[श्री सीताराम दातारांचे अन्धश्रद्धाविनाशाय हे विवेकवादी भूमिकेचे पद्यरूप आपण गेल्या अंकापासून क्रमशः देत आहोत. पहिल्या भागात 56 कडव्यांमधून (1) मानवाची वैशिष्ट्ये, (2) मानवांपुढील समस्या, (3) मानवाची उपाययोजना, (4) मानवाने कल्पिलेले ईश्वराचे स्वरूप, (5) ईश्वरविषयक सत्याची विस्मृती, (6) जनमानसावर ईश्वरकल्पनेचा प्रभाव, (7) सत्यवाद्यांचा पक्ष, (8) नास्तिकांच्या मतें सृष्टीतील विषमतेचे स्पष्टीकरण, (१) आस्तिकांचे कर्मसिद्धान्ताद्वारे स्पष्टीकरण, (10) नास्तिकांचा आक्षेप, (11) आस्तिकांचे उत्तर, (12) यावर नास्तिकांची प्रतिक्रिया. (अंक 21.9, डिसेंबर 2010.) हे विभाग दिले होते. दुसऱ्या भागात 54 कडव्यांमधून (13) प्रत्यक्षप्रमाण व अनुमानप्रमाण (14) प्रत्यक्षप्रमाणाविषयी शंका (15) शंकेचे निरसन (16) प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांनी ईश्वरादि कल्पनाचे परीक्षण (17) शब्दप्रमाणपरीक्षा (18) श्रद्धा, अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा (19) काही अंधश्रद्धा हे विभाग दिले होते. तिसऱ्या भागात 55 कडव्यांमधून (20) ज्योतिषशास्त्राच्या आधाराने लोकांची फसवणूक (21) नास्तिकांच्या शंका व चिंता (22) इतर काही अंधश्रद्धा (23) आस्तिकांचे तर्कहीन विचार व आचार (24) अंधश्रद्धा का बाळगू नये? – (अंशतः) हे विभाग दिले होते. आता अंधश्रद्धा का बाळगू नये? हा भाग पूर्ण करून प्रयत्नवाद व सत्यान्वेषण यांचे महत्त्व सांगून श्री दातार उपसंहाराने हा प्रकल्प पूर्ण करीत आहेत. • संपादक ] अंधश्रद्धा पुन्हा नाही व्यक्तिसीमित केवळ सामाजिक तिचे रूप वर्धमान सदोदित ॥ 166 अभ्यास सोडुनी छात्र, कर्तव्ये सोडुनी जन अमोल काळ दवडीत देवद्वारात तिष्ठती ॥167 गायनी नर्तनी भक्त नवरात्रादि उत्सवी ध्वनिक्षेपक लावून पीडिती बहुतां जनां ॥168 कला-क्रीडा-परीक्षांत, कामांत यश लाभण्या श्रम सोडूनि, मंत्राचा तंत्राचा करिति वापर ॥169 विसरून मनुष्यत्व बुद्धिमत्ताहि आपुली बुद्धिहीनापरी लोक वागती, हे व्यथाकर ॥170 अंधश्रद्धा-अंकितांचे सारे तनमनोधन स्वार्थी, लुच्चे, बुवाबाबा हातोहात लुबाडती ॥171 पुढारी, शेठजी, चोर, स्वार्थसाधनतत्पर करताना दुराचार देवधर्महि पाळती ॥172 देवकृपेवरी ज्यांचा असा विश्वास ते कसे भीती न ईश्वरी कोपा, करिता दुष्ट वर्तन ? ॥173 म्हणोनी देव वा त्याच्या कृपाकोपादि कल्पना असत्य असती, हे, ही मंडळी पूर्ण जाणती ॥174 म्हणून अंधश्रद्धा अन् दैववाद त्यजूनिया प्रयत्नवादा स्वीकारू, जगू मानवसदृश ॥175
25) प्रयत्नवाद पंचेंद्रिये यथाशक्ती प्रयत्न करुनी स्वता मिळवावे नरे ज्ञान गुरुंपासून पुष्कळ॥176 ज्ञान, बुद्धी, यदृच्छाही, वार्तालाप गुरुंसवे आणि प्रयत्न हे पाच यशादींचे नियामक ॥177 कृपा वा रोष कोणाचा यशादींचे न कारण मंत्र, तंत्रे, जपें, यज्ञे यशः प्राप्ति न होतसे ॥178 ‘बंधूहि आपुले तैसे, वैरी आपण आपुले’ गीतावचन हे राहो मौलिक स्मरणी सदा ॥179 ‘इतुकेच विधात्याने ललाटी लिहिले सुख’ असे मानून कोणीही कधी स्वस्थ बसू नये ॥180 विघ्नां न जाता शरण प्रयत्नांनी अखंडित तयां शरण आणावे श्रीकृष्णें कालिया जसे ॥181 दैवी लीला म्हणोनीया प्रयत्नपरिवर्जन मूक स्वीकार दैवाचा पुरुषास न शोभतो ।।182
26) सत्याचा शोध घेताना अन्वेषणाचे महत्त्व विश्वोत्पत्ती-स्थिती-नाशासंबंधी ज्ञान सम्यक होण्याआधी जगामध्ये नाना आहेत कल्पना ।।183 जसे विशाल हे विश्व, तसे सूक्ष्महि ते असे याचे ज्ञान असे गूढ, तितके ते अपारही ॥184 अनुमानें व प्रयोगें कळते ते हळूहळू त्याचे साधन विज्ञान, नाही शब्द, श्रुती, स्मृती ॥185 शास्त्रज्ञ करिती जैसे संशोधन तसे तसे जाणवे सत्य विश्वाचे क्रमाने अधिकाधिक ॥186 जे काही धर्मग्रंथांनी, पूर्वसूरींनि मांडले’ ते ते परंपरावादी सत्य मानून चालती ॥187 अनेक शतकांपूर्वी अपुऱ्या साधनांनिशी आपल्या पूर्वजांनी जे येथ सिद्धान्त मांडले ॥188 कौतुकास्पद ते सारे प्रज्ञेच्या गूढतेमुळे तथापि ते कसे सारे ठरावे सत्य अंतिम ? ॥189 विधाने पूर्वसूरींची यांपैकी अल्पशी तरी असत्य ठरणे शक्य, प्रयोगें साधनें नव्या ॥190 आज जे वाटते सत्य, उद्या खोटे ठरू शके जसे न्यूटन – सिद्धान्त पुढती ठरले तसे ॥191 संशोधन-प्रक्रियेत अटळ क्रम हा असे म्हणून काहि सिद्धान्त होती, अग्राह्य मागुती ॥192 संशोधन-प्रक्रियेला खळ ना अंत ना असे सत्य ‘अंतिम’ हे ऐसे यामुळे चूक मानणे ॥193 वास्तवेन विरुद्धा चेत् कल्पना प्रथमं कृता । रम्या भव्याऽथवा दिव्या त्यक्तव्या सा विवेकतः ॥194 अनेक जीर्ण सिद्धान्त साचल्या डबक्यापरी गतिहीन बनोनी ते उपयोगी न राहती ॥195 नवीन सत्यज्ञानाने त्याज्य ज्यापूर्वकल्पना दुराग्रहें त्यां निर्बुद्ध, उराशी कवटाळिती ॥196 विज्ञाना विमुखी होत पाळते जे परंपरा राष्ट्र ते प्रगतीशून्य, नष्ट होणार निश्चयें ॥197 विज्ञानाभिमुखी होत परिवर्तनशील जे अद्ययावत ते राष्ट्र साधेल प्रगती महा ॥198 असा स्वातंत्र्यवीरांनी मांडिला सुविचार जो ‘सत्य तो’ म्हणुनी ग्राह्य, ‘तयांचा’ म्हणुनी नव्हे ॥199
27) उपसंहार अंधश्रद्धापरित्याग, पुरुषस्त्रीसमानता जात्यादिभेद-उच्छेद, कुटुंबाचे नियोजन ॥200 विज्ञाननिष्ठा, ज्ञानाचा प्रसार सकलां जनी संशोधन अविश्रांत, श्रमयज्ञ निरंतर ॥201 प्रगती भारताची या असे जर अपेक्षित अशा व्रतांचा स्वीकार व्हावा आळस सोडुनी ॥202 ‘निष्काम’, ‘मोक्ष देणाऱ्या’ कर्माहून असे बरे ते कर्म जे असे योग्य मानवाच्या हितास्तव ॥203 आरंभ अंधश्रद्धेचा, विस्तार जनमानसी परिणाम तसे घोर, वर्णिले मी सविस्तर॥204 अंधश्रद्धाविनाशाची जरूरी कथिली तिचा करा विचार, आचार, प्रचार, पटले तर! ॥205 करोत मनना सारे समाजहितचिंतक दातार मी विनवितो सीताराम पुन्हा पुन्हा॥206 वाचून हे विचाराला होती प्रवृत्त वाचक तर माझे लागतील सार्थकी श्रम अल्पसे ॥207