(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार)
सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, “करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झाले हे मान्य करा.” हे बोलत असताना ‘शेवटी इष्ट ते घडले’ याचा त्यांना होणारा सात्त्विक आनंदही मला दिसत असतो. पण ते मान्य करण्याच्या अवस्थेत मी अजूनही नाही; अजूनही मी मुख्यतः मार्क्सवादी व थोडासा गांधीवादी आहे. माझ्या आकलनाप्रमाणे मार्क्स व महात्माजी हे दोघेही विशाल अर्थाने मानवतावादी होते. सामान्य माणसावर लादला गेलेला अन्याय व पिळवणूक आणि त्यांतून निर्माण होणारे त्याचे दारिद्रय, दुःख व असहायता या रोगावर ते इलाज शोधीत होते. मार्क्सच्या उपचारपद्धतीत वर्गलढा, संप, सामाजिक मालकी वगैरे केंद्रस्थानी, पण अॅलोपॅथिक डॉक्टरांप्रमाणे प्रसंगी शस्त्रक्रिया करायलाही त्याची मान्यता; तर महात्माजींच्या उपचारपद्धतीत अहिंसक सत्याग्रह, स्वावलंबन, विश्वस्तवृत्ती वगैरे केंद्रस्थानी व आयुर्वेदिक वैद्याप्रमाणे पथ्यविचारावर भर. दोघांचेही अंतिम लक्ष्य मानवी ऐक्याची व बंधुभावाची निर्मिती हेच होते. मार्क्स पाश्चात्त्यांची जडवादी, विज्ञाननिष्ठ व ऐतिहासिक विश्लेषणाची अर्वाचीन परंपरा पाठीशी घेऊन ते लक्ष्य गाठू पाहत होता; तर महात्माजी भारतातील आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा पाठीशी घेऊन तिकडे जाऊ पाहत होते. मार्क्सचा एखादा विचार प्लेटो किंवा सर टॉमस मोर यांच्यातही मिळेल आणि महात्माजींचे काही विचार व्यासात व संतांतही भेटतील. मार्क्स, महात्माजी किंवा कोणताही थोर विचारवंत जे विचार मांडतो त्या बंदिस्त संकल्पना आहेत असे न समजता, त्या चैतन्यशील व विकासशील खुल्या संकल्पना आहेत असे मी मानतो. अशा दृष्टीने पाहिले की वेगळ्या परिस्थितीत वेगळ्या आह्वानांना तोंड देण्याची व त्याकरिता आवश्यक ते बदल आत्मसात करण्याची त्या विचारधारांची क्षमता आपल्या प्रत्ययाला येऊ लागते. मग मार्क्सने वापरलेल्या ‘पिळवणूक’ या शब्दाचा अर्थ ‘भांडवलदारांनी कामगारांची केलेली पिळवणूक’ एवढ्यापुरताच मर्यादित न राहता जगभर पुरुषांनी स्त्रियांची केलेली पिळवणूक, स्पृश्यांनी अस्पृश्यांची केलेली पिळवणूक, गोऱ्यांनी निग्रोंची केलेली पिळवणूक, प्रगत राष्ट्रांनी अप्रगत राष्ट्रांची चालवलेली पिळवणूक या सर्वच गोष्टींना पोटात घेऊ लागलो. किंबहुना चांगले पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बलशाली संघटना जेव्हा ‘अधिकाच्या हव्यासाने’ संप करून समाजाला वेठीला धरते तेव्हा माझा मार्क्सवाद तोही पिळवणुकीचाच एक प्रकार समजतो. सोव्हिएत रशियाचे विघटन किंवा तेथील कम्युनिस्ट पार्टीची घसरण म्हणजे मार्क्सवादाचा पराभव नव्हे; मार्क्सच्या मूळ हेतूपासून फारकत घेणाऱ्या धोरणांचा व सत्तेचा तो पराभव आहे. त्याचप्रमाणे देशाचे विभाजन किंवा काँग्रेसची परवड म्हणजे गांधीवादाचा पराभव नव्हे. पिळवणुकीविरुद्धच्या संघटित व प्रभावी लढ्याचा सर्वश्रेष्ठ अर्वाचीन प्रवर्तक म्हणून मी मार्क्सला मानतो. जोपर्यंत आपल्या लोकशाहीत जमीनदारनिर्मित सशस्त्र सेनेकडून अनेक भूमिहीन शेतमजुरांना बायकामुलांसह एकत्र कोंडून गोळ्या घालून ठार मारण्यात येते, धनदांडग्या राष्ट्रांच्या आर्थिक नियोजनाचा दृश्य परिणाम झोपडपट्टीतील अर्धनग्न पोरांपर्यंत पोचलेला मला दिसत नाही, तोपर्यंत माझा मार्क्सवाद इतिहासजमा होणार नाही. तसेच जोपर्यंत आपल्या समाजातील हिंसाचार व भ्रष्टाचार सतत वाढतो आहे आणि आपल्या समाजातील सुशिक्षित व कर्तबगारवर्ग आपल्या आचरणातून आत्यंतिक व्यक्तिवाद, संपत्तीची अधिकाधिक हाव, चैनबाजी, वशिलेबाजी व मूल्यहीनता याचाच आदर्श सामान्य जनतेपुढे ठेवीत आहे, तोपर्यंत माझा गांधीवादही इतिहासजमा होणार नाही, जो सोव्हिएत रशियामध्येही खऱ्या अर्थाने होऊ शकला नाही. जो सोव्हिएत रशियामध्येही खऱ्या अर्थाने होऊ शकला नाही तो मार्क्सप्रणीत मानवी ऐक्यावर, बंधुभावावर व समतेवर आधारित पिळवणूकमुक्त, वर्गविहीन, विज्ञाननिष्ठ, संपन्न समाज कदाचित पुढेमागे आपल्या या लोकशाही मार्गांनीच निर्माण झाला, तरी महात्माजींच्या काही विचारांची प्रस्तुतता संपणार नाही. पूर्णांशाने सुसंस्कृत होण्यासाठी शेवटी माणसाला आपल्या काही मूलप्रवृत्ती आटोक्यात ठेवणे आवश्यकच ठरेल; नाहीपेक्षा अधिकाच्या न संपणाऱ्या हव्यासात तो आपले आंतरिक समाधान व शांती हरवून बसेल.