निसर्गाचे मनापासून रक्षण केले आहे लोकांनी. अमेरिकेत, युरोपात, जपानात पर्यावरणाच्या रक्षणाची पावले उचलली गेली, ती सारी लोकांच्या पुढाकारातून. ह्या पर्यावरणाच्या प्रेमातून जगभर दुसरीही एक चळवळ सुरू झाली. माहिती हक्काची. वेगवेगळ्या देशांत गेल्या काही दशकात माहिती हक्काचे कायदे पारित करून घेण्यात पर्यावरणवाद्यांनीच मुख्य भूमिका बजावलेली आहे.
ही माहिती हक्काची चळवळ लोकशाहीच्या पुढच्या टप्प्यातल्या प्रगतीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.ही वाटचाल चालू आहे प्रातिनिधिक लोकशाहीकडून प्रत्यक्ष लोकशाहीच्या दिशेने. पुण्यात लोकमान्य टिळक गरजले होते; “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.’ हे लोकांचे स्वतःचे राज्य म्हणजे काही लोकप्रतिनिधींची मनमानी नाही. निवडणुका हे लोकशाहीचे केवळ एक साधन आहे आणि तेही फार सदोष साधन आहे. स्वराज्य म्हणजे स्वतः निर्णय घेण्याची संधी. लोकतंत्रात लोकांनी निर्णयप्रक्रिया अधिकाधिक प्रमाणात स्वतःच्या हातात घेतलीच पाहिजे. ह्या दिशेने बदल घडवून आणणे, हा तर आहे दुसरा, निकडीचा, स्वातंत्र्यलढा. माहिती हक्क ही या लढ्याची सुरुवात आहे. ह्या हक्कासाठी लढणाऱ्यांचे आज होत असलेले खून दाखवतात की ही वाट तशी बिकट वाट आहे. पण धोपट मार्गाला सोडून आपण प्रत्यक्ष लोकशाहीकडे नेटाने प्रवास करत राहिलो, तरच आपण खरेखुरे स्वतंत्र होऊ हेही उघड आहे.
[साप्ताहिक साधना ११ सप्टेंबर २०१० मधील टेकड्या आणि विकासाची ठेकेदारी या माधव गाडगीळांच्या लेखातून, साभार ]