियोजन करावे लागेल. कोरडवाह शेतकऱ्यांना एक पीक हमखास मिळेल याची शाश्वती मिळाल्यास पाणलोट क्षेत्र विकासाचा उद्देश सफल झाला असे समजावे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत वृद्धी हा पण उद्देश साध्य झालाच पाहिजे.
4. लोकसहभाग :
जेव्हा पाणलोट क्षेत्र विकास म्हटले जाते तेव्हा त्या क्षेत्रांत भौतिक उपचार लोकसहभागातून राबविले जातील हे अपेक्षित असते. लोकसहभाग हा शब्दप्रयोग सर्वच स्तरावर वापरला जातो परंतु प्रत्यक्षांत पाणलोट क्षेत्र विकास लोकांना बाजूला ठेवून राबविला जात आहे असा अनुभव सुरुवातीपासूनच येत आहे. नाबार्डचे प्रकल्प वगळल्यास कोठेही लोकसहभागातून कार्यक्रम राबविला जात आहे असे आढळून येत नाही. ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण आहेत तेथे तर लोकांना हेतू पुरस्सर बाजूला ठेवून कार्यक्रमाची अंमलबजावणी होते. उपचाराच्या नियोजनापासूनच प्रकल्प पूर्ण होईपर्यंत लोकसहभाग असावा ही अपेक्षा असताना अपेक्षाभंगच लोकांच्या नशिबी येतो. असे का होते याचा शोध घेणे पण गरजेचे आहे. आजपर्यंत राबविण्यात आलेल्या पाणलोट विकास प्रकल्पांत शाश्वत विकास फक्त त्याच क्षेत्रांत दिसून येतो जेथे खऱ्या अर्थाने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम लोकसहभागातूनच राबविला आहे. इतर कोठेहि शाश्वत विकास दिसत नाही. त्यामुळे लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे याची कल्पना यावी.
5. पाणलोट क्षेत्र विकास उपचार :
“माती अडवा पाणी जिरवा’ हा पाणलोट क्षेत्र विकासाचा नारा आहे व तो साध्य करण्यासाठी पाणलोट क्षेत्रांत योग्य उपचार राबविणे आवश्यक आहे. उपचाराची विभागणी दोन प्रकारांत केली जाते. 1) क्षेत्रीय उपचार व 2) जलप्रवाह उपचार. क्षेत्रीय उपचार हे जलप्रवाह सोडून केलेले उपचार असतात व त्यापासून माती प्रभावीपणे अडविण्याचा उद्देश साध्य होतो. काही प्रमाणांत पाणी पण जिरविले जाते. कारण माती अडविताना जमिनीवर वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वेग उपचारांच्या अडथळ्यामुळे कमी होतो व जमिनीच्या सान्निध्यांत जास्त वेळ राहिल्यामुळे पाणी जिरण्यास पुरेसा वेळ मिळतो. जलप्रवाह उपचारांचा उद्देश मात्र जलप्रवाहाची धूप थांबविणे व ठिकठिकाणी प्रवाहांत पाण्याचे साठे निर्माण करून पाणी जिरण्यास गती देणे हा आहे.
पाणलोट उपचार
क्षेत्रीय उपचार जलप्रवाह उपचार
• वृक्ष संवर्धन • दगडी बांध
• वृक्ष लागवड • माती बांध
• सलग/तुटक समतलचर • जाळीचे बंधारे
• दगडाचे समतल बांध • सिमेन्ट नाला बांध
• कुरण विकास • गावतळे
• वळण नाली • पाझर तलाव
• शेताची बांध बंदिस्ती • खोदतळे
• ढाळीचे/समतल बांध • शेततळे
• दगडी बांध • वळण बंधारा
• कंपार्टमेंट बंडिंग
• जैविक बांध शेतीतील निकास नाली
• दगडी/गवती/पाईप सांडवे
• उताराला आडवी मशागत
• सेंद्रिय शेती
वर उल्लेख केलेल्या सर्वच उपचारांची सर्वच पाणलोट क्षेत्रांत अंमलबजावणी होईल असे मुळीच नाही. भौगोलिक व भूगर्भीय परिस्थिती पाहून उपचारांची निवड लोकसहभागातून करावी लागते व त्यांचाच समावेश पाणलोट प्रकल्प आराखड्यात करून उपचार मूल्य काढावे लागते.
क्षेत्रीय उपचारामध्ये सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे वृक्ष संवर्धन. हा बिनखर्ची उपचार असून पाणलोट प्रकल्पांतील लोकांनी अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे – मग ती मोठी झाडे असोत की, झुडपे असोत – जतन करण्याची गरज आहे. हे म्हणणे सोपे आहे परंतु आचरणात आणणे कठीण आहे. तरी पण पाणलोटातील सर्व लोकांनी निर्धार केल्यास हे सहज शक्य सुद्धा आहे.
पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने दुसरा उपचार आहे, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी – मग ती पडिक जमीन असेल, सामाईक जमीन असेल, ई-क्लास जमीन असेल किंवा वन जमीन असेल – वृक्ष लागवड व त्यांचे जतन. शेताच्या धुऱ्यावर व बांधावर पण वृक्ष लावणेची शिफारस केली जाते. पर्यावरणाच्या संतुलनासाठी भौगोलिक क्षेत्राच्या कमीत-कमी 33% जमीन पर्णाच्छादित असणे आवश्यक आहे व त्या दृष्टीने सर्वच पाणलोट प्रकल्पांत किमान 33% क्षेत्रावर वृक्ष लागवड अपेक्षित आहे. फक्त लागवड करून उपयोग नाही. त्यांचे जतन पण अत्यंत महत्त्वाचे आहे.
तिसरा महत्त्वाचा उपचार म्हणजे शेताची बांधबंदिस्ती. शेती व शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत किंवा सर्वात महत्त्वाचा उपचार आहे. यांत ढाळीचे बांध, समतल बांध, दगडी बांध, जैविक बांध इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर निकास नाली व सांडवे पण शेतीच्या बांधबंदिस्तीचाच भाग आहे. हमखास पावसाच्या प्रदेशांत वार्षिक पाऊस सरासरी 500 मिमि च्या वरच असतो व त्यामुळे समतल बांधाऐवजी ढाळीच्या बांधाचा उपयोग करावा. आज शासकीय कार्यक्रमांत ढाळीचे बांध म्हणून धुराबांध घालण्याचा जो प्रकार आहे, तो ताबडतोब थांबविणे आवश्यक आहे. ढाळीचे बांध उपकरणाच्या सहाय्याने आखणी करूनच टाकावे. यांत तडजोड केल्यास अपेक्षित परिणाम मिळणार नाही. शेतकऱ्यांना मशागतीसाठी त्रास होऊ नये यासाठी काही सुधारणा जरूर कराव्यात. आणखी एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे शेतात जे उपलब्ध आहे त्याचा बांधासाठी उपयोग करणे. शेतात भरपूर दगड असतील तर बांध टाकण्यासाठी त्यांचाच उपयोग करावा. दगड उपलब्ध असताना मातीच्या बांधाचा आग्रह धरू नये. शेतकऱ्याला आपल्या शेतातील दगड कमी व्हावे असे मनापासून वाटते व त्यांचा उपयोग करून बांध बांधल्यास त्याला आनंद होतो हे अनुभवावरून शिकायला मिळते. तसेच खोल काळी माती असेल तर तेथे जैविक बांध किंवा कंपार्टमेंट बंडिंगच उपयोगी पडते. अशा रीतीने भौगोलिक परिस्थिती पाहून शेतातील बांधाचा प्रकार ठरवावा लागतो.
शेतीची सुपीकता टिकवून धरण्याच्या दृष्टीने प्रत्येक शेतात माती व पाण्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील सूत्र लक्षात घेऊन उपाययोजना करावी.
“बाहेरील पाणी शेतात येता कामा नये व शेतातील माती बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.” यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वळणनाली देणे पण गरजेचे आहे.
आवश्यकतेनुसार व योग्य जागा उपलब्ध असल्यास इतर उपचारांचे नियोजन करावे. महाराष्ट्रांत तरी कृषी विभागाच्या धडक कार्यक्रमांतर्गत सिमेंट नाला बांध मोठ्या प्रमाणांत बांधले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नियोजनासाठी अभावानेच जागा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर शेत तेथे शेततळे हा कार्यक्रम शासन विशेष कार्यक्रम म्हणून राबवीत आहे. हे दोन कार्यक्रम राबविले म्हणजे पाणलोट विकास झाला असे म्हणणे चुकीचे जरी असले तरी कृषि विभागाने मात्र गावकऱ्यांमध्ये हे कार्यक्रम राबविले म्हणजे गावाचा विकास झाला ही समज करून दिली आहे. या ग्लोबल नीतीमुळे गावकरी इतर महत्त्वाच्या उपचारांकडे गांभीर्याने पहात नाहीत व त्यांच्या स्वीकृतीसाठी मोठ्या प्रमाणांत जनजागृती करावी लागते.
ठिकठिकाणी पाणी जिरविल्यामुळे व पाण्याचे साठे निर्माण केल्यामुळे भूजलाची व भूपृष्ठ जलाची पाणलोटांत उपलब्धता वाढते यात शंका नाही. परंतु हे कोण्या एका व्यक्तीचा पुरुषार्थ नसून सर्व गावाची उपलब्धी असते. त्यासाठी सर्वांनी आपला खारीचा वाटा उचललेला असतो. म्हणून उपलब्ध पाण्याचा उपयोग सर्वांच्या हितासाठी व्हावा ही अपेक्षा आहे. किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटावा अशी अपेक्षा असते. परंतु पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविल्यावरही अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे असे दिसते. याला कारणे अनेक असली तरी भूजल पुनर्भरणापेक्षा जास्त उपसा हे मुख्य कारण आढळून आले आहे. यावर ग्रामसभाच तोडगा काढू शकते.
7. काकरदऱ्याचे उदाहरण :
काकरदरा हे वर्धा जिल्ह्याच्या आवर्वी तालुक्यातील वंचित आदिवासी गाव आहे. गाव डोंगर कपारीत वसले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तेथे बिकट होता. जमीन पण उबडखाबड, उताराची, गोयड होती व उत्पादन अगदीच कमी म्हणजे एकरी 25 किलो कापूस किंवा 50 किलो ज्वारी पेक्षा जास्त नव्हते. सर्व शेतकरी जवळजवळ अल्पभूधारक, उपजीविका गावाजवळच्या जंगलातून लाकूड तोडून मोळ्या विकणे व दारू गाळून विकणे यावर. गरिबीमुळे व दारूच्या व्यसनामुळे गावात भांडणाचा सकाळ होता आणि तेव्हा एकमेव मनोरंजनाचा कार्यक्रम होता. गावांत 1988 ते 1992 या चार वर्षात लोकसहभागातून पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यांत आला. श्री घनश्याम भिमटे त्यासाठी त्या अपेटी गावांत 1987 ते 1992 या काळात परिवारासहित वास्तव्यास होते. गावकऱ्यांनी त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. पाणलोटाचे क्षेत्रफळ फक्त 350 हे. आहे व त्यांत फक्त चारच महत्त्वाचे उपचार राबविले गेले. 1) वृक्ष संवर्धन, 2) नाल्यामध्ये दगडी बांध, 3) शेतामध्ये ढाळीचे मातीचे / दगडाचे बांध, आणि 4) चार पाझर तलाव. पहिल्या वर्षापासूनच उत्पादनांत भरघोस वाढ व्हायला सुरुवात झाली. उत्पादन एकरी 50 किलो ज्वारी किंवा 25 किलो कापूस पासून 5 ते 6 क्विंटल ज्वारी व 3 ते 4 क्विंटल कापूस वर गेले. तुरीच्या उत्पादनांत सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला. पाणलोटाच्या शेवटी शेतकऱ्यांनी एक विहीर खोदली. तिला भरपूर पाणी लागले व त्यापासून 30 ते 40 एकर ओलीत होऊ लागले. गावाशेजारी असलेल्या जंगलाची वृक्षतोड थांबल्यामुळे जंगलांची घनता वाढली. गुरांच्या चाऱ्यांचा पण प्रश्न सुटला व वंचित व उपेक्षित गावाला जगण्याचा मार्ग सापडला. गावातील दारू भट्ट्या पण बंद झाल्या आणि गावातील दारू पिणाऱ्याचे प्रमाण 90% वरून 5 ते 10% वर आले. गावातील भांडणे जवळजवळ मिटली आणि गाव प्रसिद्धीच्या झोतात आले. गावाचा कायापालटच झाला म्हणायला हरकत नाही. ही परिस्थिती अजूनही दोन दशकानंतर बऱ्यापैकी टिकून आहे. __गावांत प्रभावी व राजमान्य नेतृत्व नसूनही गावाने सामूहिक नेतृत्वातून प्रगती केली हे विशेष. प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी, श्रमदान, ग्रामसभेच्या निर्णयावर विश्वास, समर्पित कार्यकर्ता यामुळे हे सर्व घडले.
8. पिंपरी हातगाव लघुपाटबंधारे प्रकल्प :
सूक्ष्म पाणलोट क्षेत्राच्या टोकाला योग्य जागा असल्यास तेथे लघुसिंचन प्रकल्प लोकसहभागातून निर्माण केल्यास कार्य परिणाम पहावयास मिळतात याचे उत्तम उदाहरण पिंपरी-हातगांव लघुसिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र 361 हे. असून यातून 171 हे. सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे व त्याचे सर्व नियंत्रण पाणी वापर * संस्था करते.
_KFW या जर्मन बँकेकडून महाराष्ट्र शासनाने लघु पाटबंधारे प्रकल्प, ज्यांची 101 ते 250 हे. पर्यंत सिंचन क्षमता आहे, निर्मिती करता अर्थ सहाय्य मागितले व बँकेने खालील अटीवर मदत करण्याची तयारी दर्शविली.
1) शीर्षकामे पाणी वापर संस्थेच्या सनियंत्रण व देखरेखीखाली शासनाने कंत्राटदाराकडून करवून घ्यावी.
2) वितरण व्यवस्था पाणी वापर संस्थेने शासनाच्या तांत्रिक सहकार्याने स्वतःचे दर 62.50% भांडवल व 37.50% अनुदानातून पूर्ण करण्याची जबाबदारी उचलावी.
3) पाणी वापर संस्था प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात करण्याच्या अगोदर तयार करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी योजना स्वयंसेवी संस्थेच्या सेवा घ्याव्या.
4) प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रकल्पाचे प्रचलन, देखभाल दुरुस्ती, पाणी कर वसूल करणे इत्यादी कामे पाणी वापर संस्थेची जबाबदारी राहील..
महाराष्ट्रातील अंदाजे 50 लघुपाटबंधारे प्रकल्पातून 8000 हे. सिंचन क्षमता निर्माण होईल अशी अपेक्षा होती व त्यापैकी पिंपरी-हातगाव प्रकल्प हा विदर्भातील पहिला प्रकल्प होय. धरामित्रच्या पाणलोट क्षेत्र विकासातील प्रदीर्घ अनुभवामुळे प्रकल्पाच्या संबंधित यंत्रणेने धरामित्रची योजना स्वयंसेवी संस्था म्हणून मदत मागितली व ती देण्यास धरामित्र तयार झाली.
8 जानेवारी 2002 साली समजुतीचा सहनामा (MOU) लघुपाटबंधारे (स्था. स्त) विभागाबरोबर झाल्यानंतर श्री शंकर अमिलकंठवार या समर्पित कार्यकर्त्याची नियुक्ती धरामित्रचा प्रतिनिधी म्हणून करण्यात आली. काम आव्हानात्मक होते. पूर्ण अनुभव कोणालाच नव्हता. लघुपाटबंधारे विभागाचा आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेता लाभार्थ्यांचे सनियंत्रण अभियंते व कंत्राटदाराला मान्य नव्हते. लाभार्थीना पण आपले अधिकार व जबाबदाऱ्या माहीत नव्हत्या व पाणी वापर संस्था प्रभावीपणे शीर्षकामावर सनियंत्रण करील व वितरण व्यवस्था उभारण्यासाठी आपले 62.50% योगदान देईल याची शाश्वती नव्हती. अशा संभ्रमाच्या अवस्थेत कामाला सुरुवात झाली. श्री शंकर अमिलकंठवारची चिकाटी व माझे तांत्रिक मार्गदर्शन आणि पाणी वापर संस्थेला प्रशिक्षण यातून लोकांची हिम्मत वाढली. त्यांनी संबंधित अभियंत्याच्या रोषाला व कंत्राटदाराच्या थयथयाटाला न जुमानता शीर्षकामे उत्तम प्रकारे करून घेतली. प्रसंगी संघर्षास पण तयार झाले आणि वितरण व्यवस्थेच्या निर्मितीत नगदी स्वरूपात, श्रमदानातून व वस्तूस्वरूपांत योगदान केले. पाटचाऱ्या पूर्ण श्रमदानातून तयार केल्या. तलाव भरल्याबरोबर सर्व लाभार्थीना सिंचनाकरता पाणी मिळेल अशी व्यवस्था केली.
आज पाणी वापर संस्था आपल्या पायावर उभी आहे. पूर्ण वितरण व्यवस्था पाणीवापर संस्थेने कार्यान्वित केली आहे. दोन वर्षे तलावात सिंचनाकरता पाणी न आल्यामुळे थोडे दुर्लक्ष झाले होते. या वर्षी तलाव पाण्याने भरल्याबरोबर शीर्षकामे व विवरण व्यवस्थेची रु. 60,000 खर्चुन दुरुस्ती केली. लाभार्थ्यांकडून अग्रिम पाणी कर वसूल केला, तलावात मच्छीमारी करता कंत्राटदाराकडून रु. 65,000 मिळणार आहेत. त्यापैकी एक-तृतीयांश रक्कम संस्थेला मिळाली. संस्थेला स्वतःचा पाटकरी असून त्यावर संस्थेचे पूर्ण नियंत्रण आहे. सर्व लाभार्थीना वेळेवर पाणी मिळेल या करता पाणी वापर संस्था नेहमी दक्ष असते. पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेतून खांदेपालट झाली असून नवीन कार्यकारिणी पूर्वीपेक्षा जास्त सक्षम आहे. अशा रीतीने हातगाव ग्रामाचा शाश्वत विकास घडवून आणण्यास धरामित्रने हातभार लावला असून अजूनही आमचे व गावाचे संबंध मधुर आहेत व जेव्हा-जेव्हा काम पडते तेव्हा-तेव्हा गावकरी धरामित्रला बोलवतात.
धरामित्रने विदर्भात चार प्रकल्पांसाठी योजना स्वयंसेवी संस्था म्हणून काम केले व या चारही प्रकल्पांवर पाणी वापर संस्था सक्षमपणे काम करीत असून उपलब्ध पाण्याचा पूर्ण वापर करीत आहेत, पाणीकर वसूल करीत आहेत, मासे पकडण्यासाठी केलेल्या लिलावातून अपेक्षेपेक्षा जास्त निधी पाणी वापर संस्थाना प्राप्त होत आहे, वितरण व्यवस्था व शीर्षकामाची योग्य प्रकारे देखभाल करण्यात येते आहे व सर्व प्रकल्पांत आर्थिक सुबत्ता पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात योजना स्वयंसेवी संस्थेने राबविलेले सर्व प्रकल्प सुस्थितीत असल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे धरामित्र आहे.
काकरदरा व हातगाव या दोन्ही ठिकाणी लोकसहभागातून प्रकल्प उभे झाले व या दोन्ही गावांनी शाश्वत विकास साधला. काकरदरा येथे पाणलोट क्षेत्र विकास व हातगांव येथे लघुपाटबंधारे प्रकल्प हे दोन्ही माती व पाण्याशी संबंधित आहेत. लोकसहभाग + समर्पित कार्यकर्ता = शाश्वत विकास हे समीकरण या दोन गावांच्या विकासातून निघते. परंतु ग्रामीण विकासाला मृद व जलसंवर्धनच महत्त्वाचे आहे हा पण संदेश त्यामधून मिळतो.
3, नवीन आय.टी.आय. कॉलनी, कांता नगर, अमरावती.