पु.ल.: तुमचं घराणं या विषयावर काय मत आहे? भीमसेन : माझं स्वतःचं काय आहे, की मी डेमॉक्रॉटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आईवडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढं ठेवलं तर ती पोपटपंची होते. मग आपलं काही तरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे
. पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य वाटतं की, तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत तुम्ही जी रचना केलीत, त्याच्यामध्ये नवीनपण आहे. नावीन्य याचा अर्थ की जुन्या घोड्याला शिंगं काढली म्हणजे घोडा काढला असा त्याचा अर्थ नाही.
भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करीत करीत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. प्रत्येक गायक हेच करतो. कारण माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो. कोणी मोठा असतो. पण असं केल्याशिवाय स्वतंत्र होऊ शकत नाही. [ भीमसेन जोशींच्या पु.ल. देशपाड्यांनी घेतलेल्या आणि राम कोल्हटकरांनी संग्रहीत केलेल्या मुलाखतीतून. साभार : लोकसत्ता, 25 जाने. 2011.]