[श्री सीताराम दातारांचे अन्धश्रद्धाविनाशाय हे विवेकवादी भूमिकेचे पद्यरूप आपण गेल्या अंकापासून क्रमशः देत आहोत. पहिल्या भागात 56 कडव्यांमधून (1) मानवाची वैशिष्ट्ये, (2) मानवांपुढील समस्या, (3) मानवाची उपाययोजना, (4) मानवाने कल्पिलेले ईश्वराचे स्वरूप, (5) ईश्वरविषयक सत्याची विस्मृती, (6) जनमानसावर ईश्वरकल्पनेचा प्रभाव, (7) सत्यवाद्यांचा पक्ष, (8) नास्तिकांच्या मतें सृष्टीतील विषमतेचे स्पष्टीकरण, (१) आस्तिकांचे कर्मसिद्धान्ताद्वारे स्पष्टीकरण, (10) नास्तिकांचा आक्षेप, (11) आस्तिकांचे उत्तर, (12) यावर नास्तिकांची प्रतिक्रिया. (अंक 21.9, डिसेंबर 2010.) हे विभाग दिले होते. दुसऱ्या भागात 54 कडव्यांमधून (13) प्रत्यक्षप्रमाण व अनुमानप्रमाण (14) प्रत्यक्षप्रमाणाविषयी शंका (15) शंकेचे निरसन (16) प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांनी ईश्वरादि कल्पनाचे परीक्षण (17) शब्दप्रमाणपरीक्षा (18) श्रद्धा, अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा (19) काही अंधश्रद्धा हे विभाग दिले होते. आता लोकांची फसवणूक, त्यासंदर्भातील शंका व चिंता इ. विषय घेतले आहेत. संपादक ]
20) ज्योतिषशास्त्राच्या आधाराने लोकांची फसवणूक फलज्योतिषशास्त्री जो जनविश्वास सर्वथा अंधश्रद्धा तीहि घोर तिचे कावेहि पाहुया ॥ 100 नवग्रहाधीन साऱ्या जीवांचे पूर्ण जीवन भूतासवे वर्तमान तदाधीन भविष्यही ॥101 ग्रहांच्या दुष्ट व क्रूर, शांतीची तरतूदही मंत्रतंत्रबलिस्तोत्रें सिद्धांनी कल्पिली असे ॥ 102 ग्रहशांतिनिमित्ताने जनां अज्ञां लुबाडणे व्यवसाय असा सध्या भरभराटीस येतसे ॥ 103 गरजू, दुबळे, भोळे, दरिद्री, त्रस्त संकटें अनाथ षड्रिपुग्रस्त, रोगी आणिक भाविक ॥ 104 असे नाना व्यथांनी हे पीडिले जन या जगी उपाय दुःखमुक्तीचा मात्र कोणी न जाणती ।।105 ‘ग्रहभावें दुर्दैवें दुःखे उपजती जगी’ भुलोनी या प्रचाराला धावती ज्योतिष्यांकडे ॥ 106 सत्ता, आरोग्य, संपत्ती, विवाह, गृह, संतती यांचे इच्छुक, ते होती, ज्योतिष्यांचे जणूं बळी ॥ 107 बाबा, बुवा, गुरू, देवी, योगी, दैवज्ञ, मांत्रिक तथाकथित ज्ञानी हे बहुधा धूर्त दांभिक ॥108 कामपूर्ती इच्छिणारे अंधश्रद्ध नि भाविक लबाड बनियांचे या, ठरती खास ग्राहक ॥ 109 ग्रहशांतिनिमित्ताने नाना ढोंगे करून हे करिती ग्राहकांचे त्या पुरे शोषण भीषण ॥110
21) नास्तिकांच्या शंका व चिंता कसे जीवन जीवांचे वर्तमान भविष्य वा बंधनी जे स्वतः बद्ध, घडवू शकती ग्रह ? ॥ 111 ग्रहस्थिती जन्मकाळी ठरवे जन्मपत्रिका व्याख्याच जन्मकाळाची परि नाही सुनिश्चित ॥ 112 मस्तकाच्या बालकाच्या, देहाच्या पूर्ण दर्शना गर्भाधानक्षणा किंवा जन्माचा काळ मानिती ॥113 जन्मकाळच हा जेथे वादास्पद चिरंतन जीवनक्रम जीवाचा कसा सांगेल पत्रिका ? ॥ 114 सिझेरिन्च्या प्रयोगाने बाळाचा जन्म आपण इष्टदेशी इष्टकाळी घडवू शकतो अता ॥ 115 असते जर प्राण्यांचे ग्रहाधीनच जीवन असते घातले जन्मा बाळाला इष्ट तेधवा ॥116 ना चंद्र ग्रह ना सूर्य, राहू-केतू न वास्तव, कालांतरें ज्ञात होती, ग्रहगोल नवे नवे ॥117 अशा स्थितीत स्वीकार्य फलज्योतिष कसे ठरे? परी त्याच्याच आधारे जनां ठकविती शठ ॥118 भारतात विवाहास येई मंगळ आडवा विदेशात परी त्याचा नसे कैसा उपद्रव ? ॥ 119 ह्या शास्त्री ‘मंगळा दुष्ट’, ‘शनीला क्रूर’ मानिती बदनाम उगा होती ग्रह हे निरुपद्रवी ॥ 120 पाहता न मुहूर्ता वा पत्रिका, घडतात जे विवाह न यशस्वी ते सारे होतात का जगी? ॥ 121 विवाह जेवढे होती पाहूनी जन्मपत्रिका होतात काय ते सारे यशस्वी जीवनात या ? ॥ 122 अशी शंकाहि ज्ञात्यांच्या चित्ती कैशी न येतसे? जाणते करिती कैसे बुद्धीचाहि न वापर? ॥123 पत्रिकाजुळणी आणि विवाहाची यशस्विता यांचा अन्योन्यसंबंध मुळीच म्हणुनी नसे ॥ 124
22) इतर काही अंधश्रद्धा अशाच आणखी काही कल्पना रूढ जाहल्या अंधश्रद्धाश्रिता साऱ्या तर्काशी न सुसंगत ॥ 125 ‘अनुरूप ग्रह स्थानां वास्तूची रचना हवी’ असा दावा मांडतात वास्तुशास्त्रविशारद ॥ 126 दाव्यास या उपेक्षन घरे जी जी उभारली तेथे सर्वत्र लोकांचे दुःखी कष्टी जिणे नसे ॥ 127 शास्त्रानुसार या, ज्यांनी घरे, वास्तू उभारल्या त्या सर्वांचे कुठे आहे दुःखवर्जित जीवन ? ॥ 128 अंतर्ज्ञान, चमत्कार, मृता संजीवनी पुन्हा वरशापादि, दृष्टान्त, तसे जारण मारण ॥ 129 पिशाच, डाकिनी, भूत आदि योनी विलक्षण देती प्राण्यां सुखे दुःखे तुष्ट वा रुष्ट तेधवा ॥ 130 अणिमा, लघिमा, प्राप्ती, ऐशा सिद्धीहि या जगी खऱ्याच असती ऐसा जनां विश्वास वाटतो ॥131 ‘गणराया दूध प्याला’, ‘फळ हातून जन्मले’, ‘पळाले रोग स्पर्शाने’, ‘पाण्याचे तेल जाहले’ ॥ 132 नित्य ऐसे चमत्कार, येती कानी नि वाचनी अजाण भोळे जनही तयांना सत्य मानिती ॥133 प्रत्यक्षे, अनुमाने वा या साऱ्या झूठ कल्पना विश्वासा त्यांवरी सुज्ञ अंध श्रद्धाच मानिती ॥134
23) आस्तिकांचे तर्कहीन विचार व आचार निसर्गनियमें सृष्टिव्यवहार सुनिश्चित अपवाद क्वचित् तेथे नियमें तोहि निश्चित ॥135 वस्तु-संकोच – विस्तार थंडी नि गरमीमुळे जलप्रसारण जसा नियमा अपवाद या ॥ 136 वस्तुस्थितीत या ऐशा, चमत्कार कसा घडे? असा विचार सुज्ञांच्या मनी कैसा न येतसे? ॥ 137 निसर्गाने मानवाला दिली बुद्धी विलक्षण सारासारविचाराही तो होतो पारखा कसा? ॥138 स्तुती करून देवाची मागणे मागती जन करून वश लाचेने अधिकाऱ्या जसे जगी ॥139 विकाऊ, लाचखाऊ हा असेल जर ईश्वर अलौकिकत्व त्याचे ते सांगा कोठे कसे उरे? ॥ 140 श्रद्धेवर विसंबून, बुद्धिसामर्थ्य सोडुन शहाणे निर्णया घेती याहुनी दुःख कोणते? ॥141 अंधश्रद्धेतले दोष, धोके जाणून घेउया स्वीकार वा अस्वीकार, तिचा त्यावरती ठरे ॥142
24) अंधश्रद्धा का बाळगू नये? – अंधश्रद्धा त्याज्य कैशी? सवाल पडता असा त्याचे उत्तर जाणूया आता विस्तारपूर्वक ॥ 143 जीवनी अटळ श्रद्धा, परी डोळस ती हवी अंधश्रद्धा समाजाच्या सर्वनाशास कारण ॥ 144 असावे सर्व शास्त्रांचे ध्येय सत्यगवेषण अंधश्रद्धा त्यात बाधा फार मोठी भयावह ॥145 या चराचर सृष्टीच्या जन्मस्थितिलयादिचे एकमात्र असे सत्य, यात शंका असू नये ॥146 त्या संबंधात कालौघी तर्क झाले बरेचसे तशीच तत्त्वज्ञाने अन् धर्म झाले तथाविध ॥147 तत्त्वज्ञानप्रणेते ते धर्मसंस्थापनाकर विचारवंत ते सारे सत्यदर्शनइच्छुक ॥148 मतभेदें तयांतील ‘जाणता सत्य वस्तुचा असे एकच (वा कोणी नसे)’ हे स्पष्ट होतसे ॥149 ‘विश्वसत्य अम्हां ठावे’ असे सारेच सांगता कोणाचे तत्त्व मानावे ‘हेच सत्य’ म्हणोनिया ? ॥ 150 आततायी स्वधर्मांधां दुसरा धर्म ना सहे त्यामुळे जगती होती धर्मयुद्धे भयानक ॥ 151 असते सर्व धर्मांना ज्ञात एकच सत्य ते धर्मनामें नृसंहार का केला असता कुणी ? ॥ 152 अद्यापि म्हणुनी वाटे गूढ ते सत्य अंतिम तयाच्या निश्चयासाठी पुढेही यत्न होतिल ।।153 श्रद्धा धर्मावरी एका कोणत्याही म्हणूनच अंधश्रद्धाच ती ऐसे स्पष्ट माझे असे मत ॥ 154 बुद्धिनिष्ठ विचाराने आचारानेहि तत्सम मनुष्याचे मनुष्यत्व प्रकर्षे सिद्ध होतसे ॥155 अंधश्रद्धा मनुष्याच्या मनुष्यत्वास घातक म्हणून सुजनांनी ती टाळावी यत्नपूर्वक ॥ 156 मुळात अंधश्रद्धेला विचाराचेच वावडे जात्याच त्यामुळे तीही अविचारच पोसते ॥ 157 क्षुधार्त असता लाखो, यज्ञी अन्नसमर्पण बळी वा मूक जीवांचे ठरती न्याय्य का कधी? ॥ 158 संयोग सुखदुःखांचा जीवनी सुमनोहर यदृच्छा आणि जीवांचे कर्म ही त्यास कारण ॥ 159 यदृच्छा जी यदृच्छा ती, योगायोगच निव्वळ ग्रह, कर्म, पापपुण्य, दैव ना तीस कारण ॥ 160 ‘ईश्वराच्या तोषरोषें सुखदुःखादि जन्मती’ कल्पना ही अशी लोकी अंधश्रद्धेमुळे रुजे ॥ 161 अंधश्रद्ध जनांचा ह्या व्यवहारहि दूषित बुद्धी, शक्ती, द्रव्य, काळ यांचा तो सर्वनाशक ॥ 162 विसरून प्रयत्नांना, देती दैवास दूषण निर्णयाची नसे शक्ती, परप्रत्ययनेयता ॥ 163 विस्मृती पुरुषार्थांची, आत्मविश्वासलोपही तसे परावलंबित्व, अंधश्रद्धाफळेच ही ॥ 164 फसती ना फसविती अंधश्रद्ध असूनही अशा अल्पजनांनीही करावे खोल चिंतन ॥ 165 (अपूर्ण)