माधुरी पुरंदरे ह्यांचे नाव वाचू आनंदे ह्या अद्वितीय पुस्तकाच्या कर्त्या म्हणून आपणाला माहीत आहे. आता लिहावे नेटके हे पुस्तक त्यांच्या लेखणीतून उतरले आहे. वाचनामध्ये गोडी निर्माण झाली की लेखनाला सुरुवात करावी आणि त्यामध्ये सर्वांनी प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची इच्छा त्यांच्या ह्या उपक्रमांतून आपणाला दिसून येते. त्या नुसती इच्छा मनात बाळगून स्वस्थ बसल्या नाहीत तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अपार कष्ट उचलले आहेत. त्यांच्या ह्या दोनही प्रयत्नांची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे.
लिहावे नेटके हे पुस्तक वाचताना त्यांनी केलेल्या व्यासंगाचे जे दर्शन आपल्याला होते त्याने आपण दिपून जातो. पुस्तकाची मोठ्या आकाराची एकूण 603 पाने आहेत. ती दोन भागांत वाटून दिली आहेत. त्यामुळे हा ग्रंथ हाताळावयास सोपा झाला आहे.” इतकेच नव्हे तर त्याची रचना पूर्णपणे मुलांना स्वाध्याय करता यावा ह्या दृष्टीने केलेली आहे. आपण दिलेली उत्तरे चूक की बरोबर ह्याचा पडताळा घेण्यासाठी तिसरा भाग उत्तरांचा आहे. असे, उत्कृष्ट निर्मितिमूल्य असलेले, त्रिखंडात्मक पुस्तक केवळ रु.400/- इतक्या अल्प किमतीला वनस्थळी ग्रामीण विकास केन्द्र, पुणे आणि ज्योत्स्ना प्रकाशन ह्यांनी उपलब्ध करून दिले आहे.
नेटके लिहिता येण्यासाठी व्याकरणाचे अल्प ज्ञान असणे आवश्यक आहे ह्या लेखिकेच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. पुस्तकाचा आणखी एक विशेष असा की येथे व्याकरण पाठांतर-पद्धतीने शिकविले नाही तर पाठ सोडविता सोडविता व्याकरणाचे नियम मुलाला/मुलीला उलगडत जावेत असा लेखिकेचा अत्यन्त स्तुत्य प्रयत्न जाणवतो.
पुस्तकाची सुरुवात वर्णमालेपासून करून शेवट शब्दांचे नातेवाईक कोणते आणि ते कसे ओळखावयाचे हे सांगून केला आहे. पुस्तकात कोणकोणते विषय मांडले आहेत ते आता थोड्या विस्ताराने पाहू.
वर्णमाला, अनुस्वार, क्रियापद, कर्ता, कर्म, सर्वनाम, तीनही काळ, आज्ञार्थ, ल्यबन्त, विभक्तिप्रत्यय, विशेषण आणि क्रियाविशेषण ही व्याकरणाची अंगे झाल्यावर भाषा लिहिणाऱ्याला आवश्यक असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. त्यांत समोच्चारी आणि समानार्थी शब्द, उपसर्ग, वाक्यरचना, वाक्प्रचार, अव्यये, विरामचिह्ने ह्यांचाही समावेश आहे.
लेखिकेने घेतलेल्या परिश्रमांचा प्रत्यय आपल्याला पानापानावर येतो. व्याकरण हा विषय कंटाळवाणा, नव्हे, रटाळ मानला जातो. मुलांसाठी तो तसा राहू नये, त्याला रंजक करावे ह्यासाठी स्वतः हाताने काढलेली चित्रे, विषयानुरूप छायाचित्रे आणि शब्दकोडीही आहेत. स्वरांचे आणि व्यंजनांचे उच्चार, नवशिक्यांच्या लिहिताना होणाऱ्या चुका कश्या टाळावयाच्या त्यासाठी सूचना हे सगळे तुम्हाला ह्या पुस्तकात सापडते. नवशिक्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील असे हे सर्वांगपरिपूर्ण पुस्तक आहे असे म्हणावयाला प्रत्यवाय नाही.
काहींना भाषा चांगल्या प्रकारे उपजतच वापरता येत असली, तरी ज्यांना ती देणगी नाही, त्यांना प्रयत्नाने तिच्यावर पकड जमविता येते, ती कमाविता येते हा विश्वास माधुरी पुरंदऱ्यांनी ह्या पुस्तकातून दिला आहे.
त्यांनी आपल्या पुस्तकामागची जी भूमिका सुरुवातीला मांडली आहे तीतील प्रांजळपणा आपल्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. त्या म्हणतात :
…….कोणता आवाज काढल्याचे कोणते परिणाम होतात ते (ऐकून ऐकून) आपल्या लक्षात येऊ लागते. आपल्याला भाषा वापरणे जमू लागते. मग आपण ती वाचायला आणि लिहायलाही शिकतो. अशा प्रकारे सध्याच्या जगात जेवढी यायला हवी तेवढी भाषा आपल्याला येऊ लागते. मलाही भाषा अशीच येऊ लागली.पुढे मी एक परकी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा माझ्या लक्षात येत गेले, की मी जेव्हा मला अमुक भाषा येते असे म्हणते, तेव्हा ते फारच सैलपणाने म्हणत असते. परभाषा तर राहूच दे, मातृभाषाही मी समजून बोलत-लिहीत नाही. माझे सगळे ढोबळ आणि गोळाबेरीज पद्धतीने चालू असते. मी अं……… म्हणजे……. हे…… असं……. करत अडखळत बोलते. साध्या गोष्टीबद्दलही सलग, न चाचरता चार वाक्ये मला बोलता येत नाहीत. आपल्याला जे म्हणायचे आहे, ते जास्तीतजास्त परिणामकारक पद्धतीने आणि नेमकेपणाने म्हणता येईल अशी वाक्यरचना असावी, शब्दांची निवड अचूक असावी, त्यातून नेमका अर्थ कळावा, आपले बोलणे दुसऱ्याला ऐकावेसे वाटेल असे रेखीव आणि नेटके असावे असा काही विचारच मनात येत नाही. मुळात भाषेचा एवढा कसला विचार करायचा? काहीही म्हणायचे झाले, की त्याच्या साधारण जवळपासचा अर्थ असणारे शब्द घ्यायचे, त्यांची मोट बांधल्यासारखे कसे तरी वाक्य रचायचे आणि टाकणे टाकल्यासारखे बदकन टाकून मोकळे व्हायचे. तीच गोष्ट लिहिण्याचीही. दोन ओळींची चिट्ठी लिहायची तरी मी दहा ठिकाणी खाडाखोड करते. परिणाम — माझा आत्मविश्वास पार लयाला जातो आणि मी लिहिण्याचे, चारचौघांत बोलायचे टाळायला लागते.
मग माझ्या हळूहळू हेही लक्षात यायला लागले, की आपल्याला दुसऱ्याचे लिहिणे-बोलणेही नेमकेपणाने समजत नाही. जेवढे ढोबळ आणि वरवरचे असते तेवढेच समजते. शब्दांमागे दडलेले अर्थ आपल्यापर्यंत पोचत नाहीत, चांगला विनोद समजत नाही, शब्दांचे खेळ कळत नाहीत. मग आपण नको तिथे टाळ्या वाजवतो. नको तिथे हसतो. पण जिथे खरेच हसू यायला हवे, अशा थांब्यावर मात्र आपली गाडी थांबतच नाही.
“साध्या गोष्टींची ही तन्हा, तर गुंतागुंतीचे अवघड विचार आणि प्रश्न वगैरेंच्या वाटेला मी कशाला जाते आहे ! तशी मी काही अगदीच ढ नाही; पण शाळेत असताना काही विषयांत मी साफ कच्चीच राहिले. त्याची इतर काही कारणे असतीलच: पण भाषेकडे दुर्लक्ष हेही एक महत्त्वाचे कारण असणार; कारण मला शिक्षकांचे बोलणे आणि धड्यांतील मजकूर नीटसा कळतच नसे. कोणताही विषय शिकण्याचे भाषा हेच प्रमुख साधन असते. तेच मोडके आणि तकलादू असेल, तर आणखी वेगळे काय होणार?
भाषेकडे केलेले हे दुर्लक्ष मला पुढे फार महागात पडले. कोणत्याही विषयात सोप्याकडून अवघडाकडे, अधिक गुंतागुंतीच्या कल्पनांकडे आणि विचारांकडे प्रवास करायचा, ही माणसाची प्रगतीची कल्पना आहे .भाषेच्या बाबतीतही हे खरे आहे. आपला प्रवास मात्र सोप्याकडून अधिक सोप्याकडे चालला आहे असे माझ्या लक्षात आले. ही चूक सुधारण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत असते; पण आजही माझे विचार शब्दांत मांडताना मला कष्ट पडतात. शिवाय माझ्यासारखी म्हणजे काहीतरी, कसेतरी लिहिणारी आणि बोलणारी खूप माणसे आसपास असल्यामुळे काय चूक आणि काय” बरोबर ह्याबद्दलही मनात सतत गोंधळ उडत असतो. आपण जी भाषा शिकत आणि वापरत लहानाचे मोठे होतो, तिची अशी हेळसांड केली, की सर्वांत जास्त अडचण येते ती इतर भाषा शिकताना. आजच्या काळात प्रत्येकाने किमान दोनतीन भाषा शिकणे आवश्यक आहे, असे सगळे जण सतत सांगत असतात.पण स्वतःची भाषाच जर उत्तम प्रकारे आणि आत्मविश्वासाने वापरता येत नसेल, तर इतर भाषांमध्येही आपण कच्चेच राहणार. स्वतःचे हे अनुभव लक्षात घेऊन , बरीच खटपट करून मी हे पुस्तक तुझ्यासाठी तयार केले आहे……”
पण माझी एक शंका कायमच आहे. काय आम्ही महाराष्ट्रीय, माधुरीताईंनी इतक्या चांगल्या त-हेने, परिश्रमपूर्वक, निर्माण केलेल्या सर्वांगपरिपूर्ण वस्तूचा उपयोग खरेच करणार आहोत? त्यांचे श्रम सार्थकी लावणार आहोत? आज काही थोडी वर्तमानपत्रे, काही नामवंत मासिके, आणि काही मोजक्या प्रकाशकांची पुस्तके सोडल्यास चांगले, ज्याला शुद्ध म्हणता येईल असे, लेखन वाचावयाला मिळत नाही. दूरदर्शन तर सोडूनच द्या, साहित्य अकादमीसारख्या संस्थांची प्रकाशनेदेखील ह्या बाबतीत पुरेशी काळजी घेताना दिसत नाहीत. कोणत्याही प्रकाशकाला जुने, नवे नियम माहीत असलेला, जाणकार मुद्रितशोधक मिळत नाही. केशवसुतपूर्वकालीन पद्य आणि चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यथामल छापावे असा सरकारी नियम आहे. तो सर्वांना बंधनकारक आहे. पण कोणीही तो पाळताना दिसत नाही. आपली मराठी भाषा नेटकी लिहिली पाहिजे अशी कळकळ आधी आपणा सर्वांमध्ये निर्माण झाली पाहिजे. लिखित औपचारिक – भाषा आपण बोलतो त्या भाषेपेक्षा वेगळी असते. ती सर्वांनाच प्रयत्नपूर्वक अवगत करावी लागते हा संदेश सर्व मराठी बोलणाऱ्यांपर्यन्त आधी पोचला तर, आणि तरच, सध्याचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. तसे न झाले तर हे सारे अरण्यरुदनच ठरेल.
सहावी सातवीच्या मुलांपासून ह्या पुस्तकातील धडे सर्वांनी सोडवावे असे लेखिकेने सुचविले आहे. मला आणखी एक सूचना करावीशी वाटते ती अशी. प्राथमिक शाळांच्या सर्व, म्हणजे कोणत्याही वयाच्या, शिक्षकांकडून ह्या पुस्तकातील धडे सोडवून घेतले पाहिजेत. मी तर ते करावयाला सुरुवात केली आहे. आपण जे सांगतो ते स्वतः केल्याशिवाय आपल्या शब्दाला वजन कसे येणार!
गौरीवंदन, 123, शिवाजीनगर, नागपूर 440010.