संस्कृतीची जादू
औद्योगिकीकरणाने जन्माला घातलेली स्थलांतराची प्रक्रियाही इंग्लंडमध्ये अनपेक्षित होती. त्याचे सामाजिक परिणाम तीव्र होते.
औद्योगिक नगरांनी औद्योगिक कामगार घडविले खरे, पण त्यांचे पालनपोषण, संगोपन करण्याची काहीच व्यवस्था तेथे निर्माण झाली नव्हती. अपत्यसंगोपनाचा काहीच अनुभव नसलेल्या बाईला ज्या गोंधळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्याचा अनुभव त्या गावातील प्रशासकांना येत असावा. त्या काळातील नागरी परिस्थितीचे वर्णन अॅलेक्सी डी तॉकव्हिल या फ्रेंच प्रवाशाने अतिशय भेदकपणे केले आहे. तो म्हणतो:
“माणसाच्या कर्तृत्वामुळे जग सुपीक होते आहे. येथे घाणीने भरलेल्या गटारातून सोने वाहते आहे. येथे मानवाने विकासाचे परमोच्च शिखर गाठले आहे. मात्र ही संस्कृतीची जादू आहे की तिने सुसंस्कृत माणसाला पुन्हा पशुवत बनविले आहे?”
[ लंडननामा, (ले. सुलक्षणा महाजन, रोहन प्रकाशन, 2010) मधून साभार.]