अणुकचरा आणि जैतापूर प्रकल्पः वास्तव व त्यासंदर्भातील एकवीस वैज्ञानिक प्रश्न

दै. लोकसत्ता दि.२१ जुलै २०१० मध्ये माजी शास्त्रज्ञ रवींद्र काळे यांनी ‘अणुकचरा : भीती व वास्तव’ हा लेख लिहिला आहे. या विषयावर वैज्ञानिक चर्चा होणे, विशेषतः जैतापूरच्या संदर्भाने, हे खरोखरच अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वीच्या काळात भारताच्या अणुकार्यक्रमाबाबत काटेकोर व परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा गुप्ततेच्या कारणांमुळे कधीच होऊ शकली नाही हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. जैतापूर हा नागरी ऊर्जाप्रकल्प आहे आणि त्यामुळे त्यात गुप्ततेची आवश्यकता नाही. अशा प्रकल्पांबाबत गुप्तता राखणे हे लोकहिताचेही नाही. अशा कोणत्याही प्रकल्पाच्या सर्व अंगांबाबत परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा झाल्याशिवाय असा प्रकल्प पुढे जाणे देशहिताचेही नाही. इंडियन स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई, लोकविज्ञान संघटना, मुंबई श्रमिक संघ (सी.आय.टी.यू.) आणि कोकण बचाव समिती यांनी जैतापूर प्रकल्पाला सात अतिमहत्त्वाचे वैज्ञानिक आक्षेप घेतलेले आहेत. ज्यात अणुकचरा हा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. या सर्व सात आक्षेपांवर वैज्ञानिक चर्चा होणे आवश्यक आहे. या लेखात फक्त अणुकचऱ्याबाबतच्या चर्चेची सुरुवात करीत आहोत.
१)उपलब्ध माहितीचे सर्वेक्षण करणे, त्याची वस्तुनिष्ठता तपासून पाहणे आणि त्याआधारे विज्ञानासाठीचे आणि देशासाठीचे महत्त्वाचे प्रश्न ठरवून त्यांची मांडणी करणे यांतून कोणत्याही वैज्ञानिक चर्चेची सुरुवात झाली पाहिजे. असे अणुकचऱ्याबाबतचे एकवीस महत्त्वाचे प्रश्न आम्ही येथे विचारीत आहोत. श्री. रवींद्र काळे आणि जैतापूर प्रकल्पाच्या इतर समर्थकांनी यांची उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा आहे. २) चेर्नोबिलच्या १९८७ च्या अपघातात झालेला किरणोत्सार हा हिरोशिमा बाँबच्या किरणोत्साराच्या ३००-४०० पट होता हे खरे आहे का? त्यानंतर २३ वर्षांनंतरही चेर्नोबिलपासून किमान ३० कि.मी. ते कमाल ७५ किमीच्या त्रिज्येचा परिसर हा एक्सक्ल्युजन झोन आहे आणि तेथे मानवांना राहण्यास संपूर्ण बंदी आहे, हे खरे आहे का? ३) या एक्सक्ल्युजन झोनमध्ये येणारे प्रिप्याट हे शहर किरणोत्सर्गामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, युक्रेन व बेलारूस या दोन राष्ट्रांमधील कित्येक लक्ष हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त झाली आणि आजही तेथे
शेती करता येत नाही, हे खरे आहे का? ४) ऊर्जेसाठीच्या एका अणुभट्टीत दरवर्षी २५-३५% अणुइंधनाचे रॉडस् बदलावे लागतात. त्यामुळे १००० मेगावॉट क्षमतेच्या अणुभट्टीत दरवर्षी २५-३० टन तीव्र प्रतीचा अणुकचरा तयार होतो आणि तो काही वर्षे प्रकल्पस्थानी पाण्याखाली साठवावा लागतो. हे खरे आहे का? ५) जैतापूर प्रकल्प हा चेर्नोबिलच्या अपघातग्रस्त अणुभट्टीच्या क्षमतेच्या दहा पट मोठा आहे आणि ४-५ वर्षांच्या वापरानंतर काही हजार हिरोशिमा बाँबइतका किरणोत्सारी साठा अणुकचऱ्याच्या रूपात माडबनच्या स्थानावर जमा होईल हे खरे आहे का ? ६) ९/११ च्या अमेरिकेतील अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकन शासनाने एक अभ्यास केला आणि त्यातून असे निष्पन्न झाले की अणुकचऱ्याच्या साठ्यावरील अतिरेकी हल्ल्याची शक्यता ही अणुभट्टीतील अपघातापेक्षा खूप जास्त आहे. हा धोका लक्षात घेऊन २००५ मध्ये अमेरिकन शासनाने आपल्या अणुऊर्जेसंबंधीच्या कायद्यात काही मूलभूत बदल केले, हे खरे आहे का ? अमेरिकन काँग्रेसने केलेल्या या अभ्यासात असे नमूद केले आहे की अणुकचरा ज्या पाण्याखाली साठवला आहे असे पाणी जर अतिरेकी हल्ल्यात वाहून गेले तर अणुकचरा पेट घेऊन चेर्नोबिलसारखा अणुउत्सर्ग होऊ शकतो. हे खरे आहे का ? ८) अणुकचरा साठवणुकीवरील अशा प्रकारचा अतिरेकी हल्ला माडबनमध्ये झाल्यास चेर्नोबिलपेक्षा अनेकपट जास्त किरणोत्सर्ग होऊ शकतो, हे खरे आहे का? ९) असे झाल्यास एक्सक्ल्युजन झोनची किमान त्रिज्या १०० कि.मी. असू शकते, म्हणजेच एक्सक्ल्युजन झोनमध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे पूर्ण जिल्हे आणि गोवा, उत्तर कर्नाटक, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व रायगड यांची अनेक शहरे, गावे व लाखो हेक्टर शेतजमीन समाविष्ट होऊ शकते, हे खरे आहे का? १०) जैतापूरच्या अणुभट्टया पुरवीत असलेल्या अरेवा कंपनीने त्यांच्या अंतर्गत कागदपत्रांमध्ये हे कबूल केलेले आहे की त्यांच्या ई.पी.आर.अणुभट्टया आणि अणुकचरा साठा यंत्रणा ही अतिरेकी हल्ल्यांपासून सुरक्षित नाही, हे आपणांस माहीत आहे का ? ११) भारतामध्ये अतिरेकी हल्ल्याची शक्यता अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे असे आपणांस वाटते का? नीरी या संस्थेने तयार केलेल्या पर्यावरणविषयक अहवालाचा (ई.आय.ए.रिपोर्ट) सखोल अभ्यास आपण केला आहे काय ? १२) या ई.आय.ए.मध्ये अणुकचऱ्यावरील फेरप्रक्रियेचा (रिप्रोसेसिंग) कोणताही उल्लेख नाही हे आपणांस माहीत आहे काय ? १३) अणुकचयावर फेरप्रक्रिया न केल्यास त्यातील किरणोत्सर्गी पदार्थ कमीतकमी १०,००० वर्षे अतिघातक व धोकादायक अवस्थेत राहणार, ही गोष्ट खरी आहे का? “विविध तीव्रतेचा घन अणुकचरा पोलादी डब्यांमध्ये ठेवून काँक्रीटमध्ये बंदिस्त करून भूगर्भातील खड्ड्यांमध्ये साठवला जाईल. तेथे तो १०० वर्षांपर्यंत सुरक्षित राहील’ असे ई.आय.ए.च्या पृष्ठ क्र.३६९ वर म्हटले आहे. १०० वर्षांनंतर पुढील हजारो वर्षांच्या त्याच्या साठवणुकीबाबतचा आणि सुरक्षिततेचा कोणताही उल्लेख इ.आय.ए.मध्ये कोठेही नाही, हे खरे आहे का? अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगाने केलेल्या प्रदीर्घ अभ्यासानंतर अणुकचऱ्याची दीर्घकालीन साठवण करण्यासाठी अमेरिकेने १९८२ साली यक्का पर्वताची निवड केली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षिततेचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी गेल्या २८ वर्षांत ४०,००० कोटी रुपये खर्च केले. त्या जागचे भूगर्भातील खडक अणुकचरा साठवण्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे या अभ्यासातून आता निष्पन्न झाले आहे आणि राष्ट्राध्यक्ष ओबामांनी हा प्रकल्प रद्द केला आहे, हे आपणांस माहीत आहे का? १७) अमेरिका भारताच्या तीन पट मोठी आहे आणि त्यांची लोकसंख्या भारताच्या १/३ पेक्षा कमी आहे. तरीही तेथेही अणुकचऱ्याच्या दीर्घकालीन साठवणुकीसाठी योग्य जागा सापडतलेली नाही, हे खरे आहे का? १८) अरेवा कंपनीची मातृभूमी असलेल्या फ्रान्समध्ये गेल्या ६० वर्षांच्या शोधप्रयत्नांनंतरही अणुकचऱ्याच्या दीर्घकालीन साठवणुकीसाठी कोणतीही सुरक्षित जागा सापडलेली नाही हे खरे आहे का? १९) भारतातही अणुकचऱ्याच्या दीर्घकालीन साठवणुकीसाठी सुरक्षित जागा आजपर्यंत निश्चित केलेली नाही हे खरे आहे काय ? २०) तीव्र प्रतीचा एक किलोग्रॅम अणुकचरा कायमचा साठवला आहे अशी जगातली कोणतीही एक जागा आपण सांगू शकाल काय ? २१) अ) वरील प्रश्नांपैकी कोणताही प्रश्न कमी महत्त्वाचा आहे का?
ब) तसे नसल्यास या प्रश्नांचा ऊहापोह आपल्या लेखात का नाही?

(भौतिकशास्त्रज्ञ)