[आमचे जुने वर्गणीदार व हितचिंतक सीताराम दातार यांनी अंधश्रद्धेबाबत विवेकवादी भूमिका श्लोकबद्ध केली आहे. मूळ संस्कृत रचना ‘अन्धश्रद्धाविनाशाय’ या नावाने असून तिचे समश्लोकी मराठी रूपांतर ‘अन्धश्रद्धा निर्मूलनार्थ’ या नावाने आहे. याशिवाय ‘For the eradication of superstitions’ नावाने इंग्रजीत गद्यरूपात प्रत्येक श्लोकाचा अर्थ विशद केला आहे. या प्रचंड परिश्रमाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. हे काम पूर्ण होताच श्री दातारांनी आम्हाला हा मजकूर पाठवून योग्य वाटेल तसा उपयोग करण्याची परवानगीही दिली, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. येत्या काही अंकांमधून आम्ही या काव्याचा मराठी भाग प्रकाशित करत आहोत. श्री दातारांना पूर्ण त्रैभाषिक मजकूर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास आम्ही जमेल ती मदत करू, असे आश्वासनही आम्ही त्यांना दिले आहे. श्री दातारांनी सोबतच एक आवाहन केले होते, ते असे –
मित्रहो, माझी ‘अंधश्रद्धाविनाशाय’ ही मूळ संस्कृत रचना व तिचा मराठी आणि इंग्रजी अनुवाद आपणांस मिळालेले आहेतच. माझे बंधू, ती. ना. भा. दातार, माझे प्रिय मित्र श्री. अ. द. मराठे व ‘आजचा सुधारक’ या मसिकाच्या संपादकमंडळावर असलेले आदरणीय श्री. दिवाकर मोहनी यांनी या प्रदीर्घ रचना परिश्रमपूर्वक वाचून त्यांत काही सुधारणा सुचविल्या, याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. त्यांतील मला पटलेल्या सुधारणा जश्याच्या तश्या घेऊन व काहींबद्दलचे योग्य आक्षेप लक्षात घेऊन त्यात मला योग्य काटतील अशा सुधारणा मी करू इच्छितो. खाली त्या सुधारणांची यादी दिली आहे. आपण कृपया आपल्याजवळील प्रतीत त्या सुधारणा करून घेण्याची तसदी घ्यावी, अशी नम्र विनंती. आपला सी. भा. दातार [आम्ही मराठी भागातील सुधारणा करूनच छापत आहोत. -संपादक] अंधश्रद्धाविनाशाय (भाग 1) 1) मानवाची वैशिष्ट्ये – आहारनिद्राभयमैथुनादि तसेच कामादि विकारभाव समस्त प्राण्यांत सदा समान मनुष्यप्राण्यात तथापि तीव्र ॥1 विचारशक्ती, त्रिविधा नि बुद्धी निसर्गदत्ता मनुजास संपदा अशा विकारें, अणि संपदेने सर्वांहि प्राण्यांत मनुष्य श्रेष्ठ ॥2
2) मानवांपुढील समस्या – तथापि याने सुचती सदैव इच्छा नि तृष्णा मनुजास नाना परंतु साऱ्याच पुऱ्या न होती भयेहि नाना छळिती तयास ॥3 अपूर्व कल्पनाशक्ती, भव्य कल्पकता तशी यांचीही देणगी त्याला निसर्गाने दिली असे ॥4 शक्ती या असती प्राप्त प्राण्यांनाही नरेतर क्वचित् विपत्तीसमयी त्यांचे साह्यहि घेत ते ॥5 अपूर्व शक्ति या देती मानवां सुख-दुःखही मानवेतर प्राण्यांत स्थिति ऐशी न आढळे ॥6 कृषी, वास्तू, वस्त्र, यान, वैद्यकी, अभियांत्रिकी विद्युत्, गणित, भूगर्भ, जीवशास्त्र, खगोलही ॥7 अशा क्षेत्रीं मानवाने साधली नवनिर्मिती भव्य कल्पकता-शक्तीचे हे त्याच्या असे फळ ॥8 मानवेतर प्राण्यांना जी भये नच माहिती कल्पनाजन्य त्या भीती मानवांना पछाडती ॥9 भयमुक्ती हेतुपूर्ती साधावी कोणत्या परी हे न निश्चित ठावे यां नरां प्रज्ञा असूनही ॥10
3) मानवाची उपाययोजना म्हणोनि ईश्वरी शक्ती त्याने बुद्ध्याच कल्पिली जिने हरावी भीति अन् करावी हेतुपूर्तता ॥11 ‘इच्छापूर्ती करो देव, भयही आपुले हरो’ यासाठी मानवें त्याला दिधले गुण अद्भुत ॥12
4) मानवाने कल्पिलेले ईश्वराचे स्वरूप सर्वज्ञत्व, समानत्व, सर्व सामर्थ्यसंपदा सर्वसाक्षित्व, सर्वत्र अस्तित्वहि असो तया ॥13 या चराचर विश्वाची उत्पत्ती, स्थिति वा लय यांचा कर्ता एकमेव तोच ऐसेही कल्पिले ॥14 दयाळू, सर्वभूतात्मा, सर्वभूतहितीं रत सर्वभूतप्राणदाता, शक्तिबुद्धिप्रदायक ॥15 पूजने, स्तुतिभक्तीने, तपोयज्ञे, जपादिकें प्रसन्न भगवंताला शरणार्थी करू शके ॥16 जर कोणी करी निंद्य विचारोच्चारवर्तन क्रुद्ध होउनि त्याला तो करी उचित शासन ॥17 आदि नाही, अंत नाही, गुण वा रूपही न त्या परी इष्ट गुणांरूपां स्वेच्छें प्राप्त करू शके ॥18 परमात्मा, परब्रह्म, भगवान्, प्रभु, ईश्वर अशी अनेक नावे त्या ईश्वरा दिधली नरें।॥19 देवाची कल्पना ऐशी, एवंगुणविशिष्ट त्या हळू हळू मान्य झाली, कालौघात जगी जनी ॥20
5) ईश्वरविषयक सत्याची विस्मृती स्वार्थासाठी नरें केली देवाची कल्पना अशी या सत्याची परी लोकां जाहली विस्मृती पुरी ॥21 6) जनमानसावर ईश्वरकल्पनेचा प्रभाव – मग कर्तृत्व देवाचे, लीला, शाप तसे वर कल्पूनिया कथाकाव्यपुराणांतून वर्णिले ॥22 वाचुनी ऐकुनी ऐशा लीला अद्भुत ईश्वरी . तयाच्या भजनी लागे इच्छा पुरविण्या नर ॥23
7) सत्यवाद्यांचा पक्ष – तथापि सत्यप्रिय बुद्धिवंता तो देव, त्याचे गुण वा न मान्य त्यांच्या मतें ते नच सिद्ध होती प्रत्यक्ष वा तर्कप्रमाणयोगें ॥24 जगातले या जर सर्व जीव खरेच देवा असती समान रूपागुणांनी अगदी विभिन्न असे कसे तो घडवील जीव? ॥25 कुणी गोरा, कुणी काळा, कुणी स्थूल, कुणी कृश उंच कोणी, खुजा कोणी, प्राज्ञ कोणी, कुणी खुळा ||26 शूर कोणी, कुणी भीरू, वक्ता वा मुखदुर्बळ सशक्त देखणा कोणी, कुरूप दुबळा दुजा ॥27 जर एकाच देवाने निर्मिले जीव सर्वही तर हे भेद का कैसे तयाने निर्मिले असे? ॥28 जन्मांध, बहिरी, पंगू बालके जन्मती कशी ? जीवांचे अपमृत्यू वा घडतात कशामुळे? ॥29 तृण-जल-संतोषांनी तुष्टां मृग-मीन-सज्जनां छळिती कोळी, व्याध नि दुर्जन निष्कारण कासया जगामाजी? ॥30 सुखाने जगती दुष्ट, सज्जनां मात्र यातना हा कसा न्याय देवाचा? असेल जर तो कुठे ॥31
8) नास्तिकांच्या मतें सृष्टीतील विषमतेचे स्पष्टीकरण- ‘वैषम्य’ योजिती शब्द ‘असमत्व’ निदर्शना तथापि वेगळ्या अर्थी घेती नास्तिक शब्द तो ॥32 नास्तिकांचे मतें येथे वर्ण्य त्या विषयामधे ‘सृष्टिसंभूत वैविध्य’ शब्द हा दाखवीतसे ॥33 सृष्टीमधील वैषम्य नास्तिकांच्या मतें असे निसर्गाचे रूप मात्र, तया देव न कारण ॥34 संयोगें बीज-भूमीच्या रोपाला गुणरूप ये परिस्थिति-स्वभावाने भेद जीवांपरी तसे ॥35
9) आस्तिकांचे कर्मसिद्धान्ताद्वारे स्पष्टीकरण जीवांची गुणरूपे अन् सुखदुःखादिबद्दल मीमांसा करिती भिन्न, देवसिद्ध्यर्थ आस्तिक स्वभाव, गुणरूपादि जीवांचे अन् परिस्थिती पूर्व वा प्राप्त जन्मीच्या कर्मांनी होत निश्चित ॥37 बरे-वाईटसे कर्म करतो जीव जीवनी तसे फळ तया लाभे त्या जन्मी अथवा पुढे ॥38 जर जीवास ये मृत्यू न कर्मफल भोगता पुनश्च जन्मतो जीव या लोकी तेच भोगण्या ॥39 जन्म-कर्म – मृती, पुढती कर्माचे फळ भोगण्या पुनर्जन्म, पुन्हा कर्म, चक्र ऐसे निरंतर ॥40
10) नास्तिकांचा आक्षेप – जीवाच्या आद्यजन्माच्या पूर्वी जन्म असंभव अभावें पूर्वजन्माच्या पूर्वकर्म न, ना फल ॥41 आद्यजन्मात नसता कर्माचे भोगण्या फल गुणरूपादि जीवांचे त्या जन्मी ठरते कसे? ॥42
11) आस्तिकांचे उत्तर – आद्यजन्म असा काही अस्तित्वात नसे जगी जन्माआधी कोणत्याही पूर्वजन्महि निश्चित ॥43 परीघस्थित बिंदूत आद्यबिंदू जसा नसे तसाच जन्मचक्रात आद्यजन्म असा नसे ॥44 ‘करणार न मी कर्म’, कोणीहि न वदू शके कर्माविणे न जगती जीवमात्र जगू शके ॥45 कर्म द्विविध, जीवांचे जगती या भलेबुरे धर्माधर्म तया नावे पुण्यपाप तयां फळे ||46 पुण्यें लाभे स्वर्ग जीवां, पापें नरक लाभतो सरता पुण्य वा पाप, जन्मे जीव जगी पुन्हा ॥47 निष्कामकर्माचरणा जर जीव करू शके जन्म – मृत्यु – पुनर्जन्म – चक्रातून सुटेल तो ॥48 देह आणिक आत्मा हे असती वेगवेगळे देहामधील चैतन्या आत्मा म्हणति आस्तिक ॥49 आदि-अंत नसे आत्म्या, असे आत्मा सनातन जन्मतो, मरतो जीव, आत्मा नाही कधीच तो ॥50 निर्मिले परमात्म्याने आब्रह्मस्तंब विश्व हे परमात्मांश जीवात्मा, जसा स्फुल्लिंग अग्नीचा ॥51
12) यावर नास्तिकांची प्रतिक्रिया- ज्यांनी हे रचिले जाळे ते हुषार महामती तर्कसंगत किंवा ते, विश्वासार्ह मुळी नसे ॥52 वेदोपनिषदे गीता, ब्रह्मसूत्रादि वाङ्मय आधार या विचाराचा मोठा म्हणुनि मानती ॥53 जैन बौद्धादि शास्त्रांना परि संमत तो नसे लोकायतिक चार्वाक यांनीही तो झुगारला ॥54 सर्वमान्यत्व नाही त्या भारतातहि ग्राह्यता शब्द हाचि तदाधार प्रमाणच नसे मुळी ॥55. बुद्धिनिष्ठ परी झाले संख्येने अल्प ते जरी करिती या विचारांचे बुद्धिनिष्ठ परीक्षण ॥56
क्रमश: सूचना पहिल्या वीस वर्षांचे बांधीव अंक लवकर उपलब्ध होणार आहेत. संचाची किंमत रु.5000/- (पोस्टेजसह) (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) असेल. इच्छुकांनी कृपया डिमांड ड्राफ्टने किंमत पाठवावी. चेकने पाठविल्यास वटणावळीपोटी रु.50/- जास्तीचे द्यावे. ज्यांनी पूर्वी 1-14 किंवा 1-17 खंड घेतले असतील त्यांना हवे असल्यास त्यापुढील खंड प्रतिवर्षाप्रमाणे उपलब्ध आहेत. कार्यकारी संपादक