‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ हे शब्द पश्चिम महाराष्ट्रात उच्चारले गेले, तर प्रतिसाद कपाळावर आठ्यांचा तरी असतो, किंवा तुच्छतेने हसण्याचा तरी हे प्रतिसाद बहुतेककरून प्रश्नाच्या अपुऱ्या आकलनातून येतात. मुळात विदर्भ राज्य ही संकल्पना कोणत्या आधारावर मांडली जाते, हे स्पष्ट करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी नरेंद्र लांजेवारांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत विदर्भ राज्य संकल्पना नावाच्या पुस्तिकेतून प्रकाशित केली गेली (विसा बुक्स, veesabooks@gmail.com, रु.50/-).
सुरुवातीला एका प्रस्तावनेतून लेखकद्वय विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाची तोंडओळख करून देतात. हे आवश्यक आहे, कारण “महाराष्ट्रालाच इतिहास आहे तर इतर प्रांतांना केवळ भूगोल आहे” असे गर्वाने सांगणाऱ्यांनाही बहुधा शिवाजीच्या आधीचा इतिहास सुचलेला नसतो.