संपादकीय

आजचा सुधारक चा पाण्यावरचा हा विशेषांक वाचकांपुढे ठेवताना मी जरा बेचैन झालो आहे. पाणी हा विषय इतका मोठा आणि आपल्या जिव्हाळ्याचा आहे की एकट्यादुकट्या माणसाने त्याला न्याय देणे अवघड आहे. तरीदेखील हे धारिष्ट्य आसु वरील प्रेमापोटी आणि वाचकांच्या उदारपणावर विश्वास ठेवून करत आहे.
पाणी हा पदार्थ मोठा विचित्र आहे. घन, द्रव आणि वायुरूप (बर्फ, पाणी, वाफ) अशा तिन्ही अवस्थेत तो आढळतो. त्याला स्वतःची ना चव ना रंग. पाण्यात जेवढे पदार्थ विरघळतात तेवढे आणि तितके विविध (रसायने, खनिजे -) पदार्थ इतर कुठल्याच द्रवात विरघळत नाहीत. यामुळे ते वाहून जाते तसे जमिनीत मुरतही जाते. वाफ होऊन आकाशात जाऊन पावसाच्या रूपाने परत परत ताजे होऊन आपल्याला मिळत राहते. तर सागरात प्रवाहाच्या रूपाने फिरत राहते. इथे अर्थातच या सर्वांचा विचार न करता एक जीवनदायी पदार्थ सतत निरनिराळ्या कामासाठी मिळवण्यासाठी काय काय क्लृप्त्या माणूस करत असतो ते मांडण्याचा प्रयत्न आहे.
पाण्याच्या प्रश्नाची सामाजिक-आर्थिक-राजकीय अशी अनेक अंगे आहेत आणि त्यांची उकल करण्यासाठी सतत विज्ञान आणि खास करून तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. सामाजिक अंगाचा विचार केला तर गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, ग्रामीण-शहरी असे भेदाभेद न करता प्रत्येकाला त्याच्या गरजेपुरते पाणी मिळायला हवे. त्यासाठी जो खटाटोप करावा लागतो त्याला पैसे पडतात-भांडवली खर्च लागतो तसा सतत चालू खर्चही लागतो. जिथे प्रश्न गुंतागुंतीचे होतात तिथे हितसंबंध निर्माण होतात. आणि मग राजकारण, कायदेकानू हे सर्व आलेच.
या अंकाची ढोबळमानाने तीन विभागांत विभागणी केली आहे. पाण्याच्या संदर्भातील वादविवाद (conflicts), कायदेकानू, समन्याय, हक्क असा एक विभाग. दुसऱ्या विभागात सरकारने, पण जास्त करून लोकांनी एकत्रित येऊन या निसर्गसंसाधनाचे नियोजन करण्याच्या प्रयत्नांचे दाखले आहेत. साहजिकच यांत सरकार व नोकरशाही थोडी थोडी दूर राहून विकेंद्रित व्यवस्था कशा उभ्या राहतात याला, आणि लोकसहभाग व सक्षमीकरण (empowerment) कसे घडते, यांना महत्त्व येते. आणि शेवटी प्रत्यक्षात उतरलेले प्रकल्प.
अंकाचा भर ग्रामीण भाग आणि शेती यावर अटळपणे दिसतो. उद्योग, सांडपाणी व्यवस्थापन, नद्यानाले यांचे प्रदूषण यावर लेख यायला हवे होते. तसेच पाण्याचा पुनर्वापर व जलसंधारण (water harvesting) हेही विषय येणे अगत्याचे होते. पण प्रयत्न करूनही लेख मिळवू शकलो नाही याची खंत वाटते. आधी कबूल करूनही शेवटी संभाव्य लेखकांनी असमर्थता व्यक्त केली. संगणक, ई-मेल द्वारे लेख पाठविण्याचे प्रमाण वाढत आहे आणि आनुषंगिक इंग्रजी भाषेचा वापरही! अर्थात माहिती, ज्ञान महत्त्वाचे.
अंक संग्राह्य व्हावा अशी खटपट केली आहे. कितपत जमले ते वाचकच ठरविणार. बहुतेक संदर्भ-साहित्य इंग्रजीत असल्यामुळे त्याची सूची येथे दिलेली नाही तथापि कोणाला विशेष संदर्भ हवा असेल तर यावच्छक्य तो देता येईल.
6, सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400 057
दूरध्वनी – 26147363

1. लोकसंख्यावाढ आणि पाण्याची दरवर्षी उपलब्धता (भारत)
वर्ष-सन लोकसंख्या (दशकक्ष) दरमाणशी पाण्याची उपलब्धता
1000 10 70,000 घन मीटर्स
1600 60 11,600 “
2000 1000 1,800 “”
2050 1600(अंदाजे) 740 “”
[टीप: वरील सर्व आकडेवारी जलजिज्ञासावरून ]

2. पाण्याची गरज
1 किलो ज्वारीसाठी 1300 लीटर
1 किलो गव्हासाठी 2600 लीटर
1 किलो साखर निर्मितीसाठी 3400 लीटर
1 किलो तांदळासाठी 5000 लीटर

टीप : वरील सर्व आकडेवारी जलजिज्ञासावरून ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.