‘आपल्या पूर्वजांच्या काळाकडे पाहण्याच्या दोन दृष्टी असतात. एक अभिमानाची व दुसरी केवळ ऐतिहासिक किंवा विवेकाची. अभिमानाच्या दृष्टींत बऱ्यावाईटाचा विवेक नसतो; आणि कांहीं एका मर्यादेपर्यंत जुन्याचा अभिमान बाळगणें हें स्वाभाविकच नव्हे तर योग्यहि ठरतें. अभिमानाच्या दृष्टीला स्वकीयांच्या इतिहासरूपी पर्वतांचीं सर्वांत उंच शिखरें कर्तृत्वरूपी बर्फानें मढवलेलीं व कीर्तिरूपी उज्ज्वल सूर्यप्रकाशांत चमकणारी तेवढीच दिसतात. कारण अभिमान दुरून आणि केवळ कौतुकबुद्धीनें पाहणारा असतो. ऐतिहासिक किंवा चिकित्सक बुद्धि ही जवळ जाऊन शोधक बुद्धीनें पाहणारी असल्यामुळें तिला त्या पर्वतांच्या शरीरांचा खडबडीतपणा, त्यांतील खोल व भयंकर दऱ्याखोरीं, त्यांतील हिंस्र श्वापदें, विषारी वृक्ष, कांटेरी वेली, हें सर्व कांहीं दिसतें. व शोधावें लागतें.” [मराठे व इंग्रज, न. चिं. केळकर, 1918 ]