सामाजिक संकेत हीच ‘सारतत्त्वे’? आणि जनुकासुर मातू नये म्हणून
एखाद्या गोष्टीचे सारतत्त्व म्हणजे काय? हे सांगण्यासाठी सँडेल यांनी दिलेले बासऱ्यांचे वाटप करण्याचे उदाहरण पूर्णतः फसलेले आहे. सँडेल सांगतात की, चांगल्या बासऱ्या उत्तम बासरी वादकांना मिळाव्यात कारण ते चांगले संगीत निर्माण करू शकतील, असे आपण सामान्य माणसे म्हणू, “पण अरिस्टॉटलचे उत्तर वेगळे आहे.” (6/238) चांगले वाजवले जाणे हेच बासऱ्यांचे, (संगीतसभांचेही) प्रयोजन आहे म्हणून चांगल्या बासऱ्या चांगल्या वादकांना मिळायला हव्यात. आता ह्यात पॅसिव्ह व्हाईस सोडून वेगळे काय आहे? जे बोलून चालून इन्स्ट्रूमेंटच आहे त्याचे सार तत्त्वही इन्स्ट्रुमेंटलच असणार! तेव्हा हे उदाहरणच चुकीचे आहे. त्यातून ॲरिस्टॉटलचे वेगळेपण अजिबात दिसत नाही व उपयुक्ततावादाच्या पलीकडे गेले पाहिजे म्हणजे काय हे समजतच नाही. असो. सार-तत्त्व हे प्रकरण नीट समजावे म्हणून सँडेल आता गोल्फ या खेळाच्या सार तत्त्वाकडे वळतात. पीजीए या अधिकृत (?) संघटनेच्या मते अचूक नेम आणि साधनांचे ओझे घेऊन भरपूर चालता येण्यासाठी लागणारा अथ्लेटिसिझम या दोन्ही बाबी गोल्फश्रेष्ठ म्हणवून घेण्यासाठी आवश्यक आहेत. फिर्यादी खेळाडूने अपंगत्वामुळे कार्ट (ढकलगाडी) वापरण्याची मागणी केली. न्यायालयाने संधीची समानता या तत्त्वाखाली ती मान्य केली. पण मान्यवर गोल्फपटूंनी अशा स-कार्ट खेळावर बहिष्कारच टाकला. इथपर्यंत ठीक आहे. यापुढे सँडेल म्हणतात की हा खटला न्यायाच्या दृष्टीने न पाहता गोल्फचे अरिस्टॉटलियन सार-तत्त्व काय? ह्या दृष्टीने पाहायला हवा. आता जे नाहीतरी मानीव संकेतांवरच आहे त्यात कसले आले आहे सारतत्त्व? पीजीए व तिचे सभासद काय मानतात हे एक यादृच्छिक (कंटिन्जंट) घटित आहे. त्याला सँडेल सार तत्त्वाचा दर्जा कसा काय देऊ शकतात? यात सँडेल यांची परंपरावादी व संकेताधिष्ठित (विवेकवादी नसलेली) नीती दिसून येते.
खरेतर हाच प्रश्न विवेकाधिष्ठित नीतिचर्चेने सोडवता येतो. सर्वच खेळांबाबत एक सार्विक तत्त्व सांगता येईल. मला ज्यांच्याकडून कौतुक होण्यात धन्यता वाटते त्यांचे कौतुकाचे निकष तरी मला मानले पाहिजेत (जर ते स्वतः त्याच निकषावर उतरत असतील तर . ) किंवा मला जे कौतुकास्पद वाटते ते कौतुकास्पद मानणाऱ्यांचे व आचरणाऱ्यांचे वर्तुळ मी उभे केले/शोधले पाहिजे. कर्सी मार्टिन (फिर्यादी) हा ज्यात नेमबाजी हेच सार मानले जाते अशा स-कार्ट गॉल्फचा संस्थापक बनू शकला असता. त्यात अपंगच नव्हे तर, आळशी पण नेमबाज असे लोकही सामील झाले असते. वि-कार्ट व अथ्लेटिक ढुढ्ढाचार्यांची पर्वा कराच कशाला. त्यांनाही त्यांचे स्वातंत्र्य भोगू द्या. म्हणजे सर्वांनाच गोल्फ कार्ट मिळावी अशीही सक्ती नको. एकदा अशी स्वच्छ भूमिका घेतली की मग कर्सी मार्टीन स्वतःचे सार प्रत्यक्षात आणू शकतो. मग इतर कोणाची मान्यता हवीच कशाला? पीजीए असो, न्यायालय असो, अरिस्टॉटल असो नाहीतर सँडेल असोत!
समलिंगी विवाहाबद्दल कोणत्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे हे सांगताना सँडेल म्हणतात “या वादातील कळीचा मुद्दा निवडस्वातंत्र्याचा हक्क हा नाहीच आहे. समलिंगी बंधने ही समाजात मान्यता व प्रतिष्ठा मिळण्याच्या योग्यतेची आहेत का, …… हा आहे. ” (6/241) “जर विवाह ही सन्मानदर्शक, प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी संस्था आहे तर कोणत्या सद्गुणाचा सन्मान केला जातो?” (6/241) सँडेल वारंवार सामाजिक प्रतिष्ठा ही गोष्ट केंद्रवर्ती धरतात. सँडेल प्रतिष्ठा या शब्दाचा बेसिक ह्युमन डिग्निटी आणि ऑनर/ प्रेस्टीज वगैरे सापेक्ष बाबी या दोन अर्थांमध्ये असलेली संदिग्धता कायम ठेवून उपयोग करतात. त्यामुळे जे समाजमान्य ते योग्य या संकेतनिष्ठ भूमिकेचे सूचन होत राहते. अर्थात सँडेल एक योग्य प्रश्नही उपस्थित करतात. तो असा की विवाहसंस्थेचा मूळ हेतू काय हे विचारणे हा चर्चेचा गाभा असायला हवा. यात जस्टीस मार्शल यांनी दिलेल्या निवाड्यानुसार प्रजोत्पादन हा आवश्यक हेतू नाही व “एकमेकांबद्दल विशेषत्वाने वाटणारी शाश्वत निष्ठा” (6/242) ही आवश्यक बाब आहे, याचा ते उल्लेख करतात. सारतत्त्व ठरविण्याच्या वादापासून आपण तटस्थ राहू शकत नाही हे सँडेल यांचे मत नक्कीच ग्राह्य आहे. पण सारतत्त्व ठरविताना धर्म काय म्हणतो हेही लक्षात घेतले पाहिजे असाही त्यांचा निर्वाळा दिसतो. प्रश्न असा आहे की जरी नीतिशास्त्रीय कूट प्रश्न हे टाळले नाहीत तरी आपण ते विवेकाने सोडवू शकतो की नाही? सँडेल यांचे सूचन तरी ‘नाही’ असेच दिसते व नेमके हेच मला आक्षेपार्ह वाटते.
विवाहसंस्थेचा मूळ हेतू म्हणताना ती संस्था काय कारणांनी उत्पन्न झाली याची उपपत्ती सँडेलनाही अभिप्रेत नसावी असे दिसते. आज विवाह ही गोष्ट का आवश्यक ठरते याचा विचार जरूर केला पाहिजे. अगदी भिन्नलिंगीयांपुरतेच पाहिले तरीही शेवटी एकमेकांशी सहजीवन (आणि असल्यास अपत्यांशी सहजीवन) महत्त्वाचे की समाजाकडून मिळणारी प्रतिष्ठा महत्त्वाची? समाजाकडून मिळणारी प्रतिष्ठा हे उत्तर, नैतिक उत्तर असू शकत नाही. सतीप्रथेपासून ते क्लिटेरियोक्टॉमीपर्यंत भीषण गोष्टींना सामाजिक प्रतिष्ठा असू शकते. या गोष्टींना भीषण म्हणणे ही फक्त संस्कृतिसापेक्ष नावड आहे असे म्हणाल तर बोलणेच खुंटले.
विवेकाने योग्य म्हणता येईल अशी एक गोष्ट खरेतर विवाह किंवा तत्सम नात्यांबाबत अस्तित्वात आहे. माझ्या मते जबाबदार पालकत्व, पालकाचे अधिकार आणि पालकत्वाची निश्चिती ही गोष्ट सार्विक मानवी म्हणून आवश्यक मानावी लागेल. राज्यसंस्थेला तिच्या कक्षेत नव्याने प्रवेश करत असलेल्या सर्वाधिक असहाय नागरिकाचे पालन नेमके कोण करणार हे विचारण्याचा हक्क आहे. कारण या नव्या नागरिकाला कल्याणकारी अधिकार प्राप्त करून देण्याची जबाबदारी राज्यसंस्थेवर आहे आणि हे तर्कतः सिद्ध आहे, त्यासाठी कोणत्या संप्रदायाचे पवित्र वाङ्मय धुंडाळण्याची गरज नाही. (खरे तर जबाबदार पालकत्व कायदा केला तर त्याच्या मर्यादा घालून, मग ‘एकनिष्ठा’ वगैरे गोष्टींबाबत राज्याला त्यात उतरायची ‘आवश्यकता’ अशी नाही. पण तो मुद्दा सध्या बाजूला ठेवू.) हे अनिवार्य प्रयोजन, सारभूत मानले पाहिजे हा मुद्दा सँडेल यांच्या चर्चेतून कसा निसटला याचे आश्चर्य वाटते.
आता समलिंगीयांच्या प्रश्नाकडे वळू. जे आपल्या अस्सल (आँथेंटिक) ‘स्व’ची अभिव्यक्ती करायचे धाडस करतात त्यांनी तरी सरकार मान्यतेचा आग्रह का धरावा? कोणीही त्यांची अवहेलना करता कामा नये (डिग्निटीचा अधिकार पण ऑनरचा नव्हे) व त्यांच्या बाबतीत भेदभाव करू नये ही मागणी अगदी रास्त आहे. तसे कायदेही केले गेले पाहिजेत. पण सामाजिक प्रतिष्ठा ही उपरी गोष्ट आहे. भिन्न-लिंगीयांनीही ती कसेही करून पदरात पाडून घेण्याची गरज नाही. भिन्न लिंगीयांनादेखील वंशभेद, जातिभेद, अगोदरचा घटस्फोट वगैरे बाबीत ही उपरी ‘सामाजिक प्रतिष्ठा’ आडवी येत असते. (पण तीच गोष्ट सँडेलना मात्र सारतत्त्व वाटते) ती गोष्ट मागून समलिंगीयांनी नसत्या गोष्टी ओढवून घेण्यात त्यांचे हित काय आहे हे मला तरी समजलेले नाही. जशी कर्सी मार्टीनने पीजीएनेच मला घेतले पाहिजे हा आग्रह धरण्याची गरज नाही तसेच समलिंगीयांनी “आम्ही देखील तितकेच पवित्र” असे म्हणण्याऐवजी “पवित्र अपवित्र ठरविणारे तुम्ही कोण?” ही घोषणा का देऊ नये? अर्थात याची दुसरी बाजू म्हणजे जस्टीस मार्शल यांनी दिला तसा त्यांनाही विवाहाचा अधिकार दिलाच तर त्यातही गहजब करण्यासारखे काही नाही.
मानवी मर्यादा आणि स्वीकारशक्तीचे महत्त्व जनुकीय हस्तक्षेपाबाबत, अवांछित विपरीत परिणाम होऊ नयेत व दुरुपयोग केले जाऊ नयेत यासाठी दक्षता बाळगलीच पाहिजे. पण सँडेल यांचा मुख्य मुद्दा अगदी वेगळ्याच प्रकारचा आहे व महत्त्वाचाही आहे. अनाहूताशी औदार्य (ओपननेस टू द अनबिडन) हाच तो मुद्दा आहे. आपल्या वाट्याला आलेले भागधेय हे कटुतेविना स्वीकारता आले पाहिजे व कोणालाही दोष न देता ते प्रेमाने आपलेसे केले पाहिजे. हे जिच्यामुळे जमते तिला आपण स्वीकार – शक्ती असे म्हणू. ही स्वीकार शक्ती चांगल्या जीवनासाठी आवश्यक आहे. तसेच अहंकेंद्रितता कमी होऊन इतरांच्या भागधेयांबाबत सहवेदना वाढण्यासही ही स्वीकार-शक्ती कामी येते इथपर्यंत मला सँडेल यांचा मुख्य मुद्दा अगदी मान्य आहे.
धर्माधिष्ठित संस्कृतीत ईश्वराने दिलेली देणगी म्हणून भागधेयाकडे पाहिले जात असे व अजूनही जाते. सँडेल “देणग्या मान्य करणे” (8/327) क्रिएशनमधली आपली जागा ओळखणे अशी भाषा करतात तेव्हा त्यांचे म्हणणे सार्विक न राहता त्यातून इहवादी वगळले जातात. भागधेय (जे न निवडता वाट्याला आले आहे ते) हाच शब्द मी पसंत करीन. मानवी कर्तृत्वाच्या वा क्षमतेच्या कोणत्याही टप्प्यावर भागधेय हे प्रकरण राहीलच. कार्यकारण भाव हा फक्त गोष्टींकडे ‘सामान्य’ (जनरल) म्हणून पाहतानाच खरा असतो. अनन्य म्हणून पाहता (अमुकच्याच बाबतीत का?) कारणमीमांसा करताच येत नाही. अनन्य व्यक्तीला भागधेय राहतेच. त्यामुळे कर्तृत्वाच्या एखाद्या टप्प्यावर मानवाला मी सर्व-नियंता आहे असे वाटण्याचा धोका नाही. वृत्तीच अहंमन्यतेची असेल तर अगदी प्राथमिक पातळीवरच्या तंत्र- सज्जतेनेही माणसे माजू शकतात. त्यामुळे स्वीकार-शक्ती गमावण्याचा धोका हा जनुकीय हस्तक्षेप शक्य झाल्यानेच वाढेल असे मानण्याचे काही कारण नाही.
कसला तरी विक्रम करून श्रेष्ठ ठरणे, पराक्रम करून इतरांना आपल्या सत्तेखाली आणणे, घोर तपश्चर्या करून अलौकिक सिद्धी प्राप्त करून घेणे या आकांक्षा नेहमीच माणसांना घातक बनवत राहिल्या आहेत. विक्रमवीरांचे कौतुक न करण्याचे, पराक्रमाला थोर न मानता ‘आक्रमक’ मानणे, स्व-पीडनात श्रेयःसंचय होतो असे मानणारा ‘तपश्चर्या’ वाद नाकारणे ही सामाजिक धोरणेच महत्त्वाकांक्षा-ग्रस्त आणि त्यांच्यामुळे त्रस्त अशा दोन्ही प्रकारच्या माणसांना वाचवू शकतील. मुख्य म्हणजे हे सनातन आहे व याचा प्रगतीच्या अमुक टप्प्याशीच असा संबंध नाही.
जनुकीय हस्तक्षेप करून काही अंशी जीन संच ‘निवडता’ आला, असे मानल्यानंतरसुद्धा व्यक्तीने जाणीवपूर्वक आचरण करून स्वतःला घडविण्याचे प्रकरण जीवनातून गायब होण्याचे काही कारण नाही. यासाठी न निवडलेला यादृच्छिक जनुकसंच असतानाचा अनुभव लक्षात घेऊ. अद्याप तरी आपण जनुकीय हस्तक्षेपाविना जन्मलेली माणसे आहोत. आपल्या वाट्याला येणारा जनुकसंच हा आपल्यासाठी मटकाच असतो. तो आपल्या आई- वडिलांच्याही नियंत्रणात नव्हता याने ‘आपल्याला’ फरक पडत नाही. जोपासणूक (नर्चर), परिस्थितींचा संच (सरकमस्टन्सेस) हेही आपल्या वाट्याला येतात (त्यात समाजधुरीणांनी. केलेले मजबूत ‘आराखडे’ ठासून भरलेले असतात.) पण वेळोवेळी निर्णय घेऊन आपण – आपल्यातल्या कोणत्या जीन्स आणि कोणत्या मीम्स चेतवावयाच्या हे निवडपूर्वकच ठरवीत आलेलो असतो. प्रसंग-निवड प्रसंग हे चक्र सतत चालू असते. आपली करंट अकौंट- स्वप्ने आपला कॅपिटल-अकौंट-स्व घडवीत आणलेला असतो. मेटाफिजिकली काहीही असो आपल्या जाणिवेत आपल्या आत्मचरित्राची जी स्टोरी असते ती संकल्प-स्वातंत्र्याचीच असते. समजा आपल्याला कोणी अचानक असे सांगितले की तुझा संच काही अंशी रचित होता तरी आता आपण पुढे कसे जायचे यात फरक पडेल? अमुक-जीन संभाव्यता असलेले आई-वडील ‘लाभणे’ हे भागधेयच होते. ‘त्यात अमुक आवड असलेले’ ही भर पडेल. पण आजही जोपासणुकी (नर्चर) बाबत ‘अमुक आवड असलेले’ हा ताप असतोच की! सँडेल म्हणतात. (8/327) “जे आईबाप आपल्या मुलाचा ‘आराखडा’ तयार करतात ते त्या त्यांच्या मुलाची स्वाधीनता, स्वातंत्र्य, बळकावतात यात वादच नाही.” बळकावयाला अशी स्वाधीनता मुळात असतेच कोठे? आईवडील सध्या आराखडा करू शकत नाहीत हे खरे. पण यावरून मुले स्वतः तो तयार करतात असे आहे की काय? दुसरीकडे प्रौढ अपत्यालासुद्धा निवडस्वातंत्र्य नाकारणारे आई-वडीलही आढळतात. शिवाय त्यांच्या जोडीला धर्मगुरू, राज्यकर्ते व नैतिक कोतवाल वगैरे मंडळीही असतातच. मुळात आराखडा करण्यालाच सँडेल यांचा विरोध असेल असे वाटते. पण सँडेल पुढे लगेचच असेही म्हणतात की, (8/ 328) “जी.ई. वापरून जे आईवडील आपल्या मुलाच्या तब्येतीची काळजी घेतात ते स्वतःला ‘आराखडाकार’ समजत नाहीत.” कशावरून समजत नाहीत? बिघाड टाळण्यासाठी केलेला आराखडा हा ‘आराखडा’ नसतो, पण सुधार व्हावा म्हणून केला कीच तो आराखडा हा ‘आराखडा’ ठरतो हे कसे?
नाझींनी चालवलेले सुप्रजनन हे दमनाने लादलेले होते व त्याची दिशा वांशिक कत्तलीची होती म्हणून ते निषेधार्ह होते यावर सँडेल सहमत होत नाहीत. दमन आणि कत्तल या गोष्टी नसल्या तरीही “ते तितकेच तिरस्करणीय आहे” (8/328) असे ते म्हणतात. सुप्रजनन हे प्रकरण जनुक अभियांत्रिकीवर अवलंबून आहे असे मानता येत नाही. आजही विवाह ठरविताना ज्या काही गोष्टी ‘पाहून’ घेतल्या जातात त्यात सुप्रजनन हा विचार नसतो काय? गर्भसंस्कार हे प्रकरण काय आहे? त्यात तथ्य नसेल पण वृत्ती तीच आहे ना? “मुलगा हवा असेल तर डावे वृषण बांधून ठेवावे हा सल्ला आरिस्टॉटल देतो” (8/326) यातही तथ्य नाहीच पण वृत्ती गर्भजलपरीक्षेमागे असते तीच आहे. अंगचे गुण वाढवता आले तर “मानवी प्रयत्नांना दुय्यम ठरविण्याचा तो सोपा मार्ग ठरेल’ (8/326) असे सँडल म्हणतात. पण मग आजही परिश्रमाने कमावलेल्या गुणांचे कौतुक करावे मात्र ‘देणगी’ म्हणून लाभलेल्या गुणांचे कौतुक करू नये, हे पथ्य पाळायला हवे. पण सँडल जी. ई. पूर्व देणग्यांबाबत . जे कौतुक केले जाते त्याचा निषेध करत नाहीत. सँडेल म्हणतात तसे नम्रता, जबाबदारी व बंधुत्व (8/329) यांचे महत्त्व वाढवणारे राजकारण करायला हवेच आहे. त्यासाठी विक्रम, पराक्रम आणि तपश्चर्या यांचे अवडंबर कमी करायला हवे. पण त्यासाठी सँडेलना त्यांची अत्यंत आवडती गोष्ट सोडावी लागेल व ती म्हणजे सामाजिक संकेतांची प्रतिष्ठा.